Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NET. Switch to the NET to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 इतिहास 19-20

19 यहूदाचा राजा यहोशाफाट यरुशलेममध्ये आपल्या घरी सुखरुप परतला. हनानीचा मुलगा येहू हा द्रष्टा होता. तो यहोशाफाटला सामोरा गेला. येहू यहोशाफाटला म्हणाला, “दुष्टांच्या मदतीला तू का गेलास? परमेश्वराचा द्वेष करणाऱ्यांबद्दल तुला आपुलकी का वाटावी? म्हणूनच परमेश्वराचा तुझ्यावर कोप झाला आहे. पण तू काही चांगल्या गोष्टीही केल्या आहेस. या देशातून तू अशेराचे खांब हटवलेस आणि परमेश्वराला अनुसरायचे तू मनःपूर्वक ठरवले आहेस.”

यहोशाफाट न्यायाधीशांची नेमणूक करतो

यहोशाफाट यरुशलेममध्ये राहात असे, त्याने पुन्हा एकदा बैर-शेब्यापासून एफ्राइमच्या डोंगराळ प्रदेशापर्यंत फिरुन लोकांच्या भेटी घेतल्या. त्याने लोकांना पुन्हा एकदा त्यांच्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्याकडे वळवले. तसेच त्याने यहूदामध्ये आणि यहूदाच्या प्रत्येक तटबंदीच्या नगरांत न्यायाधीश नेमले. यहोशाफाटने या न्यायाधीशांना सांगितले, “तुम्ही जे करायचे ते विचारपूर्वक करा. कारण लोकांसाठी नव्हे तर परमेश्वरासाठी तुम्ही न्याय करत आहात. तुमच्या निर्णयाला त्याची साथ असेल. तुम्ही सर्वांनी परमेश्वराचे भय बाळगावे. तुम्ही जे काही कराल ते सांभाळून काळजीपूर्वक करा कारण आपला परमेश्वर देव न्यायी आहे. लोकांच्या बाबतीत तो पक्षपाती नाही. आणि लाच घेऊन न्याय फिरवणे हे ही त्याच्या नीतीत बसत नाही.”

यानंतर यहोशाफाटाने यरुशलेममध्ये काही परमेश्वराचे लेवी, याजक तसेच इस्राएल घराण्यांतील वडिलधारी मंडळी यांना न्यायाधीश म्हणून नेमले. परमेश्वराच्या नियमांना अनुसरुन त्यांनी यरुशलेममधल्या रहिवाश्यांच्या वादांचा निकाल लावायचा होता. यहोशाफाटने त्यांना आज्ञापूर्वक सांगितले की, “परमेश्वराचे भय धरुन विश्वसनीय रितीने आणि मनःपूर्वक ही सेवा करा. 10 वध, कायदा, नियम, आज्ञा, किंवा एखादा न्याय यासंबंधी तुमच्याकडे वाद येतील. हे वाद नगरात राहणाऱ्या तुमच्या बांधवांकडूनच उपस्थित केले जातील. अशा सर्व बाबतीत प्रत्येक वेळी लोकांना सांगा की त्यांनी परमेश्वराविरुध्द पाप करु नये. हे तुम्ही निष्ठेने पार पाडले नाहीत तर तुमच्यावर आणि या तुमच्या भाऊबंदांवर परमेश्वराचा कोप ओढवेल. एवढे करा म्हणजे तुमच्या मनात अपराधभाव राहणार नाही.

11 “अमऱ्या हा मुख्य याजक आहे. परमेश्वराच्या बाबतीतल्या सर्व गोष्टींमध्ये त्याचे वर्चस्व राहील आणि इश्माएलचा मुलगा जबद्या, राजाच्या बाबतीतल्या सर्व गोष्टीविषयी मुखत्यार म्हणून नेमलेला आहे. जबद्या हा यहूदा वंशाचा अधिकारी आहे. लेवी हे लेखनिक कारभारी म्हणून तुमच्या दिमतीला आहेत. जे जे कराल ते धैर्याने करा. उचित तेच करणाऱ्यांना परमेश्वराची साथ असो.”

यहोशाफाटवर युध्दाचा प्रसंग

20 यानंतर मवाबी, अम्मोनी आणि काही मऊनीलोक युध्दाच्या हेतूने यहोशाफाटवर चालून आले. काही लोकांनी येऊन यहोशाफाटला खबर दिली की, “मृतसमुद्राच्या पलीकडून अराम देशाकडून मोठी सेना तुमच्यावर चाल करुन येत आहे. ती हससोन-तामार!” (म्हणजेच एन-गेदी येथे येऊन ठेपली सुध्दा.) यहोशाफाट घाबरला आणि त्याने याबाबतीत परमेश्वराला काय करावे विचारायचे ठरवले. त्याने यहूदामध्ये सर्वांसाठी उपवासाची घोषणा केली. तेव्हा यहूदातून, यहूदाच्या सर्व नगरांमधून लोक यहूदाच्या साहाय्याची परमेश्वराकडे याचना करायला जमले. यहोशाफाट परमेश्वराच्या मंदिरात नवीन अंगणासमोर होता. यहूदा आणि यरुशलेमच्या लोकांमध्ये तो उभा राहिला. तो म्हणाला,

“आमच्या पूर्वजांच्या परमेश्वर देवा, स्वर्गातील परमेश्वर तूच आहेस. सर्व राष्ट्रांमधल्या सर्व राज्यांचा तूच शास्ता आहेस. सगळे सामर्थ्य आणि सत्ता तुझ्या ठायी आहे. कोणीही तुझ्याविरुध्द जाऊ शकत नाही. तूच आमचा परमेश्वर आहेस या प्रदेशातील रहिवाश्यांना तू हाकलून लावलेस. तुझ्या या इस्राएलांदेखतच तू हे केलेस. तुझा मित्र अब्राहाम याच्या वंशजांना तू ही भूमी कायमची बहाल केलीस. अब्राहामाचे वंशज या प्रदेशात राहिले आणि तुझ्या नावाखातर त्यांनी मंदिर बांधले. ते म्हणाले, ‘तलवार, शासन, रोगराई किंवा दुष्काळ यांच्यारुपाने आमच्यावर अरिष्ट कोसळले असता आम्ही या मंदिरासमोर, आणि तुझ्यापुढे उभे राहू. या मंदिराला तुझे नाव दिले आहे. संकटाच्या वेळी आम्ही तुझा मोठ्याने धावा करु. आमची हाक ऐकून तू आम्हाला सोडव.’

10 “पण यावेळी अम्मोन, मवाब आणि सेइर पर्वत या भागातले हे लोक आहेत. इस्राएल लोक मिसरहून आले तेव्हा इस्राएल लोकांना तू त्यांच्या प्रदेशात प्रवेश करु दिला नाहीस. त्यामुळे इस्राएल लोकांनी तिकडे पाठ फिरवली आणि त्यांचे उच्चाटन केले नाही. 11 पण तेव्हाच त्यांचा नायनाट न केल्याचे हे काय फळ मिळाले पाहा, ते आम्हाला आमच्या प्रदेशातून हुसकावून लावायला निघाले आहेत. हा प्रदेश तू आम्हाला बहाल केला आहेस. 12 देवा, या लोकांना चांगले शासन कर. आमच्यावर चाल करुन येणाऱ्या या भल्या थोरल्या सेनेला तोंड द्यायचे सामर्थ्य आमच्यात नाही. आम्हाला काही सुचेनासे झाले आहे. म्हणून आम्ही मदतीसाठी तुझ्याकडे आलो आहोत.”

13 यहूदातील सर्व मंडळी आपल्या बायका आणि तान्ह्या मुलांसकट सर्व मुलाबाळांना घेऊन परमेश्वरासमोर उभी होती. 14 तेव्हा यहजीएल याच्यात परमेश्वराच्या आत्म्याचा संचार झाला. यहजीएल हा जखऱ्याचा मुलगा. जखऱ्या बनायाचा मुलगा. बनाया यईएलचा मुलगा. आणि यईएल मत्तन्याचा मुलगा. यहजीएल लेवी असून आसाफच्या वंशातला होता. या सभेत 15 यहजीएल म्हणाला, “राजा यहोशाफाट, तसेच यहूदा आणि यरुशलेममधील रहिवाश्यांनो, मी काय म्हणतो ते ऐका. परमेश्वराचा संदेश असा आहे. ‘एवढी मोठी सेना पाहून घाबरुन जाऊ नका किंवा काळजी करु नका. हे युध्द तुमचे नव्हे तर परमेश्वराचे युध्द आहे. 16 उद्या त्यांचा सामना करायला जा आणि लढा. ते सीसच्या खिंडीतून वर येत आहेत. दरीच्या टोकाला यरुएल वाळवंटाच्या दुसऱ्या बाजूला तुमची त्यांच्याशी गाठ पडेल. 17 तुम्हाला या लढाईत लढावे असे लागणारच नाही. आपल्या जागी ठाम उभे राहा. परमेश्वराने तुमचे रक्षण केलेले तुम्हाला आढळून येईल. यहूदा आणि यरुशलेम लोक हो, भिऊ नका, चिंता करु नका. परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. तेव्हा उद्या त्यांच्यावर चालून जा.’”

18 यहोशाफाटने मस्तक भूमीपर्यंत लववले. यहूदा आणि यरुशलेममधील सर्व लोक यांनी परमेश्वरापुढे दंडवत घातले. त्या सर्वांनी परमेश्वराची आराधना केली. 19 कहाथ आणि कोरह या घराण्यांतील लेवी इस्राएलच्या परमेश्वर देवाची भजने म्हणण्यास उभे राहिले. उच्च स्वरात त्यांनी परमेश्वराची भजने म्हटली.

20 यहोशाफाटचे सैन्य भल्यासकाळी तकोवाच्या वाळवंटात गेले. ते निघत असताना यहोशाफाट समोर उभा राहून त्यांना म्हणाला, “यहूदा आणि यरुशलेम नगरांमधील लोकहो, ऐका. आपल्या परमेश्वर देवावर श्रध्दा ठेवा आणि खंबीरपणे उभे राहा. परमेश्वराच्या संदेष्ट्यांवर विश्वास ठेवा. जय तुमचाच आहे.”

21 यहोशाफाटने लोकांना प्रोत्साहन दिले व सुचना दिल्या.परमेश्वराचे स्तवन करणारी माणसे त्याने निवडली. परमेश्वर पवित्र आणि कल्याणकारी आहे म्हणून त्याचे स्तवन करण्यासाठी त्याने या गायकांना नेमले. त्यांनी सैन्यासमोर उभे राहून स्तुतिगीते म्हटली. ते म्हणाले,

“परमेश्वराचे स्तवन करा
    कारण त्याची प्रीति सर्वकाळ आहे.”

22 लोकांनी देवाची स्तुतिगीते म्हणण्यास सुरुवात केल्याबरोबर परमेश्वराने चाल करुन आलेल्या अम्मोनी, मवाबी आणि सेइर पर्वतांतील लोकांशी गनिमी काव्याने लढणारी फौज मोक्याच्या जागी बसवली. 23 अम्मोनी आणि मवाबी लोक सेइर पर्वतातल्या लोकांशी लढू लागले. अम्मोन्यांनी आणि मवाब्यांनी त्यांचा पुरता संहार केला. सेइरातल्या लोकांचा बीमोड केल्यानंतर त्यांनी एकमेकांचा नाश केला.

24 यहूदा लोक वाळवंटातील टेहळणीच्या बुरुजापाशी आले. शत्रूचे विशाल सैन्य कुठे दिसते का हे ते पाहू लागले पण त्यांना फक्त जमिनीवर विखुरलेले मृतदेह तेवढे दिसले. कोणीही जिवंत राहिला नव्हता. 25 यहोशाफाट आणि त्याचे सैन्य लुटीसाठी मृतदेहांपाशी आले. त्यात त्यांना खूप गुरेढोरे, धन, कपडेलत्ता आणि मौल्यवान वस्तू मिळाल्या. त्या त्यांनी स्वतःला घेतल्या. लूट एवढी होती की ती यहोशाफाट आणि त्याचे लोक यांना नेता येईना. ती प्रेतांमधून काढून न्यायला त्यांना तीन दिवस लागले. 26 चौथ्या दिवशी यहोशाफाट आणि त्याचे सैन्य बराखच्या खोऱ्यात जमले. याठिकाणी त्यांनी परमेश्वराला, धन्यवाद दिले. म्हणून आजही या खोऱ्याचे नाव “आशीर्वादाचे खोरे” असे आहे.

27 मग यहोशाफाटने समस्त यहूदा आणि यरुशलेम लोकांना यरुशलेम येथे माघारे नेले. परमेश्वराने त्यांच्या शत्रूंचा पाडाव केल्यामुळे त्यांच्यात आनंदीआनंद पसरला होता. 28 यरुशलेमला येऊन ते सतारी, वीणा व कर्णे घेऊन परमेश्वराच्या मंदिरात गेले.

29 परमेश्वराने इस्राएलच्या शत्रु सैन्याशी लढा दिला हे ऐकून सर्व देशांमधल्या सर्व राज्यांमध्ये परमेश्वराविषयी धाक निर्माण झाला. 30 त्यामुळे यहोशाफाटच्या राज्यात शांतता नांदली. देवाने यहोशाफाटला सर्व बाजूंनी स्वास्थ्य दिले.

यहोशाफाटच्या कारकीर्दीचा अस्त

31 यहोशाफाटने यहूदा देशावर राज्य केले.तो राज्यावर आला तेव्हा तो पस्तीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेमवर पंचवीस वर्षे राज्य केले. यहोशाफाटच्या आईचे नाव अजूबा ही शिल्हीची मुलगी. 32 आपले वडिल आसा यांच्याप्रमाणेच यहोशाफाट योग्य मार्गाने वागला.त्याने तो मार्ग सोडला नाही. परमेश्वराच्या दृष्टीने भले तेच यहोशाफाटने केले. 33 पण उच्चस्थाने काढण्यात आली नव्हती. लोकांनीही आपले मन आपल्या पूर्वजांच्या परमेश्वराकडे वळवले नव्हते.

34 हनानीचा पुत्र येहू याच्या बखरीमध्ये यहोशाफाटच्या बाकीच्या कृत्यांची साद्यंत नोंद आहे. इस्राएलच्या राजांचा इतिहास या ग्रंथातही या गोष्टींचा समावेश करुन त्यांची नोंद केली आहे.

35 इस्राएलचा राजा अहज्या याच्याशी पुढे यहूदाचा राजा यहोशाफाट याने करार केला. यहोशाफाट ने हे वाईट केले. 36 तार्शीश नगराला जायच्या गलबतांबद्दल हा करार होता. एसयोन-गेबर येथे त्यांनी या गलबतांची बांधणी केली. 37 पुढे अलियेजर ने यहोशाफाट विरुध्द भविष्य सांगितले. मारेशा नगरातला दोदावाहू याचा अलियेजर हा मुलगा. तो म्हणाला, “यहोशाफाट, तू अहज्याशी हातमिळवणी केलीस म्हणून परमेश्वर तुझ्या कामांचा विध्वंस करील.” आणि जहाजे फुटली. त्यामुळे यहोशाफाट आणि अहज्या यांना ती तार्शीशला पाठवता आली नाहीत.

रोमकरांस 10:14-11:12

14 परंतु ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याला हाक मारणे त्यांना कसे शक्य होईल? ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर विश्वास ठेवणे त्यांना कसे शक्य होईल? आणि जर कोणी त्यांना उपदेश केला नाही, तर ते कसे ऐकतील? 15 त्यांना पाठविले नाही तर उपदेश करणे त्यांना कसे शक्य होईल? असे लिहिले आहे की, “शुभवार्ता आणणाऱ्याचे पाय किती सुंदर आहेत!”p

16 परंतु सर्वच यहूद्यांनी ती शुभवार्ता स्वीकारली नाही. यशयाने म्हटल्याप्रमाणे “प्रभो, आम्ही ज्या गोष्टी त्यांना सांगितल्या, त्यावर कोणी विश्वास ठेवला?” 17 म्हणून जे ऐकले त्याचा परिणाम विश्वास आणि जेव्हा कोणी येशूविषयी उपदेश केला.

18 परंतु मी म्हणतो, “त्यांनी आमचा उपदेश ऐकला नव्हता काय?” होय, त्यानी ऐकला: आत्मा म्हणतो:

“त्यांच्या आवाजाचा नाद सर्व पृथ्वीवर गेला आहे
    आणि त्यांचे शब्द पृथ्वीच्या शेवटापर्यंत गेले आहेत.” (A)

19 परंतु मी म्हणातो, “इस्राएल लोकांना कळले नव्हते काय?” होय, त्यांना कळले, प्रथम मोशे म्हणतो,

“खरे तर ज्या लोकांचे राष्ट्र नाही त्यांचा उपयोग करुन मी तुम्हांला मत्सरी करीन.
    विश्वासहीन राष्ट्राचा उपयोग करुन मी तुम्हांला राग आणीन.” (B)

20 नंतर यशया फार धीट होऊन म्हणतो,

“जे मला शोधीत नव्हते
    त्यांना मी सापडलो,
जे माझी चौकशी करीत नसत त्यांना मी प्रगट झालो.” (C)

21 परंतु देव इस्राएल लोकांविषयी म्हणतो,

“ज्या लोकानी माझी आज्ञा मोडली,
    आणि मला विरोध केला त्यांच्याकडे सर्व दिवसभर मी आपले हात पसरले आहेत.” (D)

देव त्याच्या लोकांना विसरला नाही

11 तर मग मी म्हणतो, “देवाने आपल्या लोकांना सोडून दिले आहे काय?” खात्रीने नाही! कारण मीही इस्राएली आहे. अब्राहामापासूनचा, बन्यामिन वंशातला. देवाला ज्यांचे पूर्वज्ञान होते त्या इस्राएली लोकांना त्याने सोडून दिले नाही. एलियासंबंधी पवित्र शास्त्र काय म्हणते ते तुम्हांस ठाऊक नाही काय? तो देवाजवळ इस्राएल लोकांविरुद्ध अशी विनंति करतो की, “हे प्रभु, त्यांनी तुझ्या भविष्यवाद्यांना ठार मारले आहे. त्यांनी तुझ्या वेद्या पाडून टाकल्या आहेत, तुझ्या संदेष्ट्यां पैकी मीच एकटा राहिलो आहे. आणि ते माझाही जीव घ्यावयास पाहतात.q परंतु त्याला देवाचे काय उत्तर मिळाले? देव म्हणतो. “ज्यांनी बालापुढे गुडघे टेकले नाहीत अशी सात हजार माणसे मी आपणासाठी राखून ठेवली आहेत.”r

त्याच प्रमाणे हल्ली देवाच्या कृपेच्या निवडीप्रमाणे काही शिल्लक राहिले आहेत. आणि जर तो देवाच्या कृपेचा परिणाम असेल तर तो लोकांच्या कर्माचा नाही. तर देवाची कृपा ही कृपाच राहत नाही.

तर मग काय? इस्राएल लोक जे मिळविण्याचा प्रयत्न करीत होते ते त्यांना मिळाले नाही. परंतु जे निवडलेले त्यांना मिळाले आणि बाकीचे कठीण झाले. पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे:

“देवाने त्यांना बधीरपणाचा आत्मा,” (E)

“पाहू न शकणारे डोळे ऐकू
    न शकणारे कान दिले
आणि आजपर्यंत हे असे चालूच आहे.” (F)

दाविद म्हणतो,

“त्यांचे मेज त्यांस सापळा आणि फास होवो.
    त्यांचे पतन होवो आणि त्यांना अपराधाबद्दल शिक्षा व प्रायश्चित मिळो.
10 दिसू नये म्हणून त्यांचे डोळे अंधकारमय होवोत.
    आणि त्यांच्या कष्टाच्या ओझ्याखाली तू सर्वकाळ त्यांच्या पाठी वाकीव.” (G)

11 म्हणून मी असे म्हणतो, यहूद्यांचा नाश व्हावा म्हणून ते अडखळले नाहीत काय? खात्रीने नाही! त्यांच्या चुकीमुळे विदेशी लोकांना तारण प्राप्त व्हावे आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये ईर्षा उत्पन्र व्हवी म्हणून असे झाले. 12 परंतु त्यांनी केलेल्या चुकीचा अर्थ जगास विपुलता आणि आमचा बोध उपदेश न ऐकल्याने त्यांच्या संख्येत झालेला न्हास याचा अर्थ यहूदीतरास विपुलता तर आमचा बोध स्वीकारल्याने त्यांचा समावेश झाल्यास किती तरी अधिक विपुलता येईल.

स्तोत्रसंहिता 21

प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.

21 परमेश्वरा, तुझी शक्ती राजाला सुखी बनवते
    तू त्याला वाचवतोस तेव्हा सुध्दा तो सुखावतो.
राजाला ज्या गोष्टी हव्या होत्या त्या तूच त्याला दिल्यास.
    राजाने काही गोष्टींची मागणी केली आणि परमेश्वरा, त्याने जे मागितले ते तू त्याला दिलेस.

परमेश्वरा, तू राजाला खरोखरच आशीर्वाद दिलास.
    तू त्याच्या मस्तकावर सोनेरी मुकुट ठेवलास.
त्याने तुझ्याकडे जीवनाची मागणी केली आणि तू ते त्याला दिलेस,
    देवा, तू राजाला कधीही न संपणारे चिरंजीव आयुष्य दिलेस.
तू राजाला विजयी केलेस आणि त्याला गौरव प्राप्त करुन दिलेस.
    तू त्याला मान आणि स्तुती दिलीस.
देवा, तू राजाला अनंत काळासाठी आशीर्वाद दिलास.
    राजा तुझा चेहरा पाहतो तेव्हा त्याला खूप आनंद होतो.
राजाचा परमेश्वरावर विश्वास आहे,
    सर्वशक्तिमान परमेश्वर त्याला निराश करणार नाही.
देवा, तू तुझ्या सर्व शंत्रूना तू किती सामर्थ्यवान आहेस ते दाखवशील.
    तुझ्या सामर्थ्याने तुझा तिरस्कार करणाऱ्यांचा पराभव होईल.
भट्टीतली आग अनेक वस्तू जाळू शकते.
    परमेश्वरा, तू जेव्हा राजाबरोबर असतोस तेव्हा तो भट्टीसारखा असतो.
त्याचा क्रोध अग्नी सारखा जळतो
    आणि तो त्याच्या शत्रूंचा नाश करतो.
10 त्याच्या शत्रूंच्या कुटुंबाचा नाश होईल
    ते पृथ्वीवरुन निघून जातील.
11 का? कारण परमेश्वरा, त्या लोकांनी तुझ्याविरुध्द् वाईट गोष्टींची योजना आखली
    परंतु ते यशस्वी झाले नाहीत.
12 परमेश्वरा, तू त्या लोकांना तुझे गुलाम बनवलेस तू त्यांना दोराने बांधून ठेवलेस.
    तू त्यांच्या मानेभोवती दोर बांधलेस.
    तू त्यांना गुलामाप्रमाणे वाकायला लावलेस.

13 हे देवा, तुझ्या सामर्थ्याने उच्चपदाला चढ
    आपण परमेश्वराच्या महानतेचे गाणे गाऊ या.

नीतिसूत्रे 20:4-6

आळशी मनुष्य बी पेरायचादेखील आळस करतो. म्हणून हंगामाच्या वेळी तो अन्न शोधतो, पण त्याला काहीही मिळत नाही.

चांगला उपदेश हा खोल विहिरीतून घेतलेल्या पाण्यासारखा असतो. परंतु शहाणा माणूस दुसऱ्याकडून शिकण्याचा आटोकाट प्रयत्न करतो.

बरेच लोक आपण प्रामाणिक आणि प्रेमळ आहोत असे सांगतात. पण खरोखरच असा माणूस सापडणे कठीण असते.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center