Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NET. Switch to the NET to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 इतिहास 17-18

यहूदाचा राजा यहोशाफाट

17 आसाच्या जागी आता यहोशाफाट यहूदाचा राजा झाला. यहोशाफाट हा आसाचा मुलगा. इस्राएलला तोंड देता यावे म्हणून यहोशाफाटने यहूदाचे बळ वाढवले. त्याने यहूदाच्या सर्व तटबंदीच्या नगरांमध्ये सैन्याच्या तुकड्या ठेवल्या. आसाने काबीज केलेल्या एफ्राइमच्या नगरांमध्ये तसेच यहूदामध्ये त्याने ठाणी बसवली.

यहोशाफाटला परमेश्वराचा पाठिंबा होता कारण लहान वयातच त्याने आपले पूर्वज दावीद यांच्यासारखी सत्कृत्ये केली होती. तो बाल देवतेच्या भजनी लागला नाही. आपल्या पूर्वजांच्या देवालाच तो शरण गेला. परमेश्वराच्या आज्ञा त्याने पाळल्या. इतर इस्राएल लोकांसारखा तो वागला नाही. परमेश्वराने यहोशाफाटला यहूदाचा खंबीर राजा केले. यहूदा लोकांनी यहोशाफाटसाठी नजराणे आणले त्यामुळे त्याला धन तसेच मानसन्मान मिळाला. परमेश्वराच्या मार्गाने वाटचाल करण्यात यहोशाफाटचे मन रमले. यहूदा प्रांतातील उच्च स्थाने आणि अशेरा देवीचे खांब त्याने काढून टाकले.

आपल्या राज्याच्या तिसऱ्या वर्षात त्याने सरदारांना नगरांमधून लोकांना शिकवण द्यायला पाठवले. बेन-हईक, ओबद्या, जखऱ्या, नखनेल आणि मीखाया हे ते सरदार होत. त्यांच्याबरोबर शमाया, नथन्या, जबद्या, असायेल, शामीरामोथ, यहोनाथान, अदोनीया, तोबीया आणि तोब अदोनीया या लेवींचीही त्याने रवानगी केली. अलीशामा व यहोराम हे याजकही त्याने पाठवले. हे सरदार, लेवी आणि याजक या सर्वांनी लोकांना शिकवले. परमेश्वराच्या नियमशास्त्राचे पुस्तक त्यांनी बरोबर घेतले होते. यहूदातल्या गावोगावी जाऊन ते लोकांना शिकवत गेले.

10 यहूदाच्या आसपासच्या देशांनी परमेश्वराची धास्ती घेतली होती. त्यामुळे त्यांनी यहोशाफाटवर स्वारी करुन युध्दाला तोंड फोडले नाही. 11 काही पलिष्टे यहोशाफाटसाठी भेटी आणत. या राजाचे वर्चस्व ते जाणून असल्यामुळे रुपेही आणत. काही अरबी शेळ्या-मेंढ्या घेऊन येत. त्यांनी असे 7,700 मेंढे आणि 7,700 बोकड त्याला दिले.

12 यहोशाफाटचे सामर्थ्य असे दिवसेंदिवस वाढत चालले. त्याने यहूदात किल्ले आणि कोठारे बांधली. 13 या कोठारांच्या गावांमध्ये त्याने भरपूर साठा केला. यरुशलेममध्ये यहोशाफाटने चांगली लढाऊ माणसेही ठेवली. 14 आपापल्या घराण्यांप्रमाणे त्यांची गणती झालेली होती. ती पुढीलप्रमाणे:

यहूदातील सरदार असे:

अदना हा 3,00,000 सैनिकांचा सेनापती होता.

15 यहोहानानच्या हाताखाली 2,80,000 सैनिक होते.

16 जिख्रीचा मुलगा अमस्या हा त्या खालोखाल 2,00,000 जणांचा मुख्य होता. त्याने आपणहून परमेश्वराच्या सेवेला वाहून घेतले होते.

17 बन्यामिनांच्या वंशातील सरदार असे:

एल्यादाच्या अखत्यारीत 2,00,000 सैनिक धनुष्यबाण आणि ढाली वापरण्यात तरबेज होते. एल्यादा हा एक अतिशय शूर योध्दा होता.

18 यहोजाबादकडे युध्दसज्ज असे 1,80,000 जण होते.

19 ही सर्व फौज राजा यहोशाफाट याच्या सेवेत होती. या खेरीज यहूदाभरच्या नगरांमधील किल्ल्यांवर त्याने माणसे नेमली होती.

मीखायाचा राजा अहाबला इशारा

18 यहोशाफाटला भरपूर धनदौलत आणि मानसन्मान मिळाला. राजा अहाबच्या घराण्याशी सोयरीक जुळवून त्याने त्याच्याशी सलोखा केला. [a] त्यानंतर काही वर्षांनी यहोशाफाट शोमरोन येथे अहाबच्या भेटीला गेला. त्याप्रसंगी यहोशाफाट आणि त्याच्याबरोबरचे लोक यांच्याप्रीत्यर्थ अहाबने बरीच गाईगुरे आणि शेळ्यामेंढ्या यांचे बळी? दिले. अहाबने यहोशाफाटला रामोथ-गिलादावर चढाई करण्यास प्रवृत्त केले. अहाब त्याला म्हणाला, “रामोथगिलादावरील स्वारीत तूही माझ्याबरोबर सहभागी होशील का?” अहाब इस्राएलचा राजा होता आणि यहोशाफाट यहूदाचा. यहोशाफाट त्याला म्हणाला, “तू आणि मी काही वेगळे नाही. माझी माणसे ती तुझीच माणसे. आम्ही अवश्य लढाईत भाग घेऊ.” यहोशाफाट पुढे असेही म्हणाला, “पण त्याआधी परमेश्वराचा आदेशही घेऊ या.”

तेव्हा राजा अहाबने सुमारे चारशे संदेष्ट्यांना बोलावून विचारले, “आम्ही रामोथ-गिलादावर स्वारी करावी की नाही?”

तेव्हा ते संदेष्टे राजा अहाबला म्हणाले, “जरुर जा. कारण परमेश्वर रामोथ-गिलादचा पराभव करील.”

पण यहोशाफाट म्हणाला, “यांच्याखेरीज परमेश्वराचा संदेष्टा इथे कोणी आहे का? परमेश्वराला त्याच्या संदेष्ट्यामार्फतच आपण विचारायला हवे.”

तेव्हा अहाब यहोशाफाटला म्हणाला, “इथे तसा एकजण आहे. त्याच्या मार्फत आपण परमेश्वराला विचारु शकतो. पण मला त्याच्याकडून कधीच अनुकूल संदेश मिळत नाही. नेहमी प्रतिकूल संदेशच तो मला देतो, त्यामुळे मला त्याचा द्वेष वाटतो. त्याचे नाव मीखाया. तो इम्लाचा मुलगा.” पण

यहोशाफाट म्हणाला, “अहाब, तू असे म्हणू नयेस.”

तेव्हा अहाबने आपल्या एका कारभाऱ्याला बोलावून “इम्लाचा मुलगा मीखाया याला लगेच घेऊन यायला सांगितले.”

इस्राएलचा राजा अहाब आणि यहूदाचा राजा यहोशाफाट राजवस्त्रे परिधान करुन शोमरोन नगराच्या वेशीजवळच्या खळ्यात आपापल्या सिंहासनांवर विराजमान झाले होते. त्यांच्यासमोर ते चारशे संदेष्टे भविष्यकथन करत होते. 10 कनानचा मुलगा सिदकीया याने लोखंडाची शिंगे करुन आणली होती. तो म्हणाला, “परमेश्वर म्हणतो ‘अरामी लोकांना या शिंगांच्या सहाय्याने तुम्ही नेस्तनाबृत कराल.’” 11 इतर सर्व संदेष्ट्यांनीही तेच सांगितले. ते म्हणाले, “रामोथ-गिलाद वर चालून जा. तुम्ही विजयी व्हाल. परमेश्वर तुझ्या हातून म्हणजे राजाच्या हातून अराम्यांचा पराभव करील.”

12 मीखायला आणायला गेलेला निरोप्या त्याला म्हणाला, “मीखाया, ऐक सगळ्या संदेष्ट्यांचे म्हणणे एकच आहे. राजाची सरशी होईल असे ते म्हणतात. तेव्हा तूही तसेच म्हणावेस. तू ही चांगले उद्गार काढ.”

13 पण मीखाया म्हणाला, “परमेश्वराची शपथ तो वदवेल तसेच मी बोलणार.”

14 मीखाया मग अहाब राजाकडे आला. राजा त्याला म्हणाला, “मीखाया, आम्ही रामोथ-गिलादवर स्वारी करावी की नाही?”

मीखाया म्हणाला, “खुशाल चढाई करा. परमेश्वर तुमच्या हातून त्यांचा पराभव करवेल.”

15 राजा अहाब मीखायला म्हणाला, “परमेश्वराचे नाव उच्चारुन सत्य तेच सांग असे मी कितीदा तुला निक्षून सांगितले!”

16 यावर मीखाया राजाला म्हणाला, “मेंढपाळाविना मेंढरे असावीत तसे मी इस्राएल लोकांना डोंगरांवर विखुरलेले पाहिले. परमेश्वर म्हणाला, ‘यांना कोणी शास्ता नाही. ही आपापल्या घरी सुखरुप जावोत.’”

17 इस्राएलचा राजा अहाब यहोशाफाटला म्हणाला, “मीखाया मला कधीच परमेश्वराचा शुभसंदेश देत नाही. तो नेहमी प्रतिकूलच बोलतो असे मी तुला म्हणालोच होतो.”

18 मीखाया म्हणाला, “परमेश्वराचा संदेश काय आहे तो ऐका परमेश्वराला मी आपल्या सिंहासनावर बसलेले पाहिले. स्वर्गातील सर्व सेना त्याच्या भोवताली उभी होती. 19 परमेश्वर म्हणाला, ‘इस्राएलचा राजा अहाब याला रामोथ-गिलादावर हल्ला करायला कोण बरे युक्तीने प्रवृत्त करील? म्हणजे अहाबचा तिथेच शेवट होईल.’ परमेश्वराभोवती उभ्या असलेल्या अनेक जणांनी अनेकविध गोष्टी सुचवल्या. 20 मग एक आत्मापुढे आला आणि परमेश्वरासमोर उभा राहून म्हणाला, ‘मी अहाबला फशी पाडतो.’ परमेश्वराने त्या आत्म्याला विचारले, ‘कसे बरे?’ 21 तेव्हा तो म्हणाला, ‘अहाबच्या संदेष्ट्यांच्या तोंडून असत्य वदवणारा आत्मा असे मी रुप घेईन.’ तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, ‘तू अहाबला मोहात पाडू शकशील. चल, जा आपल्या कामगिरीवर.’

22 “अहाब, आता तूच पाहा. परमेश्वराने तुझ्या संदेष्ट्यांच्या तोंडी असत्य बोलणाऱ्या आत्म्याचा संचार केला आहे. तुझ्यावर अरिष्ट येणार असे परमेश्वराने बोलून दाखवले आहे.”

23 तेवढ्यात सिद्कीयाने पुढे होऊन मीखायाच्या थोबाडीत मारले. सिद्कीया हा कनानचा मुलगा. तो म्हणाला, “मीखाया, मला सोडून परमेश्वराचा आत्मा तुझ्याशी बोलायला गेला तो कोणत्या दिशेने?”

24 मीखाया म्हणाला, “सिद्कीया, घराच्या अगदी आतल्या खोलीत तू लपायला पळ काढशील तेव्हा तुला ते कळेल.”

25 राजा अहाब म्हणाला, “मीखायाला नगराचा सुभेदार आमोन आणि राजपुत्र योवाश यांच्याकडे घेऊन जा 26 आमोन आणि योवाश यांना म्हणावे, ‘राजाचे म्हणणे असे: मीखायाला कैदेत टाका. मी युध्दावरुन परतेपर्यंत त्याला भाकर आणि पाणी याखेरीज काहीही खायला-प्यायला देऊ नका.’”

27 मीखाया म्हणाला, “अहाब तू लढाईनंतर सुखरुप परत आलास तर परमेश्वर माझ्यामार्फत बोललेला नाही असे खुशाल समज. लोकहो, माझे हे शब्द लक्षात ठेवा.”

रामोथ-गिलाद येथे अहाबचे मरण

28 इस्राएलचा राजा अहाब आणि यहूदाचा राजा यहोशाफाट यांनी रामोथ-गिलादवर हल्ला चढवला. 29 राजा अहाब यहोशाफाटला म्हणाला, “युध्दात मी वेषांतर करतो. तू मात्र राजवस्त्रेच घाल.” आणि त्याप्रमाणे राजा अहाबने वेषांतर केले आणि दोनही राजे लढाईला भिडले.

30 अरामच्या राजाने आपल्या रथांवरच्यासरदारांना आज्ञा केली होती की, “इस्राएलचा राजा अहाब याच्यावरच फक्त हल्ला करा. बाकी लहान थोर कोणाशीही लढू नका.” 31 त्या सरदारांनी यहोशाफाटला पाहिले तेव्हा त्यांना वाटले, “हाच अहाब इस्राएलचा राजा.” म्हणून त्यांनी यहोशाफाटकडे मोहरा वळवला. पण यहोशाफाट मोठ्याने ओरडला आणि परमेश्वर त्याच्या मदतीला आला. त्याने त्या सरदारांना यहोशाफाटापासून दूर वळवले. 32 हा इस्राएलचा राजा नाही असे सरदारांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी त्याचा पाठलाग सोडून दिला.

33 पण कोण्याएका सैनिकाने सहज म्हणून, लक्ष्य निश्चित न करता, धनुष्यातून एक बाण सोडला आणि तो नेमका चिलखताच्या सांध्यातून अहाबच्या शरीरात रुतला. अहाब आपल्या सारथ्याला म्हणाला, “मागे वळ आणि मला युध्द भूमीतून बाहेर काढ. मी जखमी झालो आहे.”

34 त्यादिवशी घनघोर युध्द झाले. अराम्यांकडे तोंड करुन अहाब आपल्या रथात संध्याकाळपर्यंत टेकून बसला. संध्याकाळी त्याचे प्राणोत्क्रमण झाले.

रोमकरांस 9:25-10:13

25 होशेयाच्या ग्रंथात पवित्र शास्त्र सांगते,

“जे माझे लोक नव्हते,
    त्यांना मी माझे लोक म्हणेन.
आणि ज्या स्त्रीवर प्रीति केली नव्हती
    तिला प्रिय म्हणेन.” (A)

26 “आणि असे होईल की,
    जेथे ‘तुम्ही माझे लोक नाहीत’
    असे म्हटले होते तेथे त्यांना जिवंत देवाची मुले म्हणण्यात येईल.” (B)

27 आणि यशया इस्राएलाविषयी असे ओरडून सांगतो की,

“जरी इस्त्राएलाविषयी मुलांची संख्या
    समुद्राच्या वाळूसारखी असली तरी त्यांच्यातील
फक्त थोडेच तारण पावतील.
28     कारण पूर्ण करुन व आटोपते घेऊन प्रभु पृथ्वीवर आपला शब्द अंमलात आणील.” (C)

29 आणि जसे यशयाने पूर्वी सांगितले होते,

“जर सेनाधीश परमेश्वराने
    आम्हांसाठी बीज राहू दिले नसते तर
आम्ही सदोम
    आणि गमोरासारखे झालो असतो.” (D)

30 तर मग आपण काय म्हणावे? आम्ही असे अनुमान काढतो की, जे यहूदीतर देवाला अपेक्षित असलेल्या नीतिमत्वाच्या मागे लागले नव्हते त्यांना त्यांचे न्यायीपण विश्वासाचा परिणाम म्हणून मिळाले. 31 परंतु इस्राएल लोक जे नियमशास्त्राच्या पालनातून मिळणाऱ्या नीतिमत्वाच्या मागे लागले होते त्यांना नियमशास्त्र मिळाले नाही. 32 का नाही? कारण ते हे नीतिमत्व विश्वासाने नाही तर त्यांनी केलेल्या कर्मांनी मिळेल असे समजून त्याच्या मागे लागले होते व ते अडखळण्याच्या दगडावर ठेचाळले. 33 पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे.

“पाहा मी सीयोनात अडखळण्याचा दगड
    आणि अपाय करणारा खडक ठेवतो.
परंतु जो त्याच्यावर विश्वास ठेवतो
    तो लज्जित होणार नाही.” (E)

10 बंधूनो, इस्राएलाच्या वतीने माझी मनीषा आणि देवाजवळ प्रार्थना आहे की, त्यांचे तारण व्हावे, कारण मी त्यांच्याविषयी साक्ष देतो की, त्यांना देवाविषयी कळकळ आहे, परंतु ती ज्ञानावर आधारित नाही. देवापासून मिळणाऱ्या नीतिमत्वाविषयी त्यांना माहिती नसल्यामुळे ते आपलेच नीतिमत्व स्थापावयास पाहत होते. त्यामुळे ते देवाच्या नीतिमत्वाला वश झाले नाहीत. कारण ख्रिस्त नियमशास्त्राचा शेवट आहे यासाठी की, जे विश्वास ठेवतात त्यांना नीतिमत्व मिळावे.

नियमशास्त्राद्वारे मिळणाऱ्या नीतिमत्वाविषयी मोशे लिहितो, “जो मनुष्य या गोष्टी करतो तो त्याकडून जगेल.” [a] विश्वासाने मिळणारे नीतिमत्व हे सांगते, “तुम्ही आपल्या मनात म्हणू नका की ‘स्वर्गात कोण जाईल?’” (म्हणजे “ख्रिस्ताला खाली आणावयास”) किंवा “‘खाली अधोलोकात कोण जाईल?’” (म्हणजे “ख्रिस्ताला मेलेल्यातून वर आणायला.”)

नाही! शास्त्र काय म्हणते? “ते वचन तुमच्याजवळ, तुमच्या मुखात, तुमच्या अंतःकरणात आहे.” [b] ते वचन हे आहे की, जर तू तुझ्या मुखाने “येशू प्रभु आहे” असा विश्वास धरतोस आणि आपल्या अंतःकरणात देवाने त्याला मेलेल्यांतून उठविले असा विश्वास धरतोस तुझे तारण होईल 10 कारण नीतिमत्वासाठी मनुष्य अंतःकरणाने विश्वास ठेवतो आणि तारणासाठी विश्वासाने कबूल करतो.

11 शास्त्र सांगते, “जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही.” [c] 12 याचे कारण की, यहूदी आणि ग्रीक यांच्यात भेद नाही. कारण प्रभु हा सर्वांचा प्रभु आहे. जे हाक मारतात त्या सर्वांवर दया करण्या इतका तो संपन्र आहे. 13 कारण “जे कोणी प्रभूचे नाव घेऊन हाक मारतील, त्यांचे तारण होईल.” [d]

स्तोत्रसंहिता 20

प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.

20 जेव्हा तुम्ही संकटात असाल तेव्हा परमेश्वर तुमच्या हाकेला धावून
    येवो याकोबाचा देव तुमच्या नावाला महत्व प्राप्त करुन देवो.
देव त्याच्या पवित्र स्थानातून तुम्हाला मदत पाठवो.
    तो तुम्हाला सियोनातून साहाय्य करो.
तुम्ही देवाला जे जे होमबली अर्पण केले
    त्याची त्याला आठवण राहो तुमचे सर्व त्याग तो स्वीकारो.
तुम्हाला जे काही हवे ते देव तुम्हाला देवो.
    तुमच्या सगळ्या योजना तो प्रत्यक्षात आणो.
देव तुम्हाला मदत करेल तेव्हा आम्हाला आनंद होईल.
    देवाच्या नावाचा जयजयकार करु या तुम्ही परमेश्वराला जे जे काही मागाल
ते सर्व तो तुम्हाला देवो अशी मी आशा करतो.

परमेश्वर त्याने निवडलेल्या राजाला मदत करतो हे आता मला कळले.
    देव त्याच्या पवित्र स्वर्गात होता आणि त्याने स्वत:च निवडलेल्या राजाला उत्तर दिले.
    देवाने आपल्या महान सामर्थ्याचा राजाला वाचवण्यासाठी उपयोग केला.
काही लोक त्यांच्या रथांवर भरंवसा ठेवतात आणि काही आपल्या सैन्यांवर विश्वास ठेवतात
    परंतु आम्ही परमेश्वराच्या, आमच्या देवाच्या नावावर विश्वास ठेवतो आणि त्याच्या नावाचा धावा करतो.
त्या दुसऱ्या लोकांचा पराभव झाला.
    ते युध्दात मारले गेले परंतु आपण जिंकलो आपण विजयी झालो.

परमेश्वराने त्या निवडलेल्या राजाला वाचवले.
    देवाने निवडलेल्या राजाने मदतीसाठी हाक मारली आणि देवाने उत्तर दिले.

नीतिसूत्रे 20:2-3

राजाचा राग सिंहगर्जनेसारखा असतो. तुम्ही जर राजाला राग येऊ दिला तर तुम्ही तुमचे प्राणदेखील गमावू शकता.

कुठलाही मूर्ख वादविवादाला सुरुवात करु शकतो. म्हणून जो वादविवादाला नकार देतो त्याचा तुम्ही आदर करु शकता.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center