Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NET. Switch to the NET to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 इतिहास 14-16

14 अबीयाला पुढे आपल्या पूर्वजांसोबत चिरविश्रांती मिळाली. दावीदनगरात लोकांनी त्याचे दफन केले. त्याचा मुलगा आसा हा त्याच्यानंतर राज्य करु लागला. आसाच्या कारकिर्दीत लोकांना दहा वर्षे शांतता लाभली.

यहूदाचा राजा आसा

आसाने परमेश्वर देवाच्या दृष्टीने न्याय्य आणि उचित असा कारभार केला. त्याने मूर्तिपूजेसाठी वापरात येणाऱ्या चमत्कारिक वेद्या काढून टाकल्या. उच्च स्थाने पाडली आणि पवित्र मानले जाणारे स्तंभ फोडून टाकले. आसाने अशेरा देवीचे खांबही उदध्वस्त केले. त्याने यहूदी लोकांना परमेश्वर देवाला अनुसरायची आज्ञा केली. त्यांच्या पूर्वजाचा देव तोच. त्या परमेश्वराने घालून दिलेल्या आज्ञा आणि नियम पाळायला फर्मावले. यहूदाच्या सगळ्या नगरांमधली उच्च स्थाने आणि धूप जाळायच्या वेद्या आसाने काढून टाकल्या. आसाच्या कारकीर्दीत त्यामुळे राज्यात शांतता नांदत होती. या काळात आसाने यहूदात भक्कम तटबंदीची नगरे बांधली. परमेश्वराने शांतता दिल्यामुळे या काळात आसा युध्दमुक्त राहिला.

आसा यहूदातील लोकांना म्हणाला, “ही नगरे बांधून त्याभोवती तटबंदी करु. त्यांना कोट, बुरुज, वेशी आणि अडसर करु. या प्रदेशात आपण राहात आहोत, तेव्हाच हे करु. परमेश्वर देवाला अनुसरल्यामुळे हा देश आपल्याला मिळाला आहे. त्याने आपल्याला स्वास्थ्यही दिले आहे.” तेव्हा त्यांनी ते बांधले व यश मिळविले.

आसाच्या सैन्यात यहूदाच्या वंशातील 3,00,000 जण आणि बन्यामिन वंशातील 2,80,000 लोक होते. यहूदी लोकांकडे मोठ्या ढाली आणि भाले होते. बन्यामिनाकडे लहान ढाली होत्या. तसेच धनुष्य-बाण होते. हे सर्व पराक्रमी आणि बलवान लढवय्ये होते.

पुढे जेरहने आसावर स्वारी केली. जेरह हा कूशी होता. त्याच्या कडे 10,00,000 सैनिक आणि 300 रथ होते. जेरह आपल्या सैन्याला घेऊन थेट मारेशा नगरापर्यंत आला. 10 आसा त्याच्याशी सामना करायला निघाला. मारेशा जवळच्या सफाथाच्या खोऱ्यात त्याने आपले सैन्य उभे केले.

11 आसा आपल्या परमेश्वर देवाला हाक मारुन म्हणाला, “परमेश्वरा, या बलाढ्य सेनेपुढे दुर्बलांना तूच मदत करु शकतोस. तूच आमच्या मदतीला उभा राहा. आम्ही तुझ्यावर भरवंसा ठेवून आहोत. तुझे नाव घेऊनच आम्ही या विशाल सेनेला तोंड देणार आहोत. परमेश्वर देवा, तुझ्यावर कोणी विजय मिळवू नये.”

12 मग परमेश्वराने आसाच्या यहूदा सेनेकडून कूशी सैन्याचा पराभव करवला. कूशी सैन्याने पळ काढला. 13 आसाच्या सैन्याने गरारपर्यंत कुशींचा पाठलाग केला. त्यात कूशींची एवढी प्राणहानी झाली की पुन्हा लढाईला उभे राहायचे बळ त्यांच्यात राहिले नाही. परमेश्वरापुढे आणि त्याच्या सैन्यापुढे ते पार धुळीस मिळाले. आसाच्या लोकांनी कूशींच्या मौल्यवान वस्तू लुटल्या. 14 गरारच्या आसपासच्या सर्व गावांचा आसाच्या सैन्याने पराभव केला. तिथल्या लोकांनी परमेश्वराची धास्ती घेतली. या गावांमध्ये लुटण्यासारखे बरेच काही होते. ते आसाच्या सैन्याने घेतले. 15 मेंढपाळांच्या वस्त्यांवर आसाच्या सैन्याने धाड घातली. तेथून त्यांनी बरीच मेंढरे आणि उंट घेतले आणि ते यरुशलेमला परतले.

आसाने केलेले बदल

15 ओबेदचा मुलगा अजऱ्या याच्यात परमेश्वराच्या आत्म्याचा संचार झाला. अजऱ्या आसाच्या भेटीला गेला आणि म्हणाला, “आसा मी काय म्हणतो ते ऐक. यहूदा आणि बन्यामिन लोकहो, तुम्हीही ऐका. जर तुम्ही परमेश्वराबरोबर राहिलात तर तो तुमच्याबरोबर राहील. जर तुम्ही त्याचा शोध केलात तर तो तुम्हाला भेटेल. पण तुम्ही त्याला सोडलेत तर तो ही तुम्हाला सोडेल. इस्राएलला दीर्घकाळ पर्यंत खरा देव असा नव्हता, तसेच शिकवायला याजक किंवा नियमशास्त्र नव्हते पण अडचणीत सापडल्यावर इस्राएल लोक पुन्हा परमेश्वर देवाकडे वळाले, तो इस्राएलचा देव आहे. त्यांनी देवाचा शोध घेतला आणि त्यांना तो सापडला. त्या धकाधकीच्या काळात कोणीही सुरक्षितपणे प्रवास करु शकत नव्हता. सगळ्याच देशामध्ये अराजकाची स्थिती होती. देश असोत की नगरे सगळी एकमेकांविरुध्द लढत होती. कारण परमेश्वराने सर्व प्रकारच्या संकटांनी त्यांना त्रस्त केले होते. पण आसा, तू व इस्राएल लोकहो तुम्ही हतबल होऊ नका, धीर सोडू नका. यहूदांनो बन्यामिनांनो हिंमतीने वागा. तुमच्या सद्वर्तनाचे फळ तुम्हाला मिळेल.”

आसाला या शब्दांनी आणि ओबेद या संदेष्ट्याच्या संदेशाने धीर आला. त्याने यहूदा आणि बन्यामिनमधील अमंगळ मूर्ती हटवल्या. एफ्राइमचा जो डोंगराळ प्रदेश त्याने ताब्यात घेतला होता त्या प्रदेशातल्या गावांमधल्या मूर्तिही काढून टाकल्या. मंदिराच्या प्रवेशद्वारातील परमेश्वराच्या वेदीची डागडुजी केली.

मग त्याने यहूदा आणि बन्यामिनमधील सर्व लोक तसेच एफ्राइम, मनश्शे व शिमोन वंशातील जे लोक इस्राएल राष्ट्रातून यहूदांत आले होते त्यांना एकत्र बोलावले. आसाचा देव परमेश्वर याची त्याला साथ आहे हे पाहून लोक मोठ्या संख्येने आले.

10 आसाच्या कारकिर्दीच्या पंधराव्या वर्षाच्या तिसऱ्या महिन्यात आसा आणि हे सर्व लोक यरुशलेममध्ये एकत्र जमले. 11 त्यांनी 700 गुरे, 7,000 मेंढरे यांचे बली परमेश्वराला अर्पण केले. ही गुरे आणि लूट त्यांनी शत्रू कडून आणली होती. 12 तिथे त्यांनी जिवाभावाने परमेश्वर देवाची सेवा करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या पूर्वजांचाही देव हाच होता.

13 जो परमेश्वर देवाची सेवा करणार नाही त्याला ठार करण्याचे ठरवले. मग अशी व्यक्ती लहान असो की मोठी, स्त्री असो की पुरुष 14 आसा आणि हे सर्व लोक यांनी परमेश्वरापुढे शपथ वाहिली. त्यांनी मोठ्याने जयघोष केला. कर्णे आणि रणशिंगे या वाद्यांचा नाद केला. 15 मनोभावे शपथ घेतल्यामुळे सर्व यहूदा लोकांना मनापासून आनंद झाला. एकचित्ताने ते परमेश्वराला शरण गेले. त्यांनी देवाचा शोध घेतला असता तो त्यांना सापडला होता. परमेश्वराने त्यांना चहूबाजूंनी स्वास्थ्य दिले.

16 आसा राजाने आपली आई माका हिलाही राजमाता पदावरुन दूर केले. कारण तिने अमंगळ अशा अशेरा देवीच्या स्तंभाची स्थापना केली होती. त्याने तो स्तंभ मोडून तोडून टाकला आणि किद्रोन खोऱ्यात जाळून टाकला. 17 यहूदातील उच्च स्थाने काढून टाकली नाहीत तरी पण तो आमरण परमेश्वराशी एकनिष्ठ राहिला.

18 मग त्याने व त्याच्या वडिलांनी परमेश्वरासाठी करवून घेतलेल्या सोन्याचांदीच्या पवित्र वस्तू पुन्हा मंदिरात आणल्या. 19 आसाच्या पस्तिस वर्षांच्या कारकीर्दीत मग पुन्हा युध्द झाले नाही.

आसाची अखेरची वर्षे

16 आसाच्या राज्याच्या छत्तिसाव्या वर्षी बाशाने यहूदावर स्वारी केली. बाशा हा इस्राएलचा राजा. रामा हे नगर निवडून त्याने त्याची मजबुती केली. यहूदाचा राजा आसा याच्याकडे कोणालाही येण्याजाण्याला प्रतिबंध व्हावा हा त्याचा त्यामागचा हेतू होता. तेव्हा आसाने परमेश्वराच्या मंदिरातील आणि राजमहालातील सोने आणि चांदी काढून घेतली. अरामचा राजा बेन-हदाद दिमिष्काला राहात होता. आसाने त्याच्याकडे सोने, आणि चांदी पाठवून त्याला निरोप पाठवला, “आपण आपसात एक करार करु. आपल्या दोघांच्या वडिलांमध्येही तसा करार केलेला होता. मी माझ्याकडचे सोने-रुपे तुझ्याकडे पाठवत आहे. इस्राएलचा राजा बाशा याच्याबरोबरचा तुझा करार मोड म्हणजे तो माझ्याकडे पाठ फिरवेल आणि मला त्रस्त करणार नाही.”

बने-हदाद या गोष्टीशी सहमत झाला. त्याने इस्राएली नगरांवर आपले सैन्याचे सरदार पाठवले. त्या सरदारांनी ईयोन, दान आबेल मईम या नगरांवर हल्ला केला. कोठारे असलेल्या नफतालीच्या नगरांवरही त्यांनी चढाई केली. या चढायांचे वृत्त बाशाच्या कानावर गेले. तेव्हा त्याने रामानगराच्या मजबुतीचे काम अर्धवट सोडून दिले. राजा आसाने मग सर्व यहूदींना बोलावले. या लोकांनी रामा नगर बांधण्यासाठी वापरलेले दगड, लाकूड ही सामग्री हस्तगत केली. त्यांनी ती गेबा आणि मिस्पा या नगरांच्या बांधकामासाठी वापरली.

यावेळी हनानी नावाचा संदेष्टा यहूदाचा राजा आसा याच्याकडे आला व त्याला म्हणाला, “आसा तू मदतीसाठी तुझ्या परमेश्वर देवावर भरवंसा न ठेवता अरामच्या राजावर अवलंबून राहिलास. तू परमेश्वराचे साहाय्य घ्यायला हवे होतेस. पण तू परमेश्वराचा धावा केला नाहीस म्हणून अरामचे सैन्य तुझ्या हातातून सुटून गेले आहे. कूशी आणि लुबी यांचे सैन्य तर केवढे बलाढ्य होते! त्यांच्याकडे कितीतरी रथ आणि स्वार होते. पण तेव्हा तू परमेश्वरावर भरवंसा ठेवलास आणि परमेश्वराने तुला विजय मिळवून दिला. अखिल पृथ्वीवर कोणाची आपल्यावर श्रध्दा आहे याचा शोध परमेश्वराची नजर सतत घेत असते व अशांना तो आपले पाठबळ देतो. पण आसा, तू मात्र मूर्खपणा केला आहेस. तेव्हा यापुढे तुला लढायांना तोंड द्यावे लागेल.”

10 हनानीच्या या बोलण्याचा आसाला राग आला व क्रोधाच्या भरात त्याने हनानीला तुरुंगात डांबले. कधी कधी आसा काही लोकांशी फार निर्दयतेने वागे.

11 यहूदा आणि इस्राएल राजांचा इतिहास या पुस्तकात आसाच्या कारभाराचे साद्यंत वर्णन आहे. 12 आपल्या राज्याच्या एकोणचाळीसाव्या वर्षी तो पायाच्या दुखण्याने बेजार झाला. त्याचा आजार खूप बळावला तरी त्याने दुखण्यात परमेश्वराचा धावा केला नाही. त्याने वैद्यांकरवी इलाज करुन घेतला. 13 आपल्या कारकीर्दीच्या 41 व्या वर्षी तो वारला व आपल्या पूर्वजांबरोबर त्याने चिरविश्रांती घेतली. 14 दावीदनगरात त्याने आधीच स्वतःसाठी करुन घेतलेल्या कबरीत लोकांनी त्याचे दफन केले. विविध सुवासिक द्रव्ये आणि मसाले घातलेल्या बिछान्यावर लोकांनी त्याला ठेवले. त्याच्या सन्मानार्थ सुगंधी द्रव्ये जाळली. [a]

रोमकरांस 9:1-24

देव आणि यहूदी लोक

मी ख्रिस्तामध्ये खरे बोलतो, खोटे बोलत नाही. पवित्र आत्म्याने बोध केलेला माझा विवेक मजविषयी साक्ष देतो की, मला मोठे दु:ख आहे आणि माझ्या अंतःकरणात सतत वेदना आहेत. कारण माझे भाऊ, वंशाने माझे नातेवाईक यांच्याकरिता शापित व्हावे आणि ख्रिस्तापासून मी वेगळा केलेला असावा अशी मी इच्छा करतो. इस्राएली कोण आहेत? ते देवाचे निवडलेले लोक आहेत. या लोकांकडे देवाचे गौरव आणि देवाने त्यांच्याशी केलेला करार आहे. देवाने त्यांना नियमशास्त्र दिले. आणि उपासना करण्याचा योग्य मार्ग दिला. आणि देवाने त्यांना त्याचे अभिवचन दिले आहे. त्यांचे पूर्वज थोर आहेत. मानवी दृष्टीने सांगताना ख्रिस्त त्यांच्यापासून आला, जो सदासर्वकाळ सर्व लोकांवर धन्यवादित देव आहे. आमेन.

परंतु देवाचे वचन व्यर्थ झाले असे नाही. कारण सर्व जण जे इस्त्रएलापासून आले आहेत ते खरोखरच इस्राएली आहेत असे नाही. याचा अर्थ असाही नाही की, ते अब्राहामापासून आलेले आहेत, म्हणून खरोखरच ती अब्राहामाची मुले आहेत, तर देवाने म्हटल्याप्रमाणे, “इसहाकाच्या वंशातील लोकांना तुझे संतान म्हटले जाईल.” [a] म्हणजे देहदृष्ट्या जन्मली ती देवाची मुले आहेत असे नाही तर वचनाच्या मुलांना संतान म्हटले आहे. “नेमलेल्या वेळी मी परत येईन त्यावेळेला सारेला पुत्र होईल.” [b] आणि हे ते वचन आहे.

10 इतकेच नव्हे तर रिबेकासुद्धा एकाकडून म्हणजे आपला पूर्वज इसहाक याच्याकडून गरोदर झाली. 11 मुले जन्माला येण्यापूर्वी आणि त्यांनी काही बरे किंवा वाईट केले नव्हते, तेव्हा निवडीवरुन असणारा देवाचा पूर्वसंकल्प कायम राहावा, म्हणजे कर्मावरुन नाही तर बोलावणाऱ्याच्या इच्छेवरुन घडावे. 12 म्हणून तिला सांगितले होते की, “वडील धाकट्याची सेवा करील.” [c] 13 पवित्र शास्त्रात लिहिले आहे की, “मी याकोबावर प्रेम केले आणि एसावाचा द्वेष केला.” [d]

14 तर मग आपण काय म्हणावे? देवाच्या ठायी अन्याय नाही. आहे काय? खात्रीने नाही. 15 कारण तो मोशेला म्हणाला, “ज्याच्यावर मला दया करायची त्यावर मी दया करीन, आणि ज्याच्यावर करुणा करायची त्याच्यावर करुणा करीन.” [e] 16 म्हणून ते इच्छा करणाराऱ्या वर किंवा पाळणाऱ्यावर नव्हे तर दयाळू देवावर अवलंबून आहे. 17 कारण पवित्र शास्त्रात देव फारोला म्हणाला, “याच हेतूसाठी मी तुला उच्च केले यासाठी की मी तुझ्यामध्ये आपले सामर्थ्य दाखवावे आणि माझे नाव सर्व पृथ्वीवर गाजविले जावे.” [f] 18 म्हणून देव ज्याच्यावर दया करायची त्यास दया करतो आणि ज्यास कठीण करायचे त्यास कठीण करतो.

19 तुमच्यापैकी एखादा मला म्हणेल, “देव जर आमच्या कृति नियंत्रित करतो तर तो अजूनही आमचे दोष का काढतो? शेवटी त्याच्या इच्छेला कोण विरोध करील?” 20 होय, हे मानवा, देवाला उलट उत्तर देणारा तू कोण आहेस? जे घडले आहे ते घडणाऱ्याला, “तू मला असे का केलेस” असे विचारील काय? 21 एका ठराविक गोळ्यापासून एक भांडे गौरवासाठी आणि एक भांडे अपमानासाठी करावे असा कुंभाराला मातीवर अधिकार नाही काय?

22 परंतु देवाला जरी त्याचा राग आणि सामर्थ्य व्यक्त करावेसे वाटत होते, तरी त्याने जी माणसे नाशासाठी नेमलेली होती, त्यांचे मोठ्या धीराने सहन केले नाही काय? 23 जी त्याच्या दयेची पात्रे होणार होती, त्यांना त्याने गौरव मिळण्यासाठी तयार केले, त्यांचे त्याने सहन केले यासाठी की त्यांना त्याच्या दयेची विपुलता कळावी. 24 ज्या आपणांला त्याने फक्त यहूद्यांतूनच नव्हे तर विदेशातूनही बोलाविले होते.

स्तोत्रसंहिता 19

प्रमूख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.

19 स्वर्ग देवाचा महिमा गातात.
    आणि आकाश देवाने आपल्या हाताने ज्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्या दाखवते.
प्रत्येक नवा दिवस त्या गोष्टींबद्दल अधिक काही सांगतो
    आणि प्रत्येक रात्र देवाच्या सामर्थ्याची अधिकाधिक रुपे दाखवते.
तुम्हांला एखादे भाषण किंवा शब्द खरोखरच ऐकू येत नाही.
    तुम्हांला ऐकू येण्यासारखा एखादा आवाज ते करीत नाहीत.
परंतु त्यांचा “आवाज” सर्व जगभर जातो
    त्यांचे “शब्द” पृथ्वीच्या टोकापर्यंत जातात.

आकाश म्हणजे जणू सूर्याचे घरच आहे.
    सूर्य त्याच्या झोपायच्या खोलीतून आनंदी नवऱ्या मुलासारखा बाहेर येतो.
सूर्य त्याच्या परिक्रमेची सुरुवात अधीर झालेल्या
    एखाद्या धावपटू सारखी करतो.
सूर्य आकाशाच्या एका कोपऱ्यापासून सुरुवात करतो
    आणि तो आकाशाच्या दुसऱ्या टोकापर्यंत जातो.
त्याच्या उष्णतेपासून काहीही लपून राहू शकत नाही.
    परमेश्वराची शिकवणही तशीच आहे.

परमेश्वराची शिकवण अतिशय योग्य आहे.
    ती देवाच्या लोकांना शक्ती देते.
परमेश्वराच्या करारावर विश्वास ठेवणे शक्य आहे.
    त्यामुळे मूर्ख लोकांना शहाणे बनण्यास मदत होते.
परमेश्वराचे नियम योग्य आहेत
    ते लोकांना सुखी करतात.
परमेश्वराच्या आज्ञा चांगल्या आहेत
    त्या लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात.

परमेश्वराची भीती शुध्द आहे.
    ती अखंड सहन करावी लागेल.
परमेश्वराचे निर्णय चांगले आणि योग्य आहेत.
    ते संपूर्णत बरोबर आहेत.
10 परमेश्वराची शिकवण अतिशय शुध्द अशा सोन्यापेक्षा ही किंमती आहे.
    ती मधाच्या पोळ्यातून मिळणाऱ्या, शुध्द मधापेक्षाही गोड आहे.
11 परमेश्वराच्या शिकवणी ने त्याच्या सेवकाला इशारा मिळतो.
    चांगल्या गोष्टींचे पालन केल्यामुळे चांगले फळ मिळते.

12 कोणालाही आपल्या सगळ्या चुका दिसू शकत नाहीत.
    म्हणून मला गुप्त पाप करु देऊ नकोस.
13 परमेश्वरा, जी पापे करायची इच्छा मला होते, ती मला करु देऊ नकोस.
    त्या पापांना माझ्यावर राज्य करु देऊ नकोस.
तू जर मला मदत केलीस तर मी शुध्द होईन आणी माझ्या पापांपासून मुक्त होईन.
14 माझ्या शब्दांनी आणि माझ्या विचारांनी तुला आनंद व्हावा असे मला वाटते.
    परमेश्वरा, तू माझा खडक आहेस.
    मला वाचवणारा फक्त तूच आहेस.

नीतिसूत्रे 20:1

20 द्राक्षारस आणि मद्य यामुळे लोकांचा स्वतःवरचा ताबा जातो. ते खूप जोरात बोलतात आणि फुशारकी मारायला लागतात. ते झिंगलेले असतात आणि मूर्खासारख्या गोष्टी करायला लागतात.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center