Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NLT. Switch to the NLT to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 इतिहास 8:11-10:19

11 शलमोनाने फारोच्या मुलीला, तिच्यासाठी बांधलेल्या महालात दावीद नगराहून आणले. शलमोन म्हणाला, “ज्या ज्या ठिकाणी परमेश्वराचा करारकोश ठेवण्यात आला, ती सर्व स्थाने पवित्र आहेत. तेव्हा माझ्या बायकोने दावीद नगरात राहू नये.”

12 मग शलमोनाने वेदीवर परमेश्वराला होमार्पणे वाहिली. मंदिराच्या प्रवेशमंडपासमोरच शलमोनाने ती वेदी बांधली होती. 13 मोशेच्या आज्ञेप्रमाणे शलमोन रोज होमार्पणे करी. शब्बाथच्या दिवशी, नवचंद्र दर्शनीला, वर्षभरातल्या तीन सणांना होमार्पणे करायची असत. बेखमीर भाकरीचा सण, सप्ताहांचा सण, आणि मंडपांचा सण हे तीन वार्षिक सण होत. 14 आपल्या वडिलांच्या सूचना शलमोनाने तंतोतंत पाळल्या. परमेश्वराच्या सेवेसाठी त्याने याजकवर्गाच्या नेमणुका केल्या. लेवींना त्यांची कामे पार पाडायला नेमले. स्तुतिगीते म्हणणे आणि मंदिराच्या चाकरीतील रोजची सेवाकार्ये बजावण्यात याजकांना मदत करणे ही लेवींची कामे होती. याखेरीज शलमोनाने प्रत्येक प्रवेशद्वाराशी द्वारपालांच्या गटांच्या नेमणुका केल्या. परमेश्वराला मानणाऱ्या दावीदाने अशाच सूचना दिल्या होत्या. 15 याजक आणि लेवी यांना शलमोनाने ज्या सूचना दिल्या त्यात इस्राएल लोकांनी बदल केला नाही की आज्ञाभंग केला नाही. मौल्यवान वस्तू जतन करण्याविषयीच्या आज्ञांचाही त्यांनी बदल केला नाही.

16 शलमोनाची सगळी कामे सिध्दीला गेली. मंदिराच्या कामाला सुरुवात केल्यापासून ते संपेपर्यंत त्यांचे व्यवस्थित नियोजन केले होते. अशा रीतीने मंदिराचे काम तडीला गेले.

17 यानंतर शलमोन लाल समुद्रानजीकच्या अदोम देशातील एस्योन-गेबेर आणि एलोथ या नगरांना गेला. 18 हिरामने त्याच्याकडे आपली गलबते पाठवली. समुद्रपर्यटनात तरबेज अशा हिरामच्या सेवकांनीच ती नेली. शलमोनाच्या चाकरीतील लोकांबरोबर हे सेवक ओफिर येथे गेले आणि तेथून 17 टन सोने आणून त्यांनी ते शलमोनाला दिले.

शबाच्या राणीची शलमोनाशी भेट

शलमोनाची कीर्ती शबाच्या राणीच्या कानावर गेली. तेव्हा त्याची परीक्षा पाहायला म्हणून ती यरुशलेमला आली. तिच्याबरोबर मोठा लवाजमा होता. मसाल्याचे पदार्थ, सोनेनाणे, मौल्यवान रत्ने या गोष्टी उंटांवर लादून तिने आणल्या होत्या.शलमोनाची भेट घेऊन ती त्याच्याशी बोलली. तिला शलमोनाला बरेच प्रश्न विचारायचे होते. शलमोनाने तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. त्याला त्यातले काहीच अवघड वाटले नाही. शबाच्या राणीने त्याच्या सूज्ञपणाचा प्रत्यय घेतला, त्याचा महाल पाहिला. त्याच्या मेजावरील अन्नपदार्थ तिने पाहिले, त्याच्या प्रमुख कारभाऱ्यांची बैठक पाहिली. त्यांची कार्यपध्दती आणि त्यांचे पोशाख पाहिले. शलमोनाचे मद्यपरिचारक आणि त्यांचे पोशाख, परमेश्वराच्या मंदिरातील शलमोनाने केलेली होमार्पणे हे सर्व तिने पाहिले आणि या दर्शनाने ती थक्क झाली.

मग ती राजा शलमोनाला म्हणाली, “तुझ्या कामगिरीची आणि शहाणपणाची जी वर्णने मी माझ्या देशात ऐकली ती खरीच आहेत. इथे येऊन स्वतः अनुभव घेईपर्यंत मला त्या गोष्टी खऱ्या वाटत नव्हत्या. खरे तर तुझ्या सूज्ञपणाची थोरवी निम्म्यानेही माझ्यापर्यंत पोचली नव्हती. तुझ्याबद्दल जे ऐकले त्यापेक्षाही तू महान आहेस. तुझ्या बायका, तुझी माणसे आणि अधिकारी फार भाग्यवान आहेत. तुझ्या सेवेत असतानाच त्यांना तुझ्या शहाणपणाचा लाभ होतो. तुझा देव परमेश्वर ह्याची स्तुति असो. तो तुझ्यावर प्रसन्न आहे आणि आपल्या वतीने त्याने तुला राजा म्हणून सिंहासनावर बसवले आहे. परमेश्वराचे इस्राएलवर प्रेम आहे आणि इस्राएल वर त्याचा कायमचा वरदरस्त आहे. जे उचित आणि न्याय्य ते करण्यासाठी त्याने तुला राजा केले आहे.”

शबाच्या राणीने मग राजा शलमोन याला 4 1/2 टन सोने, अनेक मसाल्याचे पदार्थ आणि किंमती रत्ने यांचा नजराणा दिला. तिने दिले तसे मसाल्याचे जिन्नस शलमोनाला कधीच कुणाकडून मिळाले नाहीत.

10 हिराम आणि शलमोन यांच्या सेवकांनी ओफिराहून सोने आणले. रक्तचंदनाचे लाकूड आणि मौल्यवान रत्नेही त्यांनी आणली. 11 परमेश्वराच्या मंदिराच्या आणि राजमहालाच्या पायऱ्या तसेच गायकांच्या वीणा व सतारी यासाठी शलमोनाने हे रक्तचंदन वापरले. रक्तचंदनाचा वापर करुन बनवलेल्या इतक्या सुंदर वस्तू यापूर्वी यहूदात कधी कोणी पाहिल्या नव्हत्या.

12 शबाच्या राणीला जे हवे ते राजा शलमोनाने देऊ केले. त्याने जे देऊ केले ते तिने आणलेल्या नजराण्यापेक्षा जास्तच होते. मग शबाची राणी आपल्या लव्याजम्यासहित आपल्या देशात परतली.

शलमोनाची अवाढव्य संपत्ती

13 शलमोनाला वर्षभरात जेवढे सोने मिळे त्याचे वजन 25 टन एवढे असे. 14 याखेरीज, फिरस्ते व्यापारी आणि विक्रेते खूप सोने आणत. अरबस्तानचे राजे आणि वेगवेगळ्या प्रदेशांचे सुभेदार सोने-चांदी आणत, ते वेगळेच.

15 सोन्याचे पत्रे ठोकून 200 मोठ्या ढाली राजा शलमोनाने केल्या. अशाप्रत्येक ढालीला 7 1/2 पौंड वजनाचा सोन्याचा पत्रा लागला. 16 याखेरीज अशा घडीव सोन्याच्या तीनशे ढाली त्याने केल्या. त्यांना प्रत्येकी 3 3/4 पौंड सोने लागले. या सोन्याच्या ढाली त्याने लबानोनच्या अरण्यमहालात ठेवल्या.

17 राजा शलमोनाने हस्तिदंताचे मोठे सिंहासन केले. ते शुध्द सोन्याने मढवले. 18 या सिंहासनाला सहा पायऱ्या होत्या आणि सोन्याचे पादासन होते. दोन्ही बाजूला हात टेकवता येतील अशी सिंहासनाला सोय होती. आणि त्याला लागून एक एक सिंहाचा पुतळा होता. 19 सहा पायऱ्यांपैकी प्रत्येक पायरीच्या दोन्ही बाजूला एकेक असे एकंदर 12 सिंह होते. दुसऱ्या कोणत्याही राज्यात असे सिंहासन नव्हते.

20 राजाची सर्व पेयपात्रे सोन्याची होती. लबानोनच्या अरण्यमहालातील सर्व घरगुती वापरायच्या वस्तू शुध्द सोन्याने घडवलेल्या होत्या. शलमोनाच्या काळात चांदी फारशी मौल्यवान मानली जात नसे.

21 तार्शीश येथे जाणारी गलबते त्याच्याकडे होती. हिरामची माणसे त्याच्या गलबतांतून मालाची ने-आण करीत. सोन-रुपे, हस्तिदंत, वानरे आणि मोर यांनी भरलेली ही गलबते दर तीन वर्षानी तार्शीशहून शलमोनाकडे येत.

22 वैभव आणि ज्ञान या बाबतीत पृथ्वीच्या पाठीवरील कोणत्याही राजापेक्षा शलमोन महान झाला. 23 त्याच्या सल्लामसलतीचा लाभ घ्यायला सर्व ठिकाणचे राजे शलमोनाकडे येऊ लागले. परमेश्वरानेच शलमोनाला जो सूज्ञपणा दिला होता तो पाहायाला ते येत असत. 24 हे राजे दरवर्षी येताना शलमोनासाठी नजराणे घेऊन येत. त्यात सोन्यारुप्याच्या वस्तू, कपडे, चिलखते, मसाले, घोडे आणि खेचरे ह्यांचा समावेश असे.

25 घोडे आणि रथ यांच्यासाठी शलमोनाकडे 4,000 ठाणी होती. त्याच्यापदरी 12,000 रथचालक होते. त्यांची सोय त्याने मुद्दाम वसवलेल्या नगरात आणि स्वतःला लागतील तेवढ्यांची यरुशलेममध्ये केली होती. 26 फरात नदीपासून पलिष्ट्यांच्या देश आणि मिसरची सीमा येथपर्यंतच्या सर्व राजांवर शलमोनाचा अधिकार होता. 27 राजा शलमोनाकडे चांदी ही दगडधोंडे असावे इतकी आणि गंधसरुची झाडे, डोंगराळ देशातल्या उंबराच्या झाडांइतकी विपुल होती. 28 मिसर आणि इतर देशामधून लोक शलमोनासाठी घोडे आणत.

शलमोनाचा मृत्यू

29 शलमोनाने सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्यागोष्टी केल्या त्या नाथान या संदेष्ट्याच्या इतिहासात तसेच, अहीया शिलोनी याच्या संदेशलेखात आणि इद्दो या भविष्यवाद्याच्या इद्दोची दर्शने यात नोंदवलेल्या आहेत. नबाटाचा मुलगा यराबाम याविषयीही इद्दोने लिहिलेले आहे. 30 शलमोनाने यरुशलेममधून इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले. 31 मग तो आपल्या पूर्वजांना मिळाला. लोकांनी त्याचे दावीदनगरात दफन केले. शलमोनाचा मुलगा रहबाम हा पुढे शलमोनाच्या जागी राज्य करु लागला.

रहबामचे अविचारी वर्तन

10 रहबाम शखेम येथे गेला कारण त्याला राजा करण्यासाठी सर्व इस्राएल लोक तेथे गेले होते. यावेळी यराबाम मिसरमध्ये होता कारण त्याने राजा शलमोनापुढून पळ काढला होता. यराबाम हा नबाटाचा मुलगा. रहबाम राजा होणार हे त्याने ऐकले म्हणून तो मिसरहून आला.

तेव्हा इस्राएल लोकांनी यराबामलाही आपल्याबरोबर येण्यास सांगितले. अशा तऱ्हेने यराबाम आणि सर्व इस्राएल लोक रहबामकडे आले. त्याला ते म्हणाले, “रहबाम, तुमच्या वडिलांनी आमचे आयुष्य फार जिकिरीचे केले होते. त्यांनी जणू आमच्या मानेवर जू ठेवले होते. ते आता हलके करा म्हणजे आम्ही तुमच्या आज्ञेत राहू.”

यावर रहबाम त्यांना म्हणाला, “तुम्ही तीन दिवसांनी परत या.” तेव्हा लोक निघून गेले.

राजा रहबामने मग आपल्या वडिलांच्या पदरी असणाऱ्या वडिलधाऱ्या मंडळींशी चर्चा केली. रहबाम त्यांना म्हणाला, “मी या लोकांशी काय बोलावे? मला या बाबतीत तुमचा सल्ला हवा आहे.”

तेव्हा ती वयोवृध्द मंडळी रहबामला म्हणाली, “तू या लोकांशी प्रेमाने वागलास, त्यांना संतुष्ट केलेस आणि त्यांच्याशी गोड बोललास तर ते चिरकाल तुझी सेवा करतील.”

पण रहबामने त्यांचा हा सल्ला मानला नाही. तो मग आपल्या पदरी असलेल्या आणि आपल्या बरोबर लहानाचे मोठे झालेल्या तरुण मंडळींशी बोलला. रहबाम त्यांना म्हणाला, “तुम्ही मला काय सल्ला द्याल? आपण लोकांना काय सांगावे? त्यांना आपले ओझे हलके करुन हवे आहे. माझ्या वडिलांनी त्यांच्या मानेवर ठेवलेले जूं आता त्यांना मी हलके करायला हवे आहे.”

10 तेव्हा त्याच्या पिढीची ती तरुण मुले रहबामला म्हणाली, “तुमच्याकडे आलेल्या लोकांना तुम्ही असे सांगावे. लोक तुम्हाला म्हणाले की, ‘मानेवर जूं ठेवल्याप्रमाणे तुमच्या वडिलांनी आम्हाला कठोर जिणे जगायला लावले. तुम्ही आता ते हलके करावे असे आम्हाला वाटते.’ पण रहबाम, तुम्ही त्यांना असे सांगावे, ‘माझी करंगळी माझ्या वडीलांच्या कमरेपेक्षा जाड असेल. 11 माझ्या वडिलांनी तुमच्यावर फार ओझे लादले ना! मी तर ते अधिकच भारी करणार आहे. माझ्या वडलांनी तुम्हाला चाबकांचे फटकारे मारले. मी त्या चाबकांना धातूची अणकुचीदार टोके लावून शासन करीन.’”

12 यराबाम आणि सर्व लोक तीन दिवसांनी रहबामकडे आले. राजा रहबामने त्यांना तसेच सांगितले होते. 13 रहबाम त्यांच्याशी यावेळी अविचारीपणाने बोलला. मोठ्यांचा सल्ला त्याने मानला नाही. 14 तरुणांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे तो बोलला. तो लोकांना म्हणाला, “माझ्या वडीलांनी तुमच्यावर फार ओझे लादले ते मी अधिकच भारी करीन. त्यांनी तुम्हाला चाबकाने शासन केले असेल पण मी टोकदार धातूची टोके जोडलेल्या चांबकांनी शासन करीन.” 15 राजा रहबामने लोकांचे ऐकून घेतले नाही. तो असे बोलला कारण हा बदल परमेश्वरानेच घडवून आणला होता. अहीया मार्फत परमेश्वर यराबामशी जे बोलला होता ते प्रत्यक्षात यावे म्हणूनच त्याने अशी वेळ येऊ दिली. अहीया हा शिलोनी लोकांपैकी होता आणि यराबाम नबाटाचा मुलगा होता.

16 राजा रहबामने आपल्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले हे इस्राएल लोकांच्या लक्षात आले. ते राजाला म्हणाले,

“आम्ही काय दावीदाच्या घराण्यातले आहोत का?
    मुळीच नाही! इशायच्या जमिनीत आमचा वाटा आहे का?
नाही! तेव्हा इस्राएल लोकांनो, आपण आपले आपापल्या घरी जाऊ
    या दावीदाच्या मुलाला आपल्या घरच्यांवरच राज्य करु द्या.”

सर्व इस्राएल लोक मग घरोघर गेले. 17 पण यहूदाच्या नगरांमध्ये राहाणारे काही इस्राएल लोक होते. रहबाम त्यांच्यावर राज्य करत राहिला.

18 हदोराम हा वेठबिगारांवरचा मुकादम होता. रहबामने त्याला इस्राएल लोकांकडे पाठवले. पण इस्राएल लोकांनी त्याच्यावर दगडफेक करुन त्याला मरेपर्यंत मारले. इकडे रहबामने रथाचा आश्रय घेतला आणि त्वरेने पळ काढला. तो यरुशलेमला पळून गेला. 19 तेव्हापासून आजतागायत इस्राएलचे दावीदाच्या घराण्याशी वैर आहे.

रोमकरांस 8:9-25

देवाचा आत्मा तुम्हांमध्ये राहतो, तर तुम्ही देहाचे नसून आत्म्याचे आहात. परंतु जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही. 10 उलट जर ख्रिस्त तुम्हांमध्ये आहे व तुमचा देह पापामुळे मेला आहे तरी नीतिमत्वामुळे तुमच्या आत्म्याच जीवन आहे. 11 आणि ज्या आत्म्याने येशूला मरणातून उठविले तो त्याचा आत्मा तुम्हांमध्ये राहतो त्या तुमच्या मर्त्य शरीराला जीवन देईल.

12 तर मग बंधूनो, आम्ही कर्जदार आहोत, देहाप्रमाणे जगण्यास देहाचे नव्हे. 13 कारण जर तुम्ही तुमच्या पापी देहस्वभावाप्रमाणे जीवन जगाल तर तुम्ही मरणार आहात, परंतु आत्म्याच्या करवी जर तुम्ही देहाची कर्मे ठार माराल तर तुम्ही जगाल.

14 कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवितो, तितके देवाची मुले आहेत. 15 पुन्हा भीति वाटू नये म्हणून तुम्हांला गुलामगिरीचा आत्मा मिळाला नाही, तर तुम्हांला दतकपणाचा आत्मा मिळाला आहे. त्याच्यायोगे आम्ही “अब्बा, बापा” अशी हाक मारतो. 16 तो आत्मा स्वतः आपल्याबरोबर दुजोरा देतो की, आपण देवाची मुले आहोत. 17 आपण जर देवाची मुले आहोत तर आम्ही वारसही आहोत आणि ख्रिस्ताबरोबर वारस आहोत. खरोखर आपण त्याच्याबरोबर दु:ख भोगतो यासाठी की, त्याच्याबरोबर आपणांस गौरवही मिळावे.

भविष्यात आम्हांला गौरव मिळेल

18 कारण भविष्यकाळात आपल्याला प्रगट करण्यात येणाऱ्या गौरवाच्या तुलनेने सध्याच्या काळातील दु:खे काहीच नाहीत असे मी मानतो. 19 कारण निर्माण केलेले जग पुत्राच्या प्रगट होण्याच्या काळाची वाट पाहत आहे. 20 निर्माण केलेले जग सर्व स्वाधीन होते ते इच्छेने नव्हे तर देवाने ते अधीन ठेवले होते म्हणून, 21 या आशेने की, निर्माण केलेले जग त्याच्या अशुद्धतेच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावे, व देवाच्या मुलांचे वैभवी गौरव त्याने उपभोगावे.

22 कारण आपल्याला माहीत आहे की, आजपर्यंत, निर्माण केलेले संपूर्ण जग कण्हत, वेदना भोगीत आहे. 23 परंतु निर्माण केलेले जगच नव्हे तर आपणांस ज्यांना आत्म्याचे प्रथम फळही मिळाले आहे ते, आपणही संपूर्ण दत्तकपणासाठी आपल्या शरीराच्या नाशवंत, मर्त्य स्वभावापासून मुक्ती व्हावी म्हणून आतल्याआत कण्हत आहोत. 24 आपण आपल्या मनातील या आशेने तारले गेलो आहोत. परंतु आपण ज्याची आशा धरली ते पाहू शकलो तर ही आशा नसेल. कारण जे पाहतो त्याची आशा कोण धरील? 25 परंतु जर आपण जे पाहत नाही त्याची आशा धरतो तर आपण धीराने त्याची वाट पाहतो.

स्तोत्रसंहिता 18:16-36

16 परमेश्वर वरुन खाली आला आणि त्याने माझे रक्षण केले.
    परमेश्वराने मला धरले आणि खोल पाण्यातून (संकटांतून) बाहेर काढले.
17 माझे शत्रू माझ्यापेक्षा शक्तिमान होते.
    ते लोक माझा तिरस्कार करीत होते माझे शत्रू मला खूप भारी होते म्हणून देवाने माझे रक्षण केले.
18 मी संकटात असताना शत्रूंनी हल्ला केला.
    परंतु माझ्या मदतीसाठी परमेश्वर तेथे होता.
19 परमेश्वर माझ्यावर प्रेम करतो.
    म्हणून त्याने माझी सुटका केली.
    तो मला सुरक्षित जागी घेऊन गेला.
20 मी निरपराध असल्यामुळे परमेश्वर मला माझे बक्षीस देईल
    मी काही चूक केली नाही म्हणून तो माझ्यासाठी चांगल्या गोष्टी करेल.
21 का? कारण मी परमेश्वराची आज्ञा पाळली
    मी माझ्या देवाविरुध्द पाप केले नाही.
22 परमेश्वराच्या सर्व निर्णयांची मी नेहमी आठवण ठेवतो.
    मी त्याचे नियम पाळतो.
23 मी त्याच्या समोर स्वत:ला शुध्द आणि निरपराध राखले.
    मी वाईट गोष्टींपासून स्वतला राखले.
24 म्हणून परमेश्वर मला माझे फळ देईल.
    का? कारण मी निरपराध आहे.
देव पाहातो की मी काहीच चूक करीत नाही म्हणून
    तो माझ्यासाठी चांगल्या गोष्टी करील.

25 परमेश्वरा, जर एखादा माणूस तुझ्यावर खरोखरच प्रेम करत असेल तर तू त्याला तुझे खरे प्रेम दाखवशील.
    जर एखादा माणूस तुझ्याशी खरा वागला तर तू देखील त्याच्याशी खरा वागशील.
26 परमेश्वरा, जे लोक चांगले आणि शुध्द असतात त्यांच्याशी तू चांगला
    आणि शुध्द असतोस परंतु अगदी नीच आणि कुटिल असणाऱ्यांना तू नामोहरण करतोस.
27 परमेश्वरा, तू दीनांना मदत करतोस,
    पण तू गर्विष्ठांना खाली पाहायला लावतोस.
28 परमेश्वरा, तू माझा दिवा लावतोस
    देव माझ्या भोवतालचा अंधार उजळतो.
29 परमेश्वरा, तुझ्या मदतीने मी सैनिकांबरोबर पळू शकतो.
    देवाच्या मदतीने मी शत्रूच्या भिंतीवर चढू शकतो.

30 देवाची शक्ती परिपूर्ण आहे.
    परमेश्वराच्या शब्दांची परीक्षा घेतली गेली आहे.
    जे त्याच्यावर विश्वास टाकतात त्यांचे तो रक्षण करतो.
31 परमेश्वराखेरीज इतर कुठलाही देव नाही.
    आपल्या देवाखेरीज इतर खडक इथे नाहीत.
32 देव मला शक्ति देतो शुध्द जीवन जगण्यासाठी
    तो मला मदत करतो.
33 देव मला हरणासारखे जोरात पळण्यासाठी मदत करतो.
    तो मला उंचावर स्थिर ठेवतो.
34 देव मला युध्दाचे शिक्षण देतो.
    त्यामुळे माझे हात शक्तिशाली बाण सोडू शकतात.

35 देवा, तू माझे रक्षण केलेस आणि मला जिंकायला मदत केलीस
    तू मला तुझ्या उजव्या हाताने आधार दिलास
    माझ्या शत्रूचा पराभव करण्यासाठी तू मला मदत केलीस.
36 माझ्या पायांना आणि घोट्यांना तू शक्ती दिलीस.
    त्यामुळे मी न पडता चालू शकलो.

नीतिसूत्रे 19:26

26 एखाद्याने वडिलांची चोरी केली आणि आईला घर सोडायला लावले तर तो खूप वाईट आहे. तो माणूस स्वतःला लाज आणतो आणि स्वतःचा अनादर करतो.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center