Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NLT. Switch to the NLT to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 इतिहास 1-3

विवेकबुध्दीसाठी शलमोनाची प्रार्थना

परमेश्वर देवाची शलमोनाला साथ असल्यामुळे दाविदाचा पुत्र शलमोन एक बलाढ्य राजा झाला. परमेश्वराने शलमोनाला थोर केले.

शलमोन सर्व इस्राएल लोकांशी म्हणजेच, सरदार, अधिकारी, न्यायाधीश, इस्राएलमधील प्रमुख मंडळी या सर्वांशी बोलला. मग तो आणि त्याच्या बरोबरची ही सर्व मंडळी गिबोन येथील उच्चस्थानी गेली. परमेश्वराचा सभामंडप तेथे होता. परमेश्वराचा सेवक मोशे आणि इस्राएल लोक वाळवंटात असताना मोशेने तो बनवला होता. दावीदाने परमेश्वराचा करारकोश किर्याथ यारीमाहून यरुशलेम येथे आणला होता. यरुशलेममध्ये तो ठेवण्यासाठी दावीदाने जागा तयार केली होती. करारकोशासाठी त्याने यरुशलेममध्ये तंबू उभारला होता. उरीचा मुलगा बसलेल याने पितळी वेदी केली होती. ती वेदी गिबोन येथील परमेश्वराच्या निवसमंडपासमोर होती. म्हणून शलमोन आपल्या बरोबरच्या इस्राएल लोकांसह गिबोन येथे परमेश्वराचा सल्ला घेण्यासाठी गेला. परमेश्वराच्या निवासमंडपासमोरील पितळी वेदी वर शलमोनाने 1,000 होमार्पणे केली.

त्यारात्री देवाने शलमोनाला दर्शन दिले. तो म्हणाला, “शलमोन, मी तुला काय द्यावे अशी तुझी इच्छा आहे ते मला माग.”

शलमोन परमेश्वराला म्हणाला, “माझे वडील दावीद यांच्यावर तुझी फार कृपा दृष्टी होती. त्यांच्याजागी तू मला नवीन राजा म्हणून निवडलेस. आता, हे परमेश्वर देवा, त्यांना तू दिलेले वचन पूर्ण कर. एका फार मोठ्या राष्ट्राचा तू मला राजा केले आहेस. त्यातील प्रजेची संख्या धरतीवरील रजःकणांसारखी विपुल आहे. 10 एवढ्या लोकांना उचित मार्गाने नेण्यासाठी मला शहाणपण आणि ज्ञान दे. तुझ्या मदतीखेरीज एवढ्या बहुसंख्य लोकांवर राज्य करणे कोणालाच जमणार नाही.”

11 तेव्हा परमेश्वर शलमोनाला म्हणाला, “तुझे म्हणणे बरोबर आहे. तू धनसंपत्ती, ऐश्वर्य किंवा मानसन्मान यांची मागणी केली नाहीस. शत्रूंचा नि:पात व्हावा असेही मागितले नाहीस. स्वतःसाठी दीर्घायुष्य मागितले नाहीस. यापैकी काहीही न मागता ज्यांचा मी तुला राजा केले त्या प्रजेसाठी धोरणीपणाने निर्णय घेता यावेत म्हणून तू शहाणपण आणि ज्ञान मागितलेस. 12 तेव्हा ते मी तुला देईनच पण त्याखेरीज मालमत्ता, ऐश्वर्य आणि मानसन्मानही देईन. तुझ्या आधीच्या कोणाही राजाला मिळाले नसेल एवढी संपत्ती व मानसन्मान देईन. पुढेही तुझ्याएवढे कोणत्याही राजाला मिळणार नाही.”

13 तेथून शलमोन गिबोन येथे उच्चस्थानी गेला. सभामंडपाकडून तो पुन्हा राजाची कर्तव्ये पार पाडण्यासाठी यरुशलेम येथे गेला.

शलमोनाचे सैन्यबल आणि संपत्ती

14 शलमोनाने सैन्यासाठी घोडे आणि रथ यांची जमवाजमव सुरु केली. त्याच्याकडे 1,400 रथ आणि 12,000 घोडेस्वार जमा झाले. त्यांना त्याने पागा आणि रथांसाठी जागा असलेल्या नगरांमध्ये ठेवले. काहींना त्याने आपल्याजवळ यरुशलेम येथेच ठेवून घेतले. 15 यरुशलेममध्ये त्याने चांदीसोन्याचा भरपूर साठा केला.सोने चांदी सामान्य दगडांसारखी विपुल होती तर गंधसरुचे लाकूड पश्चिमेकडच्या डोंगराळ भागात उंबराचे लाकूड असे तितके विपुल होते. 16 मिसर आणि क्यू येथून शलमोनाने घोडे आणवले होते. राजाचे व्यापारी क्यू येथे घोड्यांची खरेदी करत. 17 या व्यापाऱ्यांनी मिसरमधून 600 शेकेल चांदीला एकेक रथ आणि 150 शेकेल चांदीला घोडा या प्रमाणे ही खरेदी केली. हित्ती आणि अरामी राजांना मग ते हे रथ आणि घोडे विकत.

शलमोनाचे मंदिराचे बांधकाम

परमेश्वराच्या नावाच्या सन्मानार्थ एक मंदिर तसेच स्वतःसाठी एक राजमहालही बांधायचे शलमोनाने ठरवले. डोंगरातून दगडाचे चिरे काढायला 80,000 पाथरवट आणि 70,000 मजूर त्याने नेमले. मजुरांच्या कामावर देखरेख करण्यासाठी शलमोनाने 3,600 मुकादम नेमले.

सोराचा राजा हिराम याला शलमोनाने निरोप पाठवला,

“माझे वडील दावीद यांना केलीत तशीच मला मदत करा. त्यांचे निवासस्थान बांधायला उपयोगी पडावे म्हणून तुम्ही गंधसरुचे लाकूड पाठवले होते. मी माझ्या परमेश्वर देवाच्या नावाच्या सन्मानार्थ एक मंदिर बांधणार आहे. तेथे आम्ही रोज परमेश्वरासमोर सुगंधी धूप जाळू तसेच एका खास मेजावर पवित्र भाकर ठेवू. शिवाय, रोज सकाळ संध्याकाळ, शब्बाथच्या दिवशी, दर नव चंद्रदर्शनी आणि आमचा देव परमेश्वराने नेमून दिलेल्या सहभोजनाच्या दिवशी आम्ही होमार्पणे वाहू. इस्राएल लोकांनी सर्वकाळ पाळायचा हा नियमच आहे.

“आमचा परमेश्वर हा सर्व देवतांपेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून मी त्याच्यासाठी भव्य मंदिर उभारणार आहे. खरं म्हणजे परमेश्वरासाठी निवासस्थान बांधणे कोणालाही झालं तरी कसं शक्य आहे? स्वर्ग किंवा संपूर्ण विश्वही त्याला सामावून घ्यायला अपुरे आहे. तेव्हा त्याच्यासाठी म्हणून मंदिर बांधणे मलाही शक्य नाही. मी आपला त्याच्या प्रीत्यर्थ धूप जाळण्यासाठी फक्त एक ठिकाण बांधू शकतो. एवढेच.

“तर, सोने, चांदी, पितळ आणि लोखंड या धातुकामात प्रवीण असा कारागिर तुम्ही माझ्याकडे पाठवून दिलात तर बरे. त्याला जांभळे, किरमिजी आणि निळे वस्त्र करता यावे. कोरीव कामाचेही त्याला चांगले शिक्षण मिळालेले असावे. माझ्या वडिलांनी निवडलेल्या इतर कारागिरांबरोबर तो इथे यहूदा आणि यरुशलेममध्ये काम करील. लबानोनमधून माझ्यासाठी गंधसरु, देवदार आणि रक्तचंदन यांचे लाकूडही पाठवावे. लबानोनमधले तुझे लाकूडतोडे चांगले अनुभवी आहेत हे मला माहीत आहे. त्या तुमच्या सेवकाना माझे सेवक मदत करतील. मी बांधायला घेतलेले मंदिर चांगले विशाल आणि सुंदर होणार असल्यामुळे मला लाकूड मोठ्या प्रमाणावर लागणार आहे. 10 लाकडासाठी वृक्षतोड करणाऱ्या तुमच्या सेवकांना मी पुढीलप्रमाणे मेहनताना देईनः 1,25,000 बुशेल गहू, 1,25,000 बुशेल जव, 115,000 गॅलन द्राक्षारस आणि 1,15,000 गॅलन तेल.”

11 हिरामने मग शलमोनाला उत्तर पाठवले. त्यात त्याने असा निरोप पाठवला की:

“शलमोन, परमेश्वराचे आपल्या प्रजेवर प्रेम आहे. म्हणून तर त्याने तुला त्यांचा राजा म्हणून नेमले.” 12 हिराम पुढे म्हणाला, “इस्राएलचा परमेश्वर देव धन्य असो. स्वर्ग आणि पृथ्वीची निर्मिती त्यानेच केली. राजा दावीदाला त्याने सूज्ञ पुत्र दिला आहे. शलमोन, तू सूज्ञ आणि विचारी आहेस. तू परमेश्वरासाठी मंदिर तसेच स्वतःसाठी राजवाडा बांधायला निघाला आहेस. 13 हिराम अबी नावाचा एक कुशल कारागिर मी तुझ्याकडे पाठवतो. 14 त्याची आई दान वंशातील असून त्याचे वडील सोर नगरातले होते. हा कारागिर सोने, चांदी, पितळ, लोखंड, दगड आणि लाकूड यांच्या कामात तरबेज आहे. जांभळे, निळे आणि अत्यंत तलम असे उंची किरमिजी वस्त्र करण्यातही तो निपुण आहे. त्याला सांगितलेली कोणतीही गोष्ट तो तिचे योग्य रेखाटन करुन कोरुन काढू शकतो. तो तुझ्या आणि तुझ्या वडिलांच्या, माझ्या स्वामी दाविदाच्या कसबी कारागिरांबरोबर काम करील.

15 “तुम्ही गहू, जव, तेल आणि द्राक्षारस देण्याचे कबूल केले आहे ते सर्व आमच्या नोकरांना द्यावे. 16 आणि लबानोनमधून आम्ही तुम्हाला हवे तितके लाकूड झाडे तोडून पाठवू. ओडक्यांचे तराफे करुन आम्ही ते इथून समुद्रमार्गे यापो येथे पोचते करु. तेथून ते तुम्ही यरुशलेमला न्यावे.”

17 शलमोनाने यानंतर इस्राएलमधल्या सर्व उपऱ्या लोकांची गणना केली. दावीदाने गणती केली होती त्यानंतरची ही गणती. दावीद हा शलमोनाचा पिता. या गणनेत त्यांना 1,53,600 उपरे लोक मिळाले. 18 शलमोनाने त्यापैकी 70,000 जणांना ओझी वाहायला निवडले आणि 80,000 लोकांना डोंगरातून दगड काढायच्या कामासाठी निवडले. उरलेल्या 3,600 उपऱ्यांना या काम करणाऱ्यांवर देखरेख करणारे मुकादम म्हणून नेमले.

शलमोन मंदिर बांधतो

यरुशलेममधील मोरिया पर्वतावर शलमोनाने परमेश्वराचे मंदिर बांधायला सुरुवात केली. शलमोनाचे वडील दावीद याला परमेश्वराने याच मोरिया पर्वतावर दर्शन दिले होते. दावीदाने तयार करुन ठेवलेल्या या जागेवर शलमोनाने मंदिर बांधले. ही जागा म्हणजेच ते अर्णान यबूसीचे खळे. आपल्या कारकिर्दींच्या चौथ्या वर्षातल्या दुसऱ्या महिन्याच्या दुसऱ्या दिवशी शलमोनाने कामाला सुरुवात केली.

शलमोनाने बांधायला घेतलेल्या परमेश्वराच्या मंदिराच्या पायाची मोजमापे अशी: हा पाया 60 हात लांब आणि 20 हात रुंद होता. तेव्हा प्रचलित असलेले जुने क्युबिट परिमाण त्याने वापरले होते. मंदिराच्या समोरचा द्वारमंडप 20 हात लांब आणि वीस हात उंच होता. त्याची आतील बाजू शलमोनाने शुध्द सोन्याने मढवली होती. मोठ्या खोलीला सर्वबाजूंनी त्याने देवदारुच्या फळ्या बसवल्या. त्यांवर शलमोनाने सोन्याचा पत्रा चढवला आणि त्यावर खजुरीची झाडे व साखळ्या कोरुन काढल्या मौल्यवान रत्ने जडवून त्याने मंदिराच्या सौदर्यात भर घातली. यात वापरलेले सोने पर्वाइमचे होते. तुळया, दाराचे खांब, भिंती, दरवाजे हे मंदिराचे आतले भागही शलमोनाने सोन्याने मढवले. भिंतींवर त्याने करुब कोरुन काढले.

यानंतर शलमोनाने मंदिरातला अत्यंत पवित्र गाभारा बांधला. हे अत्यंत पवित्र स्थान 20 हात लांब आणि वीस हात रुंद होते. मंदिराइतकीच त्याची रुंदी होती. गाभाऱ्याच्या भिंतीही शलमोनाने सोन्याने मढवल्या. हे एकंदर 23 टन सोने होते. सोन्याच्या खिळ्यांचे वजन 1 1/4 पौंड एवढे होते. वरच्या मजल्यावरची दालने ही शलमोनाने सोन्याने मढवली. 10 अत्यंत पवित्र गाभाऱ्यात बसवण्यासाठी शलमोनाने दोन करुब घडवले. हे करुबही कारागिरांनी सोन्याने मढवले. 11 करुबांच्या एकेका पंखाची लांबी 5 हात होती. त्यांची एकंदर लांबी 20 हात एवढी होती. पहिल्या करुबाचा एक पंख दालनाच्या एका बाजूच्या भिंतीला स्पर्श करत होता तर दुसरा पंख दुसऱ्या करुबाच्या एका पंखाला. 12 आणि दुसऱ्या करुबाचा दुसरा पंख दालनाच्या दुसऱ्या भिंतीला स्पर्श करत होता. 13 अशाप्रकारे करुबांच्या पंखानी वीस हात एवढे अंतर व्यापलेले होते. हे करुब पवित्र गाभाऱ्याकडे तोंड करुन उभे होते.

14 निळ्या, जांभळ्या आणि उंची किरमिजी वस्त्राचा पडदा करुन घेऊन शलमोनाने त्यावरही करुब करवून घेतले.

15 मंदिरासमोर शलमोनाने दोन स्तंभ उभे केले. हे स्तंभ 35 हात उंच होते. त्यांच्यावरचे कळस प्रत्येकी 5 हात उंचीचे होते. 16 शलमोनाने साखळ्या करुन त्या कळसांवर ठेवल्या. या साखळ्यांना त्याने 100 शोभिवंत डाळिंबे कलाकुसर म्हणून लावली. 17 हे स्तंभ मंदिरासमोर डाव्याउजव्या हाताला उभे केले. उजव्या बाजूच्या खांबाला शलमोनाने याखीम (संस्थापक) आणि डावीकडच्या खांबाला बवाज (सामर्थ्यवान) अशी नावे दिली.

रोमकरांस 6

पापात मेलेले पण ख्रिस्तात जिवंत

तर मग आपण काय म्हणावे? देवाची कृपा वाढावी म्हणून आपण पापांत राहावे काय? खात्रीने नाही. आपण जे पापाला मेलो ते अजूनही जिवंत कसे राहू? तुम्हांला माहीत नाही का की ज्या आपण प्रभु येशू ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला होता त्या आपला त्याच्या मरणातही बाप्तिस्मा झाला. म्हणून आपण त्याच्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो यासाठी की, पित्याच्या गौरवाने ख्रिस्त जसा मेलेल्यांतून उठविला गेला तसे आम्हीही जीवनाच्या नवीनपणात चालावे.

कारण जर त्याच्या मरणाच्या प्रतिरुपाने आपण त्याच्याशी जोडलो आहोत, तर त्याच्या पुनरुत्थानाच्या प्रतिरुपाने त्याच्याशी जोडले जाऊ. आपणांला हे माहीत आहे की, आपल्यातील जुना मनुष्य ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळला गेला यासाठी की आपल्या पापमय शरीराचा नाश व्हावा व यापुढे आपण पापाचे दास होऊ नये. कारण जो कोणी ख्रिस्ताबरोबर मरतो तो पापापासून मुक्त होऊन नीतिमान होतो.

आणि जर आपण ख्रिस्ताबरोबर मेलो तर आम्ही विश्वास धरतो की, त्याच्याबरोबर जिवंतही राहू. कारण आम्हांस माहीत आहे की, ख्रिस्त जो मेलेल्यांतून उठविला गेला तो यापुढे मरणार नाही. मरणाची त्याच्यावर सत्ता चालणार नाही. 10 जे मरण तो मेला ते एकदाच पापासाठी मेला, परंतु जे जीवन तो जगतो ते तो देवासाठी जगतो. 11 त्याच रीतीने तुम्ही स्वतःला पापाला मेलेले पण ख्रिस्त येशूमध्ये व देवासाठी जिवंत असे समजा.

12 यासाठी की तुम्ही पापाच्या वाईट वासना पाळाव्यात म्हणून पापाने तुमच्यावर राज्य करु नये. 13 आणि अनीतिची साधने व्हावीत म्हणून तुम्ही आपल्या शरीराचे अवयव पापाच्या स्वाधीन करु नका. त्याऐवाजी तुम्ही जे मरणातून उठविलेले लोक व जे आता जिवंत आहात ते आपणांला देवाच्या स्वाधीन करा. आपल्या शरीराचे अवयव नीतीची साधने व्हावीत म्हणून देवाच्या स्वाधीन करा. 14 पाप तुम्हांवर राज्य करणार नाही. कारण तुम्ही नियमशास्त्राधीन नाही तर देवाच्या कृपेच्या अधीन आहात.

नीतिमतेचे दास

15 तर मग आपण काय करावे? आपण नियमशास्त्राधीन नसून देवाच्या कृपेच्या अधीन आहोत म्हणून पाप करावे काय? 16 खात्रीने नाही. तुम्हांला माहीत नाही काय की जेव्हा तुम्ही स्वतःला आज्ञापालना करता एखाद्याच्या स्वाधीन करता तर ज्याची आज्ञा तुम्ही पाळता त्याचे गुलाम आहात. तुम्ही पापांत चालू शकता किंवा देवाची आज्ञा पाळू शकता. पापांमुळे आध्यात्मिक मरण येते. पण देवाची आज्ञा पाळल्याने तुम्हांला नीतिमत्व मिळते. 17 पूर्वी तुम्ही पापाचे गुलाम होता. पाप तुम्हांला काबूत ठेवीत होते. पण देवाचे उपकार मानू या की, ज्या गोष्टी तुम्हांला शिकविल्या गेल्या त्या तुम्ही पूर्णपणे पाळल्या. 18 तुम्हांला पापांपासून मुक्त केले गेले. आणि नीतिमत्वाचे गुलाम करण्यात आले. 19 तुमच्या शरीराच्या दुर्बलतेमुळे व लोकांना समजावे म्हणून मी उदाहरणाचा उपयोग करीत आहे. कारण जसे तुम्ही आपले अवयव अशुद्धतेच्या आणि परिणाम म्हणून गुलाम होण्यासाठी स्वैरतेच्या अधीन केले त्याच रीतीने आता आपल्या शरीराचे अवयव देवाच्या सेवेला नीतिमत्वाचे गुलाम व्हावे म्हणून अर्पण करा.

20 कारण जेव्हा तुम्ही पापाचे गुलाम होता, तेव्हा नीतिमत्वासंबंधाने मोकळे होता. 21 आणि त्यावेळेला तुम्हांला काय फळ मिळाले, त्या गोष्टीची तुम्हांला आता लाज वाटते, ज्याचा शेवट मरण आहे. 22 परंतु आता तुम्हांला पापापासून मुक्त करुन देवाचे गुलाम केले आहे. देवाच्या सेवेसाठी तुमचे फळ तुम्हांला मिळाले आहे व त्याचा शेवटचा परिणाम म्हणजे अनंतकाळचे जीवन आहे. 23 कारण पापाची मजुरी मरण आहे. परंतु देवाची ख्रिस्त येशूमध्ये दिलेली मोफत देणगी म्हणजे अनंतकाळचे जीवन आहे.

स्तोत्रसंहिता 16

दावीदाचे मिक्ताम [a] नावाचे स्तोत्र

16 देवा, माझे रक्षण कर कारण मी तुझ्यावर अवलंबून आहे.
मी परमेश्वराला म्हणालो,
    “परमेश्वरा, तू माझा प्रभु आहेस
    माझ्याकडे असलेली प्रत्येक चांगली गोष्ट मला तुझ्याकडून मिळाली आहे”
परमेश्वर त्याच्या पृथ्वीवरील भक्तांसाठी अनेक अद्भुत गोष्टी करतो.
    परमेश्वर त्या लोकांवर खरोखरच प्रेम करतो हे तो दाखवतो.

परंतु जे लोक उपासनेसाठी दुसऱ्या देवाकडे वळतात त्यांना दु:ख भोगावे लागते.
    ते त्या मूर्तींना रक्ताची भेट देतात.
मी त्यात सहभागी होणार नाही.
    मी त्या मूर्तींची नावेसुध्दा घेणार नाही.
माझा वाटा आणि प्याला परमेश्वराकडूनच येतो.
    परमेश्वरा, तू माझा सांभाळ करतोस तुच मला माझा वाटा देतोस.
माझा वाटा फारच अद्भूत आहे
    माझे वतन सुंदर आहे.
मी परमेश्वराची स्तुती करतो कारण त्याने मला चांगले शिकवले रात्रीच्या वेळी मला
    अगदी आतल्या गाभ्यातून आज्ञा मिळाल्या.

मी परमेश्वराला नेहमी माझ्या पुढे ठेवतो
    आणि मी त्याची उजवी बाजू कधीही सोडणार नाही.
त्यामुळे माझे ह्रदय आणि माझा आत्मा आनंदीत राहील
    माझे शरीरही सुरक्षित असेल.
10 का? कारण परमेश्वरा, तू माझ्या आत्म्याला मृत्युलोकात राहू देणार नाहीस.
    तुझ्याशी इमानदार असणाऱ्याला तू थडग्यात सडू देणार नाहीस. [b]
11 तू मला नीट कसे जगावे ते शिकवशील परमेश्वरा,
    केवळ तुझ्या सान्निध्यात असणेही संपूर्ण समाधान देणारे असेल.
    तुझ्या उजव्या बाजूला राहण्याने कायमचे समाधान लाभेल.

नीतिसूत्रे 19:20-21

20 उपदेश ऐका आणि शिका. नंतर तुम्ही शहाणे व्हाल.

21 माणूस बऱ्याच योजना आखतो. पण फक्त परमेश्वराच्याच योजना प्रत्यक्षात येतात.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center