Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NLT. Switch to the NLT to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 इतिहास 28-29

मंदिर बांधणीची राजाची योजना

28 राजाने इस्राएल लोकांमधील सर्व पुढाऱ्यांना एकत्र बोलावले. त्यांना त्याने यरुशलेमला येण्यास सांगितले. घराण्यांचे प्रमुख, राजाचे सेनापती, अधिकारी, अंमलदार, कोठारांची गुरांची, राजपुत्रांची जबाबदारी उचलणारे राजाचे सर्व महत्वाचे अधिकारी, शूर वीर आणि लढवय्ये या सर्वांना त्याने बोलावले.

राजा दावीद त्यांच्यापुढे उभा राहून म्हणाला, “माझ्या बांधवांनो आणि लोकांनो, माझे ऐका परमेश्वराचा करारकोश ठेवण्यासाठी एक विश्रामधाम बांधावे असा माझा मानस होता. देवाच्या पादासनासाठी एक मंदिर बांधायचा माझा विचार होता. त्या मंदिराच्या इमारतीचा आराखडाही मी तयार केला. पण देव मला म्हणाला, ‘नाही दावीदा, तू माझ्यासाठी मंदिर उभारु नयेस. तू एक लढवय्या असूत तू अनेकांना ठार मारले आहेस.’

“इस्राएलचा परमेश्वर देव याने इस्राएलच्या बारा घराण्यांची धुरा सांभाळण्यासाठी यहूदा घराण्याची निवड केली. आणि मग त्यातून परमेश्वराने माझ्या वडीलांच्या घराण्याला अग्रणी केले. आता या कुटुंबातून देवाने माझी इस्राएलचा कायमचा राजा म्हणून निवड केली. मला इस्राएलचा राजा करावे अशी परमेश्वराची इच्छा होती. देवाने मला भरपूर पुत्रसंतती दिली आहे. या मुलांमधून परमेश्वराने शलमोनला माझा उत्तराधिकारी म्हणून निवडले आहे. पण खरे पाहता इस्राएल हे परमेश्वराचेच राज्य आहे. परमेश्वर मला म्हणाला, ‘दावीदा, माझे मंदिर आणि त्या भोवतालचे आवार याची उभारणी तुझा पुत्र शलमोन याच्या हातून होईल. कारण पुढे राजासनावर तो बसणार आहे. त्यासाठी मी त्याची पुत्र म्हणून निवड केली आहे आणि मी त्याचा पिता आहे. माझ्या आज्ञा आणि नियम यांचे पालन करायला शलमोनाने सुरवात केली आहे. त्याने कसोशीने हे आज्ञापालन असेच पुढे चालू ठेवले तर त्याच्या राज्याला मी सर्वकाळ स्थैर्य देईन.’”

दावीद म्हणाला, “तर आता सर्व इस्राएल बांधवांनो, परमेश्वरासमोर आणि तुमच्यासमोर मी सांगतो की परमेश्वर देवाच्या सर्व आज्ञा काटेकोरपणे पाळा. तरच या सुपीक भूमीवर तुम्ही नांदाल. तुमच्यानंतर तुमचे वंशजही इथेच निर्वेधपणे राहू शकतील.

“आणि शलमोना, माझ्या मुला, आपल्या वडीलांच्या देवाला जाणून घे. शुध्द मनाने देवाची सेवा कर. देवाच्या सेवेत मनोमन आनंद मान. कारण परमेश्वरच सर्वांच्या अंतःकरणाचा ठाव घेतो. आपले सर्व विचार त्याला कळतात. आपण मदतीसाठी परमेश्वराकडे गेलो तर आपल्याला उत्तर मिळते. पण परमेश्वराकडे पाठ फिरवली तर मात्र तो आपल्याला कायमचा सोडून जातो. 10 शलमोन, परमेश्वराने त्याचे पवित्र स्थान म्हणजे मंदिर बांधून घेण्यासाठी तुझी निवड केली आहे हे चांगले लक्षात ठेव. हिंमत बाळग आणि हे कार्य पूर्णत्वाला ने.”

11 दावीदाने मग मंदिराचा आराखडा, आपला मुलगा शलमोन याच्या स्वाधीन केला. मंदिराभोवतालचे आवार, त्यातील इमारती, कोठाराच्या खोल्या, वरच्या मजल्यावरची आणि आतल्या बाजूची दालने, दयासनाचे स्थान यांचाही त्या आराखड्यात समावेश होता. 12 मंदिराच्या सर्व भागांची योजना दावीदाने केली होती, ती त्याने शलमोनाला दिली. मंदिरा भोवतीचे अंगण आणि इतर बांधकामे यांच्या योजना दावीदाने त्याला दिल्या. मंदिराच्या कोठाराच्या खोल्या आणि मंदिराची पवित्र उपकरणे ठेवण्यासाठी असलेली भांडारगृहे यांचेही नकाशे त्यात होते. 13 याजक आणि लेवी यांच्या गटांची माहिती दावीदाने शलमोनाला दिली तसेच मंदिरातील सेवेच काम आणि त्यात वापरायची उपकरणे याबद्दलही त्याने शलमोनाला सांगितले. 14 मंदिरातील सर्व वस्तूंसाठी किती सोने-चांदी वापरायची हे सांगितले. 15 सोन्या चांदीचे दिवे आणि दिवठणी यांचे नमुने केलेले होते. त्यातील प्रत्येक दिवा आणि दिवठण यासाठी नेमके किती चांदीसोने वापरायचे याची दावीदाने शलमोनाला कल्पना दिली. वेगवेगळ्या ठिकाणी गरजेप्रमाणे या दीपमाळा वापरायच्या होत्या. 16 पवित्र भाकरी ठेवायच्या मेजासाठी किती सोने-चांदी लागेल त्याचे वजन शलमोनाला दावीदाने सांगितले. 17 काटे, कटोरे, सुरया यांना लागणारे निर्भेळ सोने, तबकांसाठी लागणारे सोने-चांदी यांचे वजन दिले. 18 धूप जाळण्यासाठी जी वेदी करायची तिला लागणारे सोने किती हे ही त्याने सांगितले. परमेश्वराच्या करारकोशावर जे करुब देवदूत आपले पंख पसरुन धरत होते त्यासह असलेले दयासन म्हणजेच देवाचा रथ याचा नमुनाही शलमोनाला त्याने दिला. हे करुब सोन्यात करायचे होते.

19 दावीद म्हणाला, “हे सर्व नमुने परमेश्वराच्या मार्गदर्शनाप्रमाणे लिहून ठेवलेले आहेत. त्या नमुन्यांतील सर्व गोष्टी परमेश्वराने मला समजावून सांगितलेल्या आहेत.”

20 दावीद शलमोनाला पुढे म्हणाला, “धीर धर आणि न भिता या कामाची सांगता कर. प्रत्यक्ष परमेश्वर, माझा देव तुझ्या सोबत आहे, तेव्हा घाबरु नको. सर्व काम पुरे़ होईपर्यंत तो तुला साथ देईल. ही साथ तो अर्धवट सोडणार नाही. मंदिराचे बांधकाम तू पूर्णत्वाला नेशील. 21 याजक आणि लेवी यांचे वर्ग नेमले आहेत. ते देवाच्या मंदिराच्या कामाला सज्ज आहेत. सर्वप्रकारच्या कामासाठी कुशल कारागिर तुझ्याबरोबर आहेत. तुझी प्रत्येक आज्ञा अधिकारी आणि सर्व लोक मानतील.”

मंदिराच्या बांधकामासाठी दाने

29 राजा दावीद सर्व इस्राएल समुदायाला म्हणाला, “देवाने शलमोनाला निवडले आहे. शलमोन अजून कोवळा तरुण आहे. या कामासाठी काय करायला लागेल त्याची त्याला पूर्ण कल्पना नाही. पण हे काम फार महत्वाचे आहे. हे घर काही सामान्य माणसाचे नव्हे; ते परमेश्वराचे देवाचे निवासस्थान आहे. माइया देवाच्या मंदिराची योजना करण्यात मी प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे. सर्व वस्तूंसाठी लागणारे सोने-चांदी, पितळ मी दिलेले आहे. एवढेच नव्हे तर लोखंडाच्या वस्तूंसाठी लोखंड, लाकडी सामानासाठी लाकूड जडावाच्या कामासाठी गोमेद, पाषाण, विविधरंगी मौल्यवाने रत्ने आणि शुभ्र संगमरवर हे ही देऊ केले आहे. परमेश्वराच्या मंदिरासाठी अशा अनेकविध गोष्टी मी दिल्या. हे देवाचे मंदिर बांधून व्हावे असे मला मनापासून वाटते म्हणून सोन्या चांदीची माझी ठेवही मी देत आहे. पवित्र मंदिरासाठी मी हे करत आहे. 110 टन ओफीरचे शुध्द सोने, 260 टन निर्भेळ चांदी मी दिली. मंदिराच्या भिंती या चांदीने मढवायच्या आहेत. कुशल कारागिरांनी मंदिरातील तऱ्हेतऱ्हेच्या वस्तू कराव्या म्हणून त्यासाठी लागणारे सोनेरुपे मी दिले. आता तुम्हा इस्राएलींपैकी किती जण आज परमेश्वरासाठी काही द्यायला तयार आहात?”

तेव्हा, वडीलधारी मंडळी, इस्राएल घराण्यांचे प्रमुख सरदार, अधिकारी, राजसेवेतील कारभारी यासर्वांनी आपापल्या बहुमोल वस्तू देणगीदाखल दिल्या. देवाच्या निवासस्थानासाठी त्यांनी दिलेल्या वस्तू पुढीलप्रमाणे: 190 टन सोने, 375 टन चांदी, 675 टन पितळ, आणि 3,750 टन लोखंड. ज्यांच्याकडे मौल्यवान रत्ने होती त्यांनी ती परमेश्वराच्या मंदिरासाठी दिली. गेर्षोन घराण्यातील यहीएल याच्याकडे त्यांनी ती सुपूर्द केली. या सर्व प्रमुख मंडळींनी अगदी मनापासून आणि खुशीने, मुक्तहस्ताने दिले. त्यामुळे सर्व लोकांमध्ये आनंद पसरला. राजा दावीदालाही आनंद वाटला.

दावीदाची भावपूर्ण प्रार्थना

10 त्या समुदायापुढे दावीदाने परमेश्वराचे स्तुतिगीत म्हटले. ते असे:

“हे परमेश्वरा, इस्राएलच्या देवा, आमच्या पित्या,
    सदासर्वकाळ तू धन्य आहेस.
11 महिमा, पराक्रम, शोभा, विजय आणि सन्मान ही सर्व
    तुझीच आहेत कारण स्वर्ग-पृथ्वीवर जे जे काही आहे ते तुझेच आहे.
परमेश्वरा, हे राज्य तुझेच आहे.
    या सागळ्यांचा शास्ता आणि मुकुटमणी तूच आहेस.
12 वैभव आणि सन्मान यांचा स्रोत तूच.
    सर्वांवर तुझा अधिकार आहे.
सत्ता आणि सामर्थ्य तुझ्या हातांत एकवटले आहे.
    कोणालाही थोर आणि बलवान करणे तुझ्याच हातात आहे.
13 देवा, आम्ही तुझे आभार मानतो
    आणि तुझ्या प्रतापी नावाची स्तुती करतो.
14 या सगळ्या गोष्टी देणारा मी कोण?
किंवा हे लोक तरी कोण?
    तुझ्यामुळेच त्या आमच्याकडे आल्या.
    तुझ्याकडून मिळालेलेच आम्ही तुला परत करत आहोत.
15 आमच्या पूर्वजांप्रमाणेच आम्ही सुध्दा
    या भूतलावरचे तात्पुरते प्रवासी आहोत.
आमचे अस्तित्व ओझरत्या सावलीसारखे.
    ते थांबवणे आमच्या हाती नाही.
16 हे परमेश्वर देवा, तुझे मंदिर उभारायला या सगळ्या गोष्टी आम्ही जमा केल्या.
    तुझ्या सन्मानार्थ आम्ही हे मंदिर बांधत आहोत
पण ही सामुग्री तुझ्यामुळेच प्राप्त झालेली आहे.
    जे आहे ते सगळे तुझेच आहे.
17 हे देवा, लोकांची तू पारख करतोस
    आणि त्यांच्या भलेपणाने तुला आनंद होतो हे मी जाणतो.
मी शुध्द आणि प्रामाणिक मनाने हे
    सगळे तुला सानंद अर्पण करत आहे.
हे सगळे तुझे लोक इथे हजर आहेत
    आणि या सर्व वस्तू ते खुशीने तुला देत आहेत;
    हे मी पाहतो आहे.
18 अब्राहाम, इसहाक आणि इस्राएल या आमच्या पूर्वजांचा,
    हे परमेश्वरा, तूच देव आहेस.
त्यांनी उचित तेच करावे म्हणून तू सर्वतोपरी सहाय्य कर.
    त्यांची मने तुझ्याठायी एकनिष्ठ आणि प्रामाणिक राहावीत याची तू काळजी घे.
19 शलमोन तुझ्याशी एकनिष्ठ राहावा म्हणून त्याचे मन तुझ्याठायी स्थिर कर.
    तुझ्या आज्ञा, नियम आणि विधी यांचे पालन त्याने करावे,
या सर्व गोष्टी कराव्या आणि
    माझ्या नियोजित मंदिराची उभारणी त्याने करावी म्हणून त्याला सात्विक मन दे.”

20 तेथे जमलेल्या सर्व लोकांना उद्देशून दावीद पुढे म्हणाला, “आता आपल्या परमेश्वर देवाला धन्यवाद द्या.” तेव्हा आपल्या पूर्वजांनी ज्याची उपासना केली त्या परमेश्वराला लोकांनी धन्यावाद दिले. राजाच्या आणि परमेश्वराच्या सन्मानार्थ ते नतमस्तक झाले.

शलमोन गादीवर येतो

21 दुसऱ्या दिवशी लोकांनी परमेश्वराला यज्ञ अर्पण केले. त्यांनी होमार्पणे वाहिली. 1,000 गोऱ्हे, 1,000 एडके, 1,000 कोकरे आणि त्याबरोबर पेयार्पणे त्यांनी अर्पण केली. शिवाय सर्व इस्राएलींसाठी त्यांनी आणखीही पुष्कळ यज्ञ केले. 22 मग परमेश्वरासमोर सर्व लोकांनी खाद्यपेयांचा मनमुराद आस्वाद लुटला.

दावीदाचा मुलगा शलमोन याला त्यांनी दुसऱ्यांदा राज्याभिषेक केला. [a] राजपदासाठी शलमोनाला आणि याजक म्हणून सादोकला अभिषेक केला गेला. हे सर्व परमेश्वरासमोर झाले.

23 त्यानंतर परमेश्वराच्या राजासनावर शलमोन स्थानापन्न झाला. शलमोनाने आपल्या वडीलांची जागा घेतली. राजा म्हणून तो यशस्वी ठरला. इस्राएलचे सर्व लोक शलमोनाचे आज्ञापालन करत. 24 एकूणएक सरदार, सैनिक आणि राजा दावीदाची मुले यांना तो राजा म्हणून मान्य होता आणि ते सगळे त्याच्या आज्ञेत होते. 25 परमेश्वराने शलमोनाची भरभराट केली. परमेश्वराच्या कृपेने तो मोठा होत आहे हे इस्राएलींना ठाऊक होते. राजाला शोभेल असा दरारा परमेश्वराने त्याला प्राप्त करुन दिला. इस्राएलाच्या या आधीच्या कोणाही राजाच्या वाट्याला असे भाग्य आले नव्हते.

दावीदाचा मृत्यू

26-27 इशायाचा मुलगा दावीद याने संपूर्ण इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले. दावीद हेब्रोन नगरात सात वर्षे राजा होता. मग यरुशलेममध्ये त्याची कारकीर्द 33 वर्षांची होती. 28 पुढे वृध्द झाल्यावर दावीदाला मृत्यू आला. त्याला सफल आणि दीर्घ आयुष्य लाभले. वैभव आणि सन्मान यांची त्याला कमतरता नव्हती. त्याच्यानंतर त्याच्या मुलगा शलमोन राजा झाला.

29 राजा दावीदाचे साद्यंत वृत्त संदेष्टा शमुवेल याच्या ग्रंथात, संदेष्टा नाथानच्या ग्रंथात तसेच गाद या संदेष्ट्याचा ग्रंथात नमूद केलेले आहे. 30 इस्राएलचा राजा म्हणून त्याने जे जे केले ते सर्व या लेखनात आलेले आहे. त्याचे पराक्रम आणि त्याची कारकीर्द, इस्राएल आणि अवतीभवतीचे सर्व देश यांच्यावर या काळात गुदरलेले प्रसंग याची हकीकत या ग्रंथांमध्ये आहे.

रोमकरांस 5:6-21

आम्ही जेव्हा आमचे स्वतःचे तारण करण्यासाठी अशक्त होतो तेव्हा ख्रिस्त योग्य वेळी आमच्यासाठी मरण पावला. आता नीतिमान मनुष्यासाठी सुध्दा कदाचित कोणी मरणार नाही. एखादा मनुष्य चांगला असेल तर त्याच्यासाठी मरण्याचे धाडस कदाचित कोणीतरी करील. परंतु आम्ही पापी असतानाच ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला. त्याद्वारे त्याने दाखवून दिले की, तो आमच्यावर फार प्रेम करतो.

तर मग आता आपण ख्रिस्ताच्या रक्ताने नीतिमान ठरलो आहोत, म्हणून ख्रिस्ताद्वारे देवाच्या रागापासून आपण वाचले जाणार आहोत. 10 आम्ही देवाचे शत्रू असताही त्याच्या पुत्राच्या मरणाद्वारे त्याने आमच्याशी समेट केला. त्यामुळे आता आम्ही देवाचे मित्र असल्यामुळे देव आम्हांला त्याच्या पुत्राच्या जीवनाद्वारे रक्षील. 11 इतकेच नव्हे तर ज्याच्याद्वारे आमचा देवाबरोबर समेट झाला त्या आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे आम्हीसुद्धा देवाविषियी अभिमान बाळगतो.

आदाम आणि ख्रिस्त

12 म्हणून पाप जसे एका मनुष्याद्वारे, जगात आले आणि पापाद्वारे मरण आले, तसेच सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये मरण आले. 13 नियमशास्त्र जगात येण्यापूर्वी पाप जगात आले होते. परंतु नियमशास्त्र नसल्यामुळे कोणाच्याही हिशेबी पाप गणले जात नव्हते. 14 परंतु मरणाने आदामाच्या काळपासून ते मोशेच्या काळापर्यंत राज्य केले. ज्यांनी पाप केले नाही, त्याच्यांवरसुद्धा मरणाने राज्य केले.

देवाची आज्ञा न मानून आदामाने पाप केले म्हणून तो मेला आदाम, ख्रिस्त जो येणार होता, त्याचे प्रतिरुप आहे. 15 पण देवाची मोफत देणगी आदामाच्या पापासारखी नाही. कारण आदामाच्या पापामुळे पुष्कळ जण मरण पावले. देवाची कृपा आणि दान, एक मानव येशू ख्रिस्ताच्या कृपेद्वारे आली व विशेषेकरुन सर्व लोकांकरिता विपुल झाली. 16 आदामाने पाप केल्यानंतर तो दोषी ठरला होता पण देवाची देणगी वेगळी आहे. देवाची मोफत देणगी पुष्कळ पापांनंतर आली आणि त्या देणगीमुळे तिने आपल्या लोकांना देवासमोर नीतिमान केले. 17 एका मनुष्याच्या पापामुळे मरणाने राज्य केले. पण आता काही लोक देवाच्या कृपेची विपुलता आणि देणगी जिच्यामध्ये नीतिमत्व आहे, ते अनुभवतात, ते विशेषेकरुन येशू ख्रिस्ताद्वारे जीवनात राज्य करतील.

18 म्हणून एका पापामुळे सर्व मनुष्यांना शिक्षा झाली तसेच एका नीतिमत्वाच्या कृत्याने सर्व लोकांना अनंतकालचे जीवन देणारे नीतिमत्व मिळाले. 19 यास्तव आदामाच्या आज्ञाभंगामुळे पुष्कळांना पापी ठरविण्यात आले, त्याचप्रमाणे ख्रिस्ताच्या आज्ञापालनाने पुष्कळांना नीतिमान ठरविण्यात येईल. 20 पापे वाढवण्यासाठी म्हणून नियमशास्त्राचा प्रवेश झाला. परंतु जेथे पाप वाढले तेथे देवाची कृपाही विपुल झाली. 21 अशासाठी की, जसे पापाने मरणाच्या योगे राज्य केले, त्याच रीतीने देवाची कृपाही, नीतिमत्वाने आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे अनंतकाळच्या जीवनसाठी राज्य करील.

स्तोत्रसंहिता 15

दावीदाचे गाणे.

15 परमेश्वरा, तुझ्या पवित्र तंबूत कोण राहू शकेल?
    तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील?
जो माणूस शुध्द जीवन जगतो, चांगल्या गोष्टी करतो,
    अगदी मनापासून सत्य बोलतो तोच माणूस तुझ्या डोंगरावर राहू शकेल.
तशा प्रकारचा माणूस दुसऱ्यांबद्दल वाईट बोलत नाही तो स्वत:च्या कुंटुबाविषयी लाजिरवाणे असे काही सांगत नाही.
    त्यांना त्रास होईल असे काही करत नाही.
    तो त्याच्या शेजाऱ्याशी वाईट वागत नाही.
तो माणूस देवाची हेटाळणी करणाऱ्या माणसाबद्दल आदर दाखवीत नाही.
    परंतु तो जे लोक परमेश्वराची सेवा करतात अशा सर्वांचा आदर करतो.
त्याने जर शेजाऱ्याला वचन दिले असेल,
    तर तो त्या वचनाला जागतो. [a]
जर त्या माणसाने कोणाला पैसे दिले असतील
    तर तो कर्जावर व्याज आकारत नाही.
आणि तो निरपराध लोकांना त्रास देण्यासाठी पैसे घेणार नाही.
    जर कोणी त्या चांगल्या माणसाप्रमाणे वागला तर तो नेहमी देवाच्या जवळ राहील. [b]

नीतिसूत्रे 19:18-19

18 तुमच्या मुलाला शिकवा व तो चुकत असेल तर त्याला शिक्षा करा. तीच एक आशा आहे. तुम्ही जर हे करायला नकार दिला तर तुम्ही त्याला स्वतःचा नाश करायला मदत करीत आहात.

19 जर एखाद्याला चटकन् राग येत असेल तर त्याची किंमत त्याला चुकवावी लागते. जर तुम्ही त्याला त्याच्या संकटातून वाचवत राहिलात तर तो पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी करील.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center