Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the CSB. Switch to the CSB to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 इतिहास 19-21

अम्मोन्याकडून दावीदाच्या लोकांचा अपमान

19 नाहाश हा अम्मोन्याचा राजा होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा गादीवर आला. तेव्हा दावीदाने विचार केला, “नाहाशचे माझ्याशी सलोख्याचे संबंध होते. म्हणून त्याचा मुलगा हानून याच्याशी मी प्रेमाचे संबंध ठेवीन.” असे म्हणून दावीदाने हानूनच्या सांत्वनासाठी आपले दूत पाठवले. दावीदाचे हे सेवक अम्मोनला हानूनकडे घेऊन गेले.

तेव्हा अम्मोन्यांचे सरदार हानूनला म्हणाले, “या देखाव्याने फसू नकोस. तुझे सांत्वन करणे किंवा तुझ्या मृत वडीलांचा मान ठेवणे हा दावीदाचा हेतू नाही. दावीदाने या लोकांना तुझा प्रदेश पाहून ठेवायला आणि हेरगिरी करायला पाठवले आहे. त्याला तुझा प्रांत उद्ध्वस्त करायचा आहे.” हे ऐकून हानून ने दावीदाच्या दूतांना अटक केली आणि त्यांचे मुंडन केले. [a] त्यांची कमरेपर्यंतची वस्त्रेही फाडली आणि त्यांना वाटेला लावले.

दावीदाचे सेवक या गोष्टींमुळे इतके शरमिंदे झाले की त्यांच्याने घरी जाववेना. लोकांकडून दावीदाला ही बातमी समजली तेव्हा दावीदाने त्यांच्यासाठी पुढीलप्रमाणे निरोप पाठवला: “दाढी वाढेपर्यंत तुम्ही यरीही येथे रहा मग इकडे या.”

पण दावीदाने वैर ओढवूत घेतले आहे हे अम्मोनी लोकांच्या लक्षात आले तेव्हा हानून आणि अम्मोनी लोक यांनी मेसोपटेम्या येथून रथ आणि सारथी आणवण्यासाठी 75,000 पौंड चांदी खर्च केली. माका व सोबा या अराममधील नगरांमधूनही त्यांनी रथ आणि स्वार यांची खरेदी केली. अम्मोन्यांनी 32,000 रथ विकत घेतले. माकाच्या राजालाही त्यांनी आपल्या सैन्यासह मदतीला बोलावले व त्याचे मोल देऊ केले. तेव्हा त्यांनी येऊन मेदबा नगराजवळ तळ ठोकला. खुद्द अम्मोनीही नगराबाहेर पडून वेशीजवळ लढायला आले.

अम्मोनी लढाईला सज्ज झाले आहेत हे ऐकून दावीदाने यवाबाला इस्राएलच्या सर्व सैन्यासकट युध्दावर पाठवले. अम्मोनी लढायच्या जय्यत तयारीनिशी वेशीजवळ आले. त्यांच्या मदतीला आलेले राजे मैदानात स्वतंत्रपणे उभे होते.

10 सैन्याच्या दोन तुकड्या आपल्याविरुध्द उभ्या ठाकलेल्या असून त्यातली एक आपल्या मागे व एक पुढे आहे हे यवाबने पाहिले. तेव्हा त्याने इस्राएली फौजेतील निवडक लढवय्यांना अरामी सैन्यासमोर नियुक्त केले. 11 उरलेल्या इस्राएली फौजेला अबीशयच्या हाताखाली सोपवले. अबीशय हा यवाबचा भाऊ. हे सैन्य अम्मोन्याशी लढायला गेले. 12 यवाब अबीशयला म्हणाला, “अरामचे सैन्य जर मला भारी ठरले तर तू माझ्या मदतीला ये. आणि अम्मोनी तुझ्यापेक्षा प्रबळ ठरले तर मी तुला सहाय्य करीन. 13 आपल्या लोकांसाठी आणि देवाच्या या नगरांसाठी लढताना आपण प्रयत्नांची शिकस्त करु, शौर्य गाजवू. मग परमेश्वराला जे योग्य वाटेल ते तो करो.”

14 यवाब आपल्या सैन्यासह अरामी फौजेवर चालून गेला. तेव्हा अरामच्या सैन्याने त्यांच्यापुढून पळ काढला. 15 अरामचे सैन्य माघार घेऊन पळून जात आहे हे पाहताच अम्मोन्यांनीही पलायन केले. अबीशय आणि त्याचे सैन्य यांच्याकडे त्यांनी पाठ फिरवली. अम्मोनी आपल्या नगरात परतले आणि यवाब यरुशलेमला परत आला.

16 इस्राएलपुढे आपला पराभव झाला आहे हे अरामी सरदारांनी पाहिले तेव्हा त्यांनी जासूद पाठवून फरात नदीपलीकडील आपल्या लोकांना बोलवून घेतले. शोफख हा हदरेजरच्या अरामी फौजेचा सेनापती होता. त्याच्या नायकत्वाखाली ते आले.

17 अरामी लढाईची जमवाजमव करत आहेत हे दावीदाने ऐकले तेव्हा त्याने सर्व इस्राएल लोकांना एकत्र जमवले आणि यार्देन नदीपलीकडे जाऊन आराम्यांच्या समोर व्यूह रचला. सर्व तयारीनिशी त्यांनी आरम्यांवर हल्ला केला. 18 इस्राएल लोकांसमोरुन अराम्यांनी पळ काढला. दावीदाने व त्याच्या सैन्याने सात हजार अरामी सारथी आणि चाळीस हजार अरामी सैन्य यांना ठार केले. अरामी सैन्याचा नेता शोफख यालाही त्यांनी मारुन टाकले.

19 इस्राएलाने आपला पाडाव केला आहे हे हदरेजरच्या अधिकाऱ्यांचा लक्षात आल्यावर त्यांनी दावीदाशी तह केला. ते दावीदाच्या अधिपत्याखाली आले. अराम्यांनी पुन्हा अम्मोनी लोकांना मदत केली नाही.

यवाबकडून अम्मोन्यांचा संहार

20 राजे लढाईच्या मोहिमेवर बाहेर पडतात अशावेळी म्हणजे वर्षारंभी यवाब इस्राएलाचे सैन्य घेऊन युध्दासाठी निघाला. पण दावीद यरुशलेममध्येच राहिला. इस्राएलचे सैन्य अम्मोन्यांच्या नगरात शिरले आणि त्यांनी तो मुलूख उद्ध्वस्त केला. मग त्यांनी राब्बा नगराकडे आपला मोर्चा वळवला. त्यांनी नगराला वेढा घातला आणि लोकांची नाकेबंदी केली. राब्बा नगर पडेपर्यंत यवाबने इस्राएली सैन्यासह नगरावर हल्ला चालू ठेवला, व राब्बा उद्ध्वस्त केले.

दावीदाने, त्या लोकांच्या राजाच्या मस्तकावरील मुकुट काढला. त्या सोन्याच्या रत्नजडित मुकुटाचे वजन पंचेचाळीस पौंड होते. तो दावीदाच्या मस्तकावर ठेवण्यात आला. राब्बा नगरातून आणखीही पुष्कळ लूट दावीदाला मिळाली. राब्बातील लोकांना बाहेर काढून दावीदाने त्यांच्याकडून करवती, कुऱ्हाही, पहारी या हत्यारांनी करायच्या कष्टाच्या कामाला जुंपले. अम्मोन्यांच्या सर्व नगरांमध्ये दावीदाने हेच केले. मग दावीद आणि त्याचे सैन्य यरुशलेमला परतले.

धिप्पाड पलिष्ट्यांचा वध

पुढे गेजेर येथे इस्राएल लोकांचे पलिष्ट्यांशी युध्द झाले. या लढाईत सिब्बखय हूशाथी याने सिप्पय याला ठार मारले. सिप्पय हा अत्यंत धिप्पाड व रेफाई वंशातला होता. तेव्हा हे पलिष्टि लोक इस्राएलींना शरण आले.

इस्राएलींची पुढे पुन्हा एकदा पलिष्ट्यांशी लढाई झाली. त्यावेळी याईरचा मुलगा एलहानान याने गथच्या गल्याथचा भाऊ लहमी याला ठार केले. लहमीचा भाला चांगला लांबलचक आणि जाडजूड होता. हातमागाच्या तुरीसारखा तो मोठा होता.

गथ येथे पलिष्ट्यांशी इस्राएल लोकांची आणखी एकदा लढाई झाली. या गावात तेव्हा एक प्रचंड आकारमानाचा माणूस होता. त्याच्या हातापायांना प्रत्येकी सहासहा, अशी एकंदर चोवीस बोटे होती. तो राक्षसपुत्रच होता. अशा माणसाने इस्राएल लोकांचा उपहास केल्यावर योनाथानने त्याला ठार केले. योनाथान हा शिमीचा मुलगा. शिमी दावीदाचा भाऊ.

पलिष्टे ही गथ नगरातील बलाढ्य लोकांची संतती. दावीद व त्याचे सेवक यांनी त्यांचे पारिपत्य केले.

इस्राएलच्या जनगणनेचे पातक

21 सैतान इस्राएल लोकांच्या विरुध्द होता. त्याने दावीदाला इस्राएल लोकांची जनगणना करण्यास प्रवृत्त केले. दावीद यवाबला आणि अधिकाऱ्यांना म्हणाला, “इस्राएलमधील सर्व लोकांच्या मोजणीला लागा. बैरशेब्यापासून दानपर्यंत सर्व प्रदेश पालथा घाला. कोणीही वगळले जाता कामा नये. मग मला एकंदर संख्या किती आहे ते येऊन सांगा.”

यावर यवाब म्हणाला, “परमेश्वर आपले राष्ट्र आहे त्यापेक्षा शंभर पटीने वाढवो. इस्राएलमधील सर्व लोक आपले दास आहेत, तेव्हा माझे स्वामीराज, आपण ही गोष्ट कशासाठी करता? त्याने इस्राएलचे लोक दोषी आणि पातकी ठरतील.”

पण राजा दावीद काहीही ऐकून घेण्यास तयार नव्हता. तेव्हा यवाबला राजाज्ञेप्रमाणे वागणे भाग पडले. यवाब निघाला आणि लोकांची मोजणी करत त्याने सर्व प्रदेश तुडवायला सुरुवात केली. मग यरुशलेमला परत येऊन दावीदाला त्याने एकंदर लोकसंख्या सांगितली. इस्राएलमध्ये 11,00,000 तलवार धारी पुरुष होते आणि यहूदात 4,70,000. यवाबाने लेवी आणि बन्यामीन यांच्या घराण्यांची मोजदाद केली नव्हती कारण राजा दावीदाचा हुकूम त्याला मान्य नव्हता. देवाच्या दृष्टीने दावीदाची ही चूक होती म्हणून देवाने इस्राएलला शासन केले.

इस्राएलला शासन

मग दावीद देवाला म्हणाला, “माझ्या हातून हा मूर्खपणा झाला आहे. इस्राएलमधील लोकांची मोजणी करुन मी पाप केले आहे. या अपराधाबद्दल या तुझ्या सेवकाला तू या पापाची क्षमा करावीस अशी मी विनवणी करतो.”

9-10 गाद हा दावीदाचा संदेष्टा होता. त्याला परमेश्वर म्हणाला, “जा, जाऊन दावीदाला सांग: ‘परमेश्वराचे म्हणणे असे आहे: तीन गोष्टीमधून निवड करायची संधी मी तुला देतो. तू त्यांतील एक निवड. तू निवडशील ती शिक्षा मी तुला करीन.’”

11-12 मग गाद दावीदाकडे गेला. दावीदाला तो म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे असे आहे, ‘दावीद तुझ्या शिक्षेची निवड तूच कर: अन्नधान्याच्या टंचाईची तीन वर्षे, किंवा शत्रू तलवारीने तुझा पाठलाग करत आहे आणि तुला पळता भुई थोडी झाली आहे असे तीन महिने किंवा परमेश्वराच्या शिक्षेचे तीन दिवस. या काळात देशभर भयंकर रोगराई पसरेल आणि परमेश्वराचा दूत इस्राएल लोकांचा संहार करील.’ दावीद मला देवाने पाठवले आहे. आता मी त्याला काय उत्तर देऊ ते तू ठरव आणि मला सांग.”

13 दावीद गादला म्हणाला, “मी भलत्याच संकटात सापडलो आहे. माझ्या शिक्षेच्या बाबतीत माणूस काय ठरवणार? परमेश्वर दयाघन आहे. मला शासन कसे करायचे ते त्यालाच ठरवू दे.”

14 तेव्हा परमेश्वराने इस्राएलभर रोगराई पसरवली. त्यात 70,000 लोक मृत्युमुखी पडले. 15 यरुशलेमचा नाश करायला देवाने दूत पाठवला. पण त्याने यरुशलेमच्या संहाराला सुरुवात केली तेव्हा परमेश्वराला ते अरिष्ट पाहून वाईट वाटले. परमेश्वराने हा संहार थांबवायचे ठरवले. परमेश्वर त्या संहारक दूताला म्हणाला, “थांब, पुरे झाले” त्या वेळी परमेश्वराचा दूत अर्णान यबूसी याच्या खळ्याजवळ होता.

16 दावीदाने वर पाहिले तेव्हा त्याला परमेश्वराचा दूत आकाशात उभा असलेला दिसला. त्याने आपली तलवार यरुशलेम नगरावर उपसलेली होती. दावीद आणि पुढाऱ्यांनी नम्रपणे वाकून अभिवादन केले. या सर्वांनी दुखवट्याच्या वेळी घालतात तसे शोक प्रदर्शित करणारे कपडे घातलेले होते. 17 दावीद देवाला म्हणाला, “पाप माझ्या हातून घडले आहे लोकांच्या मोजणीचा हूकूम मी दिला. माझे चुकले. इस्राएल लोक निरपराध आहेत. परमेश्वरा, देवा शासन करायचे ते मला आणि माझ्या कुटुंबियांना कर. पण तुझ्या लोकांचा जीव घेणारी ही रोगाची साथ थांबव.”

18 मग परमेश्वराचा दूत गादला म्हणाला, “परमेश्वराच्या उपासनेसाठी दावीदाला एक वेदी बांधायला सांग. अर्णान यबूसीच्या खळ्या जवळ त्याने ती बांधावी.” 19 गादने हे दावीदाला सांगितले. दावीद अर्णानच्या खळ्याकडे गेला.

20 अर्णान तेव्हा गव्हाची मळणी करत होता. तो मागे वळून पाहतो तर त्याला देवदूत दिसला. अर्णानचे चारही मुलगे त्याला पाहून लपून बसले. 21 दावीद अर्णान कडे गेला. अर्णान खळ्यातून राजाजवळ गेला आणि त्याने राजाला डोके जमिनीपर्यंत लववून नमस्कार केला.

22 राजा त्याला म्हणाला, “तुझे हे खळे मला विकत दे. त्याची पूर्ण किंमत मी तुला देईन. तेथे मला परमेश्वराच्या उपासने करिता वेदी बांधायची आहे. म्हणजे ही जीवघेणी मरी थांबेल.”

23 अर्णान दावीद राजाला म्हणाला, “हे खळे मी तुम्हाला दिले. तुम्ही आमचे स्वामी आणि पोशिंदे आहात. तुम्ही त्याचे हवे ते करा. यज्ञात अर्पण करण्यासाठी मी बैलही देईन. तसेच वेदीवरील होमात घालण्यासाठी लाकडी फळ्या, आणि धान्यार्पणासाठी गहू हे ही सर्व मी तुम्हाला देईन.”

24 तेव्हा राजा दावीद अर्णानला म्हणाला, “मी तुला त्याची पूर्ण किंमत देईन. तुझ्याकडून काढून घेऊन मी ते परस्पर परमेश्वराला वाहणार नाही. फुकट मिळालेला होमबली मी अर्पण करणार नाही.”

25 आणि दावीदाने खळ्याचे मूल्य म्हणून अर्णानला 25 पौंड सोने दिले. 26 दावीदाने त्या जागी परमेश्वराच्या उपासनेकरिता वेदी बांधली. तेथे त्याने होम आणि शांती-अर्पणे केली. दावीदाने परमेश्वराची प्रार्थना केली. त्याला उत्तर म्हणून परमेश्वराने स्वर्गातून अग्नी पाठवला. तो दिव्य अग्नी नेमका होमार्पणाच्या वेदीवर पडला. 27 मग परमेश्वराने देवदूताला आपली तलवार म्यान करायला सांगितले.

28 अर्णानच्या खळ्यावर परमेश्वराने आपल्याला उत्तर दिलेले पाहून दावीदाने परमेश्वरासाठी यज्ञ केले. 29 (पवित्र निवासमंडप आणि होमार्पणाची वेदी, त्याकाळी गिबोनमध्ये उच्च स्थानावर होती. इस्राएल लोक वाळवंटात असताना मोशेने तो पवित्र निवासमंडप बांधला होता. 30 परमेश्वराच्या दूताच्या तलवारीच्या धाकाने दावीद देवापुढे पवित्र निवासमंडपाकडे जाण्यास घाबरत होता.)

रोमकरांस 2:25-3:8

25 तुम्ही नियमशास्त्र पाळीत असला तर सुंतेला मोल आहे. पण जर तुम्ही नियमशास्त्र पाळीत नाही तर, तुमची सुंता न झाल्यासारखी आहे. 26 सुंता न झालेला मनुष्य जर नियमशास्त्राचे पालन करतो, तर त्याची सुंता न होणे हे सुंता झाल्याप्रमाणे समजण्यात येणार नाही काय? 27 ज्या मनुष्याची शारीरिक रीतीने सुंता झाली नाही आणि जो नियमशास्त्र पूर्ण करतो, तो ज्या तुम्हांला लिखित नियम व सुंता आहे, तरी नियमशास्त्र मोडता त्या तुमचा न्याय करील.

28 कारण जो बाहेरुन यहूदी आहे तो खरोखर यहूदी नाही व देहाची बाह्यत्कारी सुंता ही सुंता नव्हे. 29 पण जो अंतःकरणाचा यहूदी, तो यहूदी आहे आणि खरी सुंता लेखी नियमांद्वारे नव्हे तर आत्म्याने अंतःकरणाची केलेली सुंता होय, त्याची प्रशंसा माणसांकडून नव्हे, तर देवाकडून होते.

तर मग यहूदी असण्यात फायदा काय? किंवा सुंतेपासून फायदा काय? सर्व बाबतीत पुष्कळच आहे. कारण सर्वप्रथम त्यांना देवाची वचने विश्वासाने सोपविण्यात आली होती. हे खरे आहे की त्यातील काही अविश्वासू होते; देवाच्या विश्वासूपणाला अविश्वासूपणा नाहीसा करील काय? खात्रीने नाही! देव खरा असलाच पाहिजे आणि प्रत्येक मनुष्य खोटा, पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की,

“तू बोलशील तेव्हा योग्य ठरशील आणि तुझा न्याय होत
    असता तू विजय मिळविशील.” (A)

जर आपल्या दुष्टपणामुळे देवाचा न्याय स्पष्ट होत असेल तर त्याला काय म्हणावे? देव जो आपणावर क्रोध आणतो त्याला अनीतिमान म्हणावे काय? (मी हे मानवाप्रमाणे बोलतो). खात्रीने नाही! कारण मग देव जगाचा न्याय कसा करील?

परंतु तुम्ही असे म्हणाला की, “जर देवाचा खरेपणा माझ्या खोटेपणामुळे त्याच्या गौरवासाठी उठून दिसत असेल, तर मग मी पापी का गणला जातो?” आपण का वाईट करु नये जर त्याचा परिणाम चांगला होत असेल. कारण काही जण आपल्या विरुध्द वाईट बोलत आहेत, आणि त्यांना मिळणारी शिक्षा त्याबद्दलचा न्याय आहे.

स्तोत्रसंहिता 11

11 माझा परमेश्वरावर विश्वास आहे, मग तू मला पळून जाऊन लपावयास का सांगितलेस?
    तू मला म्हणालास “पक्ष्यासारखा उडून तुझ्या डोंगरावर जा.”

दुष्ट लोक शिकाऱ्यासारखे असतात.
    ते अंधारात लपून बसतात. ते धनुष्याची दोरी खेचतात.
    ते त्यांचा बाण लक्ष्यावर रोखतात आणि तो चांगल्या आणि सत्यवादी माणसाच्या ह्रदयात सरळ सोडतात.
त्यांनी सगळ्या चांगल्या गोष्टींचा [a] असा नाश केला तर काय होईल?
    मग चांगली माणसे काय करतील?

परमेश्वर त्याच्या पवित्र राजप्रासादात राहतो.
    तो स्वर्गात त्याच्या सिंहासनावर बसतो
आणि जे काही घडते ते तो बघतो परमेश्वर त्याच्या डोळ्यांनी लोकांकडे अगदी बारकाईने पाहातो
    ते चांगले आहेत की वाईट आहेत ते तो बघत असतो.
परमेश्वर चांगल्या लोकांचा शोध घेतो.
    दुष्टांना दुसऱ्यांना त्रास द्यायला आवडते आणि परमेश्वर अशा दुष्ट लोकांचा तिरस्कार करतो.
तो त्यांच्यावर जळते निखारे आणि तप्त गंधक ओतेल.
    दुष्टांना फक्त तप्त आणि चटका देणारा वाराच मिळेल.
परंतु परमेश्वर चांगला आहे आणि चांगले कृत्य करणारे लोक त्याला आवडतात.
    चांगले लोक त्याच्याजवळ असतील आणि त्याचे दर्शन घेतील.

नीतिसूत्रे 19:10-12

10 मूर्ख माणूस श्रीमंत असायला नको. ते गुलामाने राजपुत्रांवर राज्य करण्यासारखे आहे.

11 जर माणूस शहाणा असला तर त्याचा शहाणपणा त्याला सहनशीलता देतो. आणि तो जेव्हा चूक करणाऱ्यांना क्षमा करतो. तेव्हा तर ते खूपच चांगले असते.

12 राजा रागावतो तेव्हा ते सिंहाच्या गर्जनेसारखे वाटते. पण तो जर तुमच्यावर खुश असला तर ते हळुवार पावसासारखे वाटते.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center