Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the CSB. Switch to the CSB to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 इतिहास 15:1-16:36

करारकोश यरुशलेममध्ये

15 दावीदाने दावीदानगरात स्वतःसाठी घरे बांधली. तसेच करारकोश ठेवण्यासाठी एक स्थान उभारले. ते एका तंबूसारखे होते. मग दावीद म्हणाला, “फक्त लेवींनाच करारकोश वाहून आणण्याची परवानगी आहे. या कामासाठी आणि सर्वकाल परमेश्वराची सेवा करण्यासाठीच लेवींची निवड झाली आहे.”

या जागेपाशी करारकोश आणायला म्हणून दावीदाने यरुशलेममधील सर्व इस्राएल लोकांना एकत्र बोलावले. अहरोनाचे वंशज आणि लेवी यांनाही यायला सांगितले.

कहाथच्या घराण्यातील 120 माणसे होती. उरीयेल त्यांचा प्रमुख होता.

मरारीच्या कुळातले. 220 जण होते. असाया हा त्यांचा नेता होता.

गर्षोमच्या घराण्यातली 130 लोक असून, योएल हा त्यांचा प्रमुख होता.

अलीसाफानच्या घराण्यापैकी 200 लोक होते. त्यांचा नेता शमाया होता.

हेब्रोनच्या वंशातले 80 लोक होते. अलीएल त्यांचा नेता होता.

10 उज्जियेलच्या घराण्यातले 112 जण असून अमीनादाब हा प्रमुख होता.

याजक आणि लेवी यांच्याशी दावीदाची बातचीत

11 दावीदाने मग सादोक आणि अब्याथार याजकांना बोलावले. तसेच उरीयेल, असाया, योएल, शमाया, अलीएल आणि अम्मीनादाब या लेवीनाही बोलावून घेतले. 12 दावीद त्यांना म्हणाला, “तुम्ही लेवी घराण्यांचे प्रमुख आहात. तुम्ही आणि सर्व लेवींनी शुचिर्भूत झाले पाहिजे. त्यानंतर मी तयार केलेल्या जागेत तुम्ही तो करारकोश आणा. 13 गेल्या वेळी हा कोश कसा आणवा याबद्दल आपण परमेश्वराला विचारले नाही. तुम्हा लेवींनी तो आणला नाही. म्हणून परमेश्वराने आपल्याला ती शिक्षा दिली.”

14 इस्राएलच्या परमेश्वर देवाचा करारकोश आणता यावा यासाठी मग सर्व याजक आणि लेवी शुचिर्भूत झाले. 15 मोशेने सांगितले होते त्याप्रमाणे करारकोश खांद्यावरुन आणण्यासाठी लेवींनी विशेष प्रकारच्या काठ्या घेतल्या. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणेच त्यांनी तो करारकोश आणला.

गायक

16 दावीदाने लेवी प्रमुखांना आपल्या गायकबंधूंना बोलावून घ्यायला सांगितले. सतार, वीणा, झांजा ही वाद्ये आणून त्यांना मंगलगीते म्हणायला सांगितले.

17 लेवींनी मग हेमान आणि त्याचे भाऊ आसाफ आणि एथान यांना नेमले. हेमान हा योएलचा मुलगा. आसाफ बरेख्याचा मुलगा. एथान कुसायाचा मुलगा. हे सर्वजण मरारीच्या घराण्यातले होते. 18 याखेरीज लेवींचा आणखी एक गट होता. जखऱ्या, बेन, यजीएल, शमीरामोथ, यहीएल, उन्नी, अलीयाब, बनाया, मासेमा, मत्तिथ्या, अलीफलेह, मिकनेया, ओबेद-अदोम आणि ईयेल हे ते होत. हे द्वारपाल होते.

19 हेमान, आसाफ आणि एथान यांनी पितळी झांजा वाजवल्या. 20 जखऱ्या, अजीएल, शमीरामोथ, यहीएल, उन्नी, अलीयाब, मासेया, बनाया हे उच्च स्वरात सतारी वाजवत होते. 21 मत्तिथ्या, अलीफलेह, मिकनेया, ओबेद-अदोम, ईयेल आणि अजज्या हे मंदसुरात वीणा वाजवण्याच्या कामावर होते. त्यांचे हे नेहमीचेच काम होते. 22 लेवींचा प्रमुख कनन्या हा मुख्य गायक होता. गायनात निपुण असल्यामुळे त्याच्यावर ही कामगिरी होती.

23 बरेख्या आणि एलकाना हे करार कोशाचे रक्षक होते. 24 शबन्या, योशाफाट, नथानेल, अमासय, जखऱ्या, बनाया आणि अलियेजर हे याजक करारकोशापुढे चालताना कर्णे वाजवत होते. ओबेद-अदोम आणि यहीया हे करार कोशाचे आणखी दोन रक्षक होते.

25 दावीदा, इस्राएलमधील वडीलधारी मंडळी, सरदार करार कोश ओबेद-अदोमच्या घरातून आणायला पुढे गेले. सर्वजण अत्यंत आनंदात होते. 26 करार कोश उचलून आणणाऱ्यांना देवाने साहाय्य केले. त्यांनी सात गोऱ्हे आणि सात मेंढे यांचे यज्ञार्पण केले. 27 करारकोश वाहून नेणाऱ्या सर्व लेवींनी तलम वस्त्राचे अंगरखे घातले होते. गायकप्रमुख कनन्या आणि इतर सर्व गायक यांनी तलम झगे घातले होते. दावीदाचा अंगरखा देखील तलम कापडाचा होता. शिवाय त्याने तशाच कापडाचा एफोद सुध्दा घातला होता.

28 अखेर सर्व इस्राएल लोकांनी करार कोश आणला. जयघोष करत रण-शिंगाच्या नादांत, कर्णे, झांजा, सतारी, वीणा वाजवत त्यांनी तो आणला.

29 करार कोश दावीदनगरात पोहंचला तेव्हा शौलची मुलगी मीखल हिने खिडकीतून पाहिले. दावीद राजाला नाचताना, जल्लोष करताना पाहून त्याच्याबद्दलचा तिचा आदर नाहीसा झाला. तिला त्याचा तो वेडगळपणा वाटला.

16 लेवींनी करारकोश आत आणून दावीदाने उभारलेल्या तंबूमध्ये तो ठेवला. मग त्यांनी देवाला होमार्पणे आणि शांती अर्पणे वाहिली. हे झाल्यावर दावीदाने परमेश्वराच्या नावाने लोकांना आशीर्वाद दिला. मग त्याने एकूनएक इस्राएल स्त्री-पुरुषांना एकएक भाकर, खजूर आणि किसमिस एवढे दिले.

दावीदाने मग काही लेवींची करार कोशाच्या सेवेसाठी निवड केली. इस्राएलच्या परमेश्वर देवाचे गुणगान गाणे, त्याचे आभार मानणे, स्तुती करणे हे त्यांचे काम होते. आसाफ हा पहिल्या गटाचा मुख्य होता. त्याचा गट झांजा वाजवीत असे. जखऱ्या दुसऱ्या गटाचा प्रमुख होता. इतर लेवी पुढीलप्रमाणे: उज्जियेल, शमिरामोथ, यहिएल, मत्तिथ्या, अलीयाब, बनाया, ओबेद-अदोम, आणि ईयेल. हे सतारी आणि वीणा वाजवत असत बनाया आणि याहजिएल हे याजक नेहमी करार कोशापुढे रणशिंगे वाजवत. परमेश्वराची स्तुतिगीते गाण्याचे काम दावीदाने आसाफला आणि त्याच्या भावांना दिले.

दावीदाचे आभारगीत

परमेश्वराचे स्तवन करा.
त्याला हाक मारा.
    परमेश्वराने केलेली महान कृत्ये लोकांना सांगा.
परमेश्वराची स्तोत्रे गा.
त्यांचे स्तवन म्हणा.
    त्याचे चमत्कार इतरांना सांगा.
10 परमेश्वराच्या पवित्र नावाचा अभिमान धरा.
    परमेश्वराकडे येणाऱ्या तुम्हा सर्वांना आनंद मिळो.
11 परमेश्वराकडे पाहा त्याचे सामर्थ्य बघा.
    मदतीसाठी त्याला शरण जा.
12 देवाच्या अद्भूत कृत्यांची आठवण ठेवा.
    त्याने केलेले न्याय आणि चमत्काराची कृत्ये यांचे स्मरण करा.
13 इस्राएलचे लोक परमेश्वराचे सेवक आहेत.
    याकोबाचे वंशज हे परमेश्वराने निवडलेले खास लोक आहेत.
14 परमेश्वर आमचा देव आहे.
    त्याच्या सामर्थ्याची साक्ष सर्वत्र आहे.
15 त्याच्या कराराचे स्मरण असू द्या.
    त्याने दिलेल्या आज्ञा पुढील हजारो पिढ्यांसाठी आहेत.
16 परमेश्वराने अब्राहामाशी केलेल्या कराराची आठवण ठेवा.
    इसहाकाला त्याने दिलेल्या वचनाची आठवण असू द्या.
17 याकोबासाठी परमेश्वराने तोच नियम केला.
    इस्राएलशी त्याने तसाच निरंतर करार केला.
18 इस्राएलला परमेश्वर म्हणाला, “मी तुम्हाला कनानचा प्रदेश देईन.
    ते वतन तुमचे असेल.”

19 त्यावेळी तुम्ही संख्येने अगदी थोडे होता,
    परक्या प्रदेशात उपरे होता.
20 तुम्ही एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात भटकत होता.
    एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जात होता.
21 पण परमेश्वराने कोणाकडूनही त्यांना दु:ख होऊ दिले नाही.
    परमेश्वराने राजांना तशी ताकीद दिली.
22 परमेश्वराने या राजांना सांगितले, “मर्जीतील लोकांना दुखवू नका.
    माझ्या संदेष्ट्यांना दुखवू नका.”
23 पृथ्वीवरील समस्त लोकहो, परमेश्वराचे स्तवन करा.
    परमेश्वराने आपल्याला वाचवल्याची शुभवार्ता रोज सर्वांना सांगा.
24 परमेश्वराच्या गौरवाची कृत्ये सर्व राष्ट्रांना कळवा
    तो किती अद्भूत आहे ते सर्वांना सांगा.
25 परमेश्वर थोर आहे.
    त्याची स्तुती केली पाहिजे इतर दैवतांपेक्षा परमेश्वराचा धाक अधिक आहे.
26 का बरे? कारण जगातले इतर सगळी दैवते म्हणजे नुसत्या क्षुद्र मूर्ती
    पण परमेश्वराने आकाश निर्माण केले.
27 परमेश्वराला महिमा आणि सन्मान आहे.
    देव तेजस्वी लखलखीत प्रकाशाप्रमाणे आहे.
28 लोक हो, सहकुटुंब परमेश्वराच्या महिम्याची
    आणि सामर्थ्याची स्तुती करा.
29 त्याचे माहात्म्य गा. त्याच्या नावाचा आदर करा.
    त्याच्यापुढे आपली अर्पणे आणा.
    त्याची आराधना करा आणि त्याच्या सात्विक सौंदर्याचे गुणगान करा.
30 परमेश्वरासमोर सर्व पृथ्वीचा भीतीने थरकाप होतो पण त्याने पृथ्वीला खंबीरपणा दिला.
    हे जग असे हलणार नाही.
31 पृथ्वी आणि आकाश आनंदी असो सर्वत्र
    लोक म्हणोत, “हे परमेश्वराचे साम्राज्य आहे.”
32 समुद्र आणि त्यात सामावलेले सर्व काही आनंदाने गर्जना करो
    शेतमळ्यांची सृष्टी उल्हासित होवो.
33 अरण्यातील वृक्ष परमेश्वरासमोर हर्षभरित होऊन गातील कारण
    साक्षात परमेश्वरच जगाला न्याय देण्यासाठी आलेला असेल.
34 लोक हो, परमेश्वराचे कृतज्ञतेने स्मरण करा, कारण तो चांगला आहे.
    त्याचे प्रेम चिरंतन आहे.
35 परमेश्वराला सांगा,
    “देवा, तूच आमचा त्राता आहेस.
आमचे रक्षण कर, आम्हाला संघटित ठेव
    आणि इतर राष्ट्रांपासून आमचा बचाव कर.
मग आम्ही तुझे नामसंकीर्तन करु.
    तुझा माहिमा गाऊ.”
36 इस्राएलच्या परमेश्वर देवाचे अनादी काळापासून स्तवन केले जाते.
    त्याची स्तुतिस्तोत्रे अखंड गायिली जावोत.

सर्व लोकांनी “आमेन” म्हणून परमेश्वराचे स्तवन केले.

रोमकरांस 1:18-32

सर्व लोकांनी चुका केल्या आहेत

18 लोकांनी केलेल्या प्रत्येक अनितीच्या कृत्यांमुळे व जे आपल्या अनीतीने सत्य दाबून ठेवतात, त्यांच्यामुळे स्वर्गातून देवाचा क्रोध प्रगट होतो. 19 हे असे होत आहे कारण देवाविषयीचे ज्ञान त्यांच्यात दिसून येते व देवाने ते त्यांना दाखवून दिले आहे.

20 जगाच्या निर्मितीपासून देवाचे अदृश्य गुण, त्याचे सनातन सामर्थ्य व त्याचे देवपण हे देवाने ज्या गोष्टी निर्माण केल्या त्यावरुन प्रगट होतात. आणि जर तुम्हांला हे कळत नाही, तर ह्याचे तुम्हांला कसलेच समर्थन करता येणार नाही.

21 कारण जरी त्यांना देव माहीत होता तरी त्यांनी देव म्हणून त्याचा आदर केला नाही, किंवा त्याचे आभार मानले नाहीत, उलट ते आपल्या विचारात निष्फळ झाले आणि मूर्ख अंतःकरणे अंधकारमय झाली. 22 जरी गर्वाने त्यांनी स्वतःला शहाणे समजले तरी ते मूर्ख ठरले. 23 आणि अविनाशी देवाचे गौरव याची मर्त्य मानव, पक्षी, चार पायाचे प्राणी, सरपटणारे प्राणी यांच्यासारख्या दिसणाऱ्या प्रतिमांशी अदलाबदल केली.

24 यासाठी देवाने त्यांना त्यांच्या मनातील वाईट वासनांच्या व वैषयिक अशुद्धतेमुळे सोडून दिले आणि त्यांनी एकमेकांच्या देहाचा अनादर करावा यासाठी त्यांस मोकळीक दिली. 25 त्यांनी देवाच्या खरेपणाशी लबाडीची अदलाबदल केली व निर्माणकर्त्याऐवजी जे निर्मिलेले त्याची उपासना केली. निर्माणकर्ता सर्वकाळ धन्यवादित आहे. आमेन.

26 तेव्हा त्याची त्यांना शिक्षा मिळावी म्हणून देवाने नाईलाजाने त्यांना त्यांच्यावर सोडून दिले. त्यांना लाजिरवाण्या वासनांच्या स्वाधीन केले. त्यांच्या स्त्रियांनी स्त्रियांशी अनैसर्गिक संबंध ठेवले. 27 तसेच पुरुषांनी स्त्रियांबरोबर नैसर्गिक संबंध ठेवणे बाजूला ठेवले व ते एकमेकाविषयी वासनेने पेटून निघाले. पुरुषांनी पुरुषांशी अनुचित कर्म केले आणि आपल्या ह्या निर्लज्ज कृत्यांमुळे त्यांना त्यांच्यामध्ये हे फळ मिळाले.

28 आणि जेव्हापासून त्यांनी देवाला ओळखण्याचे नाकारले, तेव्हापासून देवाने त्यांना अशुद्ध मनाच्या हवाली केले व ज्या अयोग्य गोष्टी त्यांनी करु नयेत त्या करण्यास मोकळीक दिली. 29 ते सर्व प्रकारची अनीति, दुष्टपणा, लोभ, वाईटपणा, हेवा, खून, भांडणे, कपट, कुबुद्धि यांनी भरलेले असून दुसऱ्याविषयी नेहमी वाईट विचार करतात. 30 ते चहाडखोर, दुसऱ्याची निंदा करणारे, देवाचा तिटकारा करणारे, उद्धट, बढाया मारणारे, वाईट मार्ग शोधून काढणारे, आईवडिलांची आज्ञा न मानणारे; तसेच 31 मूर्ख, दिलेले वचन मोडणारे, कुटुंबियांबद्दल वात्सल्य नसणारे, दुष्ट असे आहेत. 32 देवाच्या नितिमत्वाचा जो नियम सांगतो की, जे लोक असे वागतात ते मरणास योग्य आहेत असे जरी त्यांना माहीत होते तरी ते त्या गोष्टी करतात इतकेच नव्हे तर जे असे करतात त्यांना मान्यताही देतात.

स्तोत्रसंहिता 10:1-15

10 परमेश्वरा, तू इतक्या दूर का राहतोस?
    संकटात पडलेले लोक तुला पाहू शकत नाहीत.
गर्विष्ठ आणि दुष्ट लोक वाईट योजना आखतात.
    आणि गरीब लोकांना त्रास देतात.
दुष्ट लोक आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींबद्दल बढाया मारतात.
    आधाशी लोक देवाला शाप देतात.
    अशा रीतीने दुष्ट लोक आपण परमेश्वराला तुच्छ मानतो असे दाखवून देतात.
वाईट लोक देवाची प्रार्थना न करण्याइतके गर्विष्ठ आहेत
    ते त्यांच्या सर्व वाईट योजना आखतात आणि जगात देवच नसल्यासारखे वागतात.
दुष्ट लोक नेहमीच काहीतरी वेडे वाकडे करीत असतात.
    देवाचे नियम आणि शहाणपणाच्या गोष्टी त्यांच्या लक्षात देखील येत नाहीत.
    देवाचे शत्रू त्यांच्या शिकवण्याकडे लक्ष देत नाहीत.
आपले काहीही वाईट होणार नाही असे त्या लोकांना वाटते ते म्हणतात, “आपण मजा करु
    आणि आपल्याला कधीही शिक्षा होणार नाही.”
ते लोक नेहमी शाप देत असतात.
    ते लोकांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात.
    ते सतत वाईट योजना आखत असतात.
ते गुप्त जागी लपून बसतात
    आणि लोकांना पकडण्यासाठी वाट पाहातात.
    ते दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी लपतात ते निष्पाप लोकांना ठार मारतात.
ते दुष्ट लोक खाण्यासाठी एखादा प्राणी पकडणाऱ्या सिंहासारखे असतात.
    ते गरीबांवर हल्ला करतात.
दुष्टांनी तयार केलेल्या सापळड्यात गरीब अडकतात.
10 ते दुष्ट गरीब आणि आधीच पीडलेल्या लोकांना
    पुन्हा पुन्हा त्रास देतात.
11 “देव आपल्याला विसरला, तो आपल्यापासून कायमचा दूर गेला.
    आपल्यावर काय प्रसंग आलेला आहे हे देव बघत नाही”
    असा विचार गरीब लोक करतात.

12 परमेश्वरा, ऊठ!
    आणि काहीतरी कर.
    देवा, दुष्टांना शिक्षा कर गरीबांना विसरु नकोस.

13 वाईट लोक देवाविरुध्द का जातात?
    कारण देव आपल्याला शिक्षा करणार नाही असे त्यांना वाटते.
14 परमेश्वरा, ते लोक अतिशय दुष्ट
    आणि वाईट गोष्टी करतात ते तू बघतोस तू त्याकडे लक्ष दे आणि काहीतरी कर.
संकटांनी पिडलेले लोक तुझ्याकडे मदतीसाठी येतात.
    परमेश्वरा, निराधाराला मदत करणारा तूच एक आहेस.
    म्हणून त्यांना मदत कर.

15 परमेश्वरा, दुष्टांचे निर्दालन कर.

नीतिसूत्रे 19:6-7

पुष्कळांना राज्यकर्त्यांबरोबर मैत्री करायची असते आणि जो माणूस नजराणे देतो त्याच्याबरोबर तर सर्वांनाच मैत्री करायची असते.

माणूस जर गरीब असला तर त्याचे कुटुंबही त्याच्याविरुध्द असते आणि त्याचे सगळे मित्र त्याच्यापासून दूर जातात. तो गरीब माणूस मदतीची याचना करतो. पण ते त्याच्या जवळपासही फिरकत नाहीत.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center