Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NIV. Switch to the NIV to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 राजे 18:13-19:37

यहूदा घेण्याची अश्शूरची तयारी

13 हिज्कीयाच्या चौदाव्या वर्षी अश्शूरचा राजा सन्हेरीब याने यहूदातील सर्व मजबूत नगरांवर हल्ला चढवला. सर्व नगरांचा त्याने पाडाव केला. 14 तेव्हा यहूदाचा राजा हिज्कीया याने अश्शूरच्या राजाला लाखीश येथे निरोप पाठवला. निरोपात हिज्कीयाने म्हटले, “माझ्या हातून चूक झाली आहे. तुम्हाला हवे ते द्यायला मी तयार आहे. पण माझ्यावर हल्ला करु नये.”

यावर अश्शूरच्या राजाने यहूदाचा राजा हिज्कीया याला अकरा टन चांदी आणि एक टन सोने अशी खंडणी मागितली. 15 हिज्कीयाने परमेश्वराच्या मंदिरातील आणि राजवाड्याच्या खजिन्यातील सर्व चांदी बाहेर काढली. 16 परमेश्वराच्या मंदिराचे दरवाजे आणि खांब सोन्याच्या पल्याने मढवले होते ते सर्व काढून हिज्कीयाने घेतले आणि हे सोने अश्शूरच्या राजाला दिले.

अश्शूरचा राजा यरुशलेमला माणसे पाठवतो

17 अश्शूरच्या राजाने मोठ्या सैन्यासोबत आपले तीन महत्वाचे सेनापती यरुशलेममध्ये राजा हिज्कीयाकडे पाठवले. तेव्हा ते लाखीश येथून यरुशलेमला निघाले. वरच्या तलावाच्या पाटापाशी ते उभे राहिले. (परिटाच्या शेताकडे जो रस्ता जातो त्या वाटेवर हा वरचा तलाव आहे,) 18 तेथून त्यांनी राजाला निरोप पाठवला. राजाचा खानगीकडील कारभारी एल्याकिम (हा हिल्कीयाचा मुलगा) चिटणीस शेबना आणि नोंदणी लेखक व आसाफचा मुलगा यवाह हे त्यांना भेटायला तेव्हा पुढे आले.

19 तेव्हा एक सेनापती त्यांना म्हणाला, “अश्शूरचा महान राजा काय म्हणतो ते हिज्कीयाला सांगा:

‘तू कशाचा भरवंसा धरतो आहेस? 20 तुझ्या तोंडचे शब्द पोकळ, अर्थहीन आहेत. तू म्हणालास, “लढाईसाठी पुरेशी मसलत आणि सामर्थ्य माझ्याजवळ आहे.” पण माझ्यापासून फुटून निघाल्यापासून तुला कोणाचा आधार आहे? 21 काठी म्हणून तू ज्याच्यावर रेलला आहेस तो तर मोडका बांबू आहे. ही काठी म्हणजे मिसर. माणूस अशा काठीवर विसंबून राहिला तर ती मोडून पडेल हातात रुतेल आणि क्लेश देईल लोक विश्वास ठेवतात तो मिसरचा राजा हा असा आहे. 22 तू कदाचित् असे म्हणशील, “आम्ही परमेश्वर देवावर भरवसा ठेवतो.” पण हिज्कीयाने परमेश्वराची उंचावरील पूजास्थळे आणि वेदी काढून टाकल्या आणि “फक्त यरुशलेममधील वेदीपुढेच आराधना करावी असे यहूदा आणि यरुशलेम येथील लोकांना सांगितले हे मला माहीत आहे.”

23 ‘आता माझा स्वामी अश्शूराचा राजा याच्याशी हा करार कर. तुझ्याकडे घोड्यांवर स्वार व्हायला माणसे असतील तर मी तुला दोन हजार घोडे द्यायचे कबूल करतो. 24 माझ्या स्वामीच्या सर्वात कनिष्ठ सेवकाचा देखील तू पराभव करु शकणार नाहीस. रथ आणि घोडेस्वार यांच्यासाठी तू मिसरवर अवलंबून आहेस.

25 ‘मी यरुशलेमचा संहार करायला चाल करुन आलोय तो काही परमेश्वराचा पाठिंबा असल्याशिवाय नव्हे. परमेश्वरा मला म्हणाला, “या देशावर स्वारी करुन त्याचा पूर्ण पाडाव कर.”’”

26 तेव्हा हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम, शेबना आणि यवाह हे सेनापतीला म्हणाले, “आमच्याशी तू कृपया अरामी भाषेत बोल. आम्हाला ती भाषा कळते. यहूदी भाषेत बोलू नको. कारण नाही तर तटबंदीवरील लोक आपले बोलणे ऐकतील.”

27 पण रब-शाके त्यांना म्हणाला, “परमेश्वराने काही मला फक्त तुझ्याशी आणि तुझ्या राजाशी बोलायला पाठवलेले नाही तटबंदीवरील लोकांशीही मी बोलतो आहे. तुमच्याबरोबरच त्यांनाही स्वतःचे मलमूत्र चाटायची वेळ येणार आहे.” [a]

28 मग रबशाके यहूदी भाषेत मोठ्याने ओरडून म्हणाला,

अश्शूरचा थोर राजा काय म्हणतो ते ऐका 29 राजाचे म्हणणे आहे, “हिज्कीयाच्या भूलथापांना बळी पडू नका. माझ्यापासून तो तुम्हाला वाचवू शकणार नाही.” 30 तो म्हणतो तसे परमेश्वरावर विसंबून राहू नका. हिज्कीया तुम्हाला सांगतो, “परमेश्वर आपल्याला वाचवील. अश्शूरचा राजा आपल्या शहराचा पराभव करु शकणार नाही.”

31 पण हिज्कीयाचे ऐकू नका. कारण अश्शूरचा राजा म्हणतो, माझ्याशी तह करा आणि माझ्याकडे या. तसे केलेत तर आपापल्या द्राक्षवेलीवरची, अंजिराच्या झाडावरची फळे तुम्हाला खायला मिळतील. स्वतःच्या विहिरीचे पाणी प्यायला मिळेल. 32 तुमच्या भूमीसारख्याच दुसऱ्या भूमीत मी तुम्हाला घेऊन जाईपर्यंत तुम्ही असे वागा. तरच तुम्ही जगाल; मरणार नाही. आणि हिज्कीयाचे ऐकू नका.

तो तुमचे ह्रदयपरिवर्तन करु पाहात आहे. “परमेश्वर आपल्याला वाचवेल” असे तो म्हणतो. 33 इतर दैवतांनी आपले देश अश्शूरच्या राजाच्या तावडीतून सोडवले आहेत असे अजून झाले आहे काय? कधीच नाही. 34 कुठे आहेत हमाथ आणि अर्पद यांची दैवतं? सफरवाईम, हेना, इव्वा यांची दैवते कुठे गेले? त्यांनी शोमरोनचे माझ्यापासून रक्षण केले का? नाही. 35 इतर राष्ट्रांच्या दैवतांनी आपापली भूमी माझ्यापासून सुरक्षित ठेवली का? नाही माझ्याहातून परमेश्वर यरुशलेम वाचवणार का? नाही.

36 पण लोक गप्पच होते. ते सेनापतीला काहीही बोलले नाहीत. कारण “त्यांनी काहीही उत्तर द्याचये नाही” अशी राजा हिज्कीयाची त्यांना आज्ञा होती.

37 हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम (एल्याकीम राजवाड्याचा कारभारी होता) चिटणीस शेबना आणि असाफचा मुलगा यवाह (हा नोंदी करणारा होता.) हिज्कीयाकडे आले. शोकाकुल होऊन त्यांनी वस्त्रे फाडली होती. अश्शूरचा सेनापती काय म्हणाला ते त्यांनी हिज्कीयाला सांगितले.

हिज्कीया यशया या भविष्यवाद्याशी बोलतो

19 राजा हिज्कीयाने सर्व हकीकत ऐकली. दु:ख आणि उद्वेग यांच्या भरात त्याने अंगावरची वस्त्रे फाडली आणि जाडेभरडे कपडे घालून तो परमेश्वराच्या मंदिरात गेला.

कारभारी एल्याकीम, चिटणीस शेबना आणि वडीलधारे याजक यांना हिज्कीयाने आमोजचा मुलगा यशया या संदेष्ट्याकडे पाठवले. त्यांनीही दु:ख प्रदर्शित करणारे जाडेभरडे कपडे घातले होते. ते यशयाला म्हणाले, “हिज्कीया म्हणतो, ‘हा संकटाचा मानहानीचा दिवस आहे. मूल जन्माला येत आहे पण आईला प्रसूतीची शक्ती नसावी तसे झाले आहे. त्या सेनापतीचा स्वामी, अश्शूराचा राजा याने त्याला आपल्या जिवंत देवाची निंदा करायला पाठवले होते. कदाचित् हे सर्व आपल्या परमेश्वर देवाच्या कानावर जाईल. शत्रूचा अंदाज चुकीचा आहे हे तो दाखवूनही देईल. तेव्हा अजून जे लोक आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना कर.’”

राजा हिज्कीयाचे अधिकारी यशयाकडे गेले. यशया त्यांना म्हणाला, “हिज्कीयाला हा निरोप द्या: परमेश्वर म्हणतो, ‘माझ्या टवाळीचे जे उद्गार अश्शूरच्या राजाच्या सेनापतींनी काढले त्याने घाबरुन जाऊ नका. मी आता त्याच्यात एका आत्म्याचा संचार करतो. एक अफवा तो ऐकेल आणि त्यामुळे तो स्वदेशी पळून जाईल आणि आपल्या देशातच त्याला तलवारीने मरण येईल असे मी करतो.’”

अश्शूरच्या राजाचा पुन्हा हिज्कीयाला निरोप

अश्शूराचा राजा लाखीश सोडून गेल्याचे सेनापतीने ऐकले. यहूदातील एक नगर लिब्ना याच्याविरुध्द तो लढत असल्याचे त्या सेनापतीला आढळले. कूशाचा राजा तिऱ्हाका आपल्याशी लढायला येत आहे अशी अफवा अश्शूरच्या राजाने ऐकली.

तेव्हा अश्शूरच्या राजाने हिज्कीयाकडे पुन्हा निरोप घेऊन दूत पाठवले. निरोप असा होता. 10 यहूदाचा राजा हिज्कीयाला सांगा “तुम्ही ज्या परमेश्वरावर विसंबून आहात त्याच्याकडून फसगत करुन घेऊ नका. तो म्हणतो,

‘अश्शूरचा राजा यरुशलेमचा पराभव करणार नाही.’ 11 अश्शूरच्या राजाने इतर देशांचे काय केले ते तुम्ही ऐकलेच आहे. आम्ही ते पूर्ण धुळीला मिळवले. तेव्हा तुम्हीच तेवढे वाचणार का? नाही. 12 त्या राष्ट्रांच्या देवतांनी त्यांचे रक्षण केले नाही. माझ्या पुर्वजांनी त्यांची धूळधाण केली. गोजान, हारान, रेसफ आणि तलस्सरातील एदेन हे त्यांनी नष्ट केले. 13 हमाथ, अर्पाद, सफरवाईम, हेना आणि इव्वा यांचे राजे कुठे आहेत? त्यांचा पार धुव्वा उडाला आहे.”

हिज्कीयाची परमेश्वराजवळ प्रार्थना

14 हिज्कीयाने जासूदांच्या हातून पत्र घेऊन ते वाचले. मग परमेश्वराच्या मंदिरात जाऊन परमेश्वरापुढे ते उघडून ठेवले. 15 परमेश्वराची प्रार्थना करुन हिज्कीया म्हणाला. “परमेश्वर देवा, करुबांच्यावर राजासनी बसणारा तूच इस्राएलचा देव आहेस. पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राज्यांचा तू आणि एकमेव तूच नियंता आहेस. आकाश आणि पृथ्वीचा तू निर्माता आहेस, 16 परमेश्वरा, माझे म्हणणे ऐक आपले डोळे उघड आणि हे पत्र पाहा. सन्हेरीबची जिवंत परमेश्वराचा अवमान करणारी वचने पाहा. 17 खरोखरच परमेश्वराचा अवमान करणारी वचने पाहा. खरोखरच परमेश्वरा असे घडले आहे. अश्शूरच्या राजाने ही सर्व राष्ट्रे नामशेष केली आहेत. 18 तिथले दैवत त्याने आगीच्या भक्ष्यस्थानी टाकले. पण ते काही खरे देव नव्हते. माणसाने केलेल्या त्या लाकडाच्या आणि दगडाच्या मूर्ती होत्या. म्हणून तर अश्शूरच्या राजाला त्या नष्ट करता आल्या. 19 तेव्हा परमेश्वर देवा आता आम्हाला या राजापासून वाचव. म्हणजे तूच खरा परमेश्वर आहेस हे जगातील सर्व राज्यांना कळेल.”

20 आमोजचा मुलगा यशया याने हिज्कीयाला निरोप पाठवला की, “इस्राएलचा परमेश्वर देव असे म्हणतो: अश्शूरचा राजा सन्हेरीब याच्या विषयी तू केलेले गाऱ्हाणे मी ऐकले आहे.

21 “सन्हेरीबबद्दल परमेश्वराचा असा निरोप आहे:

‘सीयोनच्या (म्हणजेच यरुशलेमच्या) कुमारी कन्येने तुला तुच्छ लेखून
    तुझा अपमान केला आहे.
यरुशलेम कन्या तुझी पाठ वळली की
    तुझा उपहास करते.
22 पण तू कोणाचा अपमान केलास?
    कोणाला कःपदार्थ लेखलेस?
तू हे कोणाविरुध्द बोललास?
    इस्राएलच्या पवित्र परमेश्वराविरुध्द तू गेलास.
    त्याच्यापेक्षा वरचढ असल्याच्या आवेशात तू असा वागलास.
23 परमेश्वराचा अवमान करायला तू दूत पाठवलेस.
    तू म्हणालास, “माझे बहुसंख्य रथ घेऊन मी या उंच पर्वतावर, लबानोनच्या अंतर्भागात आलो आहे.
त्यांचे उंच गंधसरु आणि उत्तम देवदारु मी तोडीन.
    लबानोन मध्ये सर्वात उंचावर असलेल्या घनदाट अरण्यात मी पोचलो आहे.
24 मी विहिरी खणल्या आणि नव्या नव्या ठिकाणांचे पाणी प्यालो.
    मिसरमधील नद्या सुकवून
    तो प्रदेश मी पादाक्रांत केला.”

25 तू असे म्हणालास खरा, पण परमेश्वर काय म्हणाला ते तू ऐकले नाहीस काय?’
    पूर्वी, फार फार
पूर्वीच मी हे सर्व योजले होते
    आणि आता त्याप्रमाणेच घडत आहे.
मजबूत नगर उद्ध्वस्त होऊन तिथे नुसती दगडांची रास उरली आहे,
    हे तुझ्याहातून घडले ते माझ्यामुळेच.
26 तेथील लोक समर्थ नव्हते.
    ते घाबरलेले आणि गोंधळलेले होते.
शेतातले गवत आणि पीक सरसकट
    कापले जावे तसे ते होते.
घराच्या धाब्यावरच गवत पूर्ण वाढण्याआधीच
    करपून जावे तशी त्यांची स्थिती होती.
27 तू कधी स्वस्थ बसतोस,
कधी लढाईवर जातोस
    आणि कधी घरी परततोस,
    तसेच माझ्याविरुध्द कधी उठतोस
ते मला माहीत आहे.
28 माझ्या विरुध्द तू उठलास,
    तुझे उन्मत्त बोलणे मी ऐकले. तेव्हा,
मी आता तुझ्या नाकात वेसण घालतो
    आणि तोंडात लगाम अडकवतो.
मग तुला माघारे वळवून ज्या रस्त्याने आलास
    त्याच वाटेने तुला परत फिरवतो.’”

हिज्कीयासाठी परमेश्वराचा संदेश

29 “मी तुझ्या साहाय्यासाठी येणार आहे याची खात्री पटावी म्हणून हे चिन्ह देतो. या वर्षी आपोआप धान्य उगवेल ते तुम्ही खाल. दुसऱ्या वर्षी त्याच्या बियाणातून उगवेल ते खाल. पण तिसऱ्या वर्षी मात्र तुम्ही स्वतः पेरणी कराल त्यातून धान्य काढा. द्राक्षाची लागवड करा आणि द्राक्षे खा. 30 यहूदाच्या घराण्यातील उरल्यासुरल्या लोकांचा वंश वाढेल. 31 कारण काही जण बचावतील. ते यरुशलेममधून बाहेर पडतील. सीयोन डोंगरातून काहीजण येतील. परमेश्वराच्या तीव्र आवेशामुळे असे घडेल.

32 “अश्शूरच्या राजाबद्दल परमेश्वर असे म्हणतो:

‘तो या शहरात पाऊल टाकणार नाही या नगरावर तो बाण सोडणार नाही
    आपल्या ढाली तो येथे आणणार नाही.
या शहराच्या तटबंदीवर हल्ला करण्यासाठी
    तो कचऱ्याचे ढीग रचणार नाही.
33 तो आल्या वाटेने परत जाईल.
    या शहरात तो येणार नाही
असे परमेश्वर म्हणतो.
34 या नगराचे रक्षण करुन त्याला मी वाचवीन.
    माझ्यासाठी आणि माझा सेवक दावीद याच्यासाठी मी हे करीन.’”

अश्शूरच्या सेनेचा संहार

35 त्या रात्री परमेश्वराचा दूत बाहेर पडला आणि त्याने अश्शूरांच्या छावणीतली एक लक्ष पंच्याऐशी हजार माणसे मारली. सकाळी लोक उठून पाहतात तर सर्वत्र प्रेतांचा खच पडलेला.

36 तेव्हा अश्शूरचा राजा सन्हेरीब निनवे येथे, जिथे तो अगोदर होता तिथे निघून गेला. 37 एक दिवस सन्हेरीब आपले दैवत निस्रोख याच्या देवळात पूजा करत होता. तेव्हा त्याचीच मुले अद्रम्मेलेक आणि शरेसर यांनी त्याला तलवारीने मारले. मग ते अराराट [b] या देशात निघून गेले. सन्हेरीबच्या जागी त्याचा मुलगा एसर-हद्दोन राज्य करु लागला.

प्रेषितांचीं कृत्यें 21:1-17

पौल यरुशलेमला जातो

21 त्यांचा निरोप घेतल्यानंतर आम्ही समुद्रमार्गे निघालो. आणि सरळ प्रवास करीत कोस येथे आलो. दुसऱ्या दिवशी आम्ही रुदास गेलो. तेथून आम्ही पातरा येथे गेलो. तेथे फेनीकेला जाणारे जहाज आम्हांला आढळले. तेव्हा आम्ही जहाजात बसून पुढे निघालो.

तेव्हा कुप्र आमच्या नजरेत आले. परंतु ते डाव्या अंगाला टाकून आम्ही थेट सूरीया देशाला रवाना झालो व सोर येथे उतरलो. कारण तेथे जहाजातील माल उतरावययाचा होता. तेथे येशूचे काही शिष्य आम्हाला आढळले, आणि आम्ही त्यांच्याबरोबर सात दिवस राहिलो. पवित्र आत्म्याच्या सूचनेवरुन त्यांनी पौलाला असे सांगितले की, त्याने यरुशलेमला जाऊ नये. आमच्या भेटीचे दिवस संपत आल्यावर आम्ही तेथून निघून आमचा पुढील प्रवास परत सुरु केला. त्यावेळी तेथील बंधुजन आपल्या पत्नी, मुलांच्याबरोबर आमच्यासह शहरबाहेर आले व तेथील समुद्रकिनाऱ्यावर आम्ही गुडघे टेकले व प्रार्थना केली. मग एकमेकांचा निरोप घेऊन आम्ही जहाजात बसलो व ते लोक आपापल्या घरी गेले.

सोर पासून आम्ही आमचा प्रवास सुरु केला व पोलेमा येथे उतरलो. आणि तेथील बंधुवर्गास भेटलो, त्यांच्याबरोबर एक दिवस राहिलो. आणि दुसऱ्या दिवशी निघून आम्ही कैसरीयास आलो व सुवार्तिक फिलिप्प याच्या घरी जाऊन राहिलो. तो निवडलेल्या सात सेवकांपैकी [a] एक होता. त्याला चार मुली होत्या. त्यांची लग्रे झालेली नव्हती. या मुलींना देवाच्या गोष्टी (भविष्याविषयीचे) सांगण्याचे दान होते.

10 त्या बंधूच्या बरोबर बरेच दिवस राहिल्यावर अगब नावाचा संदेष्टा यहूदीयाहून तेथे आला. 11 त्याने आमची भेट घेऊन पौलाच्या कमरेचा पट्टा मागून घेतला. त्याने स्वतःचे हात व पाय बांधले आणि तो म्हणाला, “पवित्र आत्मा असे महणतो; हा पट्टा ज्या मनुष्याच्या कमरेचा आहे, त्याला यरुशलेमा येथील यहूदी लोक असेच बांधतील व यहूदीतरांच्या हाती देतील.”

12 आम्ही व तेथील सर्वांनी ते शब्द ऐकले. तेव्हा आम्ही व इतर लोकांनी पौलाला कळकळीची विनंति केली की, त्याने यरुशलेमला जाऊ नये. 13 पण पौल म्हणाला, “तुम्ही हे काय करीत आहा, असे रडून तुम्ही मला हळवे बनवीत आहात काय? मी फक्त बांधून घेण्यासाठी नव्हे तर प्रभु येशूच्या नावासाठी यरुशलेममध्ये मरायलादेखील तयार आहे.”

14 यरुशलेमापासून दूर राहण्यासाठी आम्ही त्याचे मन वळवू शकलो नाही, म्हणून आम्ही त्याला विनंति करायची सोडली आणि म्हटले, “प्रभूच्या इच्छेप्रमाणे होवो.”

15 त्यानंतर आम्ही तयार झालो आणि यरुशलेमला निघालो. 16 कैसरीया येथील येशूचे काही शिष्य आमच्याबरोबर आले आणि आम्हांला म्लासोनकडे घेऊन गेले. कारण त्याच्याकडेच आम्ही राहणार होतो. तो (म्नासोन) कुप्रचा होता. तो सुरुवातीच्या काळात प्रथम शिष्य झालेल्यांपैकी एक होता.

पौल याकोबची भेट घेतो

17 आम्ही जेव्हा यरुशलेमला पोहोंचलो, तेव्हा तेथील बंधुजनांनी मोठ्या आनंदाने आमचे स्वागत केले.

स्तोत्रसंहिता 149

149 परमेश्वराची स्तुती करा.

परमेश्वराने ज्या नवीन गोष्टी केल्या त्याबद्दलचे नवे गाणे गा.
    ज्या सभेत त्याचे भक्त भेटतात त्या सभेत त्याचे गुणगान करा.
इस्राएलाच्या लोकांना त्यांच्या निर्मात्याबरोबर आनंदोत्सव साजरा करु द्या.
    सियोनच्या लोकांना त्यांच्या राजाबरोबर आनंद उपभोगू द्या.
त्या लोकांना डफाच्या आणि
    वीणेच्या तालावर नाच करुन देवाची स्तुती करु द्या.
परमेश्वर त्याच्या लोकांबरोबर सुखी आहे.
    देवाने त्याच्या विनम्र लोकांसाठी अद्भुत गोष्ट केली, त्याने त्याचा उध्दार केला.
देवाच्या भक्तांनो तुमच्या विजयाबद्दल आनंदी व्हा.
    झोपी गेल्यावरही आनंदी राहा.

लोकांना देवाजवळ त्याचे गुणगान करु द्या
    आणि त्यांना त्यांच्या तलवारी हातात घेऊ द्या.
त्यांना त्यांच्या शत्रूंना शिक्षा करु द्या.
    त्यांना त्या लोकांना शिक्षा करु द्या.
देवाचे लोक त्या राजांना आणि
    महत्वाच्या लोकांना साखळंदडाने बांधतील.
देवाने आज्ञा केल्याप्रमाणे देवाचे लोक त्यांना शिक्षा करतील.
    देवाचे सगळे भक्त त्याला मान देतात.

परमेश्वराचे गुणगान करा.

नीतिसूत्रे 18:8

लोकांना नेहमी अफवा ऐकायला आवडतात. ते पोटात जाणाऱ्या चांगल्या अन्नासारखे असते.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center