Bible in 90 Days
17 तीन दिवसांनंतर पौलाने सर्व यहूदी पुढाऱ्यांना एकत्र बोलावले. जेव्हा सर्व जण जमा झाले तेव्हा पौल त्यांना म्हणाला, “बंधूंनो, आपल्या बांधवांविरुद्ध मी काहीही केलेले नाही. तरी मला यरुशलेम येथे पकडून रोमी लोकांच्या हाती कैदी म्हणून देण्यात आले. आणि 18 त्यांनी माझी चौकशी केली. तेव्हा त्यांची मला सोडून देण्याची इच्छा होती. कारण मरणदंडाला योग्य असा कोणताही गुन्हा मी केला नव्हता. 19 परंतु यहूदी लोकांनी जेव्हा माझ्या सुटकेला हरकत घेतली, तेव्हा कैसराकडे न्याय मागणे मला भाग पडले. याचा अर्थ असा नाही की, यहूदी लोकांविरुद्ध मला दोषारोप करण्याची इच्छा आहे. 20 या कारणासाठी तुम्हाला भेटण्याची आणि तुमच्याशी बोलण्याची मी इच्छा दाखविली. कारण इस्राएलाच्या आशेच्या निष्ठेमुळेच मी या साखळदंडानी जखडलो गेलो आहे.”
21 यहूदी पुढारी पौलाला म्हणाले, “आम्हांला तुमच्या बाबत यहूदीयाहून कसलेही पत्र आलेले नाही, अगर तिकडून येणाऱ्या बंधुजनांपैकी एकाही भावाने तुमच्याविषयी वाईट कळविले अथवा बोललेले नाही. 22 परंतु तुमची मते काय आहेत हे समजून घेण्याची आमची इच्छा आहे. कारण या गटाविरुद्ध (ख्रिस्ती गटाविरुद्ध) सगळीकडे लोक बोलतात हे आम्हांना माहीत आहे.”
23 तेव्हा (रोम शहरातील) यहूदी लोकांनी एक बैठकीचा दिवस ठरविला, जेथे पौल राहत होता, तेथे ते मोठ्या संख्येने जमा झाले. तेव्हा पौलाने त्यांना समजावून सांगितले आणि देवाच्या राज्यविषयी आपली साक्ष दिली. मोशेच्या नियमशास्त्रापासून आणि संदेष्ट्यांच्यापासून फोड करुन येशूविषयी त्यांची खात्री पटविण्याचा प्रयत्न केला. हे तो (पौल) सकाळपासून संध्याकाळपर्यंत करीत होता. 24 त्याने फोड करुन सांगितलेल्या गोष्टीविषयी काही जणांची खात्री पटली, तर काहींनी तो बोलत असलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही.
25 पौल पुढील एक गोष्ट बोलला, त्यावरुन मतभेद होऊन त्यांच्यापैकी काही जण उठले आणि तेथून जाऊ लागले, पौल म्हणाला, “यशया संदेष्टयांच्या द्वारे पवित्र आत्मा आपल्या वाडवडिलांशी जे बोलला, ते खरोखरच किती खरे आहे! यशया म्हणाला होता:
26 ‘या लोकांकडे (यहूदी) तुम्ही जा, आणि त्यांना सांगा:
तुम्ही ऐकाल तर खरे
पण तुम्हांला समजणार नाही.
तुम्ही पहाल तुम्हाला दिसेल
पण तुम्ही काय पाहात ते तुम्हाला कळणार नाही.
27 कारण या लोकांचे विचार मंद झाले आहेत
त्याच्या कानांनी त्यांना ऐकू येत नाही.
आणि त्यांनी आपले डोळे बंद केले आहेत नाही
तर त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले असते
आणि आपल्या कानांनी ऐकले असते आणि माझ्याकडे वळाले
असते आणि मी त्यांना बरे केले असते.’ (A)
28 “म्हणून देवाचे हे तारण यहूदीतर विदेशी लोकांकडे पाठविण्यात आले आहे. हे तुम्हा यहूदी लोकांना कळावे. ते ऐकतील.” 29 [a]
30 पूर्ण दोन वर्षे तो त्याच्या भाड्याच्या घरात राहिला. जे त्याला भेटायला येत, त्यांचे तो स्वागत करी. 31 त्याने देवाच्या राज्याविषयी प्रचार केला. त्याने प्रभु येशूविषयी शिक्षण दिले. तो हे काम फार धैर्याने करीत असे. आणि कोणीही त्याला बोलण्यात अडवू शकले नाही.
1 प्रेषित होण्यासाठी पाचारण केलेला; देवाची सुवार्ता सांगण्यासाठी वेगळा केलेला ख्रिस्त येशूचा सेवक पौल याजकडून. 2 देवाच्या संदेष्ट्यांच्या द्वारे पवित्र शास्त्रात पूर्वी सांगितलेली होती, 3-4 ती ही सुवार्ता देवाचा पुत्र प्रभु येशू ख्रिस्त जो देहाने एक मनुष्य म्हणून दाविदाच्या वंशात जन्माला आला याच्याविषयी आहे.पण पवित्रतेच्या आत्म्याच्याद्वारे तो मरणातून पुन्हा जिवंत झाला त्यामुळे त्याच्या सामर्थ्यासह “देवाचा पुत्र” असा गणला गेला.
5 त्या आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे आम्हांला कृपा आणि प्रेषित पद मिळाले आहे. अशासाठी की जे यहूदी नाहीत त्यांच्यामध्ये त्याच्या नावांकरिता विश्वासाच्या आज्ञापालनामुळे जो आज्ञाधारकपणा निर्माण होतो तो निर्माण करावा. 6 तुम्हीही त्या यहूदी नसलेल्यांमध्ये आणि देवाकडून येशू ख्रिस्ताचे अनुयायी होण्यासाठी बोलाविलेले आहात.
7 ज्या लोकांवर देवाने प्रेम केले आहे व त्याचे पवित्र जन होण्यासाठी बोलाविलेले असे जे लोक रोममध्ये आहेत त्या सर्वांना मी लिहित आहे.
आपला पिता व प्रभु येशू ख्रिस्त यांजकडून तुम्हांस कृपा व शांति असो.
आभाराची प्रार्थना
8 सुरुवातीलाच तुम्हां सर्वांसाठी येशू ख्रिस्ताद्वारे मी देवाचे आभार मानतो, कारण तुमचा विश्वास जगात सगळीकडे जाहीर होत आहे. 9 देव माझा साक्षी आहे, ज्याची सेवा मी आत्म्याने त्याच्या पुत्राची सुवार्ता सांगून करतो. मी तुमची नेहमी आठवण करतो. 10 माझ्या प्रार्थनेत मी नेहमी मागतो, जर देवाची इच्छा असेल तर शेवटी मला तुम्हांला भेटता येणे शक्य व्हावे. 11 मला तुम्हांला भेटण्याची फार इच्छा आहे. यासाठी की काही आध्यात्मिक दानांविषयी तुम्हांबरोबर सहभागी व्हावे आणि तुम्ही बलवान व्हावे. 12 म्हणजे जोपर्यंत मी तुमच्यामध्ये आहे तोपर्यंत आपण एकमेकांना विश्वासामध्ये मदत करु. माझ्या विश्वासामुळे तुम्हांला व तुमच्या विश्वासामुळे मला फायदा होईल.
13 बंधूनो, पुष्कळ वेळा तुम्हांला भेट देण्याची मला इच्छा झाली. यासाठी की, जसे मला यहूदीतरांमध्ये मिळाले, तसे तुमच्यामध्येसुद्धा फळ मिळावे. परंतु आतापर्यंत मला तुमच्यापर्यंत येण्यास अडथळे आले हे तुम्हांला माहीत असावे.
14 मी सर्व लोकांची-ग्रीक आणि ग्रीक नसलेले, शहाणे आणि मूर्ख-सेवा केली पाहिजे. 15 त्यासाठीच तुम्ही जे रोममध्ये आहात त्या तुम्हांला सुद्धा सुवार्ता सांगण्याची माझी फार इच्छा आहे.
16 मला सुवार्तेची लाज वाटत नाही. कारण देवाचे सामर्थ्य जो कोणी विश्वास ठेवतो त्या सर्वासाठी तारण आहे. प्रथम यहूद्यांकारिता आणि नंतर ग्रीकांसाठी. 17 कारण सुवार्तेमध्ये देवाचे नितिमत्व ते विश्वासापासून विश्वास असे प्रगट झाले आहे. पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, “नितिमान विश्वासाद्वारे वाचेल.”
सर्व लोकांनी चुका केल्या आहेत
18 लोकांनी केलेल्या प्रत्येक अनितीच्या कृत्यांमुळे व जे आपल्या अनीतीने सत्य दाबून ठेवतात, त्यांच्यामुळे स्वर्गातून देवाचा क्रोध प्रगट होतो. 19 हे असे होत आहे कारण देवाविषयीचे ज्ञान त्यांच्यात दिसून येते व देवाने ते त्यांना दाखवून दिले आहे.
20 जगाच्या निर्मितीपासून देवाचे अदृश्य गुण, त्याचे सनातन सामर्थ्य व त्याचे देवपण हे देवाने ज्या गोष्टी निर्माण केल्या त्यावरुन प्रगट होतात. आणि जर तुम्हांला हे कळत नाही, तर ह्याचे तुम्हांला कसलेच समर्थन करता येणार नाही.
21 कारण जरी त्यांना देव माहीत होता तरी त्यांनी देव म्हणून त्याचा आदर केला नाही, किंवा त्याचे आभार मानले नाहीत, उलट ते आपल्या विचारात निष्फळ झाले आणि मूर्ख अंतःकरणे अंधकारमय झाली. 22 जरी गर्वाने त्यांनी स्वतःला शहाणे समजले तरी ते मूर्ख ठरले. 23 आणि अविनाशी देवाचे गौरव याची मर्त्य मानव, पक्षी, चार पायाचे प्राणी, सरपटणारे प्राणी यांच्यासारख्या दिसणाऱ्या प्रतिमांशी अदलाबदल केली.
24 यासाठी देवाने त्यांना त्यांच्या मनातील वाईट वासनांच्या व वैषयिक अशुद्धतेमुळे सोडून दिले आणि त्यांनी एकमेकांच्या देहाचा अनादर करावा यासाठी त्यांस मोकळीक दिली. 25 त्यांनी देवाच्या खरेपणाशी लबाडीची अदलाबदल केली व निर्माणकर्त्याऐवजी जे निर्मिलेले त्याची उपासना केली. निर्माणकर्ता सर्वकाळ धन्यवादित आहे. आमेन.
26 तेव्हा त्याची त्यांना शिक्षा मिळावी म्हणून देवाने नाईलाजाने त्यांना त्यांच्यावर सोडून दिले. त्यांना लाजिरवाण्या वासनांच्या स्वाधीन केले. त्यांच्या स्त्रियांनी स्त्रियांशी अनैसर्गिक संबंध ठेवले. 27 तसेच पुरुषांनी स्त्रियांबरोबर नैसर्गिक संबंध ठेवणे बाजूला ठेवले व ते एकमेकाविषयी वासनेने पेटून निघाले. पुरुषांनी पुरुषांशी अनुचित कर्म केले आणि आपल्या ह्या निर्लज्ज कृत्यांमुळे त्यांना त्यांच्यामध्ये हे फळ मिळाले.
28 आणि जेव्हापासून त्यांनी देवाला ओळखण्याचे नाकारले, तेव्हापासून देवाने त्यांना अशुद्ध मनाच्या हवाली केले व ज्या अयोग्य गोष्टी त्यांनी करु नयेत त्या करण्यास मोकळीक दिली. 29 ते सर्व प्रकारची अनीति, दुष्टपणा, लोभ, वाईटपणा, हेवा, खून, भांडणे, कपट, कुबुद्धि यांनी भरलेले असून दुसऱ्याविषयी नेहमी वाईट विचार करतात. 30 ते चहाडखोर, दुसऱ्याची निंदा करणारे, देवाचा तिटकारा करणारे, उद्धट, बढाया मारणारे, वाईट मार्ग शोधून काढणारे, आईवडिलांची आज्ञा न मानणारे; तसेच 31 मूर्ख, दिलेले वचन मोडणारे, कुटुंबियांबद्दल वात्सल्य नसणारे, दुष्ट असे आहेत. 32 देवाच्या नितिमत्वाचा जो नियम सांगतो की, जे लोक असे वागतात ते मरणास योग्य आहेत असे जरी त्यांना माहीत होते तरी ते त्या गोष्टी करतात इतकेच नव्हे तर जे असे करतात त्यांना मान्यताही देतात.
तुम्ही यहूदीसुद्धा पापी आहात
2 म्हणून हे मनुष्या, तू जो कोणी आहेस व जेव्हा तू न्यायासनासमोर बसतोस तेव्हा तुला सबब नाही, कारण जेव्हा तू दुसऱ्यांचा न्याय करतोस तेव्हा तू स्वतःलाही दोषी ठरवितोस कारण जो तू न्याय करतोस, तो तूही तीच गोष्ट करतोस. 2 आता आपणांला माहीत आहे की, जे अशा वाईट गोष्टी करतात त्यांचा न्याय देव करतो. आणि देवाचा न्याय योग्य असतो. 3 तुम्हीसुद्धा जे अशा वाईट गोष्टी करतात त्यांचा न्याय करता पण तुम्हीसुद्धा त्याच गोष्टी करता म्हणून निश्चितपणे तुम्हांला माहीत आहे की, देव तुमचा न्याय करील आणि स्वतःची सुटका करुन घेणे तुम्हांला शक्य होणार नाही. 4 देव तुमच्याशी अत्यंत दयाळूपणे वागतो. तो तुमच्याशी सहनशीलतेने वागतो, तुमच्यामध्ये बदल व्हावा म्हणून देव वाट पाहतो, पण त्याच्या दयाळूपणाबद्दल तुम्ही काहीच विचार करीत नाही. कदाचित तुम्ही तुमचे मन व जीवन बदलावे म्हणून देव तुमच्याशी दयाळूपणे वागतो हे तुम्हांला समजत नसेल.
5 पण तुम्ही लोक कठीण व उद्धट मनाचे आहात, तुम्ही बदलण्यास तयार नाही, त्यामुळे तुम्ही स्वतःच तुमची शिक्षा अधिकाधिक वाढवित आहात. जेव्हा देव (तुम्हाला) त्याचा क्रोध दर्शवील, त्यावेळी तुम्हांला शिक्षा होईल. त्या दिवशी लोक देवाचा यथायोग्य न्याय पाहतील. 6 देव प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईल. 7 नेटाने चांगले करीत राहून गौरव, मान, अमरत्व मिळविण्याचा जे लोक प्रयत्न करतात त्यांना तो अनंतकाळचे जीवन देईल. 8 परंतु जे स्वार्थीपणामुळे सत्यात चालणे नाकारतात, व अनीतिने चालतात त्यांची तो क्रोधाने भरपाई करील. 9 जो जे वाईट ते करतो, त्या प्रत्येक मानवावर संकटे आणि दु:खे येतील. म्हणजे पहिल्यांदा यहूद्यांवर व नंतर ग्रीक लोकांवर येतील. 10 परंतु जो चांगली कृत्ये करतो त्या प्रत्येकाला गौरव, मान आणि शांति मिळेल. प्रथम यहूद्यांना व मग ग्रीक लोकांना मिळेल. 11 देवाजवळ पक्षपात नाही.
12 जे सर्व नियमशास्त्राबाहेर असून पाप करतात, ते नियमशास्त्राबाहेर नाश पावतील. व जितक्यांनी नियम शास्त्राधीन असून पाप केले तितक्यांना नियमशास्त्रानुसार शिक्षा होईल. 13 कारण जे नियमशास्त्र ऐकतात ते देवाच्या दृष्टीने नितिमान आहेत असे नाही. परंतु जे नियमशास्त्र पाळतात आणि नियमशास्त्रांत सांगितल्याप्रमाणे करतात ते नीतिमान ठरतील.
14 कारण जेव्हा यहूदी नसलेले (विदेशी) ज्यांना नियमशास्त्र नाही, मूलतः जरी त्यांना नियमशास्त्र नाही, तरीही नियमशास्त्राप्रमाणे करतात ते स्वतःच नियमशास्त्र आहेत. 15 म्हणजे ते त्यांच्या ह्रदयात नियमशास्त्र लिहिले आहे, असे दाखवतात त्यांची सद्सद्विवेक बुद्धीसुध्दा साक्ष देते आणि त्यांचे एकमेकां विषयीचे विचार त्यांना आरोपी किंवा दोषमुक्त करतात.
16 जेव्हा देव येशू ख्रिस्ताद्वारे मनुष्यांच्या रहस्यांचा, माझ्या सुवार्तेप्रमाणे न्याय करील त्या दिवशी या गोष्टी घडतील.
यहूदी आणि नियमशास्त्र
17 परंतु आता तुम्ही जे स्वतःला यहूदी समजता आणि नियमशास्त्रावर विश्वास ठेवता व आपण देवाच्या जवळचे आहोत असा अभिमान बाळगता, 18 त्या तुम्हांला त्याची इच्छा कळते आणि ज्या सर्वोत्तम गोष्टी आहेत, त्या तुम्ही स्वीकारता कारण नियमशास्त्राद्वारे तुम्हांला शिक्षण मिळाले आहे. 19 तुम्हाला वाटतें की ज्यांना योग्य मार्ग माहित नाही त्यांचे तुम्ही मार्गदर्शक आहात, जे लोक अंधारात (पापांत) आहेत, त्यांचा तुम्ही प्रकाश आहात आणि तुमची खात्री झाली आहे की तुम्ही आंधळ्यांचें पुढारी, जे अंधारात आहेत त्यांचा प्रकाश, 20 मूर्खांचे शिक्षक, बालकांचे गुरु आहात, कारण नियमशास्त्रात तुम्हांला ज्ञान आणि सत्याचे मूर्त स्वरुप मिळाले आहे. 21 तर मग तुम्ही जे दुसऱ्यांना शिकविता ते तुम्ही स्वतःला का शिकवित नाही? तुम्ही चोरी करु नये असा उपदेश करता पण तुम्ही स्वतः चोरी का करता? 22 तुम्ही व्यभिचार करु नये असे म्हणता ते तुम्ही व्यभिचार का करतां? तुम्ही मूर्तिचा तिरस्कार करता पण देवळात चोरी करता? 23 तुम्ही नियमशास्त्राविषयी बढाई मारता, ते तुम्ही नियमशास्त्र मोडून देवाचा अपमान का करता? 24 शास्त्रलेखात लिहिल्यानुसार तुमच्यामुळे “विदेशी लोकांमध्ये देवाच्या नावाचा अपमान होत आहे.” [b]
25 तुम्ही नियमशास्त्र पाळीत असला तर सुंतेला मोल आहे. पण जर तुम्ही नियमशास्त्र पाळीत नाही तर, तुमची सुंता न झाल्यासारखी आहे. 26 सुंता न झालेला मनुष्य जर नियमशास्त्राचे पालन करतो, तर त्याची सुंता न होणे हे सुंता झाल्याप्रमाणे समजण्यात येणार नाही काय? 27 ज्या मनुष्याची शारीरिक रीतीने सुंता झाली नाही आणि जो नियमशास्त्र पूर्ण करतो, तो ज्या तुम्हांला लिखित नियम व सुंता आहे, तरी नियमशास्त्र मोडता त्या तुमचा न्याय करील.
28 कारण जो बाहेरुन यहूदी आहे तो खरोखर यहूदी नाही व देहाची बाह्यत्कारी सुंता ही सुंता नव्हे. 29 पण जो अंतःकरणाचा यहूदी, तो यहूदी आहे आणि खरी सुंता लेखी नियमांद्वारे नव्हे तर आत्म्याने अंतःकरणाची केलेली सुंता होय, त्याची प्रशंसा माणसांकडून नव्हे, तर देवाकडून होते.
3 तर मग यहूदी असण्यात फायदा काय? किंवा सुंतेपासून फायदा काय? 2 सर्व बाबतीत पुष्कळच आहे. कारण सर्वप्रथम त्यांना देवाची वचने विश्वासाने सोपविण्यात आली होती. 3 हे खरे आहे की त्यातील काही अविश्वासू होते; देवाच्या विश्वासूपणाला अविश्वासूपणा नाहीसा करील काय? 4 खात्रीने नाही! देव खरा असलाच पाहिजे आणि प्रत्येक मनुष्य खोटा, पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की,
“तू बोलशील तेव्हा योग्य ठरशील आणि तुझा न्याय होत
असता तू विजय मिळविशील.” (B)
5 जर आपल्या दुष्टपणामुळे देवाचा न्याय स्पष्ट होत असेल तर त्याला काय म्हणावे? देव जो आपणावर क्रोध आणतो त्याला अनीतिमान म्हणावे काय? (मी हे मानवाप्रमाणे बोलतो). 6 खात्रीने नाही! कारण मग देव जगाचा न्याय कसा करील?
7 परंतु तुम्ही असे म्हणाला की, “जर देवाचा खरेपणा माझ्या खोटेपणामुळे त्याच्या गौरवासाठी उठून दिसत असेल, तर मग मी पापी का गणला जातो?” 8 आपण का वाईट करु नये जर त्याचा परिणाम चांगला होत असेल. कारण काही जण आपल्या विरुध्द वाईट बोलत आहेत, आणि त्यांना मिळणारी शिक्षा त्याबद्दलचा न्याय आहे.
सर्व लोक दोषी आहेत
9 तर मग काय? आम्ही यहूदी, विदेशी लोकांपेक्षा अधिक चांगल्या स्थितीत आहोत काय? मुळीच नाही! कारण यहूदी आणि ग्रीक हे सारखेच पापाच्या अधिकाराखाली आहेत. 10 शास्त्रात असे लिहिले आहे:
“पापाशिवाय असा कोणीही नाही.
एकही नाही.
11 समंजस असा कोणी नाही.
कोणीही देवाचा शोध करीत नाही.
12 ते सर्व दूर गेले आहेत,
आणि सर्व लोक निरुपयोगी झाले आहेत.
चांगले करणारा कोणी नाही,
एकही नाही.” (C)
13 “लोकांची तोंडे उघड्या कबरांसारखी आहेत
ते आपल्या जिभांनी लोकांना फसवितात.” (D)
“ते ज्या गोष्टी बोलतात त्यात सापाचे विष असते.” (E)
14 “त्यांची तोंडे शापांनी आणि कडूपणाने भरली आहेत.” (F)
15 “त्यांचे पाय रक्तपात करण्यास नेहमी तयार असतात.
16 जेथे कोठे ते जातात तेथे विध्वंस व विपत्ती आणतात.
17 त्यांना शांतीचा मार्ग माहीत नाही.” (G)
18 “त्यांच्या डोळ्यांपुढे देवाचे भय नाही.” (H)
19 आता आपणाला माहीत आहे की, नियमशास्त्र जे सांगते ते नियमशास्त्राच्या आधिन असणाऱ्यांकरिता आहे व मनुष्यांच्या कामचुकार पणाला आळा घालण्यासाठी व सर्व जगाला चांगले व पूर्ण होण्यासाठी आहे. त्या नियमशास्त्रा प्रमाणे सर्व दोषी आहेत. 20 नियमशास्त्राच्या कर्मांनी कोणीही देवासमोर नीतिमान ठरणार नाही. कारण नियमशास्त्राद्वारे पापाची जाणीव होते.
देव लोकांना नीतिमान कसे करतो?
21 परंतु आता देवाची मानवाविषयीची नीतिमत्वाची कृती नियमशास्त्राव्यतिरिक्त प्रगट झाली आहे. त्याला नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांची साक्ष आहे. 22 देवाची नीतिमत्त्वाची कृती ही येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे आहे आणि जे विश्वास ठेवतात त्या सर्वांसाठी दाखविली आहे. त्यात भेदभाव नाही. 23 सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. 24 परंतु त्यांना देवाने त्याच्या कृपेने येशू ख्रिस्ताद्वारे खंडणी भरुन नीतिमान ठरविले आहे. 25-26 लोकांच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून ख्रिस्ताचे रक्त सांडून देवाने त्याला जाहीरपणे पुढे केले. देवाने हे यासाठी सिद्ध केले की तो नीतिमान आहे हे सिद्ध व्हावे.देवाच्या सहनशीलतेमुळे त्याने हे सिद्ध केले की, या सध्याच्या काळी तो नीतिमान आहे. यासाठी जो ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, तो नीतिमान असावा.
27 मग आमच्या बढाई मारण्याचे प्रयोजन काय? ती वगळण्यात आली. कोणत्या प्रकारच्या नियमाने? कर्माच्या काय? नाही, तर ज्यामध्ये विश्वास आहे, त्याच्या आधारे. 28 कारण आपण असे मानतो की, मनुष्य देवावरील विश्वासाने नियमशास्त्रातील कर्माशिवाय नीतिमान ठरतो. 29 किंवा देव फक्त यहूद्यांचाच आहे काय? तो विदेशी लोकांचा नाही काय? होय, तो विदेशी लोकांचादेखील आहे. 30 ज्याअर्थी देव एकच आहे, त्याअर्थी तो ज्यांची सुंता झाली आहे, त्यांच्या विश्वासाने आणि ज्यांची सुंता झालेली नाही अशांनाही विश्वासाने नीतिमान ठरवील. 31 तर मग आपण या विश्वासाचा आग्रह धरुन नियमशास्त्र निरर्थक ठरवितो काय? खात्रीने नाही, आपण तर नियमशास्त्राला मान्यता देतो.
अब्राहामाचे उदाहरण
4 तर मग अब्राहाम जो मानवी रितीने आपला पूर्वज याच्याविषयी आपण काय म्हणावे? 2 जर अब्राहाम आपल्या कर्मांनी नीतिमान ठरला तर त्याला अभिमान बाळगण्यास जागा आहे, परंतु त्याला देवासमोर अभिमान बाळगणे शक्य नाही. 3 कारण शास्त्र काय सांगते? “अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि त्याचा विश्वास त्याला नीतिमत्व असा गणण्यात आला.”
4 जो कोणी काम करतो, त्याला मजुरी ही मेहरबानी म्हणून नव्हे तर त्याचा मोबदला म्हणून दिली जाते. 5 कोणताही मनुष्य कर्मे करुन देवाच्या दृष्टीने नीतिमान ठरु शकत नाही. म्हणून त्याने देवावरच भरवंसा ठेवावा. मग देव त्या मनुष्याचा भरवंसा स्वीकारुन त्याला आपल्या दृष्टीने नीतिमान ठरवतो. दुराचारी मनुष्यालाही नीतिमान ठरविणारा देवच आहे. 6 ज्याला देव कर्मावाचून नीतिमान ठरवितो, त्याच्याविषयीही दाविद म्हणतो;
7 “ज्याच्या अपराधांची क्षमा झाली आहे.
ज्याच्या पापांवर पांघरुण घातले आहे
तो धन्य!
8 धन्य तो पुरुष
ज्याच्या पापांचा हिशेब प्रभु करणार नाही.” (I)
9 तर मग हे नीतिमत्व ज्यांची सुंता झाली आहे आणि ज्यांची सुंता झाली नाही अशांनाही लागू होते काय? जे बेसुंती आहेत अशांनाही ते लागू पडते कारण आम्ही म्हणतो, “अब्राहामाचा विश्वास त्याला नीतिमान असा गणण्यात आला.” 10 आणि तो कसा गणण्यात आला, तो सुंता झालेला असताना का सुंता झालेली नसताना? 11 सुंता झालेली नसताना ही त्याने जो विश्वास दाखविला त्याचा परिणाम व नीतिमत्वाचा शिक्का म्हणून त्याला सुंता ही खूण मिळाली, यासाठी की, जे सुंता झाली नसताही विश्वास ठेवतात, त्यांच्याकडे ते नीतिमत्व गणले जावे. (त्यांचा तो पिता आहे.) 12 आणि तो ज्यांची सुंता झाली आहे त्यांचाही पिता आहे. पण त्यांची सुंता झालेली आहे म्हणून तो त्यांचा पिता झाला नाही, तर आपला पूर्वज अब्राहाम याची सुंता होण्यापूर्वीसुद्धा तो जसा विश्वासात जगत होता, तसे जर ते जगले तरच अब्राहाम त्यांचा पिता होऊ शकतो.
विश्वासाद्वारे मिळालेले देवाचे अभिवचन
13 अब्राहाम आणि त्याच्या वंशजांना जे अभिवचन मिळाले की, ते जगाचे वारस होतील, ते अभिवचन नियमशास्त्रामुळे आले नाही, तर विश्वासाचा परिणाम असलेल्या नीतिमत्वामुळे आले. 14 लोकांना देवाने दिलेले अभिवचन जर नियमशास्त्र पाळण्याने मिळत असेल तर विश्वास व्यर्थ आहे. आणि देवाने अब्राहामाला दिलेले अभिवचन व्यर्थ आहे. 15 कारण नियमशास्त्र मनुष्यांच्या आज्ञाभंगामुळे देवाचा क्रोध निर्माण करते आणि जेथे नियमशास्त्र नाही, तेथे आज्ञा मोडणेही नाही.
16 म्हणून देवाचे वचन हे विश्वासाचा परिणाम आहे यासाठी की ते कृपेद्वारे मिळावे. अशा रीतीने ते अभिवचन अब्राहामाच्या सर्व संततीला आहे, फक्त नियमशास्त्रावर अवलंबून राहतात अशांसाठीच नव्हे तर अब्राहामाप्रमाणे विश्वासाने जगणाऱ्या प्रत्येकासाठी आहे. 17 पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे: “मी तुला पुष्कळ राष्टांचा पिता केले आहे.” [c] अब्राहामाचा देव जो मेलेल्यांना जीवन देतो, जे अस्तित्वात नाही त्यांना अस्तित्वात आणतो त्या देवासमोर हे खरे आहे.
18 आपल्या अंतःकरणात आशा धरुन सर्व मानवाच्या अपेक्षेपेक्षा विरुद्ध असा विश्वास धरला म्हणून, “तुझी संतती ताऱ्यांसारखी अगणित होईल आणि तुझे असंख्य वंशज होतील,” असे जे म्हटले आहे त्याप्रमाणे तो “अनेक राष्टांचा पिता” झाला. 19 अब्राहाम जवळ जवळ शंभर वर्षांचा झाला होता, त्यामुळे त्याचे शरीर मृतवतच झाल्यासारखे होते. तसेच सारेलासुद्धा मूल होणे शक्य नव्हते. अब्राहामाने याविषयी विचार केला होता, तरीपण त्याने त्याचा विश्वास कमकुवत होऊ दिला नाही. 20 देवाने जे अभिवचन दिले आहे त्याविषयी त्याने कधीच संशय बाळगला नाही. त्याने विश्वास ठेवण्याचे कधीच थांबविले नाही. तो विश्वासात बळकट होत गेला आणि त्याने देवाला गौरव दिले. 21 त्याची पूर्ण खात्री होती की, देवाने जे अभिवचन दिले ते पूर्ण करण्यास तो समर्थ आहे. 22 “म्हणूनच त्याला नीतिमान असे गणण्यात आले.” [d] 23 ते अभिवचन केवळ अब्राहामासाठीच होते असे नव्हे, 24 तर आपल्यासाठीसुद्धा होते, ज्याने आपल्या प्रभु येशुला मेलेल्यांतून उठविले आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो, 25 येशूला आमच्या पापांकरिता मरण्यासाठी दिले गेले. आणि त्याला मरणातून उठविण्यात आले यासाठी की, देवासमोर आम्ही नीतिमान ठरविले जावे.
देवाशी नीतिमान
5 ज्याअर्थी विश्वासाने आपल्याला नीतिमान ठरविले आहे त्याअर्थी आपल्या विश्वासाचा परिणाम म्हणून आपल्याला येशू ख्रिस्ताद्वारे देवाकडून शांति मिळाली आहे. 2 आता आपण ज्या कृपेमध्ये आहोत, त्यात त्याच्याद्धारे विश्वासाने आम्हीसुद्धा प्रवेश मिळविला आहे. आणि आम्ही देवाच्या गौरवाचे भागीदार होण्याच्या आशेने अभिमान बाळगतो. 3 याशिवाय आम्ही संकटांतही अभिमान बाळगतो; कारण आम्हांस ठाऊक आहे की, या संकटांमुळे आम्हांला अधिक धीर येतो. 4 आणि धीराने आम्ही कसोटीस उतरतो आणि कसोटीस उतरल्याने आशा उत्पन्र होते. 5 आणि आशा लाजवित नाही. कारण आपणांस दिलेल्या पवित्र आत्म्याकडून आपल्या अंतःकरणात देवाची प्रीति ओतली आहे.
6 आम्ही जेव्हा आमचे स्वतःचे तारण करण्यासाठी अशक्त होतो तेव्हा ख्रिस्त योग्य वेळी आमच्यासाठी मरण पावला. 7 आता नीतिमान मनुष्यासाठी सुध्दा कदाचित कोणी मरणार नाही. एखादा मनुष्य चांगला असेल तर त्याच्यासाठी मरण्याचे धाडस कदाचित कोणीतरी करील. 8 परंतु आम्ही पापी असतानाच ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला. त्याद्वारे त्याने दाखवून दिले की, तो आमच्यावर फार प्रेम करतो.
9 तर मग आता आपण ख्रिस्ताच्या रक्ताने नीतिमान ठरलो आहोत, म्हणून ख्रिस्ताद्वारे देवाच्या रागापासून आपण वाचले जाणार आहोत. 10 आम्ही देवाचे शत्रू असताही त्याच्या पुत्राच्या मरणाद्वारे त्याने आमच्याशी समेट केला. त्यामुळे आता आम्ही देवाचे मित्र असल्यामुळे देव आम्हांला त्याच्या पुत्राच्या जीवनाद्वारे रक्षील. 11 इतकेच नव्हे तर ज्याच्याद्वारे आमचा देवाबरोबर समेट झाला त्या आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे आम्हीसुद्धा देवाविषियी अभिमान बाळगतो.
आदाम आणि ख्रिस्त
12 म्हणून पाप जसे एका मनुष्याद्वारे, जगात आले आणि पापाद्वारे मरण आले, तसेच सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये मरण आले. 13 नियमशास्त्र जगात येण्यापूर्वी पाप जगात आले होते. परंतु नियमशास्त्र नसल्यामुळे कोणाच्याही हिशेबी पाप गणले जात नव्हते. 14 परंतु मरणाने आदामाच्या काळपासून ते मोशेच्या काळापर्यंत राज्य केले. ज्यांनी पाप केले नाही, त्याच्यांवरसुद्धा मरणाने राज्य केले.
देवाची आज्ञा न मानून आदामाने पाप केले म्हणून तो मेला आदाम, ख्रिस्त जो येणार होता, त्याचे प्रतिरुप आहे. 15 पण देवाची मोफत देणगी आदामाच्या पापासारखी नाही. कारण आदामाच्या पापामुळे पुष्कळ जण मरण पावले. देवाची कृपा आणि दान, एक मानव येशू ख्रिस्ताच्या कृपेद्वारे आली व विशेषेकरुन सर्व लोकांकरिता विपुल झाली. 16 आदामाने पाप केल्यानंतर तो दोषी ठरला होता पण देवाची देणगी वेगळी आहे. देवाची मोफत देणगी पुष्कळ पापांनंतर आली आणि त्या देणगीमुळे तिने आपल्या लोकांना देवासमोर नीतिमान केले. 17 एका मनुष्याच्या पापामुळे मरणाने राज्य केले. पण आता काही लोक देवाच्या कृपेची विपुलता आणि देणगी जिच्यामध्ये नीतिमत्व आहे, ते अनुभवतात, ते विशेषेकरुन येशू ख्रिस्ताद्वारे जीवनात राज्य करतील.
18 म्हणून एका पापामुळे सर्व मनुष्यांना शिक्षा झाली तसेच एका नीतिमत्वाच्या कृत्याने सर्व लोकांना अनंतकालचे जीवन देणारे नीतिमत्व मिळाले. 19 यास्तव आदामाच्या आज्ञाभंगामुळे पुष्कळांना पापी ठरविण्यात आले, त्याचप्रमाणे ख्रिस्ताच्या आज्ञापालनाने पुष्कळांना नीतिमान ठरविण्यात येईल. 20 पापे वाढवण्यासाठी म्हणून नियमशास्त्राचा प्रवेश झाला. परंतु जेथे पाप वाढले तेथे देवाची कृपाही विपुल झाली. 21 अशासाठी की, जसे पापाने मरणाच्या योगे राज्य केले, त्याच रीतीने देवाची कृपाही, नीतिमत्वाने आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे अनंतकाळच्या जीवनसाठी राज्य करील.
पापात मेलेले पण ख्रिस्तात जिवंत
6 तर मग आपण काय म्हणावे? देवाची कृपा वाढावी म्हणून आपण पापांत राहावे काय? 2 खात्रीने नाही. आपण जे पापाला मेलो ते अजूनही जिवंत कसे राहू? 3 तुम्हांला माहीत नाही का की ज्या आपण प्रभु येशू ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला होता त्या आपला त्याच्या मरणातही बाप्तिस्मा झाला. 4 म्हणून आपण त्याच्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो यासाठी की, पित्याच्या गौरवाने ख्रिस्त जसा मेलेल्यांतून उठविला गेला तसे आम्हीही जीवनाच्या नवीनपणात चालावे.
5 कारण जर त्याच्या मरणाच्या प्रतिरुपाने आपण त्याच्याशी जोडलो आहोत, तर त्याच्या पुनरुत्थानाच्या प्रतिरुपाने त्याच्याशी जोडले जाऊ. 6 आपणांला हे माहीत आहे की, आपल्यातील जुना मनुष्य ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळला गेला यासाठी की आपल्या पापमय शरीराचा नाश व्हावा व यापुढे आपण पापाचे दास होऊ नये. 7 कारण जो कोणी ख्रिस्ताबरोबर मरतो तो पापापासून मुक्त होऊन नीतिमान होतो.
8 आणि जर आपण ख्रिस्ताबरोबर मेलो तर आम्ही विश्वास धरतो की, त्याच्याबरोबर जिवंतही राहू. 9 कारण आम्हांस माहीत आहे की, ख्रिस्त जो मेलेल्यांतून उठविला गेला तो यापुढे मरणार नाही. मरणाची त्याच्यावर सत्ता चालणार नाही. 10 जे मरण तो मेला ते एकदाच पापासाठी मेला, परंतु जे जीवन तो जगतो ते तो देवासाठी जगतो. 11 त्याच रीतीने तुम्ही स्वतःला पापाला मेलेले पण ख्रिस्त येशूमध्ये व देवासाठी जिवंत असे समजा.
12 यासाठी की तुम्ही पापाच्या वाईट वासना पाळाव्यात म्हणून पापाने तुमच्यावर राज्य करु नये. 13 आणि अनीतिची साधने व्हावीत म्हणून तुम्ही आपल्या शरीराचे अवयव पापाच्या स्वाधीन करु नका. त्याऐवाजी तुम्ही जे मरणातून उठविलेले लोक व जे आता जिवंत आहात ते आपणांला देवाच्या स्वाधीन करा. आपल्या शरीराचे अवयव नीतीची साधने व्हावीत म्हणून देवाच्या स्वाधीन करा. 14 पाप तुम्हांवर राज्य करणार नाही. कारण तुम्ही नियमशास्त्राधीन नाही तर देवाच्या कृपेच्या अधीन आहात.
नीतिमतेचे दास
15 तर मग आपण काय करावे? आपण नियमशास्त्राधीन नसून देवाच्या कृपेच्या अधीन आहोत म्हणून पाप करावे काय? 16 खात्रीने नाही. तुम्हांला माहीत नाही काय की जेव्हा तुम्ही स्वतःला आज्ञापालना करता एखाद्याच्या स्वाधीन करता तर ज्याची आज्ञा तुम्ही पाळता त्याचे गुलाम आहात. तुम्ही पापांत चालू शकता किंवा देवाची आज्ञा पाळू शकता. पापांमुळे आध्यात्मिक मरण येते. पण देवाची आज्ञा पाळल्याने तुम्हांला नीतिमत्व मिळते. 17 पूर्वी तुम्ही पापाचे गुलाम होता. पाप तुम्हांला काबूत ठेवीत होते. पण देवाचे उपकार मानू या की, ज्या गोष्टी तुम्हांला शिकविल्या गेल्या त्या तुम्ही पूर्णपणे पाळल्या. 18 तुम्हांला पापांपासून मुक्त केले गेले. आणि नीतिमत्वाचे गुलाम करण्यात आले. 19 तुमच्या शरीराच्या दुर्बलतेमुळे व लोकांना समजावे म्हणून मी उदाहरणाचा उपयोग करीत आहे. कारण जसे तुम्ही आपले अवयव अशुद्धतेच्या आणि परिणाम म्हणून गुलाम होण्यासाठी स्वैरतेच्या अधीन केले त्याच रीतीने आता आपल्या शरीराचे अवयव देवाच्या सेवेला नीतिमत्वाचे गुलाम व्हावे म्हणून अर्पण करा.
20 कारण जेव्हा तुम्ही पापाचे गुलाम होता, तेव्हा नीतिमत्वासंबंधाने मोकळे होता. 21 आणि त्यावेळेला तुम्हांला काय फळ मिळाले, त्या गोष्टीची तुम्हांला आता लाज वाटते, ज्याचा शेवट मरण आहे. 22 परंतु आता तुम्हांला पापापासून मुक्त करुन देवाचे गुलाम केले आहे. देवाच्या सेवेसाठी तुमचे फळ तुम्हांला मिळाले आहे व त्याचा शेवटचा परिणाम म्हणजे अनंतकाळचे जीवन आहे. 23 कारण पापाची मजुरी मरण आहे. परंतु देवाची ख्रिस्त येशूमध्ये दिलेली मोफत देणगी म्हणजे अनंतकाळचे जीवन आहे.
विवाहावरुन उदाहरण
7 बंधूनो, तुम्हांस माहीत नाही काय? कारण नियमशास्त्र माहीत असलेल्या लोकांबरोबर मी बोलत आहे की, जोपर्यंत मनुष्य जिवंत आहे, तोपर्यंत नियमशास्त्र त्याच्यावर सता चालविते. 2 कारण लग्न झालेली स्त्री जोपर्यंत तिचा पती जिवंत आहे तोपर्यंत ती नियमशास्त्राने त्याला बांधलेली असते, पण जर तिचा नवरा मेला तर ती पतीविषयीच्या नियमातून मोकळी होते. 3 म्हणून पती जिवंत असताना ती दुसन्याची झाली, तर तिला व्यभिचारिणी असे म्हणतील. पण जर तिचा पती मरण पावला तर ती लग्नाच्या नियमातून मुक्त होते आणि जरी ती दुसऱ्या पुरुषाची पत्नी झाली तरी ती व्यभिचारिणी होत नाही.
4 माझ्या बंधूनो, अशाच प्रकारे नियमशास्त्राप्रमाणे तुम्हांलाही ख्रिस्ताच्या शरीराद्वारे ठार मारण्यात आले यासाठी की तुम्ही दुसऱ्या पुरुषाचे, जो मेलेल्यातून उठविला गेला होता त्याचे व्हावे, यासाठी की देवाच्या सेवेसाठी आमचा वापर व्हावा. 5 कारण जेव्हा आम्ही आमच्या पापी मानवी स्वभावाप्रमाणे जगत होतो तेव्हा पापी वासना नियमशास्त्राच्या द्वारे मरणाला फळ देण्यासाठी आपल्या अवयवामध्ये कार्य करीत होत्या. 6 ज्या नियमशास्त्रामध्ये आम्ही कैदी झालो होतो त्यात आम्ही मेलेलो असल्याने आता आम्ही नियमशास्त्रापासून मुक्त आहोत तेव्हा आता आम्ही देव, आमचा प्रभु याची पवित्र शास्त्राच्या जुनेपणाप्रमाणे नव्हे तर आत्म्याच्या नवेपणाप्रमाणे सेवा करतो.
पापाविरुद्धची लढाई
7 तर मग आता आपण काय म्हणतो? नियमशास्त्र पाप आहे असे आम्ही म्हणावे काय? खात्रीने नाही! कारण नियमशास्त्रावाचून पाप काय आहे हे मला समजले नसते. खरोखर “लोभ धरु नको” असे नियमशास्त्राने सांगितले नसते तर लोभ म्हणजे काय हे मला माहीत झाले नसते. [e] 8 परंतु पापाने संधी साधली आणि मजमध्ये सर्व प्रकारचा लोभ भरला. कारण नियमशास्त्राशिवाय पाप मृतवत आहे. 9 एके काळी मी नियाशास्त्राशिवाय जगत होतो, परंतु जेव्हा नियमशास्त्र आले तेव्हा पाप संजीवित झाले. 10 आणि मी मरण पावलो, जी आज्ञा जीवन आणण्यासाठी योजण्यात आली होती तिचा परिणाम माझ्यासाठी मरण असा झाला. 11 कारण पापाने संधी साधली आणि त्या आज्ञेयोगे मला फसविले व तिच्याद्वारे ठार केले.
12 म्हणून आम्ही असा निष्कर्ष काढतो की, नियमशास्त्र पवित्र आहे आणि आज्ञा पवित्र, नीतिमान आणि उत्तम आहेत. 13 याचा अर्थ असा आहे का, की जे उत्तम होते ते माझ्यासाठी मरण होते काय? खात्रीने नाही! परंतु पाप हे पाप म्हणून ओळखले जावे म्हणून त्याने जे उत्तम त्याद्वारे मजमध्ये मरण निर्माण केले. यासाठी की, पाप त्या आज्ञेमुळे कमालीचे पापिष्ठ व्हावे.
मनुष्याच्या मनातील लढा
14 कारण आम्हांला माहीत आहे की, नियमशास्त्र आत्मिक आणि मी दैहिक मनुष्य आहे. मी गुलाम म्हणून पापांत शरणागत राहावे म्हणून विकलेला असा आहे. 15 मी काय करतो हे मला माहीत नाही कारण काय करायचे हे मला माहीत नाही. कारण ज्या गोष्टींचा मी द्वेष करतो, त्याच गोष्टी मी करतो. 16 आणि ज्या गोष्टी मला कराव्याशा वाटत नाही त्याच करतो तर नियमशास्त्र उत्तम आहे हे मान्य करतो. 17 परंतु खरे तर मी त्या करतो असे नव्हे तर माझ्या ठायी वसत असलेले पाप त्या गोष्टी करते. 18 होय, मला माहीत आहे की, जे चांगले आहे ते माझ्यामध्ये वसत नाही. 19 चांगले करण्याची माझ्या ठायी इच्छा आहे, परंतु तसे मी करीत नाही, त्याऐवजी जे फार वाईट व जे मला करावेसे वाटत नाही तेच करतो. 20 आणि ज्याअर्थी, ज्या गोष्टी मला कराव्याशा वाटत नाहीत त्या मी करतो, तेव्हा खरे तर त्या गोष्टी मी करतो असे नाही तर माझ्याठायी असणारे पाप त्या गोष्टी करते.
21 तर माझ्यामध्ये मला हा नियम आढळतो की, माझ्यातील मनुष्याला चांगले करावेसे वाटते पण वाईट ही एकच गोष्ट माझ्याबरोबर आहे. 22 माझ्या आत असलेला मनुष्य देवाच्या नियमशास्त्रामुळे आनंद करतो. 23 परंतु माझ्या अवयवात मला निराळाच नियम कार्य करताना दिसतो. तो माझ्या मनावर अमल करणाऱ्या नियमाबरोबर लढतो, आणि पापाने मजवर लादलेल्या नियमाचा, जो माझ्या शरीरात कार्य करतो, त्याचा कैदी करतो. 24 मी अत्यंत दु:खी मनुष्य आहे! मरणाधीन असलेल्या शरीरापासून मला कोण सोडवील? 25 परंतु आमचा प्रभु येशू ख्रिस्त याच्याद्वारे देवाचे आभार मानतो.
तर मग माझ्या मनाने मी देवाच्या नियमाचा गुलाम आहे. पण माझ्या पापी स्वभावाने मी पापाने माझ्यावर लादलेल्या नियमाचा गुलाम आहे.
पवित्र आत्म्यात जीवन
8 म्हणून आता जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांना शिक्षा नाही. 2 कारण आत्म्याचा जो नियम ख्रिस्त येशूमध्ये जीवन देतो त्याने पापाचा नियम जो तुम्हांला मरणाकडे नेतो त्यापासून मुक्त केले आहे. 3 नियमशास्त्र समर्थ आहे पण आपण दूर्बळ आहोत त्यामुळे वाचु शकत नाही, देवाने आपल्या पुत्राला पापी देहाच्या प्रतिरुपाने व पापाकरिता पाठवून ख्रिस्ताच्या देहामध्ये पापाला न्यायदंड ठरविला. 4 यासाठी की, नीतिच्या व आवश्यक गोष्टी आपण जे देहाच्या पापमय स्वभावाप्रमाणे नव्हे तर आत्म्याप्रमाणे चालतो, त्या आमच्याद्वारे पूर्ण व्हाव्यात.
5 कारण जे त्यांच्या मानवी पापी देहाप्रमाणे जगतात ते देहाच्या गोष्टींचा विचार करतात, परंतु जे आत्म्याने चालतात व ज्यांचे मन आत्म्याच्या गोष्टींकडे लागलेले असते ते त्याप्रमाणे जीवन जगतात. 6 देहाचे चिंतन हे मरण आहे. पण आत्म्याचे मनन हे जीवन आणि शांति आहे. 7 मानवी स्वभावाचे अधिकार असलेले पापी मन म्हणजे देवाबरोबर वैर आहे. कारण ते देवाच्या नियमाच्या आधीन होत नाही, व त्याला आधीन होताही येत नाही. 8 कारण जे देहस्वभावाच्या आधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्र करता येत नाही.
9 देवाचा आत्मा तुम्हांमध्ये राहतो, तर तुम्ही देहाचे नसून आत्म्याचे आहात. परंतु जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही. 10 उलट जर ख्रिस्त तुम्हांमध्ये आहे व तुमचा देह पापामुळे मेला आहे तरी नीतिमत्वामुळे तुमच्या आत्म्याच जीवन आहे. 11 आणि ज्या आत्म्याने येशूला मरणातून उठविले तो त्याचा आत्मा तुम्हांमध्ये राहतो त्या तुमच्या मर्त्य शरीराला जीवन देईल.
12 तर मग बंधूनो, आम्ही कर्जदार आहोत, देहाप्रमाणे जगण्यास देहाचे नव्हे. 13 कारण जर तुम्ही तुमच्या पापी देहस्वभावाप्रमाणे जीवन जगाल तर तुम्ही मरणार आहात, परंतु आत्म्याच्या करवी जर तुम्ही देहाची कर्मे ठार माराल तर तुम्ही जगाल.
14 कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवितो, तितके देवाची मुले आहेत. 15 पुन्हा भीति वाटू नये म्हणून तुम्हांला गुलामगिरीचा आत्मा मिळाला नाही, तर तुम्हांला दतकपणाचा आत्मा मिळाला आहे. त्याच्यायोगे आम्ही “अब्बा, बापा” अशी हाक मारतो. 16 तो आत्मा स्वतः आपल्याबरोबर दुजोरा देतो की, आपण देवाची मुले आहोत. 17 आपण जर देवाची मुले आहोत तर आम्ही वारसही आहोत आणि ख्रिस्ताबरोबर वारस आहोत. खरोखर आपण त्याच्याबरोबर दु:ख भोगतो यासाठी की, त्याच्याबरोबर आपणांस गौरवही मिळावे.
भविष्यात आम्हांला गौरव मिळेल
18 कारण भविष्यकाळात आपल्याला प्रगट करण्यात येणाऱ्या गौरवाच्या तुलनेने सध्याच्या काळातील दु:खे काहीच नाहीत असे मी मानतो. 19 कारण निर्माण केलेले जग पुत्राच्या प्रगट होण्याच्या काळाची वाट पाहत आहे. 20 निर्माण केलेले जग सर्व स्वाधीन होते ते इच्छेने नव्हे तर देवाने ते अधीन ठेवले होते म्हणून, 21 या आशेने की, निर्माण केलेले जग त्याच्या अशुद्धतेच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावे, व देवाच्या मुलांचे वैभवी गौरव त्याने उपभोगावे.
22 कारण आपल्याला माहीत आहे की, आजपर्यंत, निर्माण केलेले संपूर्ण जग कण्हत, वेदना भोगीत आहे. 23 परंतु निर्माण केलेले जगच नव्हे तर आपणांस ज्यांना आत्म्याचे प्रथम फळही मिळाले आहे ते, आपणही संपूर्ण दत्तकपणासाठी आपल्या शरीराच्या नाशवंत, मर्त्य स्वभावापासून मुक्ती व्हावी म्हणून आतल्याआत कण्हत आहोत. 24 आपण आपल्या मनातील या आशेने तारले गेलो आहोत. परंतु आपण ज्याची आशा धरली ते पाहू शकलो तर ही आशा नसेल. कारण जे पाहतो त्याची आशा कोण धरील? 25 परंतु जर आपण जे पाहत नाही त्याची आशा धरतो तर आपण धीराने त्याची वाट पाहतो.
26 जेव्हा आपण कण्हतो तेव्हा आत्माही आपल्या अशक्तपणात आपणांस मदत करतो. कारण कशासाठी आपण प्रार्थना करावी, हे आपणांस माहीतसुद्धा नसते. परंतु आत्मा स्वतः आपणांसाठी शब्दांनी जे व्यक्त करता येत नाही, अशा कण्हण्याने मध्यस्थी करतो. 27 परंतु जो देव आपली अंतःकरणे शोधतो त्याला आत्म्याचा हेतू काय आहे हे माहीत आहे. कारण देवाच्या इच्छेने आत्मा संताच्या वतीने मध्यस्थी करतो.
28 आणि आपणास माहीत आहे की, प्रत्येक गोष्टीत हेतूप्रमाणे आत्मा जे देवावर प्रेम करतात व त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेले असतात त्यांच्यासह जे चांगले आहे ते करण्याचे काम करतो. 29 ज्यांना देवाने अगोदरच निवडले होते त्यांना त्याच्या पुत्राच्या सारखे व्हावे म्हणून नेमले होते. यासाठी की देवाचा पुत्र पुष्कळ बंधूंमध्ये ज्येष्ठ व्हावा. 30 देवाने ज्यांना अगोदरच नेमले होते, ज्यांना बोलाविले होते त्यांना नीतिमान केले आणि ज्यांना नीतिमान केले त्यांना गौरवसुद्धा दिले.
देवाची ख्रिस्त येशूमधील प्रीति
31 यावरुन आपण काय म्हणावे? देव जर आपल्या बाजूचा आहे तर आपल्या विरुद्ध कोण? 32 ज्याने आपल्या पुत्राला राखून ठेवले नाही, परंतु आपणा सर्वांसाठी मरण्यासाठी दिले तो आपणांला पुत्रासह सर्व काही देणार नाही काय? 33 देवाच्या निवडलेल्या लोकांवर आरोप कोण ठेवील? देव हाच एक त्यांना निरपराध ठरवितो. 34 दोषी ठरवितो तो कोण? जो मेला आणि याहीपेक्षा अधिक महत्तवाचे म्हणजे जो उठविला गेला व देवाच्या उजवीकडे बसला आहे, जो आपल्या वतीने मध्यस्थी करतो तो ख्रिस्त येशू आहे. 35 ख्रिस्ताच्या प्रेमापासून आपणांस कोण वेगळे करील? त्रास, कष्ट, छळ, भूक, नग्नता, संकटे किंवा तलवारीने वध हे वेगळे करतील काय? 36 असे लिहिले आहे की,
“दिवसभर आम्ही तुझ्यामुळे वधले जात आहोत.
आम्हांला कापायला नेत असलेल्या मेंढराप्रमाणे समजतात.” (J)
37 तरी या सर्व गोष्टींमध्ये आम्ही ज्याने आम्हांवर प्रीति केली त्याच्याद्वारे अत्यंत वैभवी जय मिळवीत आहोत. 38 कारण माझी खात्री आहे की, मरण किंवा जीवन, देवदूत, अधिकारी आत्मे हल्लीच्या किंवा भविष्यकाळात, 39 येशूचे सामर्थ्य, उंच किंवा खाली, जगात निर्माण केलेली कुठलीही गोष्ट आपणांस देवाचे प्रेम जे ख्रिस्तामध्ये आढळते त्यापासून वेगळे करु शकणार नाही.
देव आणि यहूदी लोक
9 मी ख्रिस्तामध्ये खरे बोलतो, खोटे बोलत नाही. पवित्र आत्म्याने बोध केलेला माझा विवेक मजविषयी साक्ष देतो 2 की, मला मोठे दु:ख आहे आणि माझ्या अंतःकरणात सतत वेदना आहेत. 3 कारण माझे भाऊ, वंशाने माझे नातेवाईक यांच्याकरिता शापित व्हावे आणि ख्रिस्तापासून मी वेगळा केलेला असावा अशी मी इच्छा करतो. 4 इस्राएली कोण आहेत? ते देवाचे निवडलेले लोक आहेत. या लोकांकडे देवाचे गौरव आणि देवाने त्यांच्याशी केलेला करार आहे. देवाने त्यांना नियमशास्त्र दिले. आणि उपासना करण्याचा योग्य मार्ग दिला. आणि देवाने त्यांना त्याचे अभिवचन दिले आहे. 5 त्यांचे पूर्वज थोर आहेत. मानवी दृष्टीने सांगताना ख्रिस्त त्यांच्यापासून आला, जो सदासर्वकाळ सर्व लोकांवर धन्यवादित देव आहे. आमेन.
6 परंतु देवाचे वचन व्यर्थ झाले असे नाही. कारण सर्व जण जे इस्त्रएलापासून आले आहेत ते खरोखरच इस्राएली आहेत असे नाही. 7 याचा अर्थ असाही नाही की, ते अब्राहामापासून आलेले आहेत, म्हणून खरोखरच ती अब्राहामाची मुले आहेत, तर देवाने म्हटल्याप्रमाणे, “इसहाकाच्या वंशातील लोकांना तुझे संतान म्हटले जाईल.” [f] 8 म्हणजे देहदृष्ट्या जन्मली ती देवाची मुले आहेत असे नाही तर वचनाच्या मुलांना संतान म्हटले आहे. 9 “नेमलेल्या वेळी मी परत येईन त्यावेळेला सारेला पुत्र होईल.” [g] आणि हे ते वचन आहे.
10 इतकेच नव्हे तर रिबेकासुद्धा एकाकडून म्हणजे आपला पूर्वज इसहाक याच्याकडून गरोदर झाली. 11 मुले जन्माला येण्यापूर्वी आणि त्यांनी काही बरे किंवा वाईट केले नव्हते, तेव्हा निवडीवरुन असणारा देवाचा पूर्वसंकल्प कायम राहावा, म्हणजे कर्मावरुन नाही तर बोलावणाऱ्याच्या इच्छेवरुन घडावे. 12 म्हणून तिला सांगितले होते की, “वडील धाकट्याची सेवा करील.” [h] 13 पवित्र शास्त्रात लिहिले आहे की, “मी याकोबावर प्रेम केले आणि एसावाचा द्वेष केला.” [i]
14 तर मग आपण काय म्हणावे? देवाच्या ठायी अन्याय नाही. आहे काय? खात्रीने नाही. 15 कारण तो मोशेला म्हणाला, “ज्याच्यावर मला दया करायची त्यावर मी दया करीन, आणि ज्याच्यावर करुणा करायची त्याच्यावर करुणा करीन.” [j] 16 म्हणून ते इच्छा करणाराऱ्या वर किंवा पाळणाऱ्यावर नव्हे तर दयाळू देवावर अवलंबून आहे. 17 कारण पवित्र शास्त्रात देव फारोला म्हणाला, “याच हेतूसाठी मी तुला उच्च केले यासाठी की मी तुझ्यामध्ये आपले सामर्थ्य दाखवावे आणि माझे नाव सर्व पृथ्वीवर गाजविले जावे.” [k] 18 म्हणून देव ज्याच्यावर दया करायची त्यास दया करतो आणि ज्यास कठीण करायचे त्यास कठीण करतो.
19 तुमच्यापैकी एखादा मला म्हणेल, “देव जर आमच्या कृति नियंत्रित करतो तर तो अजूनही आमचे दोष का काढतो? शेवटी त्याच्या इच्छेला कोण विरोध करील?” 20 होय, हे मानवा, देवाला उलट उत्तर देणारा तू कोण आहेस? जे घडले आहे ते घडणाऱ्याला, “तू मला असे का केलेस” असे विचारील काय? 21 एका ठराविक गोळ्यापासून एक भांडे गौरवासाठी आणि एक भांडे अपमानासाठी करावे असा कुंभाराला मातीवर अधिकार नाही काय?
22 परंतु देवाला जरी त्याचा राग आणि सामर्थ्य व्यक्त करावेसे वाटत होते, तरी त्याने जी माणसे नाशासाठी नेमलेली होती, त्यांचे मोठ्या धीराने सहन केले नाही काय? 23 जी त्याच्या दयेची पात्रे होणार होती, त्यांना त्याने गौरव मिळण्यासाठी तयार केले, त्यांचे त्याने सहन केले यासाठी की त्यांना त्याच्या दयेची विपुलता कळावी. 24 ज्या आपणांला त्याने फक्त यहूद्यांतूनच नव्हे तर विदेशातूनही बोलाविले होते. 25 होशेयाच्या ग्रंथात पवित्र शास्त्र सांगते,
“जे माझे लोक नव्हते,
त्यांना मी माझे लोक म्हणेन.
आणि ज्या स्त्रीवर प्रीति केली नव्हती
तिला प्रिय म्हणेन.” (K)
26 “आणि असे होईल की,
जेथे ‘तुम्ही माझे लोक नाहीत’
असे म्हटले होते तेथे त्यांना जिवंत देवाची मुले म्हणण्यात येईल.” (L)
27 आणि यशया इस्राएलाविषयी असे ओरडून सांगतो की,
“जरी इस्त्राएलाविषयी मुलांची संख्या
समुद्राच्या वाळूसारखी असली तरी त्यांच्यातील
फक्त थोडेच तारण पावतील.
28 कारण पूर्ण करुन व आटोपते घेऊन प्रभु पृथ्वीवर आपला शब्द अंमलात आणील.” (M)
29 आणि जसे यशयाने पूर्वी सांगितले होते,
“जर सेनाधीश परमेश्वराने
आम्हांसाठी बीज राहू दिले नसते तर
आम्ही सदोम
आणि गमोरासारखे झालो असतो.” (N)
30 तर मग आपण काय म्हणावे? आम्ही असे अनुमान काढतो की, जे यहूदीतर देवाला अपेक्षित असलेल्या नीतिमत्वाच्या मागे लागले नव्हते त्यांना त्यांचे न्यायीपण विश्वासाचा परिणाम म्हणून मिळाले. 31 परंतु इस्राएल लोक जे नियमशास्त्राच्या पालनातून मिळणाऱ्या नीतिमत्वाच्या मागे लागले होते त्यांना नियमशास्त्र मिळाले नाही. 32 का नाही? कारण ते हे नीतिमत्व विश्वासाने नाही तर त्यांनी केलेल्या कर्मांनी मिळेल असे समजून त्याच्या मागे लागले होते व ते अडखळण्याच्या दगडावर ठेचाळले. 33 पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे.
“पाहा मी सीयोनात अडखळण्याचा दगड
आणि अपाय करणारा खडक ठेवतो.
परंतु जो त्याच्यावर विश्वास ठेवतो
तो लज्जित होणार नाही.” (O)
10 बंधूनो, इस्राएलाच्या वतीने माझी मनीषा आणि देवाजवळ प्रार्थना आहे की, 2 त्यांचे तारण व्हावे, कारण मी त्यांच्याविषयी साक्ष देतो की, त्यांना देवाविषयी कळकळ आहे, परंतु ती ज्ञानावर आधारित नाही. 3 देवापासून मिळणाऱ्या नीतिमत्वाविषयी त्यांना माहिती नसल्यामुळे ते आपलेच नीतिमत्व स्थापावयास पाहत होते. त्यामुळे ते देवाच्या नीतिमत्वाला वश झाले नाहीत. 4 कारण ख्रिस्त नियमशास्त्राचा शेवट आहे यासाठी की, जे विश्वास ठेवतात त्यांना नीतिमत्व मिळावे.
5 नियमशास्त्राद्वारे मिळणाऱ्या नीतिमत्वाविषयी मोशे लिहितो, “जो मनुष्य या गोष्टी करतो तो त्याकडून जगेल.” [l] 6 विश्वासाने मिळणारे नीतिमत्व हे सांगते, “तुम्ही आपल्या मनात म्हणू नका की ‘स्वर्गात कोण जाईल?’” (म्हणजे “ख्रिस्ताला खाली आणावयास”) 7 किंवा “‘खाली अधोलोकात कोण जाईल?’” (म्हणजे “ख्रिस्ताला मेलेल्यातून वर आणायला.”)
8 नाही! शास्त्र काय म्हणते? “ते वचन तुमच्याजवळ, तुमच्या मुखात, तुमच्या अंतःकरणात आहे.” [m] ते वचन हे आहे 9 की, जर तू तुझ्या मुखाने “येशू प्रभु आहे” असा विश्वास धरतोस आणि आपल्या अंतःकरणात देवाने त्याला मेलेल्यांतून उठविले असा विश्वास धरतोस तुझे तारण होईल 10 कारण नीतिमत्वासाठी मनुष्य अंतःकरणाने विश्वास ठेवतो आणि तारणासाठी विश्वासाने कबूल करतो.
11 शास्त्र सांगते, “जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही.” [n] 12 याचे कारण की, यहूदी आणि ग्रीक यांच्यात भेद नाही. कारण प्रभु हा सर्वांचा प्रभु आहे. जे हाक मारतात त्या सर्वांवर दया करण्या इतका तो संपन्र आहे. 13 कारण “जे कोणी प्रभूचे नाव घेऊन हाक मारतील, त्यांचे तारण होईल.” [o]
14 परंतु ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याला हाक मारणे त्यांना कसे शक्य होईल? ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर विश्वास ठेवणे त्यांना कसे शक्य होईल? आणि जर कोणी त्यांना उपदेश केला नाही, तर ते कसे ऐकतील? 15 त्यांना पाठविले नाही तर उपदेश करणे त्यांना कसे शक्य होईल? असे लिहिले आहे की, “शुभवार्ता आणणाऱ्याचे पाय किती सुंदर आहेत!”p
16 परंतु सर्वच यहूद्यांनी ती शुभवार्ता स्वीकारली नाही. यशयाने म्हटल्याप्रमाणे “प्रभो, आम्ही ज्या गोष्टी त्यांना सांगितल्या, त्यावर कोणी विश्वास ठेवला?” 17 म्हणून जे ऐकले त्याचा परिणाम विश्वास आणि जेव्हा कोणी येशूविषयी उपदेश केला.
18 परंतु मी म्हणतो, “त्यांनी आमचा उपदेश ऐकला नव्हता काय?” होय, त्यानी ऐकला: आत्मा म्हणतो:
“त्यांच्या आवाजाचा नाद सर्व पृथ्वीवर गेला आहे
आणि त्यांचे शब्द पृथ्वीच्या शेवटापर्यंत गेले आहेत.” (P)
19 परंतु मी म्हणातो, “इस्राएल लोकांना कळले नव्हते काय?” होय, त्यांना कळले, प्रथम मोशे म्हणतो,
“खरे तर ज्या लोकांचे राष्ट्र नाही त्यांचा उपयोग करुन मी तुम्हांला मत्सरी करीन.
विश्वासहीन राष्ट्राचा उपयोग करुन मी तुम्हांला राग आणीन.” (Q)
20 नंतर यशया फार धीट होऊन म्हणतो,
“जे मला शोधीत नव्हते
त्यांना मी सापडलो,
जे माझी चौकशी करीत नसत त्यांना मी प्रगट झालो.” (R)
21 परंतु देव इस्राएल लोकांविषयी म्हणतो,
“ज्या लोकानी माझी आज्ञा मोडली,
आणि मला विरोध केला त्यांच्याकडे सर्व दिवसभर मी आपले हात पसरले आहेत.” (S)
देव त्याच्या लोकांना विसरला नाही
11 तर मग मी म्हणतो, “देवाने आपल्या लोकांना सोडून दिले आहे काय?” खात्रीने नाही! कारण मीही इस्राएली आहे. अब्राहामापासूनचा, बन्यामिन वंशातला. 2 देवाला ज्यांचे पूर्वज्ञान होते त्या इस्राएली लोकांना त्याने सोडून दिले नाही. एलियासंबंधी पवित्र शास्त्र काय म्हणते ते तुम्हांस ठाऊक नाही काय? तो देवाजवळ इस्राएल लोकांविरुद्ध अशी विनंति करतो की, 3 “हे प्रभु, त्यांनी तुझ्या भविष्यवाद्यांना ठार मारले आहे. त्यांनी तुझ्या वेद्या पाडून टाकल्या आहेत, तुझ्या संदेष्ट्यां पैकी मीच एकटा राहिलो आहे. आणि ते माझाही जीव घ्यावयास पाहतात.q 4 परंतु त्याला देवाचे काय उत्तर मिळाले? देव म्हणतो. “ज्यांनी बालापुढे गुडघे टेकले नाहीत अशी सात हजार माणसे मी आपणासाठी राखून ठेवली आहेत.”r
5 त्याच प्रमाणे हल्ली देवाच्या कृपेच्या निवडीप्रमाणे काही शिल्लक राहिले आहेत. 6 आणि जर तो देवाच्या कृपेचा परिणाम असेल तर तो लोकांच्या कर्माचा नाही. तर देवाची कृपा ही कृपाच राहत नाही.
7 तर मग काय? इस्राएल लोक जे मिळविण्याचा प्रयत्न करीत होते ते त्यांना मिळाले नाही. परंतु जे निवडलेले त्यांना मिळाले आणि बाकीचे कठीण झाले. 8 पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे:
“देवाने त्यांना बधीरपणाचा आत्मा,” (T)
“पाहू न शकणारे डोळे ऐकू
न शकणारे कान दिले
आणि आजपर्यंत हे असे चालूच आहे.” (U)
9 दाविद म्हणतो,
“त्यांचे मेज त्यांस सापळा आणि फास होवो.
त्यांचे पतन होवो आणि त्यांना अपराधाबद्दल शिक्षा व प्रायश्चित मिळो.
10 दिसू नये म्हणून त्यांचे डोळे अंधकारमय होवोत.
आणि त्यांच्या कष्टाच्या ओझ्याखाली तू सर्वकाळ त्यांच्या पाठी वाकीव.” (V)
11 म्हणून मी असे म्हणतो, यहूद्यांचा नाश व्हावा म्हणून ते अडखळले नाहीत काय? खात्रीने नाही! त्यांच्या चुकीमुळे विदेशी लोकांना तारण प्राप्त व्हावे आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये ईर्षा उत्पन्र व्हवी म्हणून असे झाले. 12 परंतु त्यांनी केलेल्या चुकीचा अर्थ जगास विपुलता आणि आमचा बोध उपदेश न ऐकल्याने त्यांच्या संख्येत झालेला न्हास याचा अर्थ यहूदीतरास विपुलता तर आमचा बोध स्वीकारल्याने त्यांचा समावेश झाल्यास किती तरी अधिक विपुलता येईल.
13 तर तुम्ही जे यहूदी नाही त्यांना मी निश्चितपणे सांगतो कारण मी यहूदीतरांसाठी प्रेषित आहे. मी माझ्या सेवेला मान देतो. 14 या आशेने की, माझ्या हाडामांसातल्यांना ईष्योवान करुन त्यांच्यातील काही जणांचे तारण करावे. 15 जर देवाने त्यांच्या केलेल्या अव्हेराचा परिणाम जगासाठी समेट झाला. तर देवाकडून स्वीकार याचा अर्थ मेलेल्यांतून जिवंत होणे, नाही का? 16 जर प्रथम भाग पवित्र आहे, तर संपूर्ण पिठाचा गोळा पवित्र आहे. जर झाडाचे मूळ पवित्र आहे तर फांद्यासुद्धा पवित्र आहेत.
17 परंतु काही डहाळ्या तोडून टाकण्यात आल्या आणि तुम्ही रानटी जैतून असता कलम करुन लावले गेलात व जैतूनाच्या पौष्टिक मुळाचे भागीदार झालात. 18 तर तुम्ही त्या तोडलेल्या फांद्यांहून मोठे आहात अशी बढाई मारु नका. लक्षात ठेवा, तुम्ही मुळाला आधार देत नाही, तर मूळ तुमचे पोषण करते. 19 आता तुम्ही म्हणाल, “होय, आमचे कलम व्हावे यासाठीच फांद्या तोडल्या होत्या.” 20 त्या त्यांच्या अविश्वासामुळे तोडून टाकण्यात आल्या हे खरे आहे परंतु तुम्ही तुमच्या विश्वासामुळे स्थिर आहात. यास्तव अभिमान बाळगू नका. तर भीति बाळगा. 21 कारण देवाने जर मूळ फांद्याही राखल्या नाहीत तर तो तुम्हांलाही राखणार नाही.
22 अशा प्रकारे तुम्ही देवाचा दयाळूपणा आणि कठोरताही पाहा. जे पतन पावले आहेत त्यांच्याविषयी कठोरता परंतु देवाचा तुमच्याविषयीचा दयाळूपणा, जर तुम्ही त्याच्या दयेत राहिला नाहीत तर तुम्हांला झाडापासून छाटून टाकले जाईल. 23 आणि इस्राएल त्याच्या अविश्वासात राहीले नाही तर तेही कलम पुन्हा लावण्यात येईल. कारण देव त्यांना कलम म्हणून लावण्यास समर्थ आहे. 24 म्हणून तुम्ही जे निसर्गत; रानटी जैतुनांची फांदी म्हणून तोडले गेलात आणि निसर्गक्रम सोडून मशागत केलेल्या जैतुनाच्या झाडास कलम असे लावले गेलात तर किती सहजपणे मशागत केलेल्या जैतुनांच्या फांद्या त्या मूळच्या झाडात कलम केल्या जातील!
25 परंतु बंधूनो, तुम्ही आपल्या शहाणपणावर अवलंबून या रहस्याविषयी अजाण असावे असे मला वाटत नाही. इस्राएली लोकांत अंशतः कठीणपणा आला आहे आणि तो देवाच्या कुटुंबात विदेशी लोकांचा भरणा पूर्ण होईपर्यंत राहणार आहे. 26 आणि नंतर इस्राएलाचे राष्ट्र म्हणून तारण होईल, असे लिहीले आहे,
“मुक्त करणारा सीयोनातून येईल,
तो याकोबाच्या घराण्यातून त्यांची सर्व अभक्ती दूर करील.
27 जेव्हा मी त्यांच्या पातकांची क्षमा करीन.
तेव्हा त्यांच्याशी मी हा करार करीन.” (W)
28 जेथ पर्यंत सुवार्तेचा संबंध आहे ते तुमच्यामुळे शत्रू आहेत परंतु देवाच्या निवडीमुळे त्याने पूर्वजांना दिलेल्या वचनाप्रमाणे देव त्यांच्यावर प्रेम करतो. 29 कारण देवाने ज्यांना बोलाविले आहे आणि तो जे देतो त्याच्याविषयी कधीही आपले मत बदलत नाही. 30 कारण जसे तुम्ही पूर्वी देवाची आज्ञा पाळत नव्हता, परंतु आता तुम्हांला त्यांच्या आज्ञाभंगामुळे देवाची दया मिळाली आहे. 31 त्याचप्रमाणे तेही आता आज्ञा मोडणारे झाले आहेत, यासाठी की त्यांना आता देवाची कृपा मिळावी. 32 कारण देवाने सर्व लोकांना आज्ञाभंगाच्या तरुंगात कोंडले आहे, यासाठी की, त्याने त्यांच्यावर दया करावी.
देवाचे गौरव
33 देवाच्या बूद्धीची आणि ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे. त्याच्या निर्णय आणि त्याच्या मार्गाचा माग काढणे कठीण आहे. 34 पवित्र शास्त्र सांगते.
“प्रभूचे मन कोणाला माहीत आहे
किंवा त्याचा सल्लागार कोण असेल?” (X)
35 “प्रथम कोणी काही त्याला दिले
का यासाठी की त्याची परतफेड देवाने करावी?” (Y)
36 कारण सर्व गोष्टी त्याने निर्माण केल्या आणि त्याच्या द्वारे अस्तित्वात आहेत. त्याला युगानुयुग गौरव असो, आमेन.
आपले जीवन देवाला द्या
12 म्हणून बंधूनो, देवाच्या दयेमुळे मी तुम्हांला विनवितो की, तुमची शरीरे देवाला संतोष देणारा जिवंत यज्ञ अशी अर्पण करा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. 2 आणि यापुढे या जगाच्या आदर्शाप्रमाणे आचरण करु नका, त्याऐवजी तुमच्या मनाच्या नवीनपणामुळे तुमचा बदल होऊ द्या. यासाठी की देवाची पूर्ण आणि त्याला आनंद देणारी उत्तम इच्छा काय आहे हे तुम्हांला कळावे व तिचा तुम्ही स्वीकार करावा.
3 मला देण्यात आलेल्या कृपादानाच्या दृष्टीने मी तुम्हांतील प्रत्येकाला सांगतो की, विचार करण्यास योग्य आहे त्या आपल्या योग्यतेपेक्षा आपणांला अधिक श्रेष्ठ मानू नका. तर देवाने सोपवून दिलेल्या परिमाणाप्रमाणे समंजस असा जो मार्ग त्या दृष्टीने विचार करा. 4 कारण एका शरीरात आपले अनेक अवयव आहेत तरी सर्व अवयवांचे कार्य एकच नसते. 5 त्याचप्रमाणे, आपण पुष्कळ अंग असून ख्रिस्तामध्ये एक शरीर व एकमेकांचे अवयव आहोत.
6 देवाने दाखविलेल्या दयेनुसार आपणांस निरनिराळी दाने आहेत, जर कोणाला देवाचा संदेश देण्याचे दान आहे तर त्याने ते आपल्या विश्वासाच्या प्रमाणाने उपयोगात आणावे. 7 जर कोणाला सेवेचे दान असेल तर त्याने सेवेला वाहून घ्यावे, कोणाला शिक्षणाचे दान असेल तर त्याने शिक्षणाला वाहून घ्यावे. 8 कोणाला बोध करण्याचे दान असेल तर त्याने बोध करण्यास वाहून घ्यावे. ज्याला दानधर्म देण्याचे दान असेल त्याने ते सद्हेतूने द्यावे. ज्याला अधिकाराचे दान असेल त्याने दक्षतेने ते काम करावे ज्याला दयेचे दान असेल त्याने आनंदाने दया करावी.
9 तुमची प्रीति प्रामाणिक असावी. जे वाईट त्याचा द्वेष करा व बऱ्याला चिकटून राहा. 10 बंधूप्रेमाच्याबाबतीत एकमेकांशी ममतेने वागा, आदराच्या बाबतीत स्वतःपेक्षा इतरांचा बहुमान करा. 11 आस्थेविषयी आळशी होऊ नका. आत्म्यात उत्सुक असा. प्रभूची सेवा करा. 12 आपल्या घरात आनंदी राहा. संकटात सहनशील राहा. चिकाटिने प्रार्थना करा. 13 पवित्र जनांच्या गरजा भागवा. आदरातिथ्य करण्यात तत्पर असा.
14 जे तुमचा छळ करतात त्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या. शाप देऊ नका. 15 जे आनंद करतात त्यांच्याबरोबर आनंद करा. रडणाऱ्यांबररोबर रडा. 16 एकमेकांबरोबर ऐक्याने रहा, गर्व करु नका. त्याऐवजी नम्र लोकांच्या सहवासात रहा. स्वतःस शहाणे समजू नका.
17 कोणाचीही वाईटाबद्दल वाईट अशी फेड करुन नका. सर्व लोकांच्या दृष्टीने चांगले ते करण्याचा प्रयत्न करा. 18 शक्य असेल तर ते तुमच्यावर अवलंबून असल्याने सर्व लोकांबरोबर शांतीने राहा. 19 प्रिय बंधूंनो, सूड उगवू नका, देवाच्या रागाला वाट द्या. असे लिहिले आहे, “सूड घेणे माझ्याकडे आहे. मी फेड करीन असे प्रभु म्हणतो. [p]
20 “तुमचा शत्रू भुकेला असल्यास
त्यास खावयास द्या,
तहानेला असेल तर
प्यावयास द्या.
कारण असे केल्याने तुम्ही त्याच्या डोक्यावर निखाऱ्यांची रास कराल.” [q]
21 वाइटाने जिंकले जाऊ नका तर चांगल्याने वाइटास जिंका.
Obey Your Government Rulers
13 प्रत्येकाने वरिष्ठ अधिकान्याच्या अधीन असावे, कारण देवाने नेमल्यावाचून अधिकार स्थापित होत नाही व जे आहोत ते देवाने नेमलेले आहेत. 2 परिणामी, जो अधिकाऱ्याला विरोध करतो, तो स्वतःला जे देवाने आज्ञापिले आहे त्याला विरोध करतो व जे देवाच्या आज्ञेस विरोध करतात ते स्वतःवर न्याय ओढवून घेतील. 3 अधिकारी चांगल्या कृत्यांसाठी नाही तर वाईट कृत्यांसाठी धाक असतात. तुला अधिकाऱ्याची भीति वाटू नये काय? चांगले ते कर म्हणजे तुझी प्रशंसा होईल.
4 होय, तो तुझे चांगले करणारा देवाचा सेवक आहे, परंतु वाईट करशील तर त्याची भीति बाळग, कारण तो तलवार व्यर्थ बाळगीत नाही. त्याचे वाईट करणाऱ्याचा सूड घेणारा तो देवाचा सेवक आहे. 5 यासाठी देवाचा राग जो केवळ शिक्षेद्वारे प्रगट होतो त्याच्यामुळे नव्हे, तर तुझ्या सद्विवेकबुध्दीने अधीन राहणे आवश्यक आहे.
6 आणि त्यामुळेच तुम्ही कर देता. कारण ते देवाचे अधिकारी आहेत. व हेच काम ते करतात. 7 तू ज्यांचा ऋणी आहेस त्यांचे देणे देऊन टाक. ज्यांना कर द्यावयाचा त्यांना कर दे. ज्यांना जकात द्यावयाची त्यांना जकात दे. ज्यांचा धाक धरायचा त्यांचा धाक धर. ज्याला मान द्यायचा त्याला मान दे.
लोकांवर प्रीति करणे हाच एक नियम
8 एकमेकांवर प्रीति करण्याशिवाय कोणाच्याही ऋणात राहू नका. कारण जो इतरांवर प्रीति करतो, त्याने नियमशास्त्र पाळले आहे. 9 “व्यभिचार करु नको, खून करु नको, चोरी करु नको, वाईटाचा लोभ धरु नको” [r] या आज्ञांमुळे मी असे म्हणतो आणि आणखी एखादी आज्ञा असेल तर ती आज्ञा “जशी आपणांवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीति कर” [s] या शब्दात सामावलेली आहे. 10 प्रीति शेजाऱ्याचे वाईट करीत नाही, म्हणून प्रीति नियमशास्त्राची पूर्णता आहे.
11 आणि तुम्ही हे करा कारण तुम्हांस ठाऊक आहे की, आपण ज्या काळात राहतो त्यातून तुम्ही उठावे अशी वेळ आली आहे, कारण जेव्हा आम्ही विश्वास ठेवला त्यापेक्षाही आमचे तारण अधिक जवळ आले आहे. 12 रात्र जवळ जवळ संपत आली आहे आणि “दिवस” जवळ आला आहे. म्हणून आपण अंधाराची कामे बाजूला टाकूया आणि प्रकाशाची शस्त्रसामुग्री धारण करु. 13 दिवसा आपण जसे काळजीपूर्वक वागतो, तसे वागूया. खादाडपणात, मद्यपानात, लैगिकतेत, स्वैरपणात, भांडणात, द्वेषात नको, 14 तर त्याऐवजी येशू ख्रिस्ताला परिधान करा. आणि आपल्या पापी वासना मध्ये गुंतून राहू नका.
इतर लोकांवर टीका करु नका
14 जो विश्वासात दुर्बल आहे त्याचा स्वीकार करा. पण मतभेदावरुन भांडणाच्या हेतूने नव्हे. 2 एखाद्याचा विश्वास असा असतो की, तो सर्व गोष्टी खाऊ शकतो, परंतु दुर्बल मनुष्य भाजीच खातो. 3 जो कोणत्याही प्रकारचे अन्र खातो त्याने जो काही विशिष्ट गोष्टी खात नाही, त्याला तुच्छ मानू नये. आणि जो काही विशिष्ट गोष्टी खातो त्याने त्याला दोष देऊ नये कारण देवाने त्याचा स्वीकार केला आहे. 4 दुसऱ्याच्या नोकराला दोष लावणारा तू कोण आहेस? त्याच्या मालकाच्या दृष्टीने तो स्थिर राहील किंवा त्याचे पतन झाले असताही स्थिर राहील. कारण त्याला स्थिर करण्यास मालक समर्थ आहे.
5 एखादा मनुष्य एक दिवस दुसऱ्या दिवसापेक्षा अधिक मानतो परंतु दुसरा मनुष्य प्रत्येक दिवस सारखाच मानतो. प्रत्येकाने आपल्या मनाची पूर्ण खात्री करुन घ्यावी. 6 जो विशेष दिवस पाळतो तो प्रभूचा मान राखण्यासाठी पाळतो आणि जो कोणत्याही प्रकारचे अन्र खातो तो प्रभूचा मान राखण्यासाठी खातो. विशिष्ट प्रकारचे अन्र खात नाही तो प्रभूचा मान ठेवण्यासाठी खात नाही. तो सुद्धा देवाचे आभार मानतो.
7 कारण कोणीही स्वतःसाठी जगत नाही, किंवा मरत नाही, जर आपण जगतो तर प्रभुचे लोक म्हणून जगतो आणि मरतो तर प्रभूचे लोक म्हणून मरतो. 8 म्हणून जर आपण जगतो किंवा मरतो तर आपण प्रभूचे आहोत. 9 ख्रिस्त मेला आणि जिवंत झाला यासाठी की त्याने जे आता मेलेले आहेत आणि जे अजूनही जिवंत आहेत त्या दोघांचा प्रभु व्हावे.
10 तेव्हा तू आपल्या बलवान भावाला दोष का लावतो? किंवा जो अशक्त आहे त्या भावाला तुच्छ का मानतोस? कारण आपण सर्व जण देवाच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत. 11 असे लिहिले आहे की,
“प्रभु म्हणतो खात्रीने मी जिंवत आहे
‘प्रत्येक गुडघा माझ्यासमोर टेकला जाईल
आणि प्रत्येक जीभ देवाचे उपकार मानील.’” (Z)
12 म्हणून प्रत्येक जण आपापल्यासंबंधी देवाला हिशेब देईल.
इतरांना पाप करु देऊ नका
13 म्हणून आपण एकमेकांचा न्याय करण्याचे थांबवू या. तुम्ही असा निश्चय करावा की, तुम्ही आपल्या भावाच्या मार्गात पाप करण्यासाठी मोह किंवा अडखळण ठेवणार नाही. 14 मला माहीत आहे आणि मी जो प्रभु येशूमध्ये आहे त्या माझी खात्री झाली आहे की, जो पदार्थ खाण्यास अशुद्ध आहे असे समजतो त्याशिवाय कोणताही पदार्थ मूळचा अशुद्ध नाही. त्याच्यासाठी ते अशुद्ध आहे.
15 जर खाण्यामुळे तुझा भाऊ दु:खी झाला आहे तर तू प्रीतीने वागत नाहीस. ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला त्याचा तुझ्या अन्राने नाश करु नकोस. 16 म्हणून तुम्हांसाठी जे चांगले आहे त्याची निंदा होऊ नये. 17 खाणे पिणे यात देवाचे राज्या नाही. परंतु नीतिमत्व, शांति आणि आनंद, जो पवित्र आत्म्यात आहे त्यामध्ये आहे. 18 जो कोणी अशा प्रकारे जगून ख्रिस्ताची सेवा करतो तो देवाला आनंद देणारा आणि सर्व लोकांनी पसंत केलेला असा आहे.
19 तर मग आपण शांतीला आणि एकमेकांच्या वाढीला मदत करणाऱ्या गोष्टींच्या मागे लागावे. 20 तुम्ही खाता त्या अन्रामुळे देवाच्या कार्याचा नाश करु नका. सर्व गोष्टी शुद्ध आहेत. असंतोषाने खाणे मनुष्यासाठी चुकीचे आहे. 21 मांस न खाणे, द्राक्षारस न पिणे, तुझा भाऊ न अडखळेल असे करणे चांगले आहे.
22 तुझा जो विश्वास आहे तो देवासमोर तुझ्या ठायी असू दे. ज्याला योग्य आहे असे वाटते व त्यामुळे जो स्वतःचा द्वेष करीत नाही तो धन्य. 23 जर तो पुढे जाऊन आपण हे टाळावे असा विश्वास ठेवूनखातो तो देवासमोर दोषी ठरतो. कारण त्याची कृति विश्वासावर आधारित नाही, ते पाप आहे.
2006 by World Bible Translation Center