Book of Common Prayer
97 परमेश्वर राज्य करतो आणि पृथ्वी आनंदित होते.
दूरदूरचे प्रदेश आनंदित होतात.
2 परमेश्वराच्या भोवती दाट काळे ढग आहेत.
चांगुलपणा आणि न्याय त्याच्या राज्याला मजबुती आणतात.
3 अग्नी परमेश्वराच्या पुढे जातो
आणि शत्रूंचा नाश करतो.
4 त्याची वीज आकाशात चमकते.
लोक ती बघतात आणि घाबरतात.
5 परमेश्वरा समोर पर्वत मेणासारखे वितळतात.
ते पृथ्वीच्या मालकासमोर वितळतात.
6 आकाशांनो, त्याच्या चांगुलपणा विषयी सांगा
प्रत्येक माणसाला देवाचे वैभव बघू द्या.
7 लोक त्यांच्या मूर्तीची पूजा करतात.
ते त्यांच्या “देवाला” नावजतात.
परंतु त्या लोकांना लाज वाटेल.
त्यांचे “देव” परमेश्वरापुढे झुकतील आणि त्याची प्रार्थना करतील.
8 सियोन ऐक आणि आनंदी हो यहुदाच्या शहरांनो, आनंदी व्हा का?
कारण परमेश्वर योग्य निर्णय घेतो.
9 परात्पर परमेश्वरा, तू खरोखरच पृथ्वीचा राजा आहेस.
तू इतर “देवापेक्षा” खूपच चांगला आहेस.
10 जे लोक परमेश्वरावर प्रेम करतात त्यांना वाईट गोष्टी आवडत नाहीत म्हणून देव त्याच्या लोकांना वाचवतो.
देव त्याच्या भक्तांना दुष्टांपासून वाचवतो.
11 चांगल्या लोकांवर प्रकाश
आणि सुख चमकते.
12 चांगल्या माणसांनो, परमेश्वरात आनंदी व्हा.
त्याच्या पवित्र नावाला मान द्या.
99 परमेश्वर राजा आहे
म्हणून राष्ट्रांना भीतीने थरथरु द्या.
देव करुबांच्यावर राजा म्हणून बसतो
म्हणून जगाला भीतीने थरथरु द्या.
2 सियोन मधला परमेश्वर महान आहे.
तो सर्व लोकांवरचा महान नेता आहे.
3 सर्व लोकांना तुझ्या नावाचा जयजयकार करु दे.
देवाचे नाव भीतीदायक आहे.
देव पवित्र आहे.
4 बलवान राजाला न्यायीपणा आवडतो.
देवा, तू चांगुलपणा निर्माण केलास तू चांगुलपणा आणि
प्रमाणिकपणा याकोबमध्ये (इस्राएलमध्ये) आणलास.
5 परमेश्वर, आपला देव त्याची स्तुती करा आणि
त्याच्या पवित्र पादासनाजवळ त्याची उपासना करा.
6 मोशे आणि अहरोन हे त्याचे याजक होते
आणि शमुवेल त्याचे नाव घेणाऱ्यांपैकी एक होता.
त्यांनी परमेश्वराची प्रार्थना केली
आणि त्याने त्यांना उत्तर दिले.
7 देव उंच ढगांतून बोलला.
त्यांनी त्याच्या आज्ञा पाळल्या
आणि देवाने त्यांना नियम दिले.
8 परमेश्वरा, देवा, तू त्यांच्या प्रार्थनेला उत्तर दिलेस,
तू त्यांना दाखवलेस की तू क्षमाशील देव आहेस
आणि तू वाईट गोष्टी केल्याबद्दल लोकांना शिक्षा करतोस.
9 त्याच्या पवित्र पर्वतासमोर वाका आणि त्याची प्रार्थना करा.
परमेश्वर, आपला देव खरोखरच पवित्र आहे.
115 परमेश्वरा, आम्हाला कुठलाही सन्मान मिळायला नको.
सन्मान तुझा आहे, तुझ्या प्रेमामुळे आणि
आमच्या तुझ्यावर असलेल्या विश्वासामुळे सन्मान तुझा आहे.
2 आमचा देव कुठे आहे,
याचा राष्ट्रांना का विचार पडावा?
3 देव स्वर्गात आहे
आणि त्याला हवे ते तो करतो.
4 त्या देशांचे “देव” सोन्या चांदीचे नुसते पुतळे आहेत.
कुणीतरी केलेले ते नुसते पुतळे आहेत.
5 त्या पुतळ्यांना तोंड आहे पण बोलता येत नाही.
त्यांना डोळे आहेत पण बघता येत नाही.
6 त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही,
त्यांना नाक आहे पण वास घेता येत नाही.
7 त्यांना हात आहेत पण हाताने स्पर्श करत नाही.
त्यांना पाय आहेत पण चालता येत नाही
आणि त्यांच्या घशातून कुठलाही आवाज येत नाही.
8 ज्या लोकांनी असे पुतळे केले आणि त्यावर जे विश्वास ठेवतात
ते त्या पुतळ्यांसारखेच होतात.
9 इस्राएलच्या लोकांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा.
परमेश्वरच त्यांची शक्ती आणि ढाल आहे.
10 अहरोनच्या कुटुंबा, परमेश्वरावर विश्वास ठेव.
परमेश्वरच त्यांची शक्ती आणि ढाल आहे.
11 परमेश्वराच्या भक्तांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा.
परमेश्वराच त्यांची शक्ती आणि ढाल आहे.
12 परमेश्वर आमची आठवण ठेवतो.
परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देईल.
परमेश्वर इस्राएलला आशीर्वाद देईल.
परमेश्वर अहरोनच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल.
13 परमेश्वर त्याच्या लहान आणि
मोठ्या भक्तांना आशीर्वाद देईल.
14 परमेश्वर तुला आणि तुझ्या मुलांना अधिकाधिक आशीर्वाद देईल.
अशी मी आशा करतो.
15 परमेश्वरानेच स्वर्ग व पृथ्वी निर्माण केली
आणि परमेश्वर तुमचे स्वागत करतो.
16 स्वर्ग परमेश्वराचा आहे.
पण त्यांने लोकांना पृथ्वी दिली.
17 मृत लोक परमेश्वराची स्तुती करीत नाहीत.
जे लोक खाली थडग्यात आहेत ते परमेश्वराची स्तुती करीत नाहीत.
18 पण आता आम्ही परमेश्वराला धन्यवाद देतो
आणि आम्ही त्याला सदैव धन्य मानू.
परमेश्वराची स्तुती करा.
परमेश्वर रक्षणकर्ता आहे
7 म्हणून मी मदतीसाठी परमेश्वराकडे पाहतो.
परमेश्वराने माझे रक्षण करावे म्हणून मी वाट पाहतो.
माझा परमेश्वर माझे ऐकेल.
8 मी पडलो आहे.
पण शत्रूंनो, मला हसू नका.
मी पुन्हा उठेन आता मी अंधारात बसतोय
पण परमेश्वरच माझा प्रकाश होईल.
परमेश्वर क्षमा करतो
9 मी परमेश्वराविरुध्द पाप केले.
म्हणून तो माझ्यावर रागावला.
पण न्यायालयात तो माझ्यासाठी माझ्या दाव्यात वाद घालेल.
माझ्यासाठी योग्य गोष्टी तो करील.
मग तो मला बाहेर उजेडात आणील.
मग मला त्याचे बरोबर आहे हे कळेल.
10 माझा शत्रू मला म्हणाला:
“तुझा देव परमेश्वर कोठे आहे?”
पण माझा शत्रू ही पाहील आणि तो लज्जित होईल.
त्यावेळी मी तिला हसेन. [a]
रस्त्यातील चिखलावरुन चालावे.
तसे लोक त्याला तुडवीत चालतील.
यहूद्यांचे परत येणे
11 तुमचे तट परत बांधण्याची वेळ येईल.
त्या वेळेला, देशाचा विस्तार होईल.
12 तुमचे लोक तुमच्या देशात परत येतील.
ते अश्शूर आणि मिसरमधील गावे येथून परततील.
ते मिसरमधून व फरात नदीच्या
पैलतीरावरुन येतील.
पश्चिमेकडच्या समुद्राकडून
आणि पूर्वेच्या पर्वतांतून ते येतील.
13 देशात राहणाऱ्या लोकांमुळे
व त्यांच्या कृत्यांमुळे देशाचा नाश झाला आहे.
14 म्हणून तुझ्या दंडाने लोकांवर राज्य कर.
तुझ्या मालकीच्या लोकांच्या समुदायावर राज्य कर.
तो लोकांचा समुदाय एकटाच रानात
आणि कर्मेल पर्वतावर राहतो.
पूर्वीप्रमाणेच तो बाशान
व गिलाद यांच्यामध्ये रातो.
इस्राएल त्याच्या शत्रूचा पाडाव करील
15 तुम्हाला मिसरमधून बाहेर आणताना मी खूप चमत्कार केले.
त्यांच्यासारखे आणखी चमत्कार मी तुम्हाला दाखवीन.
पेत्र एका लंगड्या मनुष्याला बरे करतो
3 एके दिवशी पेत्र व योहान मंदिराकडे जात होते. त्यावेळी दुपारचे तीन वाजले होते. मंदिरातील प्रार्थनेची ती नेहमीची वेळ होती. 2 जेव्हा ते मंदिरात जाऊ लागले, तेव्हा त्या ठिकाणी एक मनुष्य होता. हा मनुष्य जन्मापासूनचा लंगडा होता. त्याला चालता येत नव्हते. म्हणून काहीं मित्र त्याला उचलून घेऊन आले. दररोज त्याचे मित्र त्याला मंदिराकडे आणीत असत. ते त्या लंगड्या माणसाला मंदिराच्या एका दरवाजाजवळ ठेवीत असत. या दरवाजाचे नाव सुंदर दरवाजा असे होते. तेथे तो मनुष्य मंदिरात येणाऱ्या लोकांकडे भीक मागत असे. 3 त्या दिवशी त्या लंगड्या मनुष्याने पेत्र व योहानाला मंदिरात जाताना पाहिले. त्याने त्यांच्याकडे पैसे मागितले.
4 पेत्र व योहान यांनी त्या माणसाकडे पाहिले व म्हटले. “आमच्याकडे पाहा!” 5 त्या मनुष्याने त्यांच्याकडे पाहिले; त्याला वाटले ते त्याला काही पैसे देतील. 6 परंतु पेत्र म्हणाला, “माझ्याकडे सोने किंवा चांदी काही नाही, परंतु माझ्याकडे दुसरे काही तरी आहे, ते मी तुला देतो: नासरेथच्या येशू ख्रिस्ताच्या नावाने ऊठ आणि चालू लाग!”
7 मग पेत्राने त्या माणासाचा उजवा हात धरला व त्याला उठविले. आणि ताबडतोब त्या मनुष्याच्या पायात व घोट्यात शक्ति आली. 8 तो माणूस उडी मारुन उभा राहिला व चालू लागला. तो चालत, बागडत, आणि देवाचे गुणगान करीत त्यांच्याबरोबर मंदिरात गेला. 9-10 सर्व लोकांनी त्याला ओळखले. मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजापाशी भीक मागत बसत असे तो हाच म्हणून त्यांनी त्याला ओळखले. आता त्यांनी त्याच माणसाला चालताना व देवाची स्तुति करताना पाहिले. लोक आश्चर्यचकित झाले. हे कसे घडले हे त्यांना समजत नव्हते.
येशू द्राक्षवेल आहे
15 मी खरा द्राक्षवेल आणि माझा पिता माळी आहे. 2 तो माझ्यातील फळ न देणारी प्रत्येक फांदी तोडून टाकतो. ज्या प्रत्येक फांद्या फळ देतात त्यांनी अधिक फळ घावे म्हणून त्या द्राक्षवेलीला तो साफ करतो. 3 जे वचन मी तुम्हांला सांगितले, त्यामुळे तुम्ही आता स्वच्छ झालाच आहा. 4 तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हांमध्ये राहीन. जसा फाटा वेलात राहिल्यावचून त्याच्याने फळ देता येत नाही तसे माझ्यामध्ये राहिल्याशिवाय तुम्हांला फळ देता येणार नाही.
5 “मी वेल आहे, तुम्ही फाटे आहा, जो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो, तोच पुष्कळ फळ देतो. कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुमच्याने काही होत नाही. 6 कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर तो फाट्याप्रमाणे बाहेर टाकला जातो. तो वाळून जातो मग त्याला गोळा करून अग्नीत टाकतात व ते जाळण्यात येते. 7 तुम्ही माझ्यामध्ये राहिलात व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हांला पाहिजे ते तुम्ही मागा म्हणजे ते तुम्हांस मिळेल. 8 तुम्ही पुष्कळ फळ दिल्यानेच माझ्या पित्याचे गौरव होते, आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल.
9 “जशी पित्याने माझ्यावर प्रीति केली आहे तशीच मीही तुम्हांवर प्रीति केली आहे. माझ्या प्रीतीत राहा. 10 ज्याप्रमाणे मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळल्या म्हणून त्याच्या प्रीतित राहतो तसेच तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. 11 माझा आनंद तुम्हांमध्ये राहावा आणि तुमचा आनंद पूर्ण व्हावा, म्हणून मी तुम्हांला या गोष्टी सांगितल्या आहेत.
2006 by World Bible Translation Center