Añadir traducción en paralelo Imprimir Opciones de la página

अदोमबद्दल संदेश

35 मला परमेश्वराचे शब्द ऐकू आले तो म्हणाला, “मानवपुत्रा, सोईर पर्वताकडे पाहा, आणि माझ्यावतीने त्याच्याविरुद्ध बोल. त्याला सांग ‘परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो:

“‘सेईर पर्वता, मी तुझ्याविरुद्ध आहे.
    मी तुला शिक्षा करीन. मी तुला उजाड करीन.
तुझ्या गावांचा मी नाश करीन.
    तू ओसाड होशील.
मग तुला कळून चुकेल की मी परमेश्वर आहे.
का? कारण तू नेहमीच माझ्या
    माणसांच्या विरुद्ध होतास.
इस्राएलच्या अखेरच्या शिक्षेच्या वेळी,
    त्यांच्या संकटकाळी,
    तू त्यांच्यावर तलवार चालविलीस.’”

म्हणून, परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “ती शपथपूर्वक प्रतिज्ञा करतो की मी तुला मृत्युदंड देईन. मृत्यू तुझा पाठलाग करील. लोकांना ठार करण्यात तुला घृणा वाटली नाही. म्हणून मृत्यू तुझा पाठलाग करील. सेईर पर्वताला ओसाड, उजाड करीन. त्या गावातून येणाऱ्या प्रत्येकाला मी ठार करीन. तसेच त्या गावात जाऊ पाहणाऱ्यालाही मी ठार मारीन. त्याचे डोंगर मी मृत शरींरांनी झाकून टाकीन. टेकड्यांवर, दऱ्यांतून, आणि घळींतून प्रेते पडतील. मी तुला कायमचा ओसाड करीन. तुझ्या शहरांतून कोणीही राहाणार नाही. मग तुला पटेल की मीच परमेश्वर आहे.”

10 तू म्हणालास “ती दोन राष्ट्रे (इस्राएल व यहूदा) माझी होतील आम्ही त्यांना आमच्या मालकीची करु.”

पण परमेश्वर तिथे होता. 11 आणि तो परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “तू माझ्या माणसांचा द्वेष केलास. त्यांच्यावर रागावलास, म्हणून मी तुझा तिरस्कार करतो. मी शपथपूर्वक वचन देतो की तू जसे त्यांना दुखावलेस, तशीच शिक्षा मी तुला करीन. मी तुला शिक्षा करुन लोकांना दाखवून देईन की मी त्यांच्या पाठीशी आहे. 12 मग तुलासुद्धा कळेल की मी तू त्यांना उच्चारलेले सर्व अपमानकारक शब्द ऐकले होते.

“इस्राएलच्या पर्वताबद्दल तू खूप वाईट बोललास. तू म्हणालास ‘इस्राएलचा नाश झाला आहे. मी त्याला भक्ष्याप्रमाणे चोखीन.’ 13 तुला गर्व झाला होता आणि तू माझ्याविरुद्ध बोललास. तू अनेक वेळा माझ्याविरुद्ध बोललास, आणि मी खरेच सांगतो की मी प्रत्येक शब्द ऐकला.”

14 परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “मी तुझा नाश केल्यावर सर्व जगाला आनंद होईल. 15 इस्राएलचा नाश झाल्यावर तुला आनंद झाला होता. मी तुलाही अगदी तशीच वागणूक देईन. सेईर पर्वताचा व संपूर्ण अदोम देशाचा नाश होईल. मगच तुला समजेल की मी परमेश्वर आहे.”