Añadir traducción en paralelo Imprimir Opciones de la página

परमेश्वराला दयाळूपणा व करुणा पाहिजे

पारसचा राजा दारयावेश याच्या कारकिर्दींच्या चौथ्या वर्षांच्या नवव्या माहिन्याच्या (किसलेव महिन्याच्या) चौथ्या दिवशी, जखऱ्याला परमेश्वराकडून संदेश आला. बेथेलच्या लोकांनी शरेसर, रगेम्मेलेक व त्यांची माणसे यांना परमेश्वराकडे एक प्रश्न विचारायला पाठविले. ते संदेष्ट्यांकडे आणि सर्व शक्तिमान परमेश्वराच्या मंदिरातील याजकाकडे आणि सर्व शक्तिमान परमेश्वराच्या मंदिरातील याजकाकडे गेले आणि त्यांनी पुढील प्रशन विचारला: “मंदिराच्या नाशाबद्दल आम्ही गेली कित्येक वर्षे शोक प्रकट करीत आलो आहोत. प्रत्येक वर्षाच्या पाचव्या महिन्यात आम्ही शोक प्रकट करण्यासाठी आणि उपवासासाठी खास वेळ देत आलो आहोत. हे आम्ही असेच चालू ठेवायचे का?”

मला सर्व शक्तिमान परमेश्वराकडून पुढील संदेश मिळाला: “याजकांना आणि या देशातील इतर लोकांना सांग की तुम्ही 70 वर्षे प्रत्येक वर्षांच्या पाचव्या आणि सातव्या महिन्यात उपवास केलात व शोक प्रकट केलात. पण हा उपवास खरोखरीच माझ्यासाठी होता का? नाही! तुम्ही खाल्ले-प्यायले ते माझ्यासाठी होते का? नाही ते तुमच्याचसाठी होते. याच गोष्टी सांगण्यासाठी देवाने फार पूर्वीच या आधीच्या संदेष्ट्यांचा उपयोग केला होता. जेव्हा यरुशलेम ही एक भरभराट झालेली आणि लोकांनी गजबजलेली नगरी होती, तेव्हादेखील देवाने ह्याच गोष्टी सांगितल्या होत्या. यरुशलेमच्या भोवतालच्या गावात, नेगेवला व पश्चिमेकडील डोंगरपायथ्याशी जेव्हा लोकवस्ती होती, तेव्हादेखील देवाने हीच वचने सांगितली हीती.”

परमेश्वराचा जखऱ्याला पुढीलप्रमाणे संदेश आहे:
“सर्व शक्तिमान परमेश्वर असे म्हणतो की,
‘जे योग्य व न्याय्य आहे तेच तुम्ही करा.
    एकमेकांवर दया करा.
    एकमेकांना करुणा दाखवा.
10 विधवा, अनाथ,
    परके व गरीब यांना दुखवू नका.
एकमेकांचे वाईट करण्याचे मनातसुध्दा आणू नका.’”

11 पण त्या लोकांनी ऐकण्याचे नाकारले.
    देवाला पाहिजे ते करण्यास नकार दिला.
देवाची वाणी ऐकू येऊ नये म्हणून
    त्यांनी आपले कान झाकून घेतले.
12 ते अतिशय दुराग्रही बनले.
    ते नियम पाळीनान.
सर्व शक्तिमान परमेश्वराने आपल्या आत्म्याचा उपयोग करुन
    संदेष्ट्यांमार्फत त्याच्या लोकांना संदेश पाठविले.
पण लोक ऐकेनात.
    तेव्हा सर्व शक्तिमान परमेश्वर कोपला.
13 मग तो म्हणाला,
“मी त्यांना आवाहन केले
    पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
आता, त्यांनी माझा धावा केल्यास,
    मी ओ देणार नाही.
14 एखाद्या झंझावाताप्रमाणे मी इतर राष्ट्रांना त्यांच्याविरुध्द उठवीन.
    ज्या राष्ट्रांची त्यांना माहिती नव्हती,
अशी राष्ट्रे देशावर आक्रमण करुन
    त्यांचा नाश करतील
आणि हे प्रसन्न राष्ट्र नाश पावेल.”