Añadir traducción en paralelo Imprimir Opciones de la página

त्यावेळी हाग्गय आणि इद्दोचा मुलगा जखऱ्या हे संदेष्टे देवाच्या वतीने संदेश सांगू लागले. यहूदा व यरुशलेममधील यहूद्यांना त्यांनी उत्तेजन दिले. तेव्हा शल्तीएलचा मुलगा जरुब्बाबेल आणि योसादाकचा मुलगा येशूवा यांनी यरुशलेममधील मंदिराच्या कामाला सुरुवात केली, देवाच्या सर्व संदेष्ट्यांनी त्यांना याबाबतीत सहाय्य केले. त्यावेळी ततनइ हा फरात नदीच्या पश्र्चिमेकडील प्रदेशाचा अधिकारी होता. तो, शथर-बोजनइ आणि त्यांचे सोबती जरुब्बाबेल, येशूवा आणि इतर जे बांधकाम करत होते त्यांच्याकडे गेले. त्यांना ततनइ व त्याच्याबरोबरच्या लोकांनी विचारले, “तुम्हाला हे मंदिर पुन्हा बांधायला परवानगी कोणी दिली? हे बांधकाम करणाऱ्या माणसांची नावे काय?”

तरी पण यहूदी नेत्यांवर देवाची कृपादृष्टी होती. त्यामुळे राजा दारयावेशला ही खबर लेखी कळवून त्याचे उत्तर येईपर्यंत त्यांना मंदिराचे काम थांबवता आले नाही आणि बांधकाम चालूच राहिले.

फरात नदीच्या पश्र्चिमेकडील प्रदेशाचा अधिकारी ततनइ, शथर-बोजनइ आणि त्यांच्याबरोबरचे मान्यवर लोक यांनी राजा दारयावेशला जे पत्र पाठवले त्याची ही प्रत. त्यात असे लिहिले होते:

राजा दारयावेशचे कुशल असो.

हे राजा, आम्ही यहूदाप्रांतात गेल्याचे तुम्हाला माहीत आहे. आम्ही महान परमेश्वराच्या मंदिराकडे गेलो. यहुदातील लोक मोठे दगड वापरुन हे मंदिर नव्याने बांधित आहेत. भिंतीत लांबरुंद लाकडे घालत आहेत. यहुदी लोक हे काम मोठया झपाट्याने आणि मेहनत घेऊन करत आहेत. ते झटून काम करीत असल्यामुळे लवकरच बांधकाम पुरे होईल.

या कामाच्या संदर्भात आम्ही तेथील वडीलधाऱ्यांकडे चौकशी केली. त्यांना विचारले, “तुम्हाला हे मंदिराचे बांधकाम करायला कोणी परवानगी दिली?” 10 आम्ही त्यांची नावेही विचारुन घेतली. त्यांचे पुढारीपण करणाऱ्यांची नावे तुम्हाला कळावीत म्हणून आम्हाला ती टिपून ठेवायची होती.

11 त्यांनी आम्हाला पुढीलप्रमाणे उत्तर दिले:

“आम्ही आकाश आणि पृथ्वीच्या देवाचे सेवक आहोत. फार पूर्वी इस्राएलच्या एका थोर राजाने बांधून पूर्ण केलेल्या मंदिराचेच आम्ही पुन्हा बांधकाम करत आहोत. 12 आमच्या पूर्वजांच्या वागणुकीने देवाचा कोप ओढवला. तेव्हा परमेश्वराने त्यांना बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या हाती दिले. नबुखद्नेस्सराने मंदिराचा विध्वंस केला आणि लोकांना जबरदस्तीने कैद करुन बाबेलला नेले. 13 कोरेश बाबेलचा राजा झाल्यावर पहिल्या वर्षातच त्याने मंदिराची पुन्हा उभारणी करण्याचा विशेष हुकूमनामा काढला. 14 तसेच, पूर्वीच्या मंदिरातून जी सोन्यारुप्याची पात्रे होती ती काढून बाबेलच्या खोट्या देवतेच्या देवळात ठेवली होती, ती कोरेशाने बाहेर काढली. नबुखद्नेस्सराने ती पूर्वी यरुशलेममधून काढून बाबेलच्या खोट्या देवतेच्या देवळात आणली होती. राजा कोरेशने ती शेशबस्सरच्या (म्हणजेच जरुब्बाबेलाच्या) स्वाधीन केली. त्याला कोरेशने अधिकारी म्हणून नेमले.”

15 नंतर कोरेश शेशबस्सरला (जरुब्बाबेलला) म्हणाला, “ही सोन्यारुप्याची पात्रे घे आणि यरुशलेममधील मंदिरात ठेव. मंदिर पूर्वी जिथे होते त्याचठिकाणी पुन्हा बांध”

16 तेव्हा शेशबस्सरने (जरुब्बाबेलने) यरुशलेममध्ये येऊन मंदिराचा पाया घातला तेव्हापासून आजतागायत ते काम चाललेले आहे पण अजून पूर्ण झालेले नाही.

17 तेव्हा आता हवे असल्यास राजाने अधिकृत कागदपत्रे नीट तपासून पाहावीत. यरुशलेममधील मंदिर पुन्हा बांधायची राजा कोरेशने खरोखरच आज्ञा दिली आहे का ते पडताळून पाहावे आणि या बाबतीत आपण काय ठरविले आहे ते राजाने आम्हाला कृपया लेखी कळवावे.