Add parallel Print Page Options
'Salmenes 81 ' not found for the version: En Levende Bok.

प्रमुख गायकासाठी गित्तीथ चालीवर बसवलेले आसाफये स्तोत्र.

81 आनंदी राहा आणि आमची शक्ती असलेल्या देवासमोर गाणे गा,
    इस्राएलाच्या देवासमोर आनंदाने ओरडा.
संगीताची सुरुवात करा.
    डफ वाजवा.
    सतार आणि वीणा वाजवा.
अमावस्येला एडक्याच्या शिंगाचा कर्णा वाजवा.
    पौर्णिमेला ही एडक्याच्या शिंगाचा कर्णा वाजवा.
    याचवेळी आपला सण सुरु होतो.
हा इस्राएल देशाचा नियम आहे.
    देवाने याकोबाला हीच आज्ञा केली.
जेव्हा देवाने त्याला मिसरमधून दूर नेले
    तेव्हा त्याने योसेफाबरोबर हा करार केला.
मिसरमध्येच आम्ही आम्हाला न समजणारी भाषा ऐकली.
देव म्हणतो, “मी तुमच्या खांद्यावरचे ओझे उचलले.
    तुमच्या खांद्यावरची कामगाराची टोपली तुम्हाला टाकायला लावली.
तुम्ही लोक संकटात होता.
    तुम्ही मदतीसाठी हाका मारल्या आणि मी तुमची मुक्तता केली.
मी वादळी ढगात लपलो होतो आणि मी तुम्हाला उत्तर दिले.
    मी मरीबाच्या पाण्याजवळ तुमची परीक्षा घेतली.”

“लोकहो! माझे ऐका, मी तुम्हाला माझा करार देईन
    इस्राएल कृपा करुन माझे ऐक.
परदेशी लोक ज्या चुकीच्या देवाची पूजा करतात
    त्यापैकी कुठल्याही देवाची पूजा करु नकोस.
10 मी, परमेश्वरच तुमचा देव आहे
    मी तुम्हाला मिसरच्या प्रदेशातून बाहेर आणले.
इस्राएल, तुझे तोंड उघड मग मी तुला खायला घालीन.”

11 “परंतु माझ्या लोकांनी माझे ऐकले नाही.
    इस्राएलने माझी आज्ञा पाळली नाही.
12 म्हणून मी त्यांना जे करायची इच्छा होती ते करु दिले.
    इस्राएलने सुध्दा त्याला हवे ते केले.
13 जर माझ्या लोकांनी माझे ऐकले,
    जर इस्राएल माझ्या इच्छे प्रमाणे राहिला,
14 तर मी त्यांच्या शत्रूंचा पराभव करीन.
    जे लोक इस्राएलवर संकटे आणतात त्यांना मी शिक्षा करीन.
15 परमेश्वराचे शत्रू भीतीने थरथर कापतील.
    त्यांना कायमची शिक्षा होईल.
16 देव त्याच्या माणसांना सगळ्यात चांगला गहू देईल.
    देव त्याच्या माणसांना त्यांचे समाधान होईपर्यंत मध देईल.”