यशया 31-35
Marathi Bible: Easy-to-Read Version
इस्राएलने देवाच्या सामर्थ्यावर विसंबावे
31 मदत मागण्यासाठी मिसरमध्ये जाणारे ते लोक पाहा ते घोडे मागतात. घोडे आपला बचाव करतील असे त्यांना वाटते. मिसरमधील रथ आणि घोडेस्वार आपल्याला वाचवतील असा या लोकांचा समज आहे. मिसरचे सैन्य मोठे असल्याने आपण सुरक्षित आहोत असेच त्यांना वाटते. हे लोक इस्राएलच्या पवित्र देवावर विश्वास ठेवत नाही. ते परमेश्वराची मदत मागत नाहीत. 2 पण खरा ज्ञानी परमेश्वर आहे. त्यांच्यावर संकटे आणणारा परमेश्वरच असेल. परमेश्वराची आज्ञा बदलण्याची ताकद लोकांत असणार नाही. पापी लोकांच्याविरूध्द (यहुदाच्याविरूद्द) देव उभा राहील आणि लढेल. ह्या पापी लोकांना मदत करणाऱ्या लोकांविरूध्द म्हणजे मिसरच्या लोकांविरूध्दही देव लढेल.
3 मिसरमधील लोक फक्त माणसे आहेत देव नाहीत. मिसरमधील घोडे फक्त प्राणी आहेत पण आत्मे नाहीत. परमेश्वर स्वतःचा हात लांब करील आणि मदतनीसाचा (मिसरचा) पराभव होईल. त्याची मदत घेणारे लोक (यहुदा) पडतील. त्या सर्व लोकांचा बरोबरच नाश केला जाईल.
4 परमेश्वराने मला सांगितले, “जेव्हा एखादा सिंह किंवा त्याचा छावा, खाण्यासाठी, जनावर पकडतो तेव्हा तो त्या मारलेल्या प्राण्यापाशी उभा राहून डरकाळ्या फोडतो. त्या वेळी कोणीही त्या शक्तिशाली सिंहाला घाबरवू शकत नाही. जरी माणसे आली आणि त्यांनी आरोळ्या ठोकल्या तरी तो सिंह भिणार नाही. लोकांनी कितीही कोलाहल केला तरी तो सिंह पळून जाणार नाही.”
ह्याचप्रमाणे सर्वशक्तिमान परमेश्वर खाली उतरून सियोन पर्वतावर येईल. तो तेथे लढेल. 5 पक्षी ज्याप्रमाणे घिरट्या घालून आपल्या घरट्याचे रक्षण करतात, त्याचप्रमाणे सर्वशक्तिमान परमेश्वर यरूशलेमचे रक्षण करील. परमेश्वर तिला वाचवील. परमेश्वर यरूशलेमचे “वरून जाऊन” रक्षण करील.
6 इस्राएलच्या मुलांनो, तुम्ही देवाच्याविरूध्द् गेलात. तुम्ही देवाकडे परत यावे. 7 मग, तुम्ही बनविलेल्या सोन्या चांदीच्या मूर्तींची पूजा करणे लोक बंद करतील. त्या मूर्ती तयार करून तुम्ही खरोखरच पाप केले.
8 इस्राएलच्या ईशान्येकडील एकेकाळी शक्तिशाली असलेले हे (अश्शूर) राष्ट्र तलवारीच्या बळावर पराभूत होईल. पण ही तलवार मानवाची नसेल. अश्शूरचा नाश होईल. पण हा नाश मानवाच्या तलवारीने होणार नाही. देवाच्या तलवारीमुळे अश्शूर पळून जाईल. पण त्यातील तरूणांना पकडून गुलाम केले जाईल. 9 त्याच्या संरक्षणाच्या जागा नष्ट केल्या जातील. त्यांचे नेते पराभूत होतील आणि ते त्यांचा ध्वज सोडून देतील म्हणजेच त्यांची सत्ता नाहीशी होईल. परमेश्वराने या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत.
परमेश्वराची शेकोटी (वेदी) सियोनवर आहे. परमेश्वराची भट्टी (वेदी) यरूशलेममध्ये आहे.
नेत्यांनी सज्जन आणि प्रामाणिक असावे
32 मी सांगतो ते ऐका सगळीकडे चांगुलपणा नांदावा अशा तऱ्हेने राजाने राज्य करावे. नेत्यांनी लोकांना मार्गदर्शन करताना न्याय निर्णय घ्यावेत. 2 असे जर झाले तर वारा व पाऊस ह्यापासून बचाव करण्यासाठी जसा अडोसा असतो तसा राजा निवाऱ्याची जागा होईल. वाळवंटातील झऱ्याप्रमाणे अथवा उष्ण प्रदेशातील मोठ्या खडकाखालील सावलीसारखा लोकांना तो वाटेल. 3 लोक मदतीसाठी त्याच्याकडे धाव घेतील व त्याचे म्हणणे ते खरोखरच ऐकतील. 4 आता जे लोक गोंधळलेले आहेत त्यांना त्या वेळी सर्व समजून येईल. आता स्पष्ट बोलू न शकणारे लोक त्या वेळी स्पष्टपणे व लवकर बोलतील. 5 दुष्ट आणि अनीतीमान लोकांना कोणी थोर म्हणणार नाही. जे लोक गुप्त योजना करतात त्यांना लोक मान देणार नाहीत.
6 मूर्ख माणूस मूर्खपणाच्या गोष्टी सांगतो आणि मनात वाईट गोष्टींचे बेत आखतो. त्याला चुकीच्याच गोष्टी करायच्या असतात. तो परमेश्वराबद्दल वाईटसाईट बोलतो. तो भुकेलेल्यांना अन्न खाऊ देत नाही. तहानेलेल्यांना पाणी पिऊ देत नाही. 7 तो मूर्ख दुष्टपणाचा उपयोग हत्यारासारखा करतो. गरीबांना लुबाडण्याच्या योजना तो करतो. तो गरीबांबद्दल खोटेनाटे सांगतो आणि ह्यामुळे गरीब न्यायापासून वंचित होतात.
8 परंतु भला नेता चांगल्या गोष्टींच्या योजना आखतो आणि ह्या चांगल्या गोष्टीच त्याला भला नेता बनवितात.
कठीण काळ येत आहे
9 तुम्ही काही स्त्रिया आता शांत आहात. तुम्हाला आता सुरक्षित वाटते आहे. पण तुम्ही जरा उभे राहून माझे म्हणणे ऐकावे. 10 आता तुम्हाला सुरक्षित वाटते पण आणखी एक वर्षाने तुम्ही अडचणीत याल. का? कारण तुम्ही पुढच्या वर्षी द्राक्षे गोळा करू शकणार नाही. पुढच्या वर्षी द्राक्षाचे पीक येणार नाही.
11 स्त्रियांनो, आता तुम्ही शांत आहात पण तुम्हाला भिती वाटली पाहिजे. आता तुम्हाला सुरक्षित वाटते, पण तुम्ही चिंता केली पाहिजे. तुमची चांगली वस्त्रे काढा आणि शोकप्रदर्शक कपडे घाला. ते कपडे तुमच्या कमरेभोवती गुंडाळा. 12 दु:खाने भरलेल्या छातीवर शोकप्रदर्शक कपडे चढवा. रडा! कारण तुमची शेते उजाड झाली आहेत. तुम्हाला द्राक्षे देणारे तुमचे द्राक्षमळे ओस पडले आहेत. 13 माझ्या लोकांच्या भूमीसाठी शोक करा. कारण तेथे फक्त काटेकुटे आणि तण माजतील. एकेकाळी आनंदाने भरलेल्या शहरासाठी व हर्षभरित घरांसाठी आता शोक करा.
14 लोक राजधानी सोडून जातील. राजवाडा व बुरूज रिकामी पडतील. लोक घरांत न राहता गुहेत राहतील. रानगाढवे व मेंढ्या शहरात राहतील. जनावरे गवत खाण्यास तेथे जातील.
15-16 देव वरून त्याचा आत्मा आम्हांला देईपर्यंत असेच घडत राहील. आता या भूमीवर चांगुलपणा राहिला नाही. ही भूमी जणू वाळवंट झाली आहे. पण भविष्यात, ते वाळवंट कर्मेल प्रमाणे होईल. तेथे योग्य न्याय नांदेल आणि कर्मेल हिरव्यागार रानासारखे होईल. चांगुलपणा तेथे वस्ती करील. 17 तो चांगलुपणा कायमची शांती आणि सुरक्षितता आणील. 18 माझे लोक शांतीच्या सुंदर मळ्यात राहतील. माझी माणसे सुरक्षिततेच्या तंबूत राहतील. ते निवांत आणि शांत जागी राहतील.
19 पण ह्या गोष्टी घडण्यापूर्वी जंगल उजाड झालेच पाहिजे, शहराचा पाडाव झाला पाहिजे. 20 तुम्ही काहीजण प्रत्येक झऱ्याकाठी बी पेरा. तुमच्या गुरांना आणि गाढवांना मोकळे सोडा. व तेथे चरू द्या. तुम्ही लोक खूप सुखी व्हाल.
पाप फक्त आणखी पापाला जन्म देते
33 पाहा! तुम्ही युध्द् करता आणि दुसऱ्यांच्या वस्तू चोरता. पण त्यांनी तुमचे काहीही चोरले नाही. तुम्ही दुसऱ्यांविरूध्द् उठता पण त्यांनी तुमच्याविरूध्द् कधीच उठाव केला नाही. म्हणून जेव्हा तुम्ही चोरी करायचे थांबवाल तेव्हा ते तुमच्या वस्तू चोरतील. तुम्ही लोकांविरूध्द् उठाव करायचे सोडाल तेव्हा ते तुमच्याविरूध्द् उठाव करतील. मग तुम्ही म्हणाल:
2 परमेश्वरा, आमच्यावर दया कर.
आम्ही तुझ्या मदतीची वाट पाहिली.
परमेश्वरा, रोज आम्हाला शक्ती दे.
संकटकाळी आमचे रक्षण कर.
3 तुझा प्रचंड आवाज लोकांना घाबरवितो.
आणि ते तुझ्यापासून दूर पळतात.
तुझी महानता राष्ट्रांना पळून जाण्यास भाग पाडते.
4 तुम्ही लोकांनी युध्दात वस्तू चोरल्या. त्या तुमच्याकडून परत घेतल्या जातील. खूप लोक येतील आणि तुमची संपत्ती लुटतील. टोळधाड ज्याप्रमाणे सर्व पीक फस्त करते तसे हे होईल.
5 परमेश्वर महान आहे. तो उच्च स्थानी राहातो. परमेश्वर सियोनमध्ये प्रामाणिकपणा व चांगुलपणा भरतो.
6 यरूशलेमा तू श्रीमंत आहेस. देवाच्या शहाणपणात व ज्ञानात तू श्रीमंत आहेत. तू तारणात श्रीमंत आहेस. तू परमेश्वराचा आदर करतो व तेच तुला श्रीमंत करते. म्हणून लक्षात असू दे की तू सतत राहाशील.
7 पण ऐक! बाहेर देवदूत रडत आहेत. शांती आणणारे दूत फार जोराने रडत आहेत. 8 रस्ते नष्ट केले गेले आहेत. रस्त्यावर कोणीही नाही. लोकांनी केलेले करार मोडले आहेत. साक्षीदारांच्या पुराव्यावर विश्वास ठेवायला लोक तयार नाहीत. कोणी कोणाला मान देत नाही. 9 भूमी शोक करीत मरणपंथाला लागली आहे. लबानोन मरत आहे आणि शारोन दरी कोरडी व ओसाड झाली आहे. बाशान व कर्मेल यामध्ये एकेकाळी सुंदर झाडे होती. पण आता त्या झाडांची वाढ खुंटली आहे.
10 परमेश्वर म्हणतो, “आता मी उठून माझी महानता दाखवीन. आता मी लोकांना माझे महत्व पटवीन. 11 तुम्ही लोकांनी निरर्थक गोष्टी केल्यात. त्या गोष्टी वाळलेल्या गवताप्रमाणे वा पेंढ्यातील काडीप्रमाणे आहेत. त्यांची किंमत शून्य आहे. तुमचा आत्मा [a] अग्नीप्रमाणे आहे. तो तुम्हाला जाळील. 12 लोकांची हाडे चुन्याप्रमाणे [b] होईपर्यंत म्हणजेच हाडांचा भुगा होईपर्यंत लोक जाळले जातील. काटे आणि वाळलेली झुडुपे ह्यांच्याप्रमाणे चटकन ते जळतील.
13 “दूर देशांत राहणाऱ्या लोकांनो, मी काय केले ते ऐका. माझ्याजवळ राहणाऱ्या, लोकांनो, माझे सामर्थ्य जाणा.”
14 सियोनमधील पापी घाबरले आहेत. दुष्कृत्ये केलेले भीतीने कांपत आहेत. ते म्हणतात, “ह्या नाश करणाऱ्या अग्नीपासून आपल्याला कोणी वाचवू शकेल का? निरंतर जळणाऱ्या ह्या अग्नीजवळ [c] कोणी राहू शकेल का?”
15 हो! पैशासाठी दुसऱ्यांना जे त्रास देत नाहीत असे प्रामाणिक लोक या अग्नीमधूनही वाचतील. ते लोक लाच घेत नाहीत. दुसऱ्याची हत्या करण्याच्या बेताला ते नकार देतात. दुष्कृत्यांच्या योजनांकडे ते पाहण्याचे टाळतात. 16 ते लोक उच्च स्थानावर सुरक्षित राहतील. उंच पर्वतांवरील दुर्ग त्यांचे रक्षण करतील. त्यांना नेहमीच अन्न व पाणी मिळेल.
17 तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी राजाला (देवाला) त्याच्या सुंदर रूपात पाहाल. तुम्ही महान भूमी पाहाल. 18-19 तुम्ही तुमच्या भूतकाळातील संकटांबद्दल विचार कराल. तुम्ही विचार कराल, “ते दुसऱ्या देशातील लोक कोठे ओहेत? ते आम्हाला न समजणारी भाषा बोलत. दुसऱ्या देशातील ते अधिकारी आणि कर गोळा करणारे कोठे आहेत? आमच्या संरक्षक बुरूजांची मोजदाद करणारे हेर कोठे आहेत? ते सर्व नाहीसे झाले.”
देव यरुशलेमचे रक्षण करील
20 आमच्या धार्मिक सणांच्या नगरीकडे सियोनकडे पाहा, विश्राम करण्याच्या सुंदर जागेकडे, यरूशलेमकडे पाहा. यरूशलेम, कधीही न हालणाऱ्या तंबूसारखी आहे. त्याच्या घट्ट रोवलेल्या मेखा कधीही उखडल्या जाणार नाहीत. त्याच्या दोऱ्या कधीही कापल्या जाणार नाहीत. 21-23 का? कारण सर्वशक्तिमान परमेश्वर तेथे आहे. त्या भूमीवर झरे व रूंद पात्रांच्या नद्या आहेत. पण तेथे शत्रूंच्या नावा अथवा जहाजे नसतील. त्या नावांवर काम करणारे तुम्ही लोक दोऱ्या सोडतात तसेच काम सोडू शकाल. तुम्ही डोलकाठी पुरेशी घट्ट करू शकणार नाही. तुम्हाला शीड उभारता येणार नाही का? कारण परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे. परमेश्वरच आमचे कायदे करतो. परमेश्वर आमचा राजा आहे. तो आमचे रक्षण करतो. म्हणून तो आम्हाला खूप संपत्ती देईल. पंगूनासुध्दा् युध्दात खूप धन मिळेल. 24 येथे राहणारा कोणीही “मी विटलो आहे” असे म्हणणार नाही. ज्यांना क्षमा केली गेली आहे असेच लोक तेथे राहतात.
देव त्याच्या शत्रूंना शिक्षा करील
34 सर्व राष्ट्रांनो, जवळ येऊन ऐका. सर्व लोकांनी कान देऊन ऐकावे. पृथ्वी व तीवर राहणाऱ्या सर्व लोकांनी ह्या गोष्टी ऐकाव्या. 2 परमेश्वर सर्व राष्ट्रांवर व त्यांच्या सैन्यांवर रागावला आहे. परमेश्वर त्या सर्वांचा नाश करील. तो त्या सर्वाना मरायला भाग पाडील. 3 त्यांची प्रेते बाहेर टाकली जातील. त्यातून दुर्गंधी येईल व त्यातील रक्त डोंगरावरून ओघळेल. 4 आकाश कागदाच्या गुंडाळीप्रमाणे गुंडाळले जाईल. द्राक्षाच्यावेलीवर ची सुकलेलीपाने वा सुकलेलीअंजिरे अंजिराच्या झाडावरून गळून पडावीत त्या प्रमाणे तारे गळून पडतील. आकाशातील सर्व तारे वितळून जातील. 5 परमेश्वर म्हणतो, “माझी आकाशातील तलवार रक्ताने माखेल तेव्हा हे सर्व घडेल.”
पाहा! परमेश्वराची तलवार अदोमला आरपार कापील. परमेश्वराने तेथील लोकांना अपराधी ठरविले आहे आणि त्यांना मेलेच पाहिजे. [d] 6 बळींच्या रक्ताने परमेश्वराची तलवार माखली आहे. मेंढ्या आणि बकरे ह्यांच्या रक्ताने भरली आहे. एडक्याच्या मूत्र पिंडाच्या चरबीचे तिला वंगण मिळाले आहे. कारण देवाने बस्रा मध्ये नाश करण्याची आणि अदोम मध्ये कत्तल करण्याची वेळ निश्चित केली आहे. 7 म्हणून मेंढे, गुरेढोरे व मस्त बैल मारले जातील. त्यांच्या रक्ताने जमीन माखेल. त्यांच्या चरबीने माती झाकली जाईल.
8 देवाने शिक्षेची वेळ ठरवली असल्याने ह्या गोष्टी घडून येतील. लोकांनी सियोनवर केलेल्या अन्यायाची भरपाई करण्याचे वर्ष परमेश्वराने निश्चित केले आहे. 9 अदोमच्या नद्या उकळत्या डांबराप्रमाणे होतील. तेथील भूमी उकळत्या गंधकाप्रमाणे होईल. 10 आग रात्रंदिवस पेटत राहील. कोणीही ती विझविणार नाही. अदोममधून निघणारा धूर कायमचा राहील. ती भूमी कायमची नाश पावेल. कोणीही, त्या भूमीतून, पुन्हा कधीही प्रवास करणार नाही. 11 पक्षी आणि लहान सहान प्राणी तिचा ताबा घेतील. घुबडे आणि डोमकावळे तेथे वस्ती करतील. त्या भूमीला “रिकामे वाळवंट” [e] असे नाव पडेल. 12 प्रतिष्ठित नागरिक आणि नेते नाहीसे होतील. त्यांना राज्य करायला काहीही शिल्लक राहणार नाही.
13 तेथल्या सुंदर घरांतून काटेकुटे आणि रानटी झुडुपे वाढतील. त्या घरांतून जंगली कुत्रे व घुबडे राहतील. जंगली प्राणी तेथे वस्ती करतील. तेथे वाढलेल्या गवतात मोठमोठे पक्षी घरटी बांधतील. 14 रानमांजरे तरसांबरोबर तेथे राहतील. रानबोकड आपल्या मित्रांना हाका मारतील. निशाचरांना विश्रांतीचे ठिकाण मिळेल. 15 साप तेथे वारूळे करतील आणि अंडी घालतील. अंडी फुटून छोटे छोटे साप त्या अंधाऱ्या जागेत वळवळतील. स्त्रिया जशा घोळक्याने आपल्या मैत्रिणींना भेटायला जातात, तशीच गिधाडे मेलेल्या प्राण्यांचे मांस खाण्यास गोळा होतील.
16 परमेश्वराच्या पाटीकडे पाहा. त्यावर लिहिलेले वाचा त्यातून काहीही सुटलेले नाही. ते प्राणी सर्व एकत्र येतील असेच त्यावर लिहिले आहे. मी त्यांना एकत्र आणीन. असे देव म्हणाला म्हणून देवाचा आत्मा त्यांना एकत्र करील. 17 त्यांचे काय करायचे ते देवाने ठरविले, नंतर देवाने त्यांच्यासाठी जागा निवडली. देवाने रेघ काढून त्यांना त्यांची जागा दाखविली. ते प्राणी ती जागा कायमची व्यापतील. वर्षांनुवर्षे ते तेथे राहतील.
देव त्याच्या लोकांचे सांत्वन करील
35 शुष्क वाळवंट सुखी होईल. वाळवंट आनंदी होईल आणि फुलासारखे फुलेल. 2 वाळवंट फुलणाऱ्या फुलांनी भरून जाईल आणि आपला आनंद दाखवेल. त्या वेळी वाळवंट जणू आनंदाने नाचत असल्याचे भासेल. लेबानोनचे बन, कर्मेलची टेकडी व शारोनची दरी ह्यांच्याप्रमाणे ते सुंदर होईल. सर्व लोकांनी परमेश्वराचे गौरव पाहिल्यामुळे हे सर्व घडेल. लोक आमच्या देवाचे लावण्य पाहतील.
3 दुर्बल हात बळकट करा. दुर्बळ पाय घट्ट करा. 4 लोक घाबरले व गोंधळले आहेत. त्यांना सांगा, “सामर्थ्यवान व्हा. भीऊ नका.” तुमचा देव येऊन तुमच्या शत्रूला शिक्षा करील. तो येईल आणि तुमच्या वर कृपा करील. परमेश्वर तुमचे रक्षण करील. 5 मग आंधळे पुन्हा डोळस होतील. त्यांचे डोळे उघडतील. बहिरे ऐकू शकतील. त्यांना श्रवणशक्ती मिळेल. 6 पंगु हरणांप्रमाणे नाचतील. मुके आनंदगीते गाऊ लागतील. वाळवंटात झरे वाहू लागतील, तेव्हा असे होईल. कोरड्या जमिनीतून झरे वाहतील. 7 आता लोक मृगजळे पाहतात. पण त्या वेळेला खऱ्या पाण्याची तळी दिसतील. कोरड्या जमिनीत विहिरी खोदलेल्या असतील. जमिनीतून पाणी वाहील. जेथे एकेकाळी जंगली जनावरे वावरले, तेथे मोठ्या पाणवनस्पती वाढतील.
8 त्या वेळेला तेथे रस्ता असेल. ह्या महामार्गाला “पवित्र मार्ग” असे नाव मिळेल. पापी लोकांना त्या रस्त्यावरून जाण्यास परवानगी नसेल. कोणीही मूर्ख त्या मार्गाकडे जाणार नाही. फक्त सज्जन माणसेच त्या मार्गावरून चालतील. 9 त्या मार्गावर कोणताही धोका असणार नाही. तेथे लोकांना मारणारे सिंह नसतील, हिंस्त्र श्वापदे नसतील. देवाने रक्षिलेले त्या मार्गावरून चालतील.
10 देव त्याच्या लोकांना मुक्त करील आणि ते लोक त्याला शरण येतील. सियोनमध्ये येताना लोक गात येतील. त्यांना कायमचा आनंद मिळेल. तो आनंद त्यांच्या डोक्यावरील मुकुटाप्रमाणे असेल. ते आनंदाने व हर्षांने भारून जातील. दु:ख आणि शोक दूर सरेल.
Footnotes
- यशया 33:11 आत्मा ह्या शब्दाचा अर्थ “देवाचे तेज,” “प्रभा,” “चैतन्य” वा “वैभव” असाही होतो.
- यशया 33:12 चुना हा पाढरा पदार्थ बांधकामाचा चुना अथवा सिमेंट तयार करण्यासाठी नेहमी वापरतात. चुना, हाडे, शिंपले किंवा चुनखडीचा दगड जाळून तयार करतात.
- यशया 33:14 निरंतर जळणारा अग्नी ह्याचा अर्थ बहुधा देव, इस्राएलचा अग्नी (प्रकाश) असावा.
- यशया 34:5 परमेश्वराने तेथील … मेलेच पाहिजे हिब्रूमध्ये ह्या वाक्याचा अर्थ असा की हे लोक पूर्णपणे देवाचे आहेत आणि ते देवाला मिळाले नाहीत तर त्यांनी मेलेच पाहिजे.
- यशया 34:11 रिकामे वाळवंट “ते ह्या शहराला शून्यतेच्या दोरीने मोजतील आणि आभावाच्या मापाने तोलतील.” उत्पत्ती किंवा प्रारंभ 1:2 मध्ये ह्या शब्दांची उजाड पृथ्वीचे वर्णन केले आहे.
2006 by Bible League International