Añadir traducción en paralelo Imprimir Opciones de la página

यहूदाचा राजा अबीया

13 इस्राएलचा राजा यराबामच्या कारकीर्दीच्या अठराव्या वर्षी अबीया यहूदाचा राजा झाला. त्याने यरुशलेममध्ये तीन वर्षे राज्य केले. मीखाया ही अबीयाची आई. गिबा नगरातील उरीएलची ती मुलगी. अबीया आणि यराबाम यांच्यामध्ये लढाई जुंपली. अबीयाच्या सैन्यात 400,000 शूर योध्दे होते. अबीयाने लढाईत त्यांचे नेतृत्व केले. यराबामकडे 800,000 सैनिक होते. यराबाम अबीयाशी युध्द करायला सज्ज झाला.

एफ्राइमच्या डोंगराळ प्रदेशातील समाराइम पर्वतावर उभे राहून अबीया म्हणाला, “यराबाम आणि समस्त इस्राएल लोकांनो, ऐका, दावीद आणि त्याची मुले यांनी इस्राएलवर सर्वकाळ राज्य करावे असा इस्राएलच्या परमेश्वर देवानेच त्यांना अधिकार दिला आहे हे ध्यानात घ्या. देवाने दावीदाशी तसा मिठाचा करारच केला आहे. [a] पण यराबामने त्याचा स्वामी जो राजा त्याच्याकडे पाठ फिरवली. यराबाम नबाटाचा मुलगा. नबाट हा दावीदाचा पुत्र शलमोनाच्या सेवकांपैकी एक. शलमोन दावीदाचा मुलगा. मग कुचकामी आणि वाईट माणसांशी यराबामशी दोस्ती झाली. यराबाम आणि ही वाईट माणसे शलमोनाचा मुलगा रहबाम याच्या विरुद्ध होती. रहबाम तरुण आणि अनुभवी होता. त्याला यराबाम आणि त्याचे अधम मित्र यांच्यावर वचक बसवता आला नाही.

“आता तुम्ही लोकांना परमेश्वराचे राज्य म्हणजे दावीदाच्या मुलांची सत्ता असलेल्या राज्याचा पराभव करण्याचा निश्चय केला आहे. तुम्ही संख्येने वरचढ आहात आणि यराबामने तुमच्यासाठी देव म्हणून बनवलेली सोन्याची वासरे तुमच्याकडे आहेत. परमेश्वराचे याजक आणि लेवी यांना तुम्ही हाकलून लावले आहे. हे याजक अहरोनचे वंशज आहेत त्यांच्या जागी तुम्ही आपले याजक नेमले आहेत. अशा गोष्टी इतर देशातले लोक करतात. कोणीही उठून एक गोऱ्हा किंवा सात एडके आणून स्वतःवर संस्कार केला की तो जे खरे परमेश्वरच नव्हेत त्यांचा याजक बनतो.

10 “पण आमच्यासाठी परमेश्वर हाच आमचा देव आहे. आम्ही त्याच्याकडे पाठ फिरवलेली नाही. त्याचा त्याग केलेला नाही. परमेश्वराची सेवा करणारे याजक अहरोनचे वंशज आहेत. लेवी त्यांना परमेश्वराच्या सेवेत मदत करतात. 11 परमेश्वराला ते होमार्पणे वाहतात, तसेच दररोज सकाळ संध्याकाळ सुवासिक धूप जाळतात. मंदिरातील मुद्दाम करवून घेतलेल्या मेजावर समर्पित भाकर मांडतात. रोज संध्याकाळी ते सोन्याच्या दीपवृक्षावरील दिवे लावतात. आम्ही आपल्या परमेश्वर देवाची काळजीपूर्वक सेवा करतो. पण तुम्ही परमेश्वराला सोडले आहे. 12 खुद्द परमेश्वर आमच्या बाजूचा आहे. तोच आमचा शास्ता असून त्याचे याजक आमच्या बाजूला आहेत. तुम्ही जागे व्हावे व परमेश्वराकडे यावे म्हणून देंवाचे याजक कर्णे वाजवत आहेत. इस्राएल लोकांनो, आपल्या पूर्वजांचा परमेश्वर ह्याच्या विरुध्द लढू नका, कारण त्यात तुम्हाला यश येणार नाही.”

13 पण यराबामने सैन्याच्या एका तुकडीला अबीयाच्या सैन्यामागे दबा धरुन राहायला सांगितले. त्यांनी अबीयाच्या सैन्याला पाठीमागून वेढा घातला. 14 यहूदातील या सैन्याने जेव्हा आपल्या भोवताली पाहिले तेव्हा यराबामच्या सैन्याने आपल्याला मागून पुढून वेढल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा यहूदा लोकांनी परमेश्वराचा धावा सुरु केला आणि याजकांनी कर्णे वाजवले. 15 मग अबीयाच्या सैन्यातील लोकांनी आरोळ्या ठोकल्या. त्याबरोबर देवाने यराबामच्या सैन्याचा पराभव केला. अबीयाच्या यहूदा सैन्याने यराबामच्या इस्राएली सैन्याचा पाडाव केला. 16 इस्राएल लोकांनी यहूदासमोरुन पळ काढला. देवाने यहूदांच्या हातून इस्राएल लोकांचा पराभव केला. 17 अबीयाने केलेल्या या दारुण पराभवात इस्राएलचे 5,00,000 योध्दे मारले गेले. 18 अशाप्रकारे त्यावेळी इस्राएल लोक हरले आणि यहूदा जिंकले. आपल्या पूर्वजांच्या परमेश्वर देवावर विसंबून राहिल्यामुळेच यहुदा सैन्याने विजय मिळवला.

19 अबीयाच्या सैन्याने यराबामच्या सैन्याचा पाठलाग केला. बेथेल, यशाना आणि एफ्रोन ही नगरे आणि त्यांच्या आसपासची खेडी एवढा प्रदेश यराबामकडून अबीयाच्या सैन्याने बळकावला.

20 अबीयाच्या हयातीत पुन्हा यराबाम डोके वर काढू शकला नाही. परमेश्वराने यराबामवर प्रहार केला आणि तो मेला. 21 अबीयाचे सामर्थ्य मात्र वाढले. त्याने चौदा बायका केल्या. त्याला बावीस मुलगे आणि सोळा मुली झाल्या. 22 इद्दो या भविष्यवाद्याच्या नोंदवह्यांमध्ये अबीयाने केलेल्या इतर सर्व गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत.

Notas al pie

  1. 2 इतिहास 13:5 परमेश्वर … केला आहे एकत्र मीठ खाणे याचा अर्थ मैत्रीचा करार आजन्म पाळणे परमेश्वराने दावीदाशी केलेला करार हा असा अटूट आहे उसे इथे अवीयाला सांगयचे आहे.