Add parallel Print Page Options

शौलाच्या कुटुंबियांवर दावीदाची मेहेरनजर

दावीदाने विचारले, “शौलाच्या घराण्यातील कोणी व्यक्ती अजून राहिली आहे का? योनाथानसाठी मला तिच्यावर दया दाखवली पाहिजे”

सीबा नावाचा एक चाकर शौलाच्या घराण्यातला होता. दावीदाच्या सेवकांनी त्याला दावीदासमोर पाचारण केले. दावीदाने त्याला विचारले, “तूच सीबा काय?”

सीबा म्हणाला, “होय, मीच तुमचा दास सीबा.”

तेव्हा राजा म्हणाला, “शौलाच्या घराण्यातील कोणी आहे काय? देवाच्या कृपेचा लाभ त्याला मिळाला पाहिजे.”

सीबा राजाला म्हणाला, “योनाथानचा मुलगाच आहे. तो दोन्ही पायांनी पांगळा झाला आहे.”

तेव्हा दावीदाने सीबाला त्याचा ठावठिकाणा विचारला.

सीबाने सांगितले, “तो लो-दबार येथे, अम्मीएलचा मुलगा माखीर याच्या घरी आहे.”

तेव्हा राजा दावीदाने योनाथानच्या मुलाला आणण्यासाठी तेथे माणसे पाठवली. योनाथानच्या मुलगा मफीबोशेथ आला आणि राजापुढे नतमस्तक होऊन उभा राहिला, “मफीबोशेथ?” राजाने विचारले.

मफीबोशेथ म्हणाला, “होय, मीच तुमचा सेवक मफीबोशेथ.”

त्याला दावीद म्हणाला, “भिऊ नको. माझा तुझ्यावर लोभ आहे. तुझ्या वडीलांसाठी मी एवढे करीन. तुझे आजोबा शौल यांची सर्व जमीन मी तुला परत देईन. माझ्या पंक्तीला नेहमी बसण्याचा मान तुला मिळेल.”

मफीबोशेथने पुन्हा दंडवत घातले. तो म्हणाला, “मेलेल्या कुत्र्या एवढीही माझी किंमत नाही. पण आपण या सेवकावर कृपादृष्टी करत आहात.”

दावीदाने मग शौलचा सेवक सीबा याला बोलवले. त्याला तो म्हणाला, “शौलाच्या मालकीचे जे जे काही आहे ते मी या तुझ्या मालकांच्या नातवाला, मफीबोशेथला दिले आहे. 10 त्याची जमीन तू कसायची. तुझी मुले आणि सेवक यांनी एवढे केले पाहिजे. तुम्ही शेतात पीक काढा म्हणजे तुझ्या मालकाच्या नातवाचा त्यावर निर्वाह होईल. पण तो नेहमी माझ्या पंक्तीला जेवेल.”

सीबाला पंधरा मुलगे आणि वीस नोकर होते. 11 सीबा दावीदाला म्हणाला, “मी तुमचा दास आहे. माझ्या धन्याच्या राजाच्या हुकुमाप्रमाणेच मी वागेन.”

तेव्हा मफीबोशेथ दावीदाच्या मुलांप्रमाणेच दावीदाच्या पंक्तीला बसून जेवू लागला. 12 मफीबोशेथला मीखा नावाचा लहान मुलगा होता. सीबाच्या परिवारातील सर्व लोक मफीबोशेथचे चाकर झाले. 13 मफीबोशेथ दोन्ही पायांनी पांगळा होता. यरुशलेम येथे त्याचे वास्तव्य होते. तो नित्य राजाच्या टेबलावर भोजन करीत असे.