A A A A A
Bible Book List

2 राजे 9 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

येहूचा अभिषेक करण्याचा अलीशाचा एका संदेष्ट्याच्या मुलाला आदेश

अलीशाने, एका तरुण संदेष्ट्याला बोलावले. अलीशा त्याला म्हणाला, “तयार हो आणि ही तेलाची कुपी बरोबर घे. रामोथ गिलाद येथे जा. तेथे पोचल्यावर निमशीचा मुलगा यहोशाफाट याचा मुलगा येहू याला शोधून काढ. मग आत जाऊन त्याला त्याच्या भावांमधून उठवून आतल्या खोलीत ने. त्यानंतर ही तेलाची कुपी घेऊन त्याच्या मस्तकावर तेल ओत. तेव्हा ‘परमेश्वर म्हणतो की इस्राएलचा राजा म्हणून मी तुला अभिषेक केला आहे,’ असे म्हण. एवढे झाले की धावत परत ये. तेथे थांबू नकोस!”

तेव्हा हा तरुण संदेष्टा रामोथ गिलाद येथे आला तेथे पोचल्यावर त्याला सैन्यातील सरदार बसलेले आढळले. त्यांना तो म्हणाला, “तुमच्यासाठी एक निरोप आहे.”

येहू म्हणाला, “आम्ही सर्वच इथे आहोत. निरोप नक्की कुणासाठी आहे?”

तेव्हा तो तरुण म्हणाला, “हे सरदारा, तुझ्याशीच; माझे काम आहे.”

यावर येहू उठून घरात आला. त्या तरुण संदेष्ट्याने त्याच्या मस्तकावर तेलाचा अभिषेक केला. येहूला तो म्हणाला, “इस्राएलचा परमेश्वर देव म्हणतो, ‘इस्राएलचा पुढचा राजा म्हणून मी तुला अभिषेक करत आहे. तुमचा राजा अहाब याच्या घराण्याचा तू संहार करावास. अशा तऱ्हेने मी माझे सेवक, संदेष्टे, परमेश्वराचे सर्व सेवक यांच्या वधाचा सूड घेऊन ईजबेलला शासन करणार आहे. म्हणजे अहाबचे घराणे नष्ट होईल. अहाबच्या घराण्यात एकही पुरुष संतान जिवंत राहणार नाही. मग ती इस्राएलमधील मुक्त व्यक्ती असो की गुलाम. नबाटचा मुलगा यराबाम तसेच अहीयाचा मुलगा बाशा यांच्या घराण्यासारखी अहाबच्या घराण्याची मी गत करुन टाकीन. 10 ईजबेलला इज्रेल भागात कुत्री खातील. तिचे दफन होणार नाही.’”

एवढे बोलून हा तरुण संदेष्टा दार उघडून पळून गेला.

येहूला राजा म्हणून सेवक घोषित करतात

11 येहू पुन्हा राजाच्या सरदारांमध्ये आला. तेव्हा त्यांच्यातला एकजण म्हणाला, “येहू, सर्व कुशल आहे ना? तो वेडा तुझ्याकडे कशाला आला होता?”

येहू त्यांना म्हणाला, “तो माणूस आणि त्याच वेडपट बोलणं तुम्हाला माहीत आहेच.”

12 तेव्हा ते सर्व म्हणाले, “नाही, नाही खर काय झाल ते सांग. काय म्हणाला तो?” तेव्हा मग तो तरुण संदेष्टा काय म्हणाला ते येहूने सरदारांना सांगितले. येहू म्हणाला, “तो मला म्हणाला, ‘इस्राएलचा राजा म्हणून परमेश्वराच्या सांगण्यावरुन मी तुला अभिषेक करत आहे.’”

13 हे ऐकून मात्र त्यांनी ताबडतोब आपले अंगरखे उतरवले, येहूच्या समोरच्या पायऱ्यांवर ते ठेवले आणि शिंग फुंकून येहू राजा झाला असल्याची घोषणा केली.

येहू इज्रेल येथे जातो

14 निमशीचा मुलगा यहोशाफाट याचा मुलगा येहू याने योरामविरुध्द कट रचला.

यावेळी, अरामचा राजा हजाएल याच्यापासून रामोथ-गिलादचे संरक्षण करण्यासाठी योराम सर्व इस्राएलांसह झटत होता. 15 राजा योरामने हजाएलशी झुंज घेतली होती. पण अरामी लोकांनी योरामला जायबंदी केले होते तेव्हा जखमा भरुन येण्यासाठी तो इज्रेलला गेला होता.

तेव्हा येहू त्या सगळ्या सरदारांना म्हणाला, “नवीन राजा म्हणून मला तुमची मान्यता असेल तर ही बातमी नगरातून इज्रेलमध्ये जाऊ देऊ नका.”

16 योराम इज्रेलमध्ये आराम करत होता. येहू रथात बसून इज्रेलला गेला. यहूदाचा राजा अहज्या देखील तेव्हा योरामला भेटायाला इज्रेलला आला होता.

17 इज्रेलमध्ये बुरुजावर एक पहारेकरी होता. त्याने येहूला मोठ्या जमावानिशी येताना पाहिले. तो म्हणाला, “मोठाच जमाव दिसतोय”

योरामने त्याला सांगितले, “कोणाला तरी घोड्यावरुन त्यांच्याकडे पाठव ते सद्भावाने येत आहेत का ते त्या स्वाराला विचारायला सांग.”

18 तेव्हा एक सेवक घोड्यावरुन येहूला सामोरा गेला. राजा योरामच्या वतीने त्याने येहूला विचारले, “तुमचे येणे शांततेचे आहे ना?”

येहू त्याला म्हणाला, “शांतीशी तुला कर्तव्य नाही. असा माझ्या मागोमाग ये.”

पहरेकऱ्याने योरामला सांगितले, “आपला तिकडे पाठवलेला माणूस अजून परत आलेला नाही.”

19 तेव्हा योरामने दुसऱ्या घोडेस्वाराला पाठवले, तो येहू कडे आला आणि राजा योरामच्या वतीने सलोख्याचे अभिवादन केले.

येहू म्हणाला, “तुला सलोख्याशी काय करायचे आहे? असा माझ्या मागोमाग ये?”

20 पहारेकऱ्याने योरामला सांगितले, “संदेश घेऊन गेलेला दुसरा माणूसही परत आलेला नाही. रथ चालवणारा तर वेड्यासारखा भरधाव रथ हाकतो आहे. निमशीचा मुलगा येहू याच्यासारखीच पध्दत आहे.”

21 योरामने मग स्वतःचा रथ तयार ठेवण्यास सांगितले.

तेव्हा सेवकाने योरामचा रथ आणला. इस्राएलचा राजा योराम आणि यहूदाचा राजा अहज्या या दोघांनी आपापले रथ येहूच्या दिशेने पळवले. इज्रेलचा नाबोथ याच्या शेतात त्यांची येहूशी गाठ पडली.

22 येहूला पाहून योरामने त्याला विचारले, “येहू तू शांततेसाठीच आला आहेस ना?”

येहू म्हणाला, “तुझी आई ईजबेल हिचे व्यभिचार आणि चेटके चालू असेपर्यंत कसली आली आहे शांतता?”

23 योरामने ताबडतोब आपले घोडे वळवले आणि पळ काढण्याच्या तयारीत तो अहज्याला म्हणाला, “अहज्या, दगा आहे.”

24 पण येहूने सर्व शक्तीनिशी धनुष्य ओढून योरामचा बरोबर दोन बाहुंच्यामध्ये वेध घेतला. बाण योरामच्या हृदयातून आरपार गेला. योराम रथात मरुन पडला.

25 येहूने आपल्या रथाचा सारथी बिदकर याला सांगितले, “योरामचा मृतदेह उचल आणि तो इज्रेलचा नाबोथ ह्याच्या शेतात फेकून दे आपण दोघे, योरामचा बाप अहाब याच्याबरोबर बसून चाललो होतो तेव्हा हे असे घडणार असे परमेश्वराने सांगितले होते, ते आठवते ना? 26 परमेश्वर म्हणाला होता, ‘नाबोथ आणि त्याची मुले यांचे रक्त काल मला दिसले, तेंव्हा या शेतात मी अहाबला शिक्षा करीन.’ प्रत्यक्ष परमेश्वरच असे म्हणाला. तेव्हा उचल तो मृतदेह आणि परमेश्वराच्या म्हणण्याप्रमाणे दे टाकून त्या शेतात!”

27 यहूदाचा राजा अहज्या याने ते पाहिले आणि तेथून पळ काढला. मळ्यातल्या एका घराच्या बाजूने तो गेला. येहूने त्याचा पाठलाग केला. येहू म्हणाला, “अहज्याचाही वध करा.”

तेव्हा येहूच्या माणसांनी अहज्याला इब्लाम जवळच्या गूरच्या रस्त्यावर जखमी केले. तेव्हा अहज्या मगिद्दोकडे पळाला पण तिथेच मरण पावला. 28 अहज्याच्या चाकरांनी त्याचा मृतदेह रथातून यरुशलेम येथे आणला. त्याचे त्यांनी दावीद नगरात त्याच्या पूर्वजांशेजारी दफन केले.

29 योरामचे इस्राएलचा राजा म्हणून अकरावे वर्ष चालू असताना अहज्या यहूदाचा राजा झाला होता.

ईजबेलचा निघृण वध

30 येहू इज्रेलला आला ते ईजबेलने ऐकले. तिने चांगले प्रसाधन केले, केशभूषा केली आणि खिडकीत बसून बाहेर बघू लागली. 31 येहूने नगरात प्रवेश केला. ईजबेल म्हणाली, “काय रे जिम्री? त्याच्या सारखेच तू ही आपल्या स्वामीला मारलेस!”

32 येहूने वर खिडकीकडे पाहात म्हटले, “माझ्या बाजूने कोण आहे? बोला!”

तेव्हा खिडकीतून दोन तीन खोजांनी त्याच्याकडे पाहिले. 33 येहू त्यांना म्हणाला, “त्या ईजबेलला खाली फेका.”

तेव्हा त्या खोजांनी ईजबेलला खाली फेकून दिले. भिंतीवर आणि घोड्यांवर तिचे रक्त उडाले. घोडे तिच्यावरुन चालून गेले. 34 येहू घरात शिरला आणि त्याने फराळाच्या पदार्थांचा समाचार घेतला. मग तो म्हणाला, “आता त्या शापित बाईला घ्या व तिचे दफन करा कारण ती राजकन्या होती.”

35 लोक तिला पुरायला पुढे झाले पण त्यांना तिच्या देहाचा पत्ता लागला नाही. फक्त तीचे शिर, पाय आणि हाताचे तळवे सापडले. 36 तेव्हा लोकांनी येऊन येहूला हे सांगितले. येहू त्यांना म्हणाला, “आपला सेवक एलिया तिश्बी याच्या मार्फत परमेश्वराने हेच सांगितले होते. एलिया म्हणाला होता. ‘इज्रेलच्या परिसरात ईजबेलचा देह कुत्री खातील. 37 शेणखता सारखा तिचा देह इज्रेलच्या भूमीवर पडेल. लोकांना तिचे प्रेत ओळखू येणार नाही.’”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes