A A A A A
Bible Book List

2 राजे 17 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

होशेचे इस्राएलवर राज्य

17 एलाचा मुलगा होशे हा शोमरोनमधून इस्राएलवर राज्य करु लागला. तेव्हा यहूदावर आहाजच्या सत्तेचे ते बारावे वर्ष होते. होशेने नऊ वर्षे राज्य केले. परमेश्वराने ज्या कृत्यांचा निषेध केला होता तीच कृत्ये होशेने केली. पण या पूर्वीच्या इस्राएलांच्या राजांइतकी होशेची कारकीर्द वाईट नव्हती.

अश्शूरचा राजा शल्मनेसर होशेवर चाल करुन आला. तेव्हा होशे शल्मनेसरचा मांडलीक बनला. त्याला होशेने आपले रक्षण करावे म्हणून कर दिला.

पण होशेचे आपल्याविरुध्द कटकारस्थान चालू आहे हे अश्शूरच्या या राजाच्या लक्षात आले, कारण होशेने मिसरचा राजा सो याच्याकडे आपले दूत पाठवले होते. तसेच दरवर्षीप्रमाणे त्या वर्षी होशेने करही भरला नव्हता. तेव्हा अश्शूरच्या राजाने त्याला अटक करुन कैदेत टाकले.

मग अश्शूरचा राजा इस्राएलमधून चाल करत शोमरोनमध्ये येऊन ठेपला. त्याने शोमरोनशी तीन वर्षे लढा दिला. होशेच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी अश्शूरच्या राजाने शोमरोन हस्तगत केले. इस्राएल लोकांना त्याने कैद करुन अश्शूरला नेले. त्यांना त्याने हलहा येथे तसेच गोजानमधील हाबोर नदीजवळ आणि मेदीलोकांच्या नगरात ठेवले.

परमेश्वर देवाच्या इच्छेविरुध्द इस्राएल लोकांनी पापे केली होती. म्हणून असे घडले. मिसरचा राजा फारो याच्या जाचातून परमेश्वराने इस्राएल लोकांची सुटका केली होती. तरी इस्राएली लोकांनी इतर दैवतांचे भजनपूजन सुरु केले. इतर लोकांचे ते अनुकरण करु लागले. त्या लोकांना परमेश्वराने इस्राएलीखातर तेथून हुसकावून लावले होते. शिवाय देवाऐवजी इस्राएल लोकांनी राजाची सत्ता पत्करली. इस्राएल लोकांनी परमेश्वर देवाविरुध्द ज्या गोष्टी चोरुन केल्या त्या निषिध्द होत्या.

लहान गावापासून मोठ्या शहरापर्यंत सर्व ठिकाणी त्यांनी उंचस्थानावरील पुजास्थळे बांधली. 10 प्रत्येक टेकडीवर आणि हिरव्यागार झाडाखाली त्यांनी स्मृतिस्तंभ आणि अशेराचे खांब उभारले. 11 या सर्व ठिकाणी ते धूप जाळत. इस्राएली लोकांनी तेथे येण्याआधी परमेश्वराने ज्या राष्ट्रांना त्या भूमीतून घालवून दिले होते त्यांच्यासारखेच वर्तन इस्राएल लोकांनी केले. त्या नीच कृत्यांनी परमेश्वर क्रुध्द झाला. 12 त्यांनी मूर्तीपूजा आरंभली. “ती कधीही करु नये” म्हणून परमेश्वराने त्यांना बजावले होते.

13 इस्राएल आणि यहूदा यांना समज देण्यासाठी परमेश्वराने सर्व संदेष्टे आणि द्रष्टे यांचा उपयोग केला. त्यांच्यामार्फत लोकांना सांगितले, “या गैरकृत्यांपासून मागे फिरा. माझ्या आज्ञा आणि नियम पाळा. तुमच्या पूर्वजांना जे नियम मी घालून दिले त्यांचे पालन करा. ते नियमशास्त्र मी माझे सेवक असलेले संदेष्टे यांच्यामार्फत तुम्हांला सांगितले आहे.”

14 पण लोकांनी या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. आपल्या पूर्वजांसारखाच आडमुठेपणा त्यांनी केला. त्यांच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्यावर त्यांचा विश्वास नव्हता. 15 या लोकांनी परमेश्वराने पूर्वजांशी केलेले करार आणि नियम धुडकावून लावले. परमेश्वराने बजावून सांगितले तिकडे दुर्लक्ष केले. क्षुद्र दैवतांच्या नादी लागून त्यांनी काहीच साधले नाही. आपल्या भोवतालच्या राष्ट्रांचे त्यांनी अनुकरण चालवले. परमेश्वराने इस्राएल लोकांना जे करु नका म्हणून सांगितले होते तेच ही राष्ट्रे करत होती.

16 परमेश्वर देवाच्या आज्ञा पाळणे इस्राएल लोकांनी अजिबातच थांबवले. त्यांनी वासरांच्या दोन सुवर्णमूर्ती केल्या, अशेराचे खांब उभारले, आकाशातील सर्व ताऱ्यांची आणि बालदेवतेची त्यांनी पूजा केली. 17 आपल्या पोटच्या मुलामुलींचा अग्नित बळी दिला. भविष्याचे कुतूहल शमवण्यासाठी जादूटोणा आणि मंत्रतंत्र यांचा अवलंब केला. परमेश्वराने ज्या कृत्यांचा धिक्कार केला तेच करण्यापायी स्वतःलाही विकले आणि परमेश्वराचा कोप ओढवून घेतला. 18 या गोष्टींनी परमेश्वर क्रुध्द झाला आणि त्याने यहूदाचे घराणे वगळता सर्व इस्राएलांना नामशेष करुन टाकले.

यहूदा लोकांचेही अपराध

19 पण यहूदातील लोकांनीही परमेश्वराच्या आज्ञा मानल्या नाहीत. त्यांनी इस्राएल लोकांचा कित्ता गिरवला.

20 परमेश्वराने सर्व इस्राएल लोकांचा धिक्कार केला. त्यांना संकटात लोटले. इतरांकरवी त्यांचा नाश केला आणि अखेर इतरत्र हाकलून दृष्टीआड केले. 21 दावीदाच्या घराण्यापासून परमेश्वराने इस्राएल लोकांना तोडले. तेव्हा इस्राएल लोकांना नबाटचा मुलगा यराबामयाला राजा केले. यराबामने लोकांना परमेश्वरापासून आणखी दूर ओढले यराबामने त्यांना मोठ्या पातकाचे धनी केले. 22 यराबामच्या पावलांवर पाऊल ठेवून इस्राएल लोकांनी पापे केली. 23 परमेश्वराने त्यांना नजरेआड करीपर्यंत त्यांनी पापे करणे सोडले नाही. परमेश्वराने असे होणार हे भाकीत वर्तवले होतेच. ते सांगायला त्याने संदेष्ट्यांनाही पाठवले होते. तेव्हा इस्राएल लोकांची त्यांच्या प्रदेशातून अश्शूरमध्ये हकालपट्टी करण्यात आली. आजतागायत ते तिथेच आहेत.

शोमरोनी लोकांची सुरुवात

24 अश्शूरच्या राजाने इस्राएल लोकांना शोमरोनमधून बाहेर काढले. त्यानंतर या राजाने बाबेल, कूथा, अव्वा, हामाथ आणि सफरवाईम येथून लोक आणून शोमरोनमध्ये त्यांना वसवले. या लोकांनी शोमरोनचा ताबा घेतला आणि त्या भोवतालच्या गावांमध्ये ते राहू लागले. 25 या लोकांनी त्या प्रदेशात राहू लागल्यावर परमेश्वराचा मान राखला नाही. तेव्हा त्यांच्यावर हल्ला करायला परमेश्वराने त्यांच्यावर सिंह सोडले. या सिंहांनी काहीजणांचा बळी घेतला. 26 काही लोक अश्शूरच्या राजाला म्हणाले, “तू ज्या लोकांना शोमरोनमध्ये आणून ठेवलेस त्यांना या देशातील परमेश्वराचे नियम माहित नाहीत. म्हणून परमेश्वराने त्यांच्यावर सिंह सोडले. या लोकांना त्या परमेश्वराच्या नियमांचे ज्ञान नसल्यामुळे ते लोक मारले गेले.”

27 तेव्हा अश्शूरच्या राजाने आज्ञा दिली, “शोमरोनमधून काही याजकांना तुम्ही आणले आहे. तरी अटक करुन आणलेल्यांपैकी एका याजकाला तिथे पाठवा. त्याला तिथे राहू द्या. तो मग लोकांना परमेश्वराचे नियमशास्त्र शिकवेल.”

28 तेव्हा, अश्शूरांनी शोमरोनमधून नेलेल्या याजकांपैकी एकजण बेथेल येथे राहायला आला. त्याने लोकांना परमेश्वराचा मान कसा राखावा ते शिकवले.

29 पण या लोकांनी स्वतःच्या दैवतांच्या मूर्ती बनवल्या आणि शोमरोन मधील लोकांनी बांधलेल्या उंचस्थानावरील पुजास्थळामध्ये त्या ठेवल्या. सर्वत्र त्यांनी असेच केले. 30 बाबेलमधल्या लोकांनी सुक्कोथ बनोथ ही दैवते केली. कूथातील लोकांनी नेरगल केला. हमाथमधील लोकांनी अशीमा केली, 31 अव्वी या लोकांनी निभज आणि तर्ताक केले. सफरावीम लोकांनी आपले दैवत अद्रम्मेलेक आणि अनम्मेलेक यांच्याप्रीत्यर्थ आपल्या मुलांचा बळी दिला.

32 पण तरी त्यांनी परमेश्वराविषयी आदर बाळगला. उंचस्थानातील पुजास्थळांसाठी त्यांनी आपल्यातूनच याजक निवडले. तिथे हे याजक यज्ञ करीत. 33 परमेश्वराविषयी आदर बाळगून ते आपापल्या दैवतांचीही पूजा करीत. आपल्या पूर्वीच्या राष्ट्रांत ते करीत तसेच इथेही करीत.

34 आजही हे लोक पूर्वीप्रमाणेच वागतात. ते परमेश्वराला मानत नाहीत. इस्राएलांचे नियमशास्त्र ते पाळत नाहीत. याकोबचे वंशज म्हणजे इस्राएल यांना परमेश्वराने ज्या आज्ञा दिल्या त्या ते मानत नाहीत. 35 परमेश्वराने इस्राएल लोकांशी करार केला होता. त्यात परमेश्वर म्हणाला होता, “इतर दैवतांची पूजा सेवा तुम्ही करता कामा नये त्यांच्यासाठी यज्ञ करता कामा नयेत. 36 फक्त परमेश्वर देवालाच मानले पाहिजे त्यानेच तुम्हाला मिसरमधून बाहेर काढले तुमच्या रक्षणासाठी परमेश्वराने आपले सामर्थ्य पणाला लावले. तेव्हा परमेश्वराची उपासना करा आणि त्याच्यासाठी यज्ञ करा. 37 त्याने तुम्हाला ज्या आज्ञा, नियम, करार, शिकवण लिहून दिली ती तुम्ही पाळलीच पाहिजे. त्या सर्वांचे तुम्ही सर्व वेळ पालन केले पाहिजे इतर देवीदेवतांच्या नादी लागता कामा नये. 38 मी तुमच्याशी केलेल्या कराराचा विसर पडू देऊ नका. इतर दैवतांच्या भजनी लागू नका. 39 फक्त परमेश्वर देवालाच भजा. तरच तो तुम्हाला सर्व संकटांतून सोडवील.”

40 पण इस्राएल लोकांनी हे ऐकले नाही. ते पूर्वीप्रमाणेच वागत राहिले. 41 आता ती इतर राष्ट्रे परमेश्वराचा आदर ठेवतात पण स्वतःच्या देवतांच्या मूर्तीचीही पूजा करतात. त्यांची मुले बाळे, नातवंडे आपल्या पूर्वजांचेच अनुकरण करत राहिली. ती आजतागायत तशीच वागत आहेत.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes