A A A A A
Bible Book List

2 राजे 1 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

अहज्यासाठी संदेश

अहाबच्या मृत्यूनंतर मवाब इस्राएल पासून वेगळा झाला.

एकदा अहज्या आपल्या शोमरोनमधल्या घराच्या माडीवर बसला होता. तेव्हा तिथल्या लाकडी कठडयावरुन तो खाली पडला आणि जबर जखमी झाला. अहज्याने मग आपल्या सेवकांना बोलावले आणि सांगितले. “एक्रोनचे दैवत बाल-जबूब याच्या पुरोहितांना मी या दुखण्यातून बरा होईन का ते विचारुन या.”

पण एलीया तिश्बी याला परमेश्वराचा दूत म्हणाला, “राजा अहज्याने शोमरोनहून आपले काही दूत रवाना केले आहेत. त्यांना जाऊन भेट त्यांना म्हण, ‘इस्राएलचा देव परमेश्वर आहे. तेव्हा एक्रोनचे दैवत बाल-जबूब याला विचारायला का जाता? राजा अहज्याला हा निरोप सांगा तू बाल-जबूब कडे आपले दूत पाठवलेस याबद्दल परमेश्वर काय म्हणतो ते ऐक तू आता अंथरुणावरुन उठणार नाहीस. तुला मरण येईल.’” मग एलीया उठला आणि अहज्याच्या सेवकांना त्याने जाऊन हा निरोप सांगितला.

तेव्हा ते दूत अहज्याकडे आले. अहज्याने त्यांना विचारले, “तुम्ही एवढ्या लौकर कसे आलात?”

ते अहज्याला म्हणाले, “आम्हाला एकजण भेटायला आला होता. त्याने आम्हाला तुमच्याकडे परत येऊन परमेश्वराचा हा निरोप सांगायला सांगितले, ‘इस्राएलात परमेश्वर आहे. तरी तू एक्रोनचे दैवत बाल-जबूब याच्याकडे आपल्या सेवकांना का पाठवलेस? ज्याअर्थी तू असे केलेस त्याअर्थी तू आता बरा होणार नाहीस. तू मृत्यू पावशील.’”

अहज्या आपल्या दूतांना म्हणाला, “ज्याने तुम्हाला भेटून हे सांगितले तो दिसायला कसा होता?”

तेव्हा ते दूत म्हणाले, “तो एक केसाळ माणूस होता आणि त्याने कातडयाचा कंबरपट्टा बांधला होता.”

तेव्हा अहज्या म्हणाला, “म्हणजे तो एलीया तिश्बी होता.”

अहज्याने पाठवलेले सरदार आगीत भस्मसात

अहज्याने आपला एक सरदार पन्नास माणसांसह एलीयाकडे पाठवला. हा सरदार एलीयाकडे गेला. एलीया तेव्हा एका डोंगराच्या माथ्यावर बसला होता. तो सरदार एलीयाला म्हणाला, “हे देवाच्या माणसा (संदेष्ट्या), राजाने तुला खाली बोलावले आहे.”

10 एलीयाने या सरदाराला उत्तर दिले, “मी खरेच देवाचा माणूस (संदेष्टा) असेन तर आकाशातून अग्नी प्रकट होऊन तुला आणि या पन्नास जणांना भस्मसात करु दे.”

तेव्हा आकाशातून अग्नी खाली आला आणि त्यात सरदारासह ती पन्नास माणसे जळून खाक झाली.

11 अहज्याने दुसऱ्या सरदाराला पन्नास जणांसह पाठवले. तो सरदार एलीयाला म्हणाला, “हे देवाच्या माणसा, ‘खाली ये असा राजाचा निरोप आहे.’”

12 एलीयाने त्या सर्वाना सांगितले “मी परमेश्वराचा माणूस असेन तर आकाशातून अग्नी उतरुन त्यात तुम्ही सर्व जळून जाल.”

तेव्हा आकाशातून परमेश्वराचा अग्नी उत्पन्न झाला आणि त्यात ते सर्वजण जळून गेले.

13 अहज्याने तिसऱ्या सरदाराला पन्नास जणांसह पाठवले. तो ही सरदार आपल्या बरोबरच्या लोकांसह एलीयाकडे आला. हा सरदार गुडघे टेकून बसला आणि एलीयाची त्याने विनवणी केली. तो म्हणाला, “हे देवाच्या माणसा, मी आणि माझ्याबरोबरचे हे पन्नासजण यांच्या प्राणांचे मोल तू जाणावेस. 14 आधीचे दोन सरदार आणि त्यांच्या बरोबरची पन्नास पन्नास माणसे आकाशातून आलेल्या अग्नीत नष्ट झाली. पण आता आमच्यावर दया कर आणि आम्हाला जीवदान दे.”

15 तेव्हा परमेश्वराचा दूत एलीयाला म्हणाला, “या सरदाराबरोबर जा व त्याला भिऊ नकोस.”

तेव्हा एलीया त्या सरदाराबरोबर राजा अहज्याला भेटायला गेला.

16 एलीया अहज्याला म्हणाला, “इस्राएलचा देव परमेश्वर आहे. तरी तू एक्रोनच्या बाल-जबूबकडे माणसे का पाठवलीस? तू असे केलेस म्हणून तू आता अंथरुणावरुन उठणार नाहीस. तुला मरण येईल.”

अहज्याच्या जागी यहोराम

17 अहज्या मरण पावला. परमेश्वराने एलीयाला सांगितले होते तसेच झाले. अहज्याला मुलगा नव्हता. तेव्हा अहज्यानंतर यहोराम राजा झाला. यहोशाफाटचा मुलगा यहोराम यहूदावर राज्य करत असताना दुसऱ्या वर्षी हा यहोराम राज्य करु लागला.

18 इस्राएलाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात अहज्या ने केलेली बाकीची कृत्ये लिहिलेली आहेत.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes