A A A A A
Bible Book List

2 इतिहास 9 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

शबाच्या राणीची शलमोनाशी भेट

शलमोनाची कीर्ती शबाच्या राणीच्या कानावर गेली. तेव्हा त्याची परीक्षा पाहायला म्हणून ती यरुशलेमला आली. तिच्याबरोबर मोठा लवाजमा होता. मसाल्याचे पदार्थ, सोनेनाणे, मौल्यवान रत्ने या गोष्टी उंटांवर लादून तिने आणल्या होत्या.शलमोनाची भेट घेऊन ती त्याच्याशी बोलली. तिला शलमोनाला बरेच प्रश्न विचारायचे होते. शलमोनाने तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. त्याला त्यातले काहीच अवघड वाटले नाही. शबाच्या राणीने त्याच्या सूज्ञपणाचा प्रत्यय घेतला, त्याचा महाल पाहिला. त्याच्या मेजावरील अन्नपदार्थ तिने पाहिले, त्याच्या प्रमुख कारभाऱ्यांची बैठक पाहिली. त्यांची कार्यपध्दती आणि त्यांचे पोशाख पाहिले. शलमोनाचे मद्यपरिचारक आणि त्यांचे पोशाख, परमेश्वराच्या मंदिरातील शलमोनाने केलेली होमार्पणे हे सर्व तिने पाहिले आणि या दर्शनाने ती थक्क झाली.

मग ती राजा शलमोनाला म्हणाली, “तुझ्या कामगिरीची आणि शहाणपणाची जी वर्णने मी माझ्या देशात ऐकली ती खरीच आहेत. इथे येऊन स्वतः अनुभव घेईपर्यंत मला त्या गोष्टी खऱ्या वाटत नव्हत्या. खरे तर तुझ्या सूज्ञपणाची थोरवी निम्म्यानेही माझ्यापर्यंत पोचली नव्हती. तुझ्याबद्दल जे ऐकले त्यापेक्षाही तू महान आहेस. तुझ्या बायका, तुझी माणसे आणि अधिकारी फार भाग्यवान आहेत. तुझ्या सेवेत असतानाच त्यांना तुझ्या शहाणपणाचा लाभ होतो. तुझा देव परमेश्वर ह्याची स्तुति असो. तो तुझ्यावर प्रसन्न आहे आणि आपल्या वतीने त्याने तुला राजा म्हणून सिंहासनावर बसवले आहे. परमेश्वराचे इस्राएलवर प्रेम आहे आणि इस्राएल वर त्याचा कायमचा वरदरस्त आहे. जे उचित आणि न्याय्य ते करण्यासाठी त्याने तुला राजा केले आहे.”

शबाच्या राणीने मग राजा शलमोन याला 4 1/2 टन सोने, अनेक मसाल्याचे पदार्थ आणि किंमती रत्ने यांचा नजराणा दिला. तिने दिले तसे मसाल्याचे जिन्नस शलमोनाला कधीच कुणाकडून मिळाले नाहीत.

10 हिराम आणि शलमोन यांच्या सेवकांनी ओफिराहून सोने आणले. रक्तचंदनाचे लाकूड आणि मौल्यवान रत्नेही त्यांनी आणली. 11 परमेश्वराच्या मंदिराच्या आणि राजमहालाच्या पायऱ्या तसेच गायकांच्या वीणा व सतारी यासाठी शलमोनाने हे रक्तचंदन वापरले. रक्तचंदनाचा वापर करुन बनवलेल्या इतक्या सुंदर वस्तू यापूर्वी यहूदात कधी कोणी पाहिल्या नव्हत्या.

12 शबाच्या राणीला जे हवे ते राजा शलमोनाने देऊ केले. त्याने जे देऊ केले ते तिने आणलेल्या नजराण्यापेक्षा जास्तच होते. मग शबाची राणी आपल्या लव्याजम्यासहित आपल्या देशात परतली.

शलमोनाची अवाढव्य संपत्ती

13 शलमोनाला वर्षभरात जेवढे सोने मिळे त्याचे वजन 25 टन एवढे असे. 14 याखेरीज, फिरस्ते व्यापारी आणि विक्रेते खूप सोने आणत. अरबस्तानचे राजे आणि वेगवेगळ्या प्रदेशांचे सुभेदार सोने-चांदी आणत, ते वेगळेच.

15 सोन्याचे पत्रे ठोकून 200 मोठ्या ढाली राजा शलमोनाने केल्या. अशाप्रत्येक ढालीला 7 1/2 पौंड वजनाचा सोन्याचा पत्रा लागला. 16 याखेरीज अशा घडीव सोन्याच्या तीनशे ढाली त्याने केल्या. त्यांना प्रत्येकी 3 3/4 पौंड सोने लागले. या सोन्याच्या ढाली त्याने लबानोनच्या अरण्यमहालात ठेवल्या.

17 राजा शलमोनाने हस्तिदंताचे मोठे सिंहासन केले. ते शुध्द सोन्याने मढवले. 18 या सिंहासनाला सहा पायऱ्या होत्या आणि सोन्याचे पादासन होते. दोन्ही बाजूला हात टेकवता येतील अशी सिंहासनाला सोय होती. आणि त्याला लागून एक एक सिंहाचा पुतळा होता. 19 सहा पायऱ्यांपैकी प्रत्येक पायरीच्या दोन्ही बाजूला एकेक असे एकंदर 12 सिंह होते. दुसऱ्या कोणत्याही राज्यात असे सिंहासन नव्हते.

20 राजाची सर्व पेयपात्रे सोन्याची होती. लबानोनच्या अरण्यमहालातील सर्व घरगुती वापरायच्या वस्तू शुध्द सोन्याने घडवलेल्या होत्या. शलमोनाच्या काळात चांदी फारशी मौल्यवान मानली जात नसे.

21 तार्शीश येथे जाणारी गलबते त्याच्याकडे होती. हिरामची माणसे त्याच्या गलबतांतून मालाची ने-आण करीत. सोन-रुपे, हस्तिदंत, वानरे आणि मोर यांनी भरलेली ही गलबते दर तीन वर्षानी तार्शीशहून शलमोनाकडे येत.

22 वैभव आणि ज्ञान या बाबतीत पृथ्वीच्या पाठीवरील कोणत्याही राजापेक्षा शलमोन महान झाला. 23 त्याच्या सल्लामसलतीचा लाभ घ्यायला सर्व ठिकाणचे राजे शलमोनाकडे येऊ लागले. परमेश्वरानेच शलमोनाला जो सूज्ञपणा दिला होता तो पाहायाला ते येत असत. 24 हे राजे दरवर्षी येताना शलमोनासाठी नजराणे घेऊन येत. त्यात सोन्यारुप्याच्या वस्तू, कपडे, चिलखते, मसाले, घोडे आणि खेचरे ह्यांचा समावेश असे.

25 घोडे आणि रथ यांच्यासाठी शलमोनाकडे 4,000 ठाणी होती. त्याच्यापदरी 12,000 रथचालक होते. त्यांची सोय त्याने मुद्दाम वसवलेल्या नगरात आणि स्वतःला लागतील तेवढ्यांची यरुशलेममध्ये केली होती. 26 फरात नदीपासून पलिष्ट्यांच्या देश आणि मिसरची सीमा येथपर्यंतच्या सर्व राजांवर शलमोनाचा अधिकार होता. 27 राजा शलमोनाकडे चांदी ही दगडधोंडे असावे इतकी आणि गंधसरुची झाडे, डोंगराळ देशातल्या उंबराच्या झाडांइतकी विपुल होती. 28 मिसर आणि इतर देशामधून लोक शलमोनासाठी घोडे आणत.

शलमोनाचा मृत्यू

29 शलमोनाने सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्यागोष्टी केल्या त्या नाथान या संदेष्ट्याच्या इतिहासात तसेच, अहीया शिलोनी याच्या संदेशलेखात आणि इद्दो या भविष्यवाद्याच्या इद्दोची दर्शने यात नोंदवलेल्या आहेत. नबाटाचा मुलगा यराबाम याविषयीही इद्दोने लिहिलेले आहे. 30 शलमोनाने यरुशलेममधून इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले. 31 मग तो आपल्या पूर्वजांना मिळाला. लोकांनी त्याचे दावीदनगरात दफन केले. शलमोनाचा मुलगा रहबाम हा पुढे शलमोनाच्या जागी राज्य करु लागला.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes