A A A A A
Bible Book List

2 इतिहास 21 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

21 पुढे यहोशाफाट वारला. त्याचे त्याच्या पूर्वजांजवळ दफन केले. दावीद नगरात त्याला पुरले. यहोशाफाटच्या जागी त्याचा मुलगा यहोराम गादीवर बसला. अजऱ्या, यहीएल, अजऱ्या, मीखाएल व शफट्या हे यहोरामचे भाऊ, व यहोशाफाटचे मुलगे. यहोशाफाट हा यहूदाचा राजा होता. यहोशाफाटने आपल्या मुलांना यहूदातील तटबंदीच्या नगरांखेरीज सोन्या-रुप्याच्या आणि अन्य किंमती वस्तू भेटीदाखल दिल्या. यहोराम मात्र ज्येष्ठ पुत्र असल्यामुळे त्याला त्याने राज्य दिले.

यहूदाचा राजा यहोराम

यहोराम आपल्या वडिलांच्या जागी गादीवर आला आणि सत्ताधीश बनला. त्याने आपल्या सर्व भावांचा तसेच इस्राएलमधील काही वडिलधाऱ्यांचा तलवारीने वध केला. वयाच्या बत्तिसाव्या वर्षी सत्तेवर येऊन यहोरामने यरुशलेममध्ये आठ वर्षे राज्य केले. अहाबच्या घराण्याप्रमाणे, इस्राएलच्या राजांच्या राहणीला अनुसरुनच याचे वागणे होते. कारण अहाबाच्या मुलीशी यहोरामने लग्न केले होते. परमेश्वराच्या दृष्टीने वाईट अशा गोष्टी त्याने केल्या. पण परमेश्वराने दावीदाला वचन दिलेले असल्यामुळे परमेश्वर दावीदाच्या घराण्याचे उच्चाटन करु शकत नव्हता. दावीदाच्या वंशाचा दिवा सतत तेवत राहील असा परमेश्वराने दावीदाशी करार केला होता.

यहोरामच्या कारकीर्दीत अदोमने यहूदाच्या सत्तेविरुध्द बंड पुकारले. अदोमच्या लोकांनी स्वतः आपला राजा निवडला. तेव्हा आपले सर्व सेनापती आणि रथ यांच्यासह यहोराम अदोमवर चाल करुन गेला. अदोमी सैन्याने त्यांना वेढा घातला. पण यहोरामने रात्रीची वेळ साधून त्यांच्यावर प्रतिहल्ला केला. 10 तेव्हा पासून आजतागायत अदोमची यहूदाशी बंडखोरी चालू राहिली आहे. लिब्ना नगरातील लोकांनीही यहोरामची सत्ता झुगारली. यहोरामने आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचा त्याग केल्यामुळे असे झाले. 11 यहोरामने यहूदातील पहाडांवर प्रार्थनेसाठी उच्चस्थाने बांधली. असे करण्याने, परमेश्वराला लोकांनी जसे वागावे असे वाटत होते त्यात खंड पडला. यहोरामने यहूदा लोकांना परमेश्वरापासून दूर नेले.

12 एलीया या संदेष्ट्याकडून यहोरामला असा संदेश आला:

“परमेश्वरा देवाने असे सांगितले आहे. तुझे पूर्वज दावीद यांचा हा परमेश्वर आहे, परमेश्वर म्हणतो, ‘यहोराम, तुझे आचरण आपले वडील यहोशाफाट यांच्या सारखे नाही. यहूदाचा राजा आसा याच्यासारखे तुझे वर्तन नाही. 13 उलट तू इस्राएलच्या राजांचा कित्ता गिरवला आहेस. यहूदा आणि यरुशलेममधील लोकांना तू परमेश्वराच्या इच्छेविरुध्द वागायला लावले आहेस. अहाब आणि त्याचे घराणे यांनी हेच केले. ते परमेश्वराशी एकनिष्ठ राहिले नाहीत. तू स्वतःच्या भावांची हत्या केलीस. ते तुझ्यापेक्षा वर्तणुकीने चांगले होते. 14 तेव्हा परमेश्वर आता तुझ्या लोकांना जबर शासन करणार आहे.तुझी मुले,बायका,मालमत्ता? यांना परमेश्वर शिक्षा करणार आहे. 15 तुला आतड्यांचा भयंकर आजार होईल आणि तो दिवसे दिवस बळावेल. त्यात तुझी आतडी बाहेर पडतील.’”

16 कूशी लोकांच्या शेजारचे अरब आणि पलिष्टी लोक यांना परमेश्वराने यहोरामविरुध्द भडकावले. 17 या लोकांनी यहूदावर स्वारी केली आणि त्यांनी राजाच्या महालातली सगळी धनदौलत लुटून नेली. यहोरामच्या बायकामुलांनाही त्यांनी पळवले. फक्त यहोआहाज हा सगळ्यात धाकटा मुलगा तेवढा बचावला.

18 या सगळ्या घडामोडींनंतर परमेश्वराने यहोरामला आतड्यांच्या असाध्य अशा रोगाने आजारी केले. 19 त्या आजारात दोन वर्षांनी त्याची आतडी बाहेर आली. असह्य वेदना होऊन तो मरण पावला. लोकांनी त्याच्या वडिलांच्या सन्मानार्थ जसा मोठा अग्नी पेटवला होता तसा यहोरामच्या सन्मानार्थ पेटवला नाही. 20 यहोराम सत्तेवर आला तेव्हा बत्तीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये आठ वर्षे राज्य केले. त्याच्या मृत्यूचे कोणालाही दु:ख झाले नाही. लोकांनी दावीदनगरातच त्याचे दफन केले, पण राजासाठी असलेल्या कबरीत नव्हे.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes