1 शमुवेल 16:14-23
Marathi Bible: Easy-to-Read Version
शौलाला दुष्ट आत्म्याचा त्रास
14 इकडे परमेश्वराच्या आत्म्याने शौलाची साथ सोडली. परमेश्वराने पाठवलेला एक दुरात्मा त्याला त्रस्त करु लागला. 15 शौलचे नोकर त्याला म्हणाले “हा परमेश्वराकडचा दुरात्मा तुम्हाला त्रास देत आहे. 16 आम्हाला आज्ञा द्या आम्ही कोणी चांगला वीणा वाजवणारा शोधतो. तुम्ही त्या दुरात्म्याने त्रस्त व्हाल तेव्हा हा वादक वीणा वाजवेल. म्हणजे तो दुष्ट आत्मा तुम्हाला सोडून जाईल आणि तुम्हाला बरे वाटेल.”
17 तेव्हा शौल आपल्या सेवकांना म्हणाला, “शोधा तर असा कुणीतरी आणि त्याला माझ्याकडे आणा.”
18 यावर एक चाकर म्हणाला, “इशाय नावाचा एक माणूस बेथलहेम येथे राहतो. त्याचा मुलगा मला माहीत आहे. त्याला वीणा वाजवता येते. तो चांगला लढवय्या सुध्दा आहे. तो तरतरीत, देखणा असून परमेश्वराची त्याला साथ आहे.”
19 तेव्हा शौलाने इशायकडे संदेश पाठवला. निरोप्यांनी इशायला सांगितले, “तुला दावीद म्हणून मुलगा आहे. तुझी मेंढरे तो राखतो. त्याला माझ्याकडे पाठव.”
20 तेव्हा इशायने शौलासाठी काही भेटवस्तू घेतल्या. एक गाढव. थोडी भाकरी, द्राक्षारसाचा एक बुधला आणि एक करडू या वस्तू दावीदजवळ देऊन त्याला शौलकडे पाठवले. 21 दावीद शौलकडे गेला आणि त्याच्या समोर उभा राहिला. शौलला तो फारच आवडला. दावीद त्याचा शस्त्रवाहक बनला.
22 शौलने इशायला निरोप पाठवला, “दावीदला माझा सेवक म्हणून इथेच राहू दे. त्याच्यावर माझा फार लोभ आहे.”
23 मग जेव्हा जेव्हा शौल दुरात्म्या मुळे हैराण होई तेव्हा तेव्हा दावीद वीणावादन करी. त्यामुळे दुरात्मा पळून जाऊन शौलला दिलासा मिळे.
Read full chapter2006 by Bible League International