Add parallel Print Page Options

तेव्हा परमेश्वर एलीयाला म्हणाला, “सिदोनमधील सारफथ येथे जाऊन राहा तेथे एक विधवा राहते. तिला मी तुला अन्न द्यायला सांगितले आहे.”

10 तेव्हा एलीया सारफथ येथे गेला. तो वेशीजवळ जातो तर त्याला एक बाई भेटली. ती विधवा होती. ती सरपण गोळा करत होती. एलीया तिला म्हणाला, “मला थोडे पाणी प्यायला मिळेल का?” 11 ती पाणी आणायला निघाली तेव्हा एलीया तिला म्हणाला, “मला एखादा भाकरीचा तुकडाही दिलास तर बरे!”

12 तेव्हा ती बाई म्हणाली, “परमेश्वर देवाची शपथ सांगते, माझ्याकडे भाकर अजिबात नाही. थोडेसे पीठ शिल्लक आहे. आणि बरणीच्या तळाला थोडेसे तेल आहे. इथे मी सरपण गोळा करायला आले. ते घेऊन मी घरी जाईन, स्वयंपाक करीन तो शेवटचाच. माझा मुलगा आणि मी जेवू आणि मग भुकेने मरु.”

13 तेव्हा एलीया तिला म्हणाला, “काही काळजी करु नकोस. घरी जा आणि आत्ता म्हणालीस त्याप्रमाणे स्वयंपाक कर. पण आधी जे पीठ शिल्लक आहे त्याची लहानशी भाकर करुन मला आणून दे मग तुमच्या दोघांचा स्वयंपाक कर. 14 इस्राएलचा परमेश्वर देव म्हणाला आहे, ‘तुझ्या डब्यातील पीठ कधी सरणार नाही. तुझ्या बरणीत नेहमीच तेल असेल. पुन्हा परमेश्वर पृथ्वीवर पाऊस पाडेपर्यंत असे चालेल.’”

15 तेव्हा ती घरी गेली. एलीयाच्या सांगण्याप्रमाणे तिने केले. एलीया, ती आणि तिचा मुलगा यांना बरेच दिवसपर्यंत पुरेसे खायला मिळत गेले. 16 पीठ आणि तेल कधीच संपले नाही. एलीयाला परमेश्वराने जे सांगितले त्याप्रमाणेच हे घडत गेले.

Read full chapter