Añadir traducción en paralelo Imprimir Opciones de la página

शौलाचा मृत्यू

31 पलिष्ट्यांची इस्राएलांशी लढाई झाली तेव्हा इस्राएलांनी शत्रूंपासून पळ काढला. बरेच इस्राएल लोक गिलबोवा डोंगरात मारले गेले. शौल आणि त्याची मुले यांच्याशी पलिष्टी निकराने लढले. योनाथान, अबीनादाब आणि मलकीशुवा या शौलाच्या मुलांचा पलिष्ट्यांनी वध केला.

युद्ध शौलाच्या हाताबाहेर जाऊ लागले. तिरंदाजांनी शौलावर बाणांचा वर्षाव केला आणि शौल चांगलाच घायाळ झाला. तो आपल्या शस्त्रवाहक सेवकाला म्हणाला, “तुझी तलवार उचल आणि माझ्यावर चालव. नाहीतर हे परकीय मला भोसकून माझी टिंगल टवाळी करतील.” पण त्या शस्त्रवाहकाने भेदरुन या गोष्टीला नकार दिला. तेव्हा शौलाने आपली तलवार उपसली व स्वतःला भोसकले.

शस्त्रवाहकाने शौल मेला हे पाहून आपली तलवार काढली आणि आत्महत्या केली. शौला बरोबरच त्याने देह ठेवला. अशा प्रकारे त्या दिवशी शौल, त्याची तीन मुले आणि त्याचा शस्त्रवाहक असे सर्व एकदम मृत्युमुखी पडले.

शौलच्या मरणाचा पलिष्ट्यांना आनंद

खोऱ्याच्या दुसऱ्या बाजूला राहणाऱ्या इस्राएली लोकांनी, इस्राएली सैन्याला पळ काढताना पाहिले. शौल आणि त्याची मुले मरण पावल्याचे त्यांना आढळले. तेव्हा त्यांनी ही आपापली गावे सोडून पलायन केले. त्या ठिकाणी मग पलिष्ट्यांनी वस्ती केली.

दुसऱ्या दिवशी हे पलिष्टी मृतांच्या अंगावरील चीजवस्तू लुबाडायला आले. त्यांना शौल आणि त्याची तीन मुले गिलबोवा डोंगरात मरुन पडलेली आढळली. पलिष्ट्यांनी शौलचे मुंडके कापले आणि चिलखत, शस्त्रे पळवली सर्व देशभरच्या लोकांना आणि देवळांमधून त्यांनी हे वर्तमान कळवले. 10 शौलची शस्त्रे त्यांना अष्टारोथच्या देवळात ठेवली आणि त्याचा मृतदेह बेथ-शानच्या गावकुसावर टांगला.

11 पलिष्ट्यांनी शौलची काय गत केली ते याबेश-गिलाद येथील रहिवाश्यांनी ऐकले. 12 तेव्हा तेथील सैनिक रातोरात तेथून निघून बेथ-शान येथे पोचले. तेथे गावकुसावर टांगलेला शौलचा मृतदेह त्यांनी काढला. शौलच्या मुलांची प्रेते ही काढली. याबेश येथे त्यांनी हे सर्व मृतदेह आणले आणि याबेश येथील सर्वांनी त्यांचे दहन केले. 13 मग त्यांच्या अस्थी काढून याबेश मधील झाडाखाली पुरल्या. सर्व लोकांनी सात दिवस उपास करुन शोक प्रगट केला.