A A A A A
Bible Book List

1 शमुवेल 28 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

पलिष्टी युध्दाला सज्ज

28 तेव्हा पुढे पलिष्ट्यांनी इस्राएलवर स्वारी करायला सैन्याची जमवाजमव केली. आखीश दावीदला म्हणाला, “इस्राएलशी युद्ध करायला तू आणि तुझे लोक यांना माझ्या बाजूला असले पाहिजे हे लक्षात ठेव.”

दावीद म्हणाला, “निश्चितच माझी कामगिरी पाहालच तुम्ही.”

आखीश म्हणाला, “उत्तम. मी तुला माझा अंगरक्षक म्हणून नेमतो. तू माझ्या संरक्षणाची काळजी घेशील.”

शौल आणि एन-दोर येथील एक बाई

शमुवेल मरण पावला होता. सर्व इस्राएलांनी निधनाबद्दल शोक व्यक्त करुन त्याच्या गावी रामा येथे शमुवेलचे दफन केले होते.

शौलने मांत्रिक आणि दैवज्ञ यांना इस्राएल मधून घालवून दिले होते.

पलिष्ट्यांनी युद्धाच्या तयारीने शूनेम येथे तळ दिला. शौलने सर्व इस्राएलांना एकत्र आणून गिलबोवा येथे तळ दिला. पलिष्ट्यांचे सैन्य पाहून शौल घाबरला. त्याची छाती धडधडू लागली. त्याने परमेश्वराची प्रार्थना केली पण परमेश्वराने त्याला उत्तर दिले नाही. स्वप्न, संदेष्टे किंवा उरीम यापैकी कोणत्याही माध्यामातून देव त्याच्याशी बोलला नाही. शेवटी शौल आपल्या अधिकाऱ्यांना म्हणाला, एखाद्या भूतविद्याप्रवीण बाईला गाठा. तिलाच या युध्दाविषयी प्रश्न विचारतो.

ते अधिकारी म्हणाले, “अशी एक बाई एन-दोन येथे आहे.”

आपणच शौल आहोत हे ओळखू देऊ नये म्हणून वेष पालटून शौल दोन सेवकांना सोबतीला घेऊन रात्रीच त्या बाईकडे गेला. तिला म्हणाला, “पुढे काय होणार हे मला जाणून घ्यायचे आहे. तेव्हा आपल्या भूतविद्येचा प्रयोग करुन, मी ज्याचे नाव घेईन त्याला इथे हजर कर.”

तेव्हा ती बाई शौलला म्हणाली, “शौलने काय केले माहीत आहेना? त्याने सर्व भूताविद्याप्रवीण आणि भविष्यवादी लोकांना इस्राएलमधून हद्दपार केले आहे. मलाही त्यात अडकवून मारायचा तुझा विचार दिसतो.”

10 शौलने परमेश्वराची शपथ घेऊन तिला वचन दिले की परमेश्वर जिवंतअसेतो तुला शिक्षा होणार नाही.

11 तेव्हा कोणाला समोर आणू असे तिने त्याला विचारले.

शौल म्हणाला, शमुवेलला आण.

12 आणि तसे झाले. शमुवेलला पाहताच ती मोठ्याने किंचाळली. शौलला ती म्हणाली, “तू मला फसवलेस तू शौल आहेस.”

13 तेव्हा राजा म्हणाला, “घाबरु नकोस. तुला काय दिसते ते सांग.”

ती म्हणाली, “मला एक आत्मा भूमीतून वर येताना दिसतोय.”

14 शौलने विचारले, “तो दिसायला कोणासारखा आहे?”

ती म्हणाली, “एक विशिष्ट प्रकारचा अंगरखा घातलेला एक वृध्द आहे.” तो शमुवेलच असल्याचे शौलाच्या लक्षात आले. जमिनीपर्यंत वाकून त्याने त्याला अभिवादन केले. 15 शमुवेल शौलला म्हणाला, “मला तू त्रास का दिलास? मला का उठवलेस?”

शौल म्हणाला, “मी अडचणीत सापडलो आहे. पलिष्टी माझ्यावर हल्ला करायला आले आहेत. परमेश्वराने माझी साथ सोडली आहे. त्याच्याकडून मला प्रतिसाद मिळत नाही. स्वप्न किंवा संदेष्टे यांच्यामार्फत मला उत्तरे मिळत नाहीत. म्हणून मी तुला बोलावले. मी काय करु ते तू सांग.”

16 शमुवेल म्हणाला, “परमेश्वराने तुझा त्याग केला आहे. तो आता दावीद या तुझ्या शेजाऱ्याच्या बाजूचा आहे. तेव्हा मला का त्रास देतोस? 17 परमेश्वराने माझ्या द्वारे जे जे सांगितले होते तेच तो आता करत आहे. तुझ्या हातातून राज्य खेचून घेऊन ते तो तुझ्या लगतच्या दुसऱ्यांच्या हाती सोपवत आहे हा शेजारी म्हणजे दावीद. 18 तू परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे वागला नाहीस. परमेश्वराचा क्रोध किती आहे ते दाखवायला तू अमालेक्यांचा नाश करायाला हवा होतास, तसा तू केला नाहीस. म्हणून परमेश्वर आज तुझ्याशी असे वागत आहे. 19 पलिष्ट्यांच्या हातून प्रभु तुझा आणि इस्राएल सैन्याचा पराभव करील आणि उद्या तू आणि तुझी मुले इथे माझ्याबरोबर असाल.”

20 हे ऐकून शौलने जमिनीवर लोळण घेतली. शमुवेलच्या भाकिताने त्याला कापरे भरले. त्याआधी दिवसभर आणि रात्र भर त्याने काही खाल्ले नव्हते म्हणून त्याच्या अंगात त्राण उरले नव्हते.

21 तेव्हा ती बाई शौलजवळ आली. तो घाबरल्याचे तिने पाहिले आणि त्याला ती म्हणाली, “पाहा, मी तुझ्या सेवेत आहे. तुझे म्हणणे मी ऐकले आहे. मला जे करायला सांगितले ते मी जीव धोक्यात घालून केले आहे. 22 आता कृपा करुन माझे ऐक. मी खायला देते ते खा तरच तुला वाटचाल करायला तरतरी येईल.”

23 पण शौलने खायचा आग्रह निग्रहाने धुडकावून लावला.

शेवटी शौल बरोबरच्या सेवकांनीही तिच्याच सारखी त्याला खायची विनंती केली. तेव्हा अखेर शौलने त्यांचे म्हणणे मानले. जमिनीवरुन उठून तो पलंगावर बसला. 24 एक चांगले धष्टपुष्ट वासरु त्या बाईकडे होते ते तिने पटकन् मारले. मग पीठ मळून त्याची खमीर विरहित भाकर भाजली. 25 शौल आणि त्याचे सेवक यांना खायला दिले. त्या सर्वांनी ते खाऊन त्याच रात्री तिचा निरोप घेतला.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes