A A A A A
Bible Book List

1 राजे 21 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

नाबोथचा द्राक्षमळा

21 अहाब राजाचा राजवाडा शोमरोनमध्ये होता. त्याच्या महालाशेजारी एक द्राक्षाचा मळा होता. तो नाबोथ नावाच्या माणसाचा होता. नाबोथचा द्राक्षमळा. एकदा अहाब नाबोथला म्हणाला, “तुझा मळा मला दे. तिथे मला भाजीचा मळा करायचा आहे. तुझा मळा माझ्या महालाला लागूनच आहे. त्याच्या ऐवजी मी तुला आणखी चांगला द्राक्षमळा देईन. किंवा तुला हवे असेल तर याचा मोबदला मी पैशात देईन.”

नाबोथ म्हणाला, “माझी जमीन मी देणार नाही. ती माझ्या कुटुंबाचे वतन आहे.”

तेव्हा अहाब घरी परतला. पण तो नाबोथवर रागावलेला होता. ईज्रेलचा हा माणूस जे बोलला ते त्याला आवडले नाही. नाबोथ म्हणाला होता, “माझ्या कुटुंबाची जमीन मी तुम्हाला देणार नाहीं.” अहाब अंथरुणावर पडला त्याने तोंड फिरवून घेतले आणि अन्नपाणी नाकराले.

अहाबची पत्नी ईजबेल त्याच्याजवळ गेली. त्याला म्हणाली, “तुम्ही असे खिन्र का? तुम्ही जेवत का नाही?”

अहाब म्हणाला, “इज्रेल येथल्या नाबोथला मी त्याचा मळा मला द्यायला सांगितला. त्याची पूर्ण किंमत मी मोजायला तयार आहे किंवा हवे तर दुसरी जमीन द्यायला तयार आहे हे ही मी त्याला सांगितले. पण नाबोथ त्याचा मळा द्यायला कबूल होत नाही.”

ईजबेल त्याला म्हणाली, “पण तुम्ही तर इस्राएलचे राजे आहात. उठा, काही तरी खा म्हणजे तुम्हाला बरे वाटेल. त्याचा मळा मी आपल्याला मिळवून देईन.”

ईजबेलने मग काही पत्रे लिहिली. पत्रांवर तिने अहाबची सही केली. अहाबचा शिक्का वापरुन पत्रांवर तो शिक्का उमटवला. मग तिने ही पत्रे नाबोथाच्या गावच्या वडीलधाऱ्या मंडळींना आणि थोरामोठ्यांना पाठवली. पत्रातला मजकूर असा होता:

“एक दिवस उपवासाची घोषणा करा. मग गावातल्या लोकांना एकत्र बोलवा. तिथे नाबोथविषयी बोलणे होईल. 10 नाबोथबद्दल खोट्या गोष्टी सांगणारी काही माणसे जमवा. नाबोथ राजाविरुध्द आणि देवाविरुध्द बोलला, हे आम्ही ऐकले, असे त्या माणसांनी म्हणावे. एवढे झाल्यावर नाबोथला गावाबाहेर घालवून दगडांनी ठेचून मारा.”

11 इज्रेलमधल्या वयाने आणि मानाने वडिलधाऱ्या (पुढ्याऱ्यांनी) अशा मंडळींनी ही आज्ञा मानली. 12 त्यांनी उपवासाचा म्हणून एक दिवस घोषित केला. त्या दिवशी सर्व लोकांना सभेत बोलावले. नाबोथला सर्वांसमोर खास आसनावर बसवले. 13 मग, नाबोथ देवाविरुध्द आणि राजाविरुध्द बोलल्याचे आपण ऐकले आहे असे दोन माणसांनी सांगितले. तेव्हा लोकांनी नाबोथला गावाबाहेर घालवले आणि तो मरेपर्यंत त्याच्यावर दगडांचा वर्षाव केला. 14 मग त्या प्रतिष्ठित माणसांनी ईजबेलकडे निरोप पाठवला. “नाबोथचा वध झाला आहे.” असा तो निरोप होता.

15 ईजबेलने हे ऐकले तेव्हा ती अहाबला म्हणाली, “नाबोथ मेला. आता तुम्हाला हवा होता तो मळा तुम्ही जाऊन ताब्यात घेऊ शकता” 16 यावर अहाबने तो द्राक्षमळा आपल्या ताब्यात घेतला.

17 यावेळी परमेश्वर एलीयाशी बोलला. (एलीया हा तिश्बी येथील संदेष्टा) परमेश्वर म्हणाला, 18 “शोमरोनमधल्या राजा अहाबकडे जा तो नाबोथाच्या द्राक्षमळ्यात असेल. तो त्या मळ्यावर कब्जा करायला तिथे गेला आहे. 19 अहाबला जाऊन सांग की परमेश्वर म्हणतो, ‘अहाब, नाबोथला तू मारलेस. आता त्याचा मळा घ्यायला निघालास तेव्हा आता मी सांगतो ते ऐक. नाबोथ मेला त्याच जागी तू सुध्दा मरशील ज्या कुत्र्यांनी नाबोथाचे रक्त चाटले तीच कुत्री त्याच ठिकाणी तुझे रक्त चाटतील.’”

20 तेव्हा एलीया अहाबकडे गेला. अहाबने एलीयाला पाहिले आणि तो म्हणाला, “तुला मी पुन्हा सापडलो. तू नेहमीच माझ्याविरुध्द आहेस.”

एलीया म्हणाला, “हो, तुला मी पुन्हा शोधून काढले आहे. तुझे आयुष्य तू परमेश्वराचे अपराध करण्यातच घालवलेस. 21 तेव्हा परमेश्वर तुला काय सांगतो ते ऐक, ‘मी तुझा नाश करीन. मी तुला आणि तुझ्या कुटुंबातील सर्व पुरुषांना ठार करीन. 22 नबाटाचा मुलगा यराबाम याच्या कुटुंबासारखीच तुझ्या घराचीही वाताहत होईल. बाशाच्या कुटुंबासारखीच तुझी दशा होईल. या दोन्ही घराण्यांचा समूळ नाश झाला. तू माझा क्रोध जागा केलास. इस्राएल लोकांनाही पाप करायला लावलेस.’ 23 शिवाय परमेश्वर असे म्हणतो, ‘तुझी बायको ईजबेल हिच्या शरीरावर इज्रेल मध्ये कुत्री तुटून पडतील. 24 तुझ्या घरातल्या ज्याला कुणाला गावात मरण येईल त्याला कुत्री खातील आणि जो कोणी शेतात मरेल तो पक्ष्यांचे भक्ष्य होईल.’”

25 अहाबने जितकी पापे केली, जितके अपराध केले तेवढे कोणीच केले नाहीत. त्याची बायको ईजबेल हिने त्याला हे सर्व करायला लावले. 26 अहाबने आणखी एक पातक केले ते म्हणजे त्या लाकडी ठोकळ्यांची, मूर्तींची पूजा केली. अमोरी लोकांनीही हेच केले तेव्हा परमेश्वराने त्यांच्याकडून हा प्रदेश काढून घेऊन इस्राएल लोकांना दिला.

27 एलीयाचे बोलून झाल्यावर अहाबला फार दु:ख झाले. दु:खाने त्याने अंगावरचे कपडे फाडले. मग विशेष शोकवस्त्रे परिधान केली. त्याने अन्नत्याग केला. त्याच कपड्यात तो झोपला. तो अतिशय दु:खी आणि खिन्न झाला होता.

28 परमेश्वर एलीया संदेष्ट्याला म्हणाला, 29 “अहाब माझ्यापुढे नतमस्तक झाला आहे असे दिसते. तेव्हा तो जिवंत असेपपर्यंत मी त्याला संकटात लोटणार नाही. त्याचा मुलगा राज्यावर येईपर्यंत मी थांबेन. मग त्याच्या घराला मी उपद्रव देईन.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes