A A A A A
Bible Book List

1 तीमथ्याला 5 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

इतर लोकांबरोबर राहण्याचे काही नियम

वडील माणसाला कठोरपणे बोलू नको, उलट पित्याप्रमाणे त्याला बोध कर. तरुणांना भावासारखे, वृद्ध स्त्रियांना आईसारखे, तरुण स्त्रियांना बहिणीसारखे पूर्ण शुद्ध भावाने वागीव.

ज्या विधवा खरोखरच निराधार आहेत त्यांची काळजी घे. पण जर एखाद्या विधवेला मुले किंवा नातवंडे असतील तर त्यांनी प्रथम आपल्या घरच्यांची काळजी घेऊन आपला धर्म प्रत्यक्षात आणावा आणि अशा प्रकारे आपल्या आईवडिलांची किंवा आजीआजोबांची परतफेड करावी. कारण हे देवाला मान्य आहे. जी स्त्री खरी विधवा आहे, व तिची काळजी घेण्यासाठी कोणी नाही तिची आशा देवावर असते व ती रात्रंदिवस देवाकडे प्रार्थना व विनंत्या करीत असते. पण जी विधवा चैनीत राहते, ती जरी जिवंत असेल तरी ती खरोखर मेलेली आहे. म्हणून लोकांना याविषयी निक्षन सांग, यासाठी की, कोणालाही त्यांच्याकडे दोष दाखविण्यास वाव राहणार नाही. पण जर कोणी त्याच्या स्वतःच्या नातेवाईकासाठी आणि विशेषतः त्याच्या कुटुंबातील जवळच्यांसाठी तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारलेला आहे. व तो अविश्वासू माणसांपेक्षा वाईट आहे.

एखादी विधवा जी कमीत कमी साठ वर्षांची असेल, जिला सोडचिठ्ठी देण्यात आली नाही व जिचे दुसऱ्यांदा लग्न झाले नाही, अशाच स्त्रियांची विधवा म्हणून नोंद घ्यावी. 10 चांगले काम करण्याबद्दल तिचा नावलौकिक असेल व तिने मुलाबाळांना वाढवल असेल, जिने अनोळखी लोकांचे स्वागत केले असेल, संताचे पाय धुतले असतील, त्रासात असलेल्यांना मदत केली असेल व सर्व चांगले काम करण्यात स्वतःला वाहून घेतले असेल, तिचा विधवांच्या खास यादीत समावेश करावा.

11 पण तरुण विधवांची यादीत नोंद करण्याचे टाळावे. कारण जेव्हा त्या ख्रिस्ताला सोडून अविचारी होतात, तेव्हा त्यांना पुन्हा लग्न करावेसे वाटते. 12 आणि त्या दोषी धरल्या जातील, कारण त्यांनी त्यांचे मूळ वचन मोडलेले असते. 13 आणखी, त्या आळशी, त्या आळशी बनतात व घरोघरी फिरतात. त्या आळशी बनतात एवढेच नाही तर इतर लोकांच्या भानगडीत स्वतःला गुरफटून घेतात व इतरांविषयी खोटनाटे बोलतात. ज्या गोष्टी बोलू नयेत, त्या गोष्टी बोलतात. 14 यासाठी माझी अशी इच्छा आहे की, तरुण स्त्रियांनी (विधवांनी) लग्ने करावीत. मुलांचे संगोपन करावे व आपले घर चालवावे. आपल्या शत्रूला आपली निंदा करण्यास वाव मिळू देऊ नये. 15 मी तर असे म्हणतो कारण काही विधवा सैतानामागे जाण्यासाठी वळल्यादेखील आहेत.

16 जर एखाद्या विश्वासणाऱ्या स्त्रीच्या घरात विधवा स्त्रिया असतील तर तिने त्यांची काळजी घ्यावी [a] व मंडळीवर भार टाकू नये. यासाठी की ज्या खरोखरच विधवा आहेत त्यांना ते मदत करु शकतील.

More About Elders and Other Matters

17 जे वडील मंडळीची चांगली सेवा करतात त्यांना दुप्पट मान देण्याच्या योग्यतेचे समजावे, विशेषतः जे उपदेश करण्याचे व शिकविण्याचे काम करतात त्यांना. 18 कारण पवित्र शास्त्र म्हणने, “धान्याची मळणी करताना बैलाला मुसक्या बांधू नको. [b] आणि मजुराचा त्याच्या मजुरीवर हक्क आहे.” [c]

19 दोन किंवा तीन साक्षीदारांनी पाठिंबा दिल्याशिवाय वडिलावरील आरोप दाखल करु नकोस. 20 जे पाप करीत राहतात त्यांचा जाहीरपणे निषेध कर. यासाठी की, इतरांनाही भय वाटावे.

21 देव, येशू ख्रिस्त व निवडलेले देवदूत यांच्यासमोर मी निक्षून आज्ञा करतो की, तू कोणताही पूर्वग्रह न ठेवता या गोष्टी पाळ व पक्षपाताने काहीही करु नको.

22 देवाच्या सेवेसाठी नियुक्ती करण्याठी कोणावरही घाईने हात न ठेवण्याची सवय कर. इतरांच्या पापांत वाटेकरी होऊ नको. नेहमी स्वतःला शुद्ध राख.

23 नुसतेच पाणी पिण्याचे थांबव आणि तुझ्या पचनासाठी व वारंवारच्या दुखण्यासाठी द्राक्षारसाचा वापर कर.

24 काही लोकांची पापे स्पष्ट आहेत. व ती त्यांच्याअगोदर न्यायालयात जातात पण दुसऱ्या लोकांची पापे त्यांच्या मागून जातात. 25 त्याचप्रमाणे, चांगली कामेही स्पष्ट आहेत ती सुध्दा कायमची लपविता येत नाहीत.

Footnotes:

  1. 1 तीमथ्याला 5:16 जर एखाद्या … घ्यावी काही प्राचीन ग्रीक प्रतींमध्ये लिहिले आहे, जर एखादा मनुष्य किंवा स्त्री जी विश्वासणारी आहे कडे विधवा असेल तर त्याने त्यांना मदत करावी.
  2. 1 तीमथ्याला 5:18 पाहा अनुवाद 25:4
  3. 1 तीमथ्याला 5:18 पाहा लूक 10:7
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes