Add parallel Print Page Options

94 परमेश्वरा, तू लोकांना शासन करणारा देव आहेस.
    असा तू देव आहेस जो येतो आणि लोकांसाठी शासन आणतो.
तू संपूर्ण पृथ्वीचा न्यायाधीश आहेस.
    गर्विष्ठ दुष्ट माणसांना योग्य अशी शिक्षा दे.
परमेश्वरा, दुष्ट लोक किती काळ मजा करीत राहाणार आहेत?
    परमेश्वरा किती काळ?
आणखी किती काळ हे गुन्हेगार त्यांनी केलेल्या
    गुन्ह्यांबद्दल गौरवोद्गार काढणार आहेत?
परमेश्वरा, ते तुझ्या माणसांना त्रास देतात.
    त्यांनी तुझ्या माणसांना यातना भोगायला लावल्या.
ते दुष्ट लोक विधवांना आणि आपल्या देशात आलेल्या परकीयांना ठार मारतात.
    ते अनाथ मुलांचा खून करतात.
आणि ते म्हणतात की या वाईट गोष्टी करताना परमेश्वर त्यांना बघत नाही.
    ते म्हणतात की जे काही घडते आहे ते इस्राएलाच्या देवाला माहीत नाही.

तुम्ही दुष्ट लोक, मूर्ख आहात.
    तुम्ही तुमचा धडा कधी शिकणार?
तुम्ही वाईट लोक किती मूर्ख आहात!
    तुम्ही समजण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे.
देवानेच आपले कान केलेत
    तेव्हा त्यालाही कान असलेच पाहिजेत
आणि जे काही घडते ते तो ऐकू शकतो.
    देवानेच आपले डोळे केलेत.
तेव्हा त्यालाही डोळे असलेच पाहिजेत
    आणि जे काही घडते ते तो पाहू शकतो.
10 देव त्या लोकांना शिस्त लावेल.
    देव लोकांना काय करायचे ते शिकवेल.
11 लोक काय विचार करतात ते देवाला माहीत असते.
    लोक म्हणजे वाऱ्याचा झोत आहे हे देवाला माहीत आहे.

12 परमेश्वर ज्या माणसाला शिस्त लावेल तो सुखी होईल.
    देव त्या माणसाला जगण्याचा योग्यमार्ग शिकवेल.
13 देवा, तू त्या माणसाला संकटात शांत राहाण्यास शिकवशील.
    तू त्या माणसाला वाईट लोक थडग्यात जाईपर्यंत शांत राहाण्यास मदत करशील.
14 परमेश्वर त्याच्या माणसांना सोडून जाणार नाही.
    तो त्याच्या माणसांना मदत केल्याशिवाय सोडून जाणार नाही.
15 न्याय प्रस्थापित होईल आणि तो न्यायीपणा आणेल आणि
    नंतर प्रामाणिक आणि चांगले लोक तेथे येतील.

16 वाईट लोकांशी लढायला मला कोणीही मदत केली नाही.
    वाईट कृत्य करणाऱ्या लोकांशी लढण्यासाठी माझ्या बरोबरीने कोणीही उभे राहिले नाही.
17 आणि जर परमेश्वराने मला मदत केली
    नसतीतर मी मेलो असतो.
18 मी पडायला आलेलो आहे हे मला माहीत आहे,
    पण परमेश्वराने त्याच्या भक्तांना आधार दिला.
19 मी खूप चिंताग्रस्त आणि उदास होतो.
    परंतु परमेश्वरा, तू माझे सांत्वन केलेस.

20 देवा, तू दुष्ट न्यायाधीशांना मदत करीत नाहीस.
    ते वाईट न्यायाधीश कायद्याचा दुरुपयोग करुन लोकांचे आयुष्य कठीण करतात.
21 ते न्यायाधीश चांगल्या माणसांवर हल्ला करतात.
    ते निरपराधी लोक अपराधी आहेत असे म्हणतात आणि त्यांना ठार मारतात.
22 परंतु परमेश्वर माझी उंच पर्वतावरची सुरक्षित जागा आहे.
    देव माझा खडक माझी सुरक्षित जागा आहे.
23 देव त्या दुष्ट न्यायाधीशांना त्यांनी केलेल्या वाईटकृत्याबद्दल शिक्षा करेल.
    त्यांनी पाप केले म्हणून देव त्यांचा नाश करेल.
    परमेश्वर आपला देव त्या दुष्ट न्यायाधीशांचा सर्वनाश करेल.