Añadir traducción en paralelo Imprimir Opciones de la página

प्रमुख गायकासाठी “भूकमळे” या चालीवर बसवलेले आसाफाचे स्तोत्र.

80 इस्राएलाच्या मेंढपाळा, माझे ऐक.
    तू योसेफाच्या मेंढ्यांना (माणासांना) मार्ग दाखवतोस.
राजा म्हणून तू करुबांच्या आसनावर बसतोस.
    आम्हाला तुला बघू दे.
इस्राएलाच्या मेंढपाळा, तुझे मोठेपण एफ्राइम आणि बन्यामीन व मनश्शे यांच्यासमोर दाखव.
    ये आणि आम्हाला वाचव.
देवा, आमचा पुन्हा स्वीकार कर
    आणि आम्हाला वाचव.
सर्वशक्तिमान परमेश्वर देवा, तू आमच्या प्रार्थना कधी ऐकशील?
    आमच्यावर तू सदैव रागावलेलाच राहाणार आहेस का?
तू तुझ्या लोकांना अन्न म्हणून अश्रू दिलेस.
    तेच त्यांचे प्यायचे पाणी होते.
तू आम्हाला आमच्या शेजाऱ्यांच्या भांडणाचे निमित्त केलेस.
    आमचे शत्रू आम्हाला हसतात.
सर्वशक्तिमान देवा, पुन्हा आमचा स्वीकार कर.
    आमचा स्वीकार कर आणि आम्हाला वाचव.

भूतकाळात तू आम्हाला अतिशय महत्वाच्या वनस्पती सारखे वागवलेस.
    तू तुझी ही “वेल” मिसर देशाच्याबाहेर आणलीस.
तू इतर लोकांना ही जमीन सोडून जायला भाग पाडलेस
    आणि तू तुझी “वेल” इथे लावलीस.
तू त्या “वेलीसाठी” जमीन तयार केलीस.
    त्या “वेलीची” मुळं जोमाने वाढावीत म्हणून प्रयत्न केलेस.
थोड्याच अवधीत ती वेल सर्व देशभर पसरली.
10 तिने डोंगरांना आच्छादून टाकले,
    मोठ्या देवदारुच्या वृक्षांवर सुध्दा तिच्या पानांनी छाया घातली.
11 तिच्या वेली भूमध्य समुद्रापर्यंत पसरल्या,
    तिचे कोंब युफ्रेटस नदीपर्यंत गेले.
12 देवा, तुझ्या “वेलीचे” रक्षण करणाऱ्या भिंती तू का पाडून टाकल्यास?
    आता जो कोणी तिथून जातो तो तिची द्राक्षे तोडतो.
13 रानडुकरे येऊन तुझ्या “वेलीवर” चालतात.
    रानटी पशू येतात आणि तिची पाने खातात.
14 सर्वशाक्तिमान देवा, परत ये स्वर्गातून खाली
    तुझ्या “वेलीकडे” बघ आणि तिचे रक्षण कर.
15 देवा, तू तुझ्या हाताने कापलेल्या “वेलीकडे” बघ.
    तू वाढवलेल्या तुझ्या लहान वेलाकडे बघ.
16 तुझी “वेल” वाळलेल्या शेणाप्रामाणे (गोवरीप्रमाणे) आगीत जळून गेली
    तू तिच्यावर रागावला होतास आणि तू तिचा नाश केलास.

17 देवा, तुझ्या उजव्या बाजूला उभ्या असलेल्या तुझ्या मुलाला मदत कर.
    तू वाढवलेल्या तुझ्या मुलाला मदत कर.
18 तो तुला सोडून परत जाणार नाही.
    त्याला जगू दे आणि तो तुझ्या नावाचा धावा करेल.
19 सर्वशक्तिमान परमेश्वर देवा, आमच्याकडे परत ये.
    आमचा स्वीकार कर. आम्हाला वाचव.