Añadir traducción en paralelo Imprimir Opciones de la página

प्रमूख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.

19 स्वर्ग देवाचा महिमा गातात.
    आणि आकाश देवाने आपल्या हाताने ज्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्या दाखवते.
प्रत्येक नवा दिवस त्या गोष्टींबद्दल अधिक काही सांगतो
    आणि प्रत्येक रात्र देवाच्या सामर्थ्याची अधिकाधिक रुपे दाखवते.
तुम्हांला एखादे भाषण किंवा शब्द खरोखरच ऐकू येत नाही.
    तुम्हांला ऐकू येण्यासारखा एखादा आवाज ते करीत नाहीत.
परंतु त्यांचा “आवाज” सर्व जगभर जातो
    त्यांचे “शब्द” पृथ्वीच्या टोकापर्यंत जातात.

आकाश म्हणजे जणू सूर्याचे घरच आहे.
    सूर्य त्याच्या झोपायच्या खोलीतून आनंदी नवऱ्या मुलासारखा बाहेर येतो.
सूर्य त्याच्या परिक्रमेची सुरुवात अधीर झालेल्या
    एखाद्या धावपटू सारखी करतो.
सूर्य आकाशाच्या एका कोपऱ्यापासून सुरुवात करतो
    आणि तो आकाशाच्या दुसऱ्या टोकापर्यंत जातो.
त्याच्या उष्णतेपासून काहीही लपून राहू शकत नाही.
    परमेश्वराची शिकवणही तशीच आहे.

परमेश्वराची शिकवण अतिशय योग्य आहे.
    ती देवाच्या लोकांना शक्ती देते.
परमेश्वराच्या करारावर विश्वास ठेवणे शक्य आहे.
    त्यामुळे मूर्ख लोकांना शहाणे बनण्यास मदत होते.
परमेश्वराचे नियम योग्य आहेत
    ते लोकांना सुखी करतात.
परमेश्वराच्या आज्ञा चांगल्या आहेत
    त्या लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात.

परमेश्वराची भीती शुध्द आहे.
    ती अखंड सहन करावी लागेल.
परमेश्वराचे निर्णय चांगले आणि योग्य आहेत.
    ते संपूर्णत बरोबर आहेत.
10 परमेश्वराची शिकवण अतिशय शुध्द अशा सोन्यापेक्षा ही किंमती आहे.
    ती मधाच्या पोळ्यातून मिळणाऱ्या, शुध्द मधापेक्षाही गोड आहे.
11 परमेश्वराच्या शिकवणी ने त्याच्या सेवकाला इशारा मिळतो.
    चांगल्या गोष्टींचे पालन केल्यामुळे चांगले फळ मिळते.

12 कोणालाही आपल्या सगळ्या चुका दिसू शकत नाहीत.
    म्हणून मला गुप्त पाप करु देऊ नकोस.
13 परमेश्वरा, जी पापे करायची इच्छा मला होते, ती मला करु देऊ नकोस.
    त्या पापांना माझ्यावर राज्य करु देऊ नकोस.
तू जर मला मदत केलीस तर मी शुध्द होईन आणी माझ्या पापांपासून मुक्त होईन.
14 माझ्या शब्दांनी आणि माझ्या विचारांनी तुला आनंद व्हावा असे मला वाटते.
    परमेश्वरा, तू माझा खडक आहेस.
    मला वाचवणारा फक्त तूच आहेस.