Add parallel Print Page Options

प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.

109 देवा, माझ्या प्रार्थनेला
    तुझे कान बंद करु नकोस.
दुष्ट लोक माझ्याविषयी खोटंनाटं सांगत आहेत.
    ते माझ्याबद्दल असत्य गोष्टी सांगत आहेत.
लोक माझ्याबद्दल द्वेषयुक्त गोष्टी सांगत आहेत.
    ते कारण नसताना माझ्यावर हल्ला करत आहेत.
मी त्यांच्यावर प्रेम केले पण ते माझा द्वेष करतात म्हणून देवा,
    मी आता तुझी प्रार्थना करतो.
मी त्या लोकांसाठी चांगल्या गोष्टी केल्या
    पण ते माझ्यासाठी वाईट गोष्टी करत आहेत.
    मी त्यांच्यावर प्रेम केले पण ते माझा द्वेष करत होते.

“माझ्या शत्रूंनी वाईट गोष्टी केल्या त्याबद्दल त्यांना शिक्षा कर.
    ते चुकले आहेत हे सिध्द करण्यासाठी एखादा माणूस शोध.
माझा शत्रू चुकला आणि तो अपराधी आहे हे न्यायाधीशांना ठरवू दे.
    माझा शत्रू जे काही बोलतो त्यामुळे त्याची परिस्थिती अधिकच बिघडते.
माझ्या शत्रूला लवकर मरु दे.
    त्याचा व्यवसाय दुसऱ्या माणसाला मिळू दे.
माझ्या शत्रूच्या मुलांना अनाथ
    आणि त्याच्या बायकोला विधवा कर.
10 त्यांना त्यांचे घर गमावू दे
    आणि त्यांना भिकारी होऊ दे.
11 माझ्या शत्रूंच्या धनकोंना त्याच्याकडचे सगळे घेऊ दे
    आणि परक्यांना त्याच्या सर्व श्रमांचे फळ घेऊ दे.
12 माझ्या शत्रूंशी कुणीही दयाळू असू नये असे मला वाटते.
    त्याच्या मुलांना कुणी दया दाखवू नये असे मला वाटते.
13 माझ्या शत्रूचा संपूर्ण नाश कर.
    पुढच्या पिढीला त्याचे नाव सर्व गोष्टीवरुन काढून टाकू दे.
14 परमेश्वराला माझ्या शत्रूच्या वडिलांच्या पापांची आठवण करुन दिली जाईल असे मला वाटते,
    त्याच्या आईची पापे कधीही पुसली जाऊ नयेत असे मला वाटते.
15 परमेश्वराला त्या पापांची सदैव आठवण राहील अशी मी आशा करतो.
    आणि तो लोकांवर माझ्या शत्रूला पूर्णपणे विसरुन जायची शक्ती देईल अशी मी आशा करतो.
16 का? कारण त्या दुष्ट माणसाने कधीही काहीही चांगले केले नाही,
    त्याने कधीच कुणावर प्रेम केले नाही.
    त्याने गरीब, असहाय्य लोकांचे आयुष्य कष्टी केले.
17 त्या दुष्ट माणसाला दुसऱ्या लोकांचे वाईट कर
    असे सांगायला आवडायचे म्हणून त्या वाईट गोष्टी त्या माणसालाच होऊ दे.
तो दुष्ट माणूस लोकांचे भले होवो
    असे कधीही म्हणाला नाही, म्हणून त्याचेही भले होऊ देऊ नकोस.
18 शाप हेच त्याचे कपडे असू दे.
शाप हेच त्याचे पिण्याचे पाणी असू दे.
    शाप हेच त्याच्या शरीरावरचे तेल असू दे.
19 शाप त्या दुष्ट माणसांच्या शरीराभोवती गुंडाळण्याचे वस्त्र असू दे,
    आणि शापच त्यांच्या कमरे भोवतीचा पट्टा असू दे.”

20 परमेश्वर या सगळ्या गोष्टी माझ्या शत्रूंच्या बाबतीत करील अशी मी आशा करतो.
    जे लोक मला ठार मारायचा प्रयत्न करीत आहेत,
    त्या सर्वांना परमेश्वर या गोष्टी करेल अशी मी आशा करतो.
21 परमेश्वरा, तू माझा प्रभु आहेस म्हणून
    तुझ्या नावाला गौरव प्राप्त होईल अशा रीतीने मला वागव.
माझ्यावर तुझे खूप प्रेम आहे म्हणून मला वाचव.
22 मी फक्त एक गरीब, असहाय्य माणूस आहे.
    मी खरोखरच दुखी: आहे आणि माझे ह्रदयविदीर्ण झाले आहे.
23 दिवसाच्या शेवटी येणाऱ्या लांब सावल्यांप्रमाणे माझे आयुष्य संपले आहे असे मला वाटते.
    कुणीतरी झटकून टाकलेल्या किड्याप्राणे मी आहे असे मला वाटते.
24 मी भुकेला असल्यामुळे माझ्या गुडघ्यातली शक्ती क्षीण झाली आहे.
    माझे वजन घटते आहे आणि मी बारीक होत आहे.
25 वाईट लोक माझा अपमान करतात.
    ते माझ्याकडे बघतात आणि त्यांच्या माना हलवतात.
26 परमेश्वरा, देवा, मला मदत कर.
    तुझे खरे प्रेम दाखव आणि माझा उध्दार कर.
27 नंतर त्या लोकांना तू मला मदत केल्याचे कळेल.
    तुझ्या शक्तीनेच मला मदत केली हे त्यांना कळेल.
28 ते वाईट लोक मला शाप देतात.
    परंतु परमेश्वरा, तू मला आशीर्वाद देऊ शकतोस.
    त्यांनी माझ्यावर हल्ला केला म्हणून त्यांचा पराभव कर नंतर मी, तुझा सेवक आनंदी होईन.
29 माझ्या शत्रूंना लाज आण.
    त्यांना त्यांची लाजच अंगरख्या प्रमाणे घालायला लाव.
30 मी परमेश्वराला धन्यवाद दिले.
    खूप लोकांसमोर मी त्याची स्तुती केली.
31 का? कारण परमेश्वर असहाय्य लोकांच्या मदतीसाठी उभा राहातो
    जे लोक त्यांना ठार मारायची शिक्षा देतात त्यांच्यापासून देव त्यांना वाचवतो.