A A A A A
Bible Book List

स्तोत्रसंहिता 105 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

105 परमेश्वराला धन्यावाद द्या.
त्याच्या नावाचा धावा करा.
    राष्ट्रांना तो करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल सांगा.
परमेश्वराला गाणे गा; त्याची स्तुतिगीते गा.
    तो ज्या अद्भुत गोष्टी करतो त्याबद्दल सांगा.
परमेश्वराच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा.
    तुम्ही लोक परमेश्वराला शोधत आला, सुखी व्हा.
शक्तीसाठी परमेश्वराकडे जा.
    मदतीसाठी नेहमी त्याच्याकडे जा.
तो ज्या आश्चर्यकारक गोष्टी करतो त्याची आठवण ठेवा त्याचे चमत्कार
    आणि त्याचे शहाणपणाचे निर्णय याची आठवण ठेवा.
तुम्ही त्याचा सेवक अब्राहाम याचे वंशज आहात.
    तुम्ही याकोबाचे, देवाने निवडलेल्या माणसाचे वंशज आहात.
परमेश्वर आपला देव आहे.
    परमेश्वर सर्व जगावर [a] राज्य करतो.
परमेश्वर देवाच्या कराराची सदैव आठवण ठेवा.
    हजारो पिढ्या त्याच्या आज्ञांची आठवण ठेवा.
देवाने अब्राहामा बरोबर करार केला.
    देवाने इसहाकाला वचन दिले.
10 नंतर त्याने याकोबासाठी नियम केला.
    देवाने इस्राएल बरोबर करार केला.
    तो सदैव राहील.
11 देव म्हणाला, “मी तुला कनानची जमीन देईन.
    ती जमीन तुझ्या मालकीची होईल.”
12 अब्राहामाचे कुटुंब लहान होते, तेव्हा देवाने हे वचन दिले.
    ते केवळ काही वेळ तिथे घालवणारे परके लोक होते.
13 ते एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात,
    एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करत होते.
14 पण देवाने लोकांना त्यांना वाईट वागणूक देऊ दिली नाही.
    देवाने राजांना त्यांना दुख: न देण्याची ताकीद दिली.
15 देव म्हणाला, “मी निवडलेल्या माणसांना दुख: देऊ नका.
    माझ्या संदेष्ट्यांचे काही वाईट करु नका.”
16 देवाने त्या देशात दुष्काळ आणला.
    लोकांना खायला पुरेसे अन्न नव्हते.
17 पण देवाने योसेफ नावाच्या माणसाला त्यांच्या पुढे पाठवले.
    योसेफ गुलामा सारखा विकला गेला.
18 त्यांनी योसेफाच्या पायाला दोर बांधले.
    त्यांनी त्याच्या मानेभोवती लोखंडी कडे घातले.
19 योसेफाने सांगितलेल्या गोष्टी प्रत्यक्ष घडेपर्यंत तो गुलामच राहिला.
    परमेश्वराच्या संदेशामुळे योसेफ बरोबर होता हे सिध्द् झाले.
20 तेव्हा मिसरच्या राजाने त्याला मोकळे सोडले.
    राष्ट्रांच्या प्रमुखाने त्याला तुरुंगातून बाहेर काढले.
21 त्याने योसेफाला आपल्या घराचा मुख्य नेमले.
    योसेफाने त्याच्या मालकीच्या सर्व वस्तूंची काळजी घेतली.
22 योसेफाने इतर प्रमुखांना सूचना दिल्या.
    योसेफाने वृध्दांना शिकवले.
23 नंतर इस्राएल मिसरमध्ये आला.
    याकोब हामच्या देशातच राहिला.
24 याकोबाचे कुटुंब खूप मोठे झाले.
    ते त्यांच्या शत्रूंपेक्षा खूप बलवान झाले.
25 म्हणून मिसरचे लोक याकोबाच्या कुटुंबाचा द्वेष करु लागले.
    त्यांनी त्याच्या गुलामांविरुध्द योजना आखल्या.
26 म्हणून देवाने त्याचा सेवक मोशे आणि
    देवाने निवडलेला त्याचा याजक अहरोन यांना पाठविले.
27 देवाने मोशे आणि अहरोन यांचा हामच्या देशात
    अनेक चमत्कार करण्यात उपयोग करुन घेतला.
28 देवाने अतिशय दाट काळोख पाठवला,
    पण मिसरमधल्या लोकांनी त्याचे ऐकले नाही.
29 म्हणून देवाने पाण्याचे रक्तात रुपांतर केले
    आणि सगळे मासे मेले.
30 त्यांचा देश बेडकांनी भरुन गेला.
    राजाच्या शयनकक्षात देखील बेडूक होते.
31 देवाने आज्ञा केली आणि
    माशा व चिलटे आली. ती सगळीकडे होती.
32 देवाने पावसाचे गारात रुपांतर केले.
    सर्व देशांत विजा पडल्या.
33 देवाने त्यांच्या द्राक्षांच्या वेली व अंजीराची झाडे नष्ट केली.
    देवाने त्यांच्या देशातले प्रत्येक झाड नष्ट केले.
34 देवाने आज्ञा केली आणि टोळ व नाकतोडे आले.
    ते संख्येने इतके होते की ते मोजता येत नव्हते.
35 टोळ व नाकतोड्यांनी देशातली सर्व झाडे खाऊन टाकली.
    त्यांनी शेतातली सर्व पिके खाल्ली.
36 आणि नंतर देवाने त्यांच्या देशातल्या सर्व पहिल्या अपत्यांना ठार मारले.
    देवाने त्यांच्या मोठ्या मुलांना मारले.
37 नंतर देवाने त्यांच्या माणसांना मिसरबाहेर काढले.
    त्यांनी बरोबर सोने आणि चांदी आणली.
    देवाचा कुठलाही माणूस ठेच लागून पडला नाही.
38 देवाचे लोक गेल्याचे पाहून मिसरला आनंद झाला.
    कारण त्यांना देवाच्या लोकांची भीती वाटत होती.
39 देवाने ढग पांघरुणासारखे पसरले.
    देवाने अग्नीच्या खांबाचा रात्री प्रकाशासाठी उपयोग केला.
40 लोकांनी अन्नाची मागणी केली आणि देवाने लावे आणले.
    देवाने त्यांना स्वर्गातली भाकरी भरपूर दिली.
41 देवाने खडक फोडला आणि त्यातून पाणी उसळून बाहेर आले.
    वाळवटांत नदी वाहू लागली.

42 देवाला त्याच्या पवित्र वचनाची आठवण होती.
    देवाला त्याचा सेवक अब्राहाम याला दिलेल्या वचनाची आठवण आली.
43 देवाने त्याच्या माणसांना मिसरमधून बाहेर आणले.
    लोक आनंदाने नाचत बागडत, गाणी म्हणत बाहेर आले.
44 देवाने त्याच्या माणसांना इतर लोक राहात असलेला देश दिला.
    देवाच्या माणसांना इतरांनी काम करुन मिळवलेल्या वस्तू मिळाल्या.
45 देवाने असे का केले?
त्याच्या माणसांनी त्याचे नियम पाळावे म्हणून त्यांनी त्याची
    शिकवण काळजीपूर्वक आचरावी म्हणून,

परमेश्वराची स्तुती करा.

Footnotes:

  1. स्तोत्रसंहिता 105:7 परमेश्वर … जग शब्दश: “त्याच्या आज्ञा सर्व पृथ्वीवर आहेत.”
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes