Añadir traducción en paralelo Imprimir Opciones de la página

दावीदाचे एक स्तोत्र.

32 ज्याच्या अपराधांची क्षमा केली गेली
    आहे तो अत्यंत सुखी आहे
    ज्याचे अपराध पुसले गेले आहेत तो फार सुखी आहे.
परमेश्वर ज्याला निरपराध म्हणतो तो सुखी आहे.
    जो स्वत:चे गुप्त अपराध लपवीत नाही तो सुखी आहे.

देवा, मी पुन्हा पुन्हा तुझी प्रार्थना केली
    परंतु माझ्या गुप्त अपराधांची वाच्यता केली नाही
    प्रत्येक प्रार्थनेच्या वेळी मी क्षीण होत गेलो.
देवा, रात्रंदिवस तू माझे आयुष्य अधिक बिकट करीत गेलास,
    मी उष्ण उन्हाळी दिवसांतील जमिनीसारखा शुष्क होत गेलो.

परंतु नंतर मी परमेश्वरा पुढे माझे अपराध कबूल करण्याचा निर्णय घेतला.
    परमेश्वरा, मी तुला माझे अपराध सांगितले.
    आणि तू मला माझ्या सर्व अपराधांबद्दल क्षमा केलीस.
याच कारणासाठी देवा तुझ्या सर्व भक्तांनी तुझी प्रार्थना करायला हवी.
    संकटे जेव्हा महापुरासारखी येतात तेव्हा ती तुझ्या भक्तांपर्यंत नक्कीच जाणार नाहीत.
देवा, तू माझी लपण्याची जागा आहेस.
    तू माझे माझ्या संकटांपासून रक्षण करतोस
तू माझ्या भोवती कडे करतोस आणि माझे रक्षण करतोस
    म्हणून मी तू मला कसे वाचवलेस त्याचे गाणे गातो.
परमेश्वर म्हणतो, “मी तुला आयुष्य कसे जगायचे
    या विषयी मार्गदर्शन करीन.
    मी तुझे रक्षण करीन आणि तुझा मार्गदर्शक होईन.
म्हणून घोड्यासारखा वा गाढवासारखा मूर्ख होऊ नकोस, त्या प्राण्यांना आवरण्यासाठी लगाम वापरायलाच हवा.
    या गोष्टीशिवाय ते प्राणी तुमच्या जवळ येणार नाहीत.”

10 वाईट लोकांना खूप दु:ख भोगावे लागेल,
    परंतु जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात त्यांच्या भोवती देवाच्या खऱ्या प्रेमाचे कडे आहे.
11 चांगल्या लोकांनो! परमेश्वराच्या ठायी आपला आनंद व सुख व्यक्त करा.
    शुध्द मनाच्या सर्व लोकांनो आनंदी व्हा!