A A A A A
Bible Book List

शास्ते 3 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

परमेश्वराने इतर राष्ट्रातील त्या लोकांना इस्राएलींचा प्रदेश सोडण्यास भाग पाडले नाही. परमेश्वराला इस्राएल लोकांची परिक्षा घ्यायची होती. या पिढीतील इस्राएल लोकांनी कनानातील देश काबीज करण्यासाठी लढाईत भाग घेतला नव्हता. तेव्हा त्या राष्ट्रांमधील लोकांना परमेश्वराने तेथेच राहू दिले. (कधी युद्ध माहीत नसलेल्या या इस्राएल लोकांना धडा शिकवण्यासाठी परमेश्वराने असे केले.) तेथे राहू दिलेल्या राष्ट्रांची नावे अशी. पलिष्ठ्यांचे पाच राजे, सर्व कनानी लोक, सीदोनी, व बआल-हर्मोनच्या डोंगरापासून ते लेबो हमाथपर्यंतच्या लबानोन डोंगरावर राहणारे हिव्वी. या योगे इस्राएल लोकांची परीक्षा पाहावी आणि मोशेमार्फत त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या आज्ञा ते पाळतात की नाही हे पाहावे म्हणून परमेश्वराने असे केले.

कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी या लोकांबरोबर इस्राएल लोक राहिले. इस्राएल लोकांनी त्यांच्याशी बेटीव्यवहार केला. त्यांच्या मुलींशी लग्ने केली. तसेच आपल्या मुली त्यांच्या मुलांना दिल्या. तसेच त्यांच्या दैवतांची इस्राएल लोक उपासना करु लागले.

पहिला न्यायाधीश अथनिएल

इस्राएल लोक दुर्वर्तन करत आहेत हे परमेश्वराने पाहिले. ते त्यांचा देव परमेश्वर ह्याला विसरले आणि बआल हे दैवत व अशेरा देवी यांची उपासना करु लागले. त्यामुळे परमेश्वर इस्राएल लोकांवर संतप्त झाला. मेसोपटेमियाचा राजा कुशन-रिशाथईम याचे करवी परमेश्वराने इस्राएल लोकांचा पराभव होऊ दिला व त्याची सत्ता त्यांच्यावर आणली. इस्राएल लोक आठ वर्षे त्याच्या अंमलाखाली होते. तेव्हा इस्राएल लोकांनी मदतीसाठी परमेश्वराचा धावा केला. तेव्हा परमेश्वराने अथनिएलला त्यांच्या रक्षणासाठी पाठवले. कालेबचा धाकटा भाऊ कनाज याचा अथनिएल मुलगा होता. त्यांने इस्राएल लोकांचे रक्षण केले. 10 अथनिएलावर परमेश्वराचा आत्मा आला आणि तो इस्राएल लोकांचा न्यायाधीश झाला. त्याने इस्राएली सैन्याला लढाईस नेले. परमेश्वराच्या मदतीने अथनिएल ने कुशन-रिशाथईमचा पराभव केला. 11 आणि कनाजपुत्र अथनिएलच्या मृत्यूपर्यंत चाळीस वर्षे त्या प्रदेशात शांतता होती.

दुसरा न्यायाधीश एहूद

12 पुन्हा इस्राएल लोक परमेश्वराच्या दृष्टीने वाईट असे आचरण करु लागले. ते परमेश्वराने पाहिले. तेव्हा मवाबचा राजा एग्लोन याला इस्राएल लोकांना पराभूत करण्याचे सामर्थ्य परमेश्वराने दिले. 13 अम्मोनी आणि अमालेकी लोकांची मदत त्याला मिळाली. त्यांनी इस्राएल लोकांवर एकत्रित हल्ला केला. एग्लोनच्या सैन्याने इस्राएलवर विजय मिळवला व त्यांना यरीहो हे खजुरीच्या झाडांचे नगर सोडायला भाग पाडले. 14 पुढे एग्लोन या मवाबच्या राजाने इस्राएलींवर अठरा वर्षे राज्य केले.

15 त्यांनी पुन्हा परमेश्वराचा धावा केला तेव्हा परमेश्वराने एहूदला लोकांच्या रक्षणासाठी पाठवले. एहूद हा डावरा असून, बन्यामीनच्या वंशातील गेरा याचा मुलगा होता. इस्राएल लोकांनी एहूदला नजराणा घेऊन एग्लोनकडे पाठवले. 16 एहूदने एक अठरा इंच [a] लांबीची दुधारी तलवार बनवून घेतली आणि ती उजव्या मांडीवर कपड्याखाली झाकली जाईल अशी बांधली.

17 मग मवाबचा राजा एग्लोन याच्याकडे तो नजरणा घेऊन गेला. (एग्लोन हा अतिशय लठ्ठ होता.) 18 एहूदने एग्लोनला नजराणा दिला व तो बरोबर घेऊन आलेल्यांना त्याने पाठवून दिले. 19 त्यांनी राजवाडा सोडला जेव्हा एहूद गिलगालमधील मुर्तीजवळ आला तेव्हा तो मागे फिरला आणि राजाला भेटण्यासाठी परत गेला. एहूद राजा एग्लोनला म्हणाला, “हे राजा, मी तुझ्यासाठी एक गुप्त संदेश आणला आहे.”

राजाने त्याला गप्प बसायची खूण करुन सर्व नोकरचाकरांना दालनाच्या बाहेर जायला सांगितले. 20 एहूद राजाच्या अगदी जवळ गेला. एग्लोन आता आपल्या राजवाड्याच्या दालनात अगदी एकटा होता.

तेव्हा एहूद म्हणाला, “तुला देवाकडून एक संदेश आहे.” राजा सिंहासनावरुन उठला आता तो एहूदच्या अगदी निकट होता. 21 राजा उठल्याबरोबर उजव्या मांडीवर बांधलेली तलवार एहूदने डाव्या हाताने उपसली आणि राजाच्या पोटात खुपसली. 22 तलवारीचे पाते थेट मुठीपर्यंत राजाच्या शरीरात घुसले. राजाच्या अंगातील चरबीने पाते बरबटले. तेव्हा एहूदने ती तशीच तेथे राहू दिली.

23 मग तो बाहेर पडला आणि दालनाचे दरवाजे बंद करुन त्याने त्यांना कुलूप लावले. 24 एहूद बाहेर पडल्याबरोबर सेवक आत शिरले. पाहतात तो दरवाजे बंद केलेले. ते पाहून, राजा स्वच्छतागृहात असेल असे त्यांना वाटले. 25 ते तसेच बाहेर बराच वेळ थांबले. शेवटी त्यांना काळजी वाटायला लागली. किल्ली आणून त्यांनी कुलूप उघडून दार उघडले. आत शिरतात तर जमिनीवर त्यांना राजाचा मृतदेह पसरलेला दिसला.

26 नोकर राजाच्या दालनाबाहेर वाट पाहात होते तेवढ्या वेळात एहूद निसटून जाऊ शकला. मूर्तीवरुन पुढे जाऊन तो सेईराकडे निघाला. 27 तो सेईरा येथे पोचला तेव्हा लगेच त्याने एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात रणशिंग फुंकले. इस्राएल लोकांनी तो आवाज ऐकला आणि ते खाली उतरले, एहूद त्यांच्या पुढे निघाला. 28 तो म्हणाला, “माझ्या मागोमाग या, आपला शत्रू मवाब याला पराभूत करायला परमेश्वराने आपल्याला मदत केली आहे.”

तेव्हा इस्राएल लोक त्याच्या पाठोपाठ निघाले. यार्देन नदी सहजगत्या पार करुन जिथून मवाब प्रदेशात जाता येते अशा सर्व जागांचा त्यांनी ताबा घेतला. कोणालाही त्यांनी यार्देन पार करु दिली नाही. 29 मवाबांपैकी जवळजवळ दहाहजार शूर आणि कणखर लोकांना इस्राएल लोकांनी ठार केले. एकही मवाब व्यक्ती पळून जाऊ शकला नाही. 30 त्या दिवसापासून इस्राएल लोकांचे मवाबांवर राज्य सुरु झाले. पुढे ऐंशी वर्षे त्या प्रदेशात शांतता नांदली.

तिसरा न्यायाधीश शमगार

31 एहूदनंतर आणखी एक जण इस्राएल लोकांच्या रक्षणाला आला तो म्हणजे अनाथचा मुलगा शमगार, त्याने बैलाच्या आरीने पलिष्ट्यांपैकी सहाशे जणांना मारले.

Footnotes:

  1. शास्ते 3:16 अठरा इंच शब्दश, “हातभर लांब.”
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes