Añadir traducción en paralelo Imprimir Opciones de la página

बोखीम येथे परमेश्वराचा दूत

परमेश्वराचा दूत गिलगाल नगरातून बोखीम या नगरात आला. इस्राएल लोकांना त्याने परमेश्वराचा संदेश सांगितला. संदेश असा होता; “मी तुम्हाला मिसरमधून बाहेर आणले. तुमच्या पूर्वजांना वचन दिलेल्या प्रदेशापर्यंत तुम्हाला आणले. तुमच्याशी केलेला करार मी मोडणार नाही असे मी तुम्हाला सांगितले होते. त्यामुळे तुम्ही त्या प्रदेशात राहणाऱ्यां लोकांशी करार करू नका. त्यांच्या वेद्यां उध्वस्त करा असे मी तुम्हाला स्पष्ट सांगितले होते, पण तुम्ही माझे ऐकले नाही.”

“म्हणून मी म्हणतो, ‘आता या लोकांना त्यांचा देश सोडून जायला मी भाग पाडणार नाही. तुमच्यापुढे ते समस्या निर्माण करतील. त्यांचा पाश तुमच्याभोवती पडेल. त्यांच्या खोट्या देवता जाळ्यांप्रमाणे तुम्हाला अडकवून टाकतील.’”

देवदूताने परमेश्वराचा हा संदेश इस्राएल लोकांना ऐकवल्यावर ते आक्रोश करु लागले. म्हणून त्या ठिकाणाचे नाव त्यांनी बोखीम असे ठेवले. बोखीम येथे त्यांनी परमेश्वरासाठी यज्ञ केले.

आज्ञाभंग आणि पराभव

मग यहोशवाने सर्वाना घरी जायला सांगितले. तेव्हा सर्व वंशांचे लोक आपापल्या वतनाचा ताबा घ्यायाला परतले. यहोशवाच्या हयातीत आणि त्याच्या मृत्यूनंतर. वडीलधारी मंडळी जिवंत असे पर्यंत इस्राएलचे लोक परमेश्वराची उपासना करत होते. या वृध्द मंडळीनी परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी केलेल्या महान गोष्टी पाहिल्या होत्या. परमेश्वराचा सेवक नूनपुत्र यहोशवा एकशेदहा वर्षांचा होऊन वाराला. इस्राएल लोकांनी त्याचे दफन केले. तिम्नाथ-हेरेस येथे, गाश डोंगराच्या उत्तरेस एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात त्याला मिळालेल्या जमिनीत त्याला त्यांनी पुरले.

10 जुन्या पिढीतील सर्व मृत्यू पावल्यानंतर नवीन पिढी पुढे आली. त्यांना परमेश्वराविषयी आणि परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी काय केले याविषयी काहीही माहिती नव्हती. 11 तेव्हा या इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट अशी दृष्कृत्ये केली आणि बआल या दैवताच्या भजनी लागले. हे निंद्य कृत्य करताना त्यांना परमेश्वराने पाहिले. 12 परमेश्वराने इस्राएल लोकांना मिसरमधून बाहेर आणले होते. आणि त्यांच्या पूर्वजांनी परमेश्वराची उपासना केली होती. पण आता या इस्राएल लोकांनी परमेश्वराचे अनुसरण करण्याचे सोडून दिले होते. आणि त्यांच्या अवती भोवतीच्या लोकांच्या खोट्या दैवतांची पूजा करायला सुरुवात केली होती. याचा परमेश्वराला संताप आला. 13 इस्राएल लोकांनी आता परमेश्वराला सोडून बआल आणि अष्टारोथ यांची उपासना करायला सुरुवात केली.

14 परमेश्वराचा इस्राएल लोकांवर कोप झाल्यामुळे त्यांच्यावर शत्रू चाल करुन येऊ लागला व त्यांना लुटू लागला. भोवताली राहणाऱ्या शत्रूंकडून ते पराभूत होऊ लागले. इस्राएल लोकांना शत्रूपासून आपले रक्षण करता येईना. 15 लढाईत त्यांना नेहमी अपयश येऊ लागले. परमेश्वराची साथ आता त्यांना नसल्यामुळे ते पराजित होऊ लागले. त्यांच्या भोवती राहणाऱ्या लोकांच्या दैवतांची सेवा केल्यास इस्राएल लोकांना पराभव पत्करावा लागेल हे परमेश्वराने आधीच बजावले होते.

16 तेव्हा परमेश्वराने न्यायाधीश म्हणून, ओळखल्या जाणाऱ्या नेत्यांची नेमणूक केली. हे नेते इस्राएलांचा ताबा घेणाऱ्या शत्रुंपासून त्यांची सुटका करीत. 17 इस्राएल लोक या न्यायाधीशांनाही जुमानीतनासे झाले. आपल्या परमेश्वराशी इस्राएल लोक निष्ठावंत राहिले नाहीत ते इतर दैवतांच्या भजनी लागले. [a] पूर्वी या इस्राएल लोकांचे पूर्वज परमेश्वराच्या आज्ञा पाळत असत. पण आता त्यांच्या वागणुकीत बदल झाला आणि परमेश्वराने सांगितलेला मार्ग त्यांनी सोडून दिला.

18 अनेकदा शत्रु इस्राएलांचा जाच करत. अशावेळी ते मदतीलाठी परमेश्वराचा धावा करीत आणि तेव्हा त्यांची दया येऊन परमेश्वर त्यांच्या सुटकेसाठी न्यायाधीशाला पाठवी. परमेश्वर या न्यायाधीशांच्या बरोबर होता. म्हणून इस्राएल लोकांचे दरवेळी शत्रूंपासून रक्षण झाले. 19 पण प्रत्येक न्यायाधीशाच्या मृत्यूनंतर ते पुन्हा पुन्हा पापाकडे झुकत आणि अन्य दैवतांची उपासना करत आणि त्यांची सेवा करत असत. त्यांच्या पूर्वजांपेक्षाही ते अधिक वाईट वागत असत. त्यांच्या आडमुठ्या स्वभावामुळे आपल्या दुर्वतनात फरक करायला त्यांनी नकार दिला.

20 तेव्हा परमेश्वराचा इस्राएल लोकांवर अतिशय संताप झाला व तो म्हणाला, “मी यांच्या पूर्वजांशी केलेला करार या राष्ट्राने मोडला आहे. त्यांनी माझे ऐकले नाही. 21 तेव्हा मी यापुढे त्यांच्या शत्रूंचा पराभव करुन इस्राएल लोकांचा मार्ग मोकळा करत जाणार नाही. यहोशवा वारला तेव्हा जी राष्ट्रे या भूमीत होती त्यांना मी येथेच राहू देईन. 22 इस्राएल लोकांच्या कसोटीसाठी मी या राष्ट्रांचा वापर करीन. आपल्या पूर्वजांप्रमाणे आताचे इस्राएल लोक परमेश्वराची आज्ञा पाळतात का ते बघू.” 23 तेव्हा परमेश्वराने इतर राष्ट्रांना त्या त्या ठिकाणी राहू दिले. त्यांना तो देश लगेच सोडून जायची बळजबरी केली नाही. त्यांचा पराभव करायला परमेश्वराने यहोशवाच्या सैन्याला साहाय्य केले नाही.

Notas al pie

  1. शास्ते 2:17 आपल्या परमेश्वराशी … भजनीलागले शब्दश, “वेश्येप्रमाणे इतर दैवतांकडे वळले.”