A A A A A
Bible Book List

लेवीय 5 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

चुकून घडलेली वेगळी पापे

“एखाद्याने इतरांस सांगण्यासारखी सूचना ऐकली किंवा त्याने काही पाहिले किंवा ऐकले तर त्या बाबीसंबंधी त्याने साक्ष द्यावी; तो जर साक्ष द्यावयाचे नाकारील तर पाहिलेले किंवा माहीत असलेले न सांगण्याचे पाप केल्यामुळे तो दोषी ठरेल;

“किंवा कोणी अशुद्ध वस्तूला किंवा मेलेल्या वनपशुला किंवा अशुद्ध मानलेल्या पाळीव प्राण्याला वा अशुद्ध सरपटणाऱ्या गोष्टींना जरी न कळत शिवल्यामुळे अशुद्ध झाला तरीही तो दोषी ठरेल.

“माणसाच्या आंतून बाहेर पडणाऱ्या स्राव इत्यादि अनेक गोष्टी अशुद्ध असतात; एखादा माणूस दुसऱ्या माणसाच्या अशा अशुद्ध गोष्टीला न कळत शिवला व आपण अशुद्ध झालो आहो असे त्याला नंतर कळाले तर तो दोषी ठरेल.

“किंवा एखादी बरी किंवा वाईट गोष्ट करण्यासंबंधी कोणी घाईघाईने शपथ घेतली आणि नंतर ती पूर्ण करण्यास तो विसरला; परंतु नंतर त्याला ती आठवली तर आपली शपथ पूर्ण न केल्यामुळे तो दोषी होईल. तो अशा कोणत्याही गोष्टीविषयी दोषी ठरला तर त्याने पाप केलेली बाब कबूल करावी; आणि केलेल्या पापाबद्दल परमेश्वरासमोर त्याने दोषार्पण म्हणून मेंढी आणावी; आणि मग याजकाने त्या माणसाच्या पापाबद्दल प्रायश्चित करावे.

“त्याला कोंकरु देण्याची ऐपत नसेल तर आपण केलेल्या पापाबद्दल त्याने दोषार्पण म्हणून दोन होले किंवा पारव्याची दोन पिले परमेश्वरासमोर आणावी; त्यापैकी एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे. त्याने ती याजकापाशी आणावी; मग याजकाने पहिल्याने त्यातील पापार्पण अर्पावे; त्याने पक्ष्याची मुंडी मुरगाळून मोडावी परंतु त्याचे दोन भाग करु नयेत. पापार्पणाचे काही रक्त वेदीच्या भोंवती शिंपडावे व बाकीचे रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतावे; हे पापार्पण होय. 10 मग याजकाने दुसऱ्या पक्ष्याचा विधीप्रमाणे होम करावा; ह्याप्रमाणे त्याने केलेल्या पापाबद्दल याजकाने त्या माणसाकरिता प्रायश्चित करावे; आणि मग देव त्याला क्षमा करील.

11 “जर दोन होले किंवा पारव्याची दोन पिले देखील देण्याची त्याला ऐपत नसेल तर आपल्या पापाबद्दल त्याने एका एफाचा दहावा भाग मैदा त्याचे पापार्पण म्हणून आणावा; ते पापार्पण असल्यामुळे त्याने त्यावर तेल घालू नये किंवा त्याच्यावर धूप ठेवू नये. 12 त्याने तो मैदा याजकाकडे आणावा आणि याजकाने त्याच्यातून मूठभर मैदा घेऊन त्याचा स्मारक भाग म्हणून परमेश्वराकरिता होम करावा; हे पापार्पण होय. 13 अशा प्रकारे याजकाने त्याच्यासाठी प्रायश्चित करावे; आणि मग देव त्याला क्षमा करील; अन्नार्पणाप्रमाणे पापार्पणाचा उरलेला मैदा याजकाचा होईल.”

14 परमेश्वर मोशेला म्हणाला, 15 “परमेश्वराची कोणतीही पवित्र वस्तू [a] चुकून दूषित करुन कोणी पापी ठरला तर त्याने दोषार्पण म्हणून तू ठरवशील तितक्या किमतीचा दोष नसलेला मेंढा आणावा; 16 ज्या पवित्र वस्तूची विटंबना करुन त्याने पाप केले असेल तिची त्याने भरपाई करावी आणि तिच्या किंमतीचा पांचवा हिस्सा रक्कम त्याने याजकाला द्यावी; ह्याप्रकारे याजकाने हा दोषार्पणाचा मेंढा अर्पून त्या माणसाकरिता प्रायश्चित करावे; आणि मग देव त्याला क्षमा करील.

17 “परमेश्वराने मना केलेली एखादी गोष्ट करुन कोणाकडून चुकून किंवा न कळत पाप घडले तर तो दोषी ठरेल; त्या पापाबद्दल त्याने शिक्षा भोगावी. 18 त्याने दोष नसलेला एक मेंढा दोषार्पणासाठी याजकापाशी आणावा; हे दोषार्पण होय. अंशा रीतीने याजकाने त्या माणसाकडून नकळत घडलेल्या पापाबद्दल प्रायश्चित करावे; आणि मग देव त्याला क्षमा करील. 19 तो माणूस जरी त्याच्या हातून नकळत पाप घडले तरी तो दोषी आहे म्हणून परमेश्वरासाठी त्याने दोषार्पण अर्पावे.”

Footnotes:

  1. लेवीय 5:15 परमेश्वराच्या कोणतीही पवित्र वस्तू परमेश्वराला देण्यासाठी आश्वास केलेली परंतु प्रत्यक्षात देण्यास विसरून गेलेली ही कदाचित विशेष दाने असावीत.
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes