Añadir traducción en paralelo Imprimir Opciones de la página

चुकून केलेल्या पापांसाठी अर्पणे

परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांना असे सांग: जर कोणी परमेश्वराने मना केलेल्या कृत्यापैकी एखादे कृत्य केले वा चुकून त्याच्या हातून पाप घडले तर त्याने पुढील गोष्टी कराव्यातः

“जर अभिषेक झालेल्या याजकाने लोकावंर दोष येईल असे पाप केले तर आपल्या पापाबद्दल त्याने पापार्पण म्हणून कोणताही दोष नसलेला एक गोऱ्हा परमेश्वरासाठी अर्पावा. त्याने तो गोऱ्हा परमेश्वरासमोर दर्शनमंडपाच्या दारापाशी आणावा, त्याच्या डोक्यावर त्याने आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर त्याचा वध करावा. मग अभिषेक झालेल्या याजकाने गोऱ्ह्याचे थोडे रक्त घ्यावे व ते दर्शनमंडपात न्यावे; त्याने आपले बोट त्या रक्तात बुडवावे व परमेश्वरासमोर, परमपवित्र स्थानातील अंतरपटासमोर ते सात वेळा शिंपडावे. मग त्याने त्यातले काही रक्त घेऊन दर्शनमंडपापुढे परमेश्वरासमोर असलेल्या धूपवेदीच्या शिंगांना ते लावावे; मग त्या गोऱ्हाचे राहिलेले सगळे रक्त दर्शनमंडपाच्या दारापाशी असलेल्या होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे; आणि त्याने पापार्पणाच्या गोऱ्ह्याच्या आंतड्यावरील चरबी, त्यास लागून असलेली सर्व चरबी; दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कमरेजवळची चरबी आणि गुरद्यापर्यतच्या काळजावरील पडद्याची चरबी वेगळी करावी; 10 शांत्यर्पणात जसे हे भाग अर्पण करतात तसेच ते अर्पण करुन याजकाने त्यांचा होमवेदीवर होम करावा. 11 गोऱ्ह्याचे कातडे, आंतडी, सर्व मांस, डोके, पाय व शेण, 12 असा सर्व गोऱ्हा छावणी बाहेरील विधीपूर्वक नेमलेल्या व स्वच्छ केलेल्या ठिकाणी राख टाकण्याच्या जागेवर नेऊन लाकडाच्या विस्तवावर जाळून टाकावा.

13 “इस्राएलच्या सर्व राष्ट्राकडून चुकून काही पाप घडले आणि ते मंडळीच्या लक्षात आले नाही, म्हणजे परमेश्वराने मना केलेले एखादे कर्म केले तर ते सर्वजण दोषी ठरतील. 14 आणि मग जर ते त्यांच्या लक्षात आले तर त्यांनी सर्व इस्राएल लोकांकरिता पापार्पण म्हणून एक गोऱ्हा दर्शनमंडपाजवळ आणून अर्पावा. 15 मंडळीच्या वडिलांनी परमेश्वरासमोर त्या गोऱ्ह्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावे व परमेश्वरासमोर एकाने त्याचा वध करावा. 16 नंतर अभिषेक झालेल्या याजकाने त्या गोऱ्ह्याचे थोडे रक्त घ्यावे व ते दर्शनमंडपात न्यावे; 17 मग याजकाने त्या रक्तात आपले बोट बुडवून परमेश्वरासमोर, अंतरपटासमोर ते सात वेळा शिंपडावे. 18 मग त्याने दर्शनमंडपातील परमेश्वरासमोर असलेल्या वेदीच्या शिंगांना थोडे रक्त लावावे, व बाकीचे सर्व रक्त दर्शनमंडपापाशी असलेल्या होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे. 19 त्या गोऱ्ह्याची सर्व चरबी याजकाने काढून तिचा वेदीवर होम करावा; 20 पापार्पणाच्या गोऱ्ह्याच्या भागांचे जसे अर्पण करावयाचे तसेच ह्याच्याही भागांचे अर्पण करावे; अशा प्रकारे याजकाने इस्राएल लोकांसाठी प्रायश्चित करावे म्हणजे परमेश्वर देव त्यांच्या पापांची क्षमा करील. [a] 21 आधीचा गोऱ्हा जसा जाळून टाकावयाचा तसा हाही गोऱ्हा याजकाने छावणीच्या बाहेर नेऊन जाळून टाकावा. हे सर्व इस्राएल लोकांकरिता पापार्पण होय.

22 “एखाद्या अधिपतीने परमेश्वराने मना केलेले कर्म केले व चुकून पाप घडले तर तो दोषी ठरेल. 23 त्याने केलेले पाप जेव्हा त्याला कळून येईल तेव्हा त्याने एक दोष नसलेला बकरा अर्पिण्यासाठी आणावा; 24 त्याने त्या बकऱ्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर जेथे यज्ञपशूचा वध करतात तेथे त्याचा वध करावा. हे पापार्पण होय. 25 मग याजकाने त्या पापार्पणातील काही रक्त घेऊन ते आपल्या बोटाने होमवेदीच्या शिंगांना लावावे व बाकीचे रक्त होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे. 26 उपकारस्तुतीच्या अर्पणातील यज्ञपशूच्या चरबी प्रमाणे याजकाने ह्या बकऱ्याच्याही सर्व चरबीचा वेदीवर होम करावा; अशा प्रकारे त्या अधिपतीच्या पापाबद्दल याजकाने प्रायश्चित करावे, म्हणजे देव त्या अधिपतीला क्षमा करील.

27 “एखादा सामान्य माणूस परमेश्वराने मना केलेले एखादे कर्म केल्यामुळे चुकून पाप घडल्यामुळे दोषी ठरला; 28 आणि त्याने केलेले पाप त्याला कळून आले तर त्याने त्या पापाबद्दल अर्पण म्हणून एक दोष नसलेली बकरी आणावी; 29 त्याने त्या बकरीच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि होमबलीचा वध करतात तेथे तिचा वध करावा; 30 मग याजकाने त्या अर्पणातील काही रक्त घेऊन आपल्या बोटाने ते होमवेदीच्या शिंगांना लावावे आणि बाकीचे सर्व रक्त वेदीच्या पायथ्यावर ओतावे; 31 आणि याजकाने त्या बकरीच्या चरबीचा शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या चरबी प्रमाणे परमेश्वरासाठी सुवासिक हव्य म्हणून वेदीवर होम करावा; अशा प्रकारे याजकाने त्या सामान्य माणसाकरिता प्रायश्चित्त करावे म्हणजे परमेश्वर त्याला क्षमा करील.

32 “त्याने आपल्या अर्पणासाठी पापबली म्हणून कोंकरु आणले तर ती दोष नसलेली मादी असावी. 33 त्याने त्या कोंकराच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व जेथे होमबलीचा वध करतात तेथे पापार्पणाकरिता त्याला वधावे. 34 याजकाने त्या पापार्पणातील काही रक्त घेऊन ते आपल्या बोटाने होमवेदीच्या शिंगांना लावावे व बाकीचे वेदीच्या पायथ्याशी ओतावे. 35 त्याने शांत्यर्पणाच्या कोंकराच्या चरबी प्रमाणे त्याची सर्व चरबी काढून घ्यावी आणि होमवेदीवर तिचा परमेश्वरासाठी होम करावा. ह्या प्रमाणे त्याने केलेल्या पापाबद्दल याजकाने प्रायश्चित करावे म्हणजे देव त्याला क्षमा करील.

Notas al pie

  1. लेवीय 4:20 त्यांच्या पापांची क्षमा करील किंवा “प्रायश्चित करणे” हिब्रू शब्दाचा अर्थ “झाकणे” “लपवणे” किंवा “पापे खोडणे.”