Añadir traducción en paralelo Imprimir Opciones de la página

दीपवृक्ष आणि पवित्र भाकरs

24 परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांना आज्ञा कर की, दीप सतत तेवत राहून प्रकाश मिळावा म्हणून जैतुनाच्या हातकुटीचे शुद्ध तेल त्यांनी तुझ्याकडे घेऊन यावे; अहरोनाने दर्शनमंडपात साक्षपटासमोरील अंतरपटाबाहेर परमेश्वरासमोर संध्याकाळपासून सकाळपर्यंत दीप सतत तेवत ठेवावा; हा तुमचा पिढ्यान्पिढ्या कायमचा नियम होय. त्याने परमेश्वरासमोर शुद्ध सोन्याच्या दीपवृक्षावरील दिवे सतत तेवत ठेवावे.

“तू मैदा घेऊन त्याच्या बारा पोव्व्या भाज; एक पोळी दोन दशमांश एफाभर मैद्याचा करावा. त्यांच्या दोन रांगा करुन एका रांगेत सहा सहा पोव्व्या शुद्ध सोन्याच्या मेजावर परमेश्वरासमोर ठेवाव्यात. प्रत्येक रांगेवर धूप ठेव ह्यामुळे देवाला अग्नींतून केलेल्या अर्पणाचे ते प्रतीक असेल. दर शब्बाथ दिवशी अहरोनने त्या, परमेश्वरासमोर मांडाव्या; इस्राएल लोकांच्या वतीने हा सर्वकाळचा करार होय. ती भाकर अहरोन व त्याचे मुलगे ह्यांचा कायमचा वाटा होय; त्यांनी ती पवित्र ठिकाणी खावी; कारण कायमच्या नियमाप्रमाणे परमेश्वराला अर्पिलेल्या अर्पणांपैकी ती त्याला परमपवित्र होय.”

देवाला शिव्याशाप देणारा माणूस

10 त्याकाळीं कोणा एक इस्राएल स्त्रीला मिसरी-पुरुषापासून झालेला एक मुलग होता; तो इस्राएली होता व इस्राएल लोकांप्रमाणे वागत होता. तो छावणीत एका इस्राएल माणसाशी भांडू लागला. 11 तो इस्राएल स्त्रीचा मुलगा परमेश्वराच्या नांवाची निंदा करुन शिव्याशाप देऊ लागला म्हणून लोकांनी त्याला मोशेकडे आणले. त्याच्या आईचे नांव शलोमीथ होते; ती दान वंशातील दिब्री ह्याची मुलगी होती; 12 त्याच्या संबंधी परमेश्वराची आज्ञा स्पष्टपणे कळावी म्हणून त्यांनी त्याला अटकेत ठेवले.

13 मग परमेश्वरदेव मोशेला म्हणाला, 14 “तुम्ही त्या शिव्याशाप देणाऱ्या माणसाला छावणीबाहेर न्या; मग जितक्यांनी ती निंदा ऐकली तितक्यांना एकत्र बोलावा; त्यांनी आपले हात त्या माणसाच्या डोक्यावर ठेवावे; आणि मग सर्व लोकांनी त्याला दगडमार करुन मारुन टाकावे. 15 तू इस्राएल लोकांना अवश्य सांग की जो कोणी आपल्या देवाला शिव्याशाप देईल त्याने आपल्या पापाची शिक्षा भोगावी. 16 जो कोणी परमेश्वराच्या नावाची निंदा करील त्याला अवश्य जिवे मारावे; सर्व मंडळीने त्याला दगडमार करावा; तो परदेशीय असो किंवा स्वदेशीय असो, त्याने परमेश्वराच्या नावाची निंदा केली तर त्याला अवश्य जिवे मारावे.

17 “जर एखादा माणूस दुसऱ्या माणसाला ठार मारील तर त्याला अवश्य जिवे मारावे. 18 जर कोणी दुसऱ्याच्या पशूस ठार मारील तर त्याने त्याच्या बदली दुसरा पशु देऊन भरपाई करावी.

19 “जो कोणी एखाद्याला दुखापत करील त्याला उलट त्याच प्रकारची दुखापत करावी. 20 हाड मोडल्याबद्दल हाड मोडणे, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात; ह्याप्रमाणे एखाद्याने कोणा माणसाला जी इजा केली असेल त्याच प्रकारची इजा त्याला केली जावी. 21 पशूला ठार मारणाऱ्याने त्याची भरपाई करावी, पण मनुष्य हत्या करणाऱ्याला अवश्य जिवे मारावे.

22 “परदेशीयांना व स्वदेशीयांना एकच नियम लागू असावा; कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे.”

23 मोशेने इस्राएल लोकांना ह्याप्रमाणे सांगितल्यावर त्यांनी त्या शिव्याशाप देणाऱ्या माणसाला छावणीबाहेर नेऊन दगडमार केला; अशाप्रकारे परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी केले.