A A A A A
Bible Book List

लेवीय 19 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

इस्राएल देवाचा आहे

19 परमेश्वर मोशेला म्हणाला, “सर्व इस्राएल लोकांना सांग की मी तुमचा देव परमेश्वर आहे! मी पवित्र आहे, म्हणून तुम्हीही पवित्र असलेच पाहिजे.

“तुमच्यातील प्रत्येकाने आपली आई व आपला बाप ह्यांचा मान राखलाच पाहिजे आणि माझे शब्बाथ पाळलेच पाहिजेत; मी तुमचा देव परमेश्वर आहे!

“तुम्ही मूर्तीपूजा करु नका, आपल्यासाठी ओतीव देव करु नका. मी तुमचा देव परमेश्वर आहे!

“तुम्ही परमेश्वरासाठी शांत्यर्पणाचा यज्ञ कराल तेव्हा तो असा करा की त्यामुळे तुम्ही मला मान्य व्हाल. त्या अर्पणाचे मांस यज्ञाच्या दिवशी व त्याच्या दुसऱ्या दिवशी खावे, पण तिसऱ्या दिवशी जर त्यातून काही उरले तर ते अग्नीत जाळून टाकावे. तिसऱ्या दिवशी त्यातील खाणे भयंकर पाप आहे; ते अर्पण मान्य होणार नाही. कोणी तसे करील तर ते पाप केल्यामुळे तो अपराधी ठरेल, कारण त्याने परमेश्वराच्या पवित्र वस्तूचा मान न राखता ती दूषित केली असे होईल; त्या माणसाला आपल्या लोकातून बाहेर टाकावे.

“तुम्ही हंगामाच्या वेळी आपल्या शेतातील पिकाची कापणी कराल तेव्हा, आपल्या शेताच्या कोनाकोपऱ्यातील झाडून सारेच पीक कापू नका व पीक काढून घेतल्यावर सरवा वेचू नका. 10 आपला द्राक्षमळाही झाडुन सारा खुडू नका, तसेच द्राक्षमळयात खाली पडलेली फळे गोळा करु नका; गोरगरीबांसाठी व तुमच्या देशातून प्रवास करणाऱ्या उपरी लोकांसाठी ती राहू द्यावी; मी तुमचा देव परमेश्वर आहे!

11 “तुम्ही चोरी करु नये, कोणाला फसवू नये व एकमेकाशीं खोटे बोलू नये. 12 तुम्ही माझ्या नांवाने खोटी शपथ वाहू नये; तसे कराल तर तुम्ही माझे मय न धरता माझ्या नांवाला कलंक लावाल. मी परमेश्वर आहे!

13 “आपल्या शेजाऱ्यावर जुलूम करु नका व त्याला लुबाडू नका; मजुराची मजुरी रात्रभर दिवस उजाडेपर्यंत आपल्याजवळ ठेवू नका.

14 “बहिऱ्याला शिव्याशाप देऊ नका; आंधळ्याने ठोकर लागून पडावे म्हणून एखाद्या वस्तूचे अडखळण त्याच्या वाटेत ठेवू नका; पण आपल्या देवाचा मान राखा-त्याचे भय बाळगा. मी परमेश्वर आहे!

15 “न्यायनिवाडा करताना कोणावर अन्याय करु नका तर योग्य न्याय द्या. न्यायदान करताना गरीब लोक व वजनदार लोक ह्यांना विशेष मर्जी दाखवू नका. आपल्या शेजाऱ्याचा न्याय करताना योग्य तोच न्याय द्या. 16 इतर लोकाविषयी खोट्यानाट्या गोष्टी सांगत इकडे तिकडे फिरु नका; आपल्या शेजाऱ्याचा जीव धोक्यात येईल असे काही करु नका. मी परमेश्वर आहे.

17 “आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष बाळगूं नका; आपल्या शेजाऱ्याने चुकीचे काही कृत्य केल्यास त्याची कान उघाडणी करावी, परंतु त्याच्या अपराधामध्ये सहभागी होऊ नये. 18 लोकांनी तुमचे वाईट केलेले विसरुन जावे, त्याबद्दल सूड घेण्याचा प्रयत्न करु नका तर आपल्या शेजाऱ्यावर स्वतः सारखी प्रीती करा. मी परमेश्वर आहे!

19 “तुम्ही माझे नियम पाळा. आपल्या पशूंचा भिन्न जातीच्या पशूंशी संकर करु नका; दोन जातीचे बी मिसळून ते आपल्या शेतात पेरु नका; भिन्न सूत एकत्र करुन विणलेला कपडा अंगात घालू नका.

20 “एकाद्या पुरुषाची स्त्री गुलाम, ती विकत घेतलेली नसेल किंवा खंडणी भरुन मुक्त झाली नसेल, अशा स्त्रीशी कोणी शरीर संबंध केल्यास त्या दोघांना शिक्षा व्हावी; परंतु तिची मुक्तता झाली नसल्यामुळे त्यांना जिवे मारु नये; 21 हे पाप केलेल्या माणसाने आपले दोषार्पण म्हणून एक मेंढा दोषार्पणासाठी, दर्शनमंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर आणावा; 22 आणि त्याने केलेल्या पापाबद्दल दोषार्पणाच्या मेंढ्याद्वारे त्याच्यासाठी याजकाने परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे; म्हणजे त्याने केलेल्या पापाची त्याला क्षमा होईल.

23 “तुम्ही आपल्या देशात जाऊन पाहोंचल्यावर खाण्यासाठी निरनिराळ्या प्रकारची फळ झाडे लावाल, तेव्हा फळ झाडे लावल्यावर तुम्ही तीन वर्षे थांबाबे, त्यांची फळे खाऊं नयेत. 24 पण चौथ्या वर्षी त्यांची सर्व फळे परमेश्वराची होतील; ती परमेश्वराच्या उपकारस्मरणाच्या यज्ञासाठी पवित्र समजावी. 25 मग पाचव्या वर्षी तुम्ही त्यांची फळे खावी. असे केल्याने त्यांना तुमच्यासाठी अधिकात अधिक फळे येतील. मी तुमचा देव परमेश्वर आहे!

26 “तुम्ही कोणतेही मांस रक्तासह खाऊ नका;

“तुम्ही काही जादू-टोणा, मंत्रतंत्र व शकूनमुहूर्त ह्यांच्याद्वारे भविष्य पाहण्याचा प्रयत्न करु नका.

27 “आपल्या डोक्याला घेर ठेवू नका; आपल्या दाढीचे कोपरे छाटू नका. 28 मृताची आठवण म्हणून अंगावर जखम करुन घेऊ नका. आपले अंग गोंदवून घेऊन नका. मी परमेश्वर आहे!

29 “तू आपल्या मुलीला वेश्या बनून भ्रष्ट होऊ देऊ नको, त्यामुळे तू तिच्या पावित्र्याचा मान राखीत नाहीस असे दिसेल. तुमच्या देशात वेश्या होऊ देऊ नका त्या प्रकारच्या पापाने तुमचा देश भ्रष्ट होऊ देऊ नका.

30 “तुम्ही माझे शब्बाथ, काम न करिता विसाव्याचे दिवस म्हणून पाळावे. तुम्ही माझ्या पवित्रस्थानाविषयी आदर बाळगावा. मी परमेश्वर आहे!

31 “सल्लामसलत विचारण्यासाठी पंचाक्षऱ्याकडे किंवा चेटक्याकडे जाऊ नका; त्यांच्या मागे लागू नका; ते तुम्हाला अशुद्ध करतील. मी तुमचा देव परमेश्वर आहे!

32 “वडीलधाऱ्यामाणसांना मान द्या; वृद्ध माणूस घरात आल्यास उठून उभे राहा; आपल्या देवाचे भय बाळगा. मी परमेश्वर आहे!

33 “कोणी परदेशीय तुमच्या देशात तुमच्याबरोबर राहात असेल तर त्याच्याशी वाईट वागू नका. 34 तुमच्याबरोबर राहणाऱ्या परदेशीय माणसाला स्वदेशीय माणसासारखेच माना; आणि त्याच्यावर स्वतः सारखीच प्रीती करा; कारण तुम्हीही एके काळी मिसरदेशात परदेशीय होता. मी तुमचा देव परमेश्वर आहे!

35 “लोकांचा न्याय करताना तुम्ही योग्य न्याय करावा; मोजण्यामापण्यात व तोलण्यात तुम्ही अन्याय करु नका. 36 तुमच्यापाशी खरी मापे, खरी वजने, खरे तराजू, खरा एफा व खरा हिन असावा. मी परमेश्वर तुमचा देव आहे! मीच तुम्हाला मिसर देशातून बाहेर आणले!

37 “म्हणून तुम्ही माझे विधी व नियम ह्यांची आठवण ठेवून ते पाळावे. मी परमेश्वर आहे.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes