Añadir traducción en paralelo Imprimir Opciones de la página

बाळंत झालेल्या मातांच्या शुद्धीकरणाविषयी नियम

12 परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांना सांग,

“जर स्त्री गर्भवत होऊन तिला मुलगा झाला तर तिने सात दिवस अशुद्ध राहावे; मासिक पाळीच्या वेळी जशी ती असते तशीच ती अशुद्ध समजावी. आठव्या दिवशी त्या मुलाची सुंता करावी. नंतर त्या स्त्रीला आपल्या रक्त स्त्रावापासून शुद्ध होण्यासाठी तेहतीस दिवस काढावे लागतील; त्या मुदतीत तिने कोणत्याही पवित्र वस्तूला शिवू नये व पवित्र स्थानात जाऊ नये. परंतु जर तिला मुलगी झाली तर मासिक पाळीच्या काळात जशी ती असते तसेच तिने चौदा दिवस अशुद्ध राहावे; तिला आपल्या रक्त स्त्रावापासून शुद्ध होण्यासाठी सहासष्ट दिवस लागतील.

“तिला मुलगा किंवा मुलगी झाल्यावर तिची शुद्धीहोण्याची मुदत पुरी झाली म्हणजे तिने होमार्पणासाठी एक वर्षाचे कोंकरु आणि पापार्पणासाठी पारव्याचे पिलू किंवा होला आणून दर्शनमंडपापाशी याजकाकडे द्यावीत. तिला कोकरु अर्पिण्याची ऐपत नसेल तर तिने दोन होले किंवा पारव्याची दोन पिले, एक होमार्पणासाठी व दुसरा एक पापार्पणासाठी आणावी. मग याजकाने ते होले किंवा ती पिले परमेश्वरासमोर अर्पून तिच्यासाठी प्रायश्चित करावे म्हणजे ती आपल्या रक्तस्त्रावापासून शुद्ध होईल; मुलगा किंवा मुलगी झालेल्या स्त्री विषयी हे नियम आहेत.”