A A A A A
Bible Book List

लूक 20 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

यहूदी पुढारी येशूला एक प्रश्न विचारतात

20 एके दिवशी येशू मंदिरात लोकांना शिक्षण देत असताना व सुवार्ता सांगत असताना एकदा एक मुख्य याजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक, वडीलजनांसह एकत्र वर त्याच्याकडे आले. ते त्याला म्हणाले, “आम्हांला सांग, कोणत्या अधिकाराने तू या गोष्टी करत आहेस! तुला हा अधिकार कुणी दिला?”

तेव्हा त्याने त्यास उत्तर दिले, “मी सुद्धा तुम्हांला एक प्रश्न विचारीन, तुम्ही मला सांगा: योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गापासून होता की मनुष्यापासून?”

त्यांनी आपसात चर्चा केली आणि म्हणाले, “जर आपण स्वर्गापासून म्हणावे, तर तो म्हणेल, तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही? पण जर आपण मनुष्यांकडून म्हणावे, तर सर्व लोक आपणांस दगडमार करतील कारण त्यांची खात्री होती की, योहान संदेष्टा होता.” म्हणून त्यांनी असे उत्तर दिले की, तो कोणापासून होता हे त्यांना माहीत नाही.

मग येशू त्यांस म्हणाला, “मग मी या गोष्टी कोणत्या अधिकाराने करतो हे तुम्हांला मी सुध्दा सांगणार नाही.”

देव आपला पुत्र पाठवितो

मग तो लोकांना ही गोष्ट सांगू लागला: “एका मनुष्याने द्राक्षमळा लावला. व तो काही शेतकऱ्यांना मोलाने देऊन बऱ्याच दिवसांसाठी दूर गेला. 10 हंगामाच्या वेळी त्याने नोकराला शेतकऱ्यांकडे पाठविले. यासाठी की, त्यांनी द्राक्षमळ्यातील काही फळे द्यावित. पण शेतकऱ्यांनी त्या नोकराला मारले व रिकाम्या हाताने परत पाठविले. 11 नंतर त्याने दुसऱ्या नोकराला पाठविले, पण त्यालासुद्धा त्यांनी मारले. त्या नोकराला त्यांनी लज्जास्पद वागणूक दिली. आणि रिकाम्या हाताने परत पाठविले. 12 तेव्हा त्याने तिसऱ्या नोकराला पाठविले. पण त्यालाही त्यांनी जखमी करुन बाहेर फेकून दिले.

13 “द्राक्षमळ्याचा मालक म्हणाला, ‘मी काय करु? मी माझा स्वतःचा प्रिय पुत्र पाठवतो. कदाचित ते त्याला मान देतील.’ 14 पण जेव्हा शेतकऱ्यांनी मुलाला पाहिले, तेव्हा त्यांनी आपसात चर्चा केली आणि म्हणाले, ‘हा तर वारस आहे, आपण त्याला ठार मारु, म्हणजे वतन आपले होईल.’ 15 त्यांनी त्याला द्राक्षमळ्याच्या बाहेर फेकले व ठार मारले.

“तर मग द्राक्षमळ्याचा मालक काय करील? 16 तो येईल आणि त्या शेतकऱ्यांना ठार मारील व तो द्राक्षमळा दुसऱ्यांना सोपवून देईल.”

त्यांनी हे ऐकले तेव्हा ते म्हणाले, “असे कधीही न होवो.” 17 येशूने त्यांच्याकडे पाहिले व म्हटले,

“‘तर मग जो दगड बांधणाऱ्यांनी नाकारला
    तोच कोनशिला झाला?’

असे जे लिहिले आहे त्याचा अर्थ काय? 18 जो कोणी त्याच्यावर पडेल त्याचे तुकडे होतील परंतु ज्या कोणावर तो पडेल त्याचा चुराडा होईल.”

19 नियमशास्त्राचे शिक्षक आणि मुख्य याजक यांनी त्याचवेळी त्याला अटक करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना लोकांची भीति वाटत होती. त्यांना त्याला अटक करायचे होते, कारण त्यांना माहीत होते की, हा दाखला त्याने त्यांनाच उद्देशून सांगितला होता.

यहूदी पुढारी येशूला फसविण्याचा प्रयत्न करतात

20 तेव्हा त्यानी त्याच्यावर पाळत ठेवली. आणि आपण प्रामाणिक आहोत असे भासविणारे हेर पाठविले. त्यांची अशी योजना होती की, त्याच्या बोलण्यात त्याला पकडावे म्हणजे त्यांना त्याला राज्यपालाच्या ताब्यात देऊन त्यांच्या अधिकाराच्या कक्षेत आणता आले असते. अधिकारामध्ये सुपूर्त करता आले असते. 21 म्हणून त्या हेरांनी त्याला प्रश्न विचारला. ते म्हणाले, “गुरुजी, आम्हांला माहीत आहे की, जे योग्य ते तुम्ही बोलता व शिकविता आणि तुम्ही पक्षपात करीत नाही. तर सत्याने देवाचा मार्ग शिकविता. 22 आम्ही कैसराला कर द्यावा हे योग्य आहे किंवा नाही?”

23 ते धूर्तपणे आपल्याला फसवू पाहत आहेत याची येशूला कल्पना होती. 24 “मला एक नाणे दाखवा. त्यावर कोणाचा मुखवटा व शिक्का आहे?”

ते म्हणाले, “कैसराचा.”

25 तेव्हा तो त्यांना म्हणाला, “कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला द्या.”

26 तेव्हा लोकांसमोर तो जे बोलला त्यात त्याला धरणे त्यांना शक्य झाले नाही. त्याच्या उत्तराने ते आश्चर्यचकित झाले. आणि शांत झाले.

काही सदूकी येशूला फसविण्याचा प्रयत्न करतात

27 मग पुनरुत्थान नाही असे म्हणणारे काही सदूकी त्याच्याकडे आले. त्यांनी त्याला प्रश्न विचारला. ते म्हणाले, 28 “गुरुजी मोशेने आमच्यासाठी लिहून ठेवले आहे की जर एखाद्याचा भाऊ मेला, व त्या भावाला पत्नी आहे पण मूल नाही, तर त्याच्या भावाने त्या विधवेशी लग्न करावे आणि भावासाठी त्याला मुले व्हावीत. 29 सात भाऊ होते. पाहिल्या भावाने लग्न केले व तो मूल न होता मेला. 30 नंतर दुसऱ्या भावाने तिच्याशी लग्न केले. 31 नंतर तिसऱ्याने तिच्याशी लग्न केले. सातही भावांबरोबर तीच गोष्ट घडली. कोणालाही मुले न होता ते मरण पावले. 32 नंतर ती स्त्रीही मरण पावली. 33 तर मग पुनरुत्थानाच्या वेळी ती कोणाची पत्नी होईल? कारण त्या सातांनीही तिच्याबरोबर लग्न केले होते.”

34 तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “या युगातले लोक लग्न करुन घेतात व लग्न करुन देतात. 35 परंतु जे लोक त्या येणाऱ्या युगामध्ये व मृतांच्या पुनरुत्थानामध्ये भाग घेण्यासाठी पात्र ठरतील, ते लग्न करुन घेणार नाहीत, आणि लग्न करुन देणार नाहीत 36 आणि ते मरणार नाहीत, कारण ते देवदूतासारखे आहेत. ते पुनरुत्थानाचे पुत्र असल्यामुळे ते देवाचे पुत्रही आहेत. 37 जळत्या झुडुपाविषयी मोशेने लिहिले, तेव्हा त्याने परमेश्वराला अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव आणि याकोबाचा देव असे म्हटले व मेलेलेसुद्धा उठविले जातात हे दाखवून दिले. 38 देव मेलेल्यांचा नाही तर जिवंतांचा देव आहे. सर्व लोक जे त्याचे आहेत ते जिवंत आहेत.”

39 काही नियमशास्त्राचे शिक्षक म्हणाले, “गुरुजी, उत्तम बोललात!” 40 तेव्हा त्याला आणखी प्रश्न विचारण्याचे धाडस कोणी केले नाही.

ख्रिस्त दावीदाचा पुत्र असेल काय?

41 परंतु तो त्यांना म्हणाला, “ख्रिस्त दावीदाचा पुत्र आहे असे ते कसे म्हणतात? 42 कारण दावीद स्वतः स्तोत्राच्या पुस्तकात म्हणतो,

‘प्रभु माझ्या प्रभूला म्हणाला:
तू माझ्या उजवीकडे बैस,
43     जोपर्यंत मी तुझ्या शत्रूला तुझ्या पायाखालचे आसन करीत नाही तोपर्यंत.’

44 अशा रीतिने दावीद त्याला ‘प्रभु’ म्हणतो, तर मग ख्रिस्त दावीदाचा पुत्र कसा?”

नियमशास्त्रातील शिक्षकांविरुद्ध इशारा

45 सर्व लोक हे ऐकत असताना तो शिष्यांना म्हणाला, “नियमशास्त्राच्या शिक्षकांविषयी सावध असा, त्यांना लांब झगे घालून फिरणे आवडते, 46 त्यांना बाजारात नमस्कार घेण्यास, सभास्थानात महत्त्वाच्या आसनावर व मेजवानीच्या वेळी मानाच्या जागी बसणे आवडते. 47 ते विधवांची घरे खाऊन फस्त करतात आणि देखाव्यासाठी लांब लांब प्रार्थना करतात. या माणसांना अत्यंत वाईट शिक्षा होईल.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes