A A A A A
Bible Book List

लूक 19 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

जक्कय

19 येशूने यरीहोत प्रवेश केला आणि यरीहोतून जात होता. तेथे जक्कय या नावाचा मनुष्य होता. तो मुख्य जकातदार होता आणि खूप श्रीमंत होता. येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता. परंतु गर्दीमुळे त्याला काही दिसेना, कारण तो बुटका होता. तेव्हा तो सर्वांच्या पुढे पळत गेला आणि त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला. कारण तो त्याच रस्त्याने पुढे जाणार होता.

येशू जेव्हा त्या ठिकाणी आला तेव्हा वर पाहून जक्कय याला म्हणाला, “जक्कया त्वरा कर आणि खाली ये. कारण आज मला तुझ्याच घरी राहायचे आहे.”

मग तो घाईघाईने खाली उतरला आणि आनंदाने त्याचे स्वागत केले. सर्व लोकांनी ते पाहिले, ते कुरकूर करु लागले. व म्हणू लागले की, “तो पापी माणसाचा पाहुणा होण्यास गेला आहे.”

परंतु जक्कय उभा राहिला व प्रभूला म्हणाला, “गुरुजी, जे माझे आहे त्यातील अर्धे मी गरिबांना दिले असे समजा व मी कोणाला फसवून काही घेतले असेल तर ते चौपट परत करीन.”

येशू त्याला म्हणाला, “आज या घराला तारण मिळाले आहे. कारण हा मनुष्यसुद्धा अब्राहामाचा पुत्र आहे. 10 कारण मनुष्याचा पुत्र जे हरवलेले ते शोधावयास व तारावयास आला आहे.”

देव तुम्हांला देतो त्या गोष्टींचा उपयोग करा

11 लोक या गोष्टी ऐकत असतानाच येशूने त्यांना आणखी एक गोष्ट सांगितली, कारण तो यरुशलेमाजवळ होता म्हणून त्यांनी असा विचार केला की, देवाचे राज्य तत्काळ प्रगट होणार आहे. 12 मग येशू म्हणाला, “कोणी एक उच्च कुळातील मनुष्य आपली त्या भागाचा सरदार म्हणून नियुक्ती करुन घेण्यासाठी व पुन्हा परतण्यासाठी दूरच्या देशी गेला. 13 त्याने त्याच्या नोकरांपैकी दहा नोकरांना बोलाविले. त्यांना त्याने दहा मोहरा [a] दिल्या. आणि तो त्यांना म्हणाला, ‘मी परत येईपर्यंत यावर व्यापार करा.’ 14 परंतु त्याचे प्रजाजन त्याचा द्वेष करीत असत त्यांनी त्याच्यामागे एक शिष्टमंडळ पाठविले, व सांगितले की, ‘या माणसाला आमचा राजा करु नका.’

15 “परंतु त्याची राजा म्हणून नेमणूक झाली व तो परत आला. त्याने ज्या नोकरांना पैसे दिले होते त्यांना बोलावणे पाठविले. यासाठी की, त्यांनी त्यापासून किती फायदा मिळविला हे पाहावे. 16 पहिला वर आला आणि म्हणाला, ‘धनी तुम्ही दिलेल्या नाण्यावर मी आणखी दहा नाणी मिळवली आहेत.’ 17 तेव्हा तो त्याला म्हणाला, ‘चांगल्या दासा, छान केलेस, तू थोडक्यांविषयी विश्वासू झालास, म्हणून तू दहा नगरांवर अधिकारी होशील.’

18 “मग दुसरा (नोकर) आला व म्हणाला, ‘तुमच्या पाच नाण्यांवर मी पाच नाणी आणखी मिळवली.’ 19 आणि तो त्याला म्हणाला, ‘तू पाच नगरांवर अधिकारी असशील.’

20 “मग दुसरा नोकर आला आणि म्हणाला, ‘धनी, आपण दिलेले नाणे मी हातरुमालात बांधून ठेवले होते. 21 आपण कठोर आहात, मला तुमची भीति वाटत होती. जे आपण ठेवले नाही, ते आपण काढता, आणि जे पेरिले नाही, ते कापता.’

22 “धनी त्यास म्हणाला, ‘दुष्ट माणसा, तुझ्याच शब्दांनी मी तुझा न्याय करतो. तुला ठाऊक होते की मी कडक शिस्तीचा माणूस आहे. मी जे दिले नाही ते घेतो आणि जे पेरले नाही त्याची कापणी करतो, 23 तर तू माझा पैसा पेढीवर का ठेवला नाहीस? मग जेव्हा मी परत आलो असतो तेव्हा ते मला व्याजासह मिळाले असते.’ 24 त्याच्याजवळ उभे राहणाऱ्यांना तो म्हणाला, ‘त्याच्याजवळून ते नाणे घ्या आणि ज्याच्याजवळ दहा नाणी आहेत, त्याला द्या.’

25 “ते त्याला म्हणाले, ‘धनी, त्याच्याजवळ दहा नाणी आहेत.’

26 “धन्याने उत्तर दिले, ‘मी तुम्हांला सांगतो, ज्याच्याजवळ आहे, त्याला अधिक दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही, ज्याच्याकडे जे काही असेल ते सुद्धा काढून घेतले जाईल. 27 परंतु मी राज्य करु नये अशी इच्छा करणाऱ्या माझ्या शत्रूंना येथे आणा आणि माझ्यासमोर ठार मारा.’”

येशू यरुशलेमेत प्रवेश करतो

28 येशूने या गोष्टी सांगितल्यावर तो वर यरुशलेमापर्यंत गेला. 29 जेव्हा तो वर जातच राहिला तेव्हा तो जैतून डोंगर म्हटलेल्या टेकडीनजिक असलेल्या बेथफगे आणि बेथानीजवळ आला तेव्हा त्याने आपल्या दोन शिष्यांना असे सांगून पाठविले की, 30 “तुमच्यासमोर असलेल्या खेड्यात जा. तुम्ही प्रवेश करताच, ज्यावर कोणी बसले नाही असे शिंगरु तुम्हास आढळेल. ते सोडून येथे आणा. 31 जर तुम्हांला कोणी विचारले की, तुम्ही ते का सोडता? तर म्हणा की, ‘प्रभूला याची गरज आहे.’”

32 ज्यांना पाठविले होते, ते गेले आणि त्याने सांगितल्याप्रमाणे त्यांस आढळले. 33 ते सोडीत असता त्याचा मालक त्यांना म्हणाला, “तुम्ही शिंगरु का सोडता?”

34 ते म्हणाले, “प्रभूला याची गरज आहे.” 35 त्यांनी ते येशूकडे आणले. त्यांनी आपले झगे शिंगरावर घातले आणि येशूला त्याच्यावर बसविले. 36 येशू रस्त्यावरुन जात असता लोक आपली वस्त्रे रस्त्यावर पसरीत होते.

37 जेव्हा तो जैतून डोंगराच्या उतरणीवर आला तेव्हा सर्व जनसमुदाय, त्यांनी जे चमत्कार पाहिले होते त्याबद्दल मोठ्या आनंदाने देवाची स्तुति करु लागले. 38 ते म्हणाले,

“‘प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो!’

स्वर्गात शांति आणि उर्ध्वलोकी देवाला गौरव!”

39 जमावातील काही परुशी येशूला म्हणाले, “गुरुजी, आपल्या शिष्यांना दटावा.”

40 त्याने उत्तर दिले, “मी तुम्हांला सांगतो, जर ते शांत बसतील तर हे धोंडे ओरडतील!”

येशू यरुशलेमासाठी रडतो

41 जेव्हा तो जवळ आला व त्याने शहर पाहिले, तेव्हा तो त्यासाठी रडला. आणि म्हणाला, 42 “जर आज कोणत्या गोष्टी तुला शांति देतील हे माहीत असते तर! परंतु आता ते तुझ्या नजरेपासून लपवून ठेवण्यात आले आहे. 43 तुझ्यावर असे दिवस येतील की, तुझे शत्रु तुझ्याभोवती कोट उभारतील. तुला वेढीतील, आणि सर्व बाजूंनी तुला कोंडीत पकडतील. 44 ते तुला, तुझ्या मुलांना तुझ्या भिंतीच्या आत धुळीस मिळवतील. व दगडावर दगड राहू देणार नाही. कारण देवाचा तुझ्याकडे येण्याचा समय तू ओळखला नाही.”

येशूचा मंदिरात प्रवेश

45 येशूने मंदिरात प्रवेश केला व जे विक्री करीत होते, त्यांना बाहेर हाकलू लागला. 46 तो त्यांस म्हणाला, “असे लिहिले आहे की, ‘माझे घर प्रार्थनेचे घर होईल!’ पण तुम्ही ते ‘लुटारुची गुहा केली आहे.’” [b]

47 तो दररोज मंदिरात शिकवीत असे. मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक, लोकांचे पुढारी त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करीत होते. 48 पण तसे करण्यासाठी त्यांना काही मार्ग सापडत नव्हता. कारण सर्व लोक त्याच्या शब्दांनी खिळून गेले होते.

Footnotes:

  1. लूक 19:13 दहा मोहर एका मजुराच्या तीन महिन्यांच्या पगाराइतकी एक मोहरेची किंमत.
  2. लूक 19:46 पाहा यिर्मया 7:11
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes