Añadir traducción en paralelo Imprimir Opciones de la página

पापात मेलेले पण ख्रिस्तात जिवंत

तर मग आपण काय म्हणावे? देवाची कृपा वाढावी म्हणून आपण पापांत राहावे काय? खात्रीने नाही. आपण जे पापाला मेलो ते अजूनही जिवंत कसे राहू? तुम्हांला माहीत नाही का की ज्या आपण प्रभु येशू ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला होता त्या आपला त्याच्या मरणातही बाप्तिस्मा झाला. म्हणून आपण त्याच्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो यासाठी की, पित्याच्या गौरवाने ख्रिस्त जसा मेलेल्यांतून उठविला गेला तसे आम्हीही जीवनाच्या नवीनपणात चालावे.

कारण जर त्याच्या मरणाच्या प्रतिरुपाने आपण त्याच्याशी जोडलो आहोत, तर त्याच्या पुनरुत्थानाच्या प्रतिरुपाने त्याच्याशी जोडले जाऊ. आपणांला हे माहीत आहे की, आपल्यातील जुना मनुष्य ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळला गेला यासाठी की आपल्या पापमय शरीराचा नाश व्हावा व यापुढे आपण पापाचे दास होऊ नये. कारण जो कोणी ख्रिस्ताबरोबर मरतो तो पापापासून मुक्त होऊन नीतिमान होतो.

आणि जर आपण ख्रिस्ताबरोबर मेलो तर आम्ही विश्वास धरतो की, त्याच्याबरोबर जिवंतही राहू. कारण आम्हांस माहीत आहे की, ख्रिस्त जो मेलेल्यांतून उठविला गेला तो यापुढे मरणार नाही. मरणाची त्याच्यावर सत्ता चालणार नाही. 10 जे मरण तो मेला ते एकदाच पापासाठी मेला, परंतु जे जीवन तो जगतो ते तो देवासाठी जगतो. 11 त्याच रीतीने तुम्ही स्वतःला पापाला मेलेले पण ख्रिस्त येशूमध्ये व देवासाठी जिवंत असे समजा.

12 यासाठी की तुम्ही पापाच्या वाईट वासना पाळाव्यात म्हणून पापाने तुमच्यावर राज्य करु नये. 13 आणि अनीतिची साधने व्हावीत म्हणून तुम्ही आपल्या शरीराचे अवयव पापाच्या स्वाधीन करु नका. त्याऐवाजी तुम्ही जे मरणातून उठविलेले लोक व जे आता जिवंत आहात ते आपणांला देवाच्या स्वाधीन करा. आपल्या शरीराचे अवयव नीतीची साधने व्हावीत म्हणून देवाच्या स्वाधीन करा. 14 पाप तुम्हांवर राज्य करणार नाही. कारण तुम्ही नियमशास्त्राधीन नाही तर देवाच्या कृपेच्या अधीन आहात.

नीतिमतेचे दास

15 तर मग आपण काय करावे? आपण नियमशास्त्राधीन नसून देवाच्या कृपेच्या अधीन आहोत म्हणून पाप करावे काय? 16 खात्रीने नाही. तुम्हांला माहीत नाही काय की जेव्हा तुम्ही स्वतःला आज्ञापालना करता एखाद्याच्या स्वाधीन करता तर ज्याची आज्ञा तुम्ही पाळता त्याचे गुलाम आहात. तुम्ही पापांत चालू शकता किंवा देवाची आज्ञा पाळू शकता. पापांमुळे आध्यात्मिक मरण येते. पण देवाची आज्ञा पाळल्याने तुम्हांला नीतिमत्व मिळते. 17 पूर्वी तुम्ही पापाचे गुलाम होता. पाप तुम्हांला काबूत ठेवीत होते. पण देवाचे उपकार मानू या की, ज्या गोष्टी तुम्हांला शिकविल्या गेल्या त्या तुम्ही पूर्णपणे पाळल्या. 18 तुम्हांला पापांपासून मुक्त केले गेले. आणि नीतिमत्वाचे गुलाम करण्यात आले. 19 तुमच्या शरीराच्या दुर्बलतेमुळे व लोकांना समजावे म्हणून मी उदाहरणाचा उपयोग करीत आहे. कारण जसे तुम्ही आपले अवयव अशुद्धतेच्या आणि परिणाम म्हणून गुलाम होण्यासाठी स्वैरतेच्या अधीन केले त्याच रीतीने आता आपल्या शरीराचे अवयव देवाच्या सेवेला नीतिमत्वाचे गुलाम व्हावे म्हणून अर्पण करा.

20 कारण जेव्हा तुम्ही पापाचे गुलाम होता, तेव्हा नीतिमत्वासंबंधाने मोकळे होता. 21 आणि त्यावेळेला तुम्हांला काय फळ मिळाले, त्या गोष्टीची तुम्हांला आता लाज वाटते, ज्याचा शेवट मरण आहे. 22 परंतु आता तुम्हांला पापापासून मुक्त करुन देवाचे गुलाम केले आहे. देवाच्या सेवेसाठी तुमचे फळ तुम्हांला मिळाले आहे व त्याचा शेवटचा परिणाम म्हणजे अनंतकाळचे जीवन आहे. 23 कारण पापाची मजुरी मरण आहे. परंतु देवाची ख्रिस्त येशूमध्ये दिलेली मोफत देणगी म्हणजे अनंतकाळचे जीवन आहे.