A A A A A
Bible Book List

रूथ 4 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

बवाज आणि दुसरा आप्त

बवाज मग वेशीजवळ चावडीपाशी गेला. तो नातलग दिसेपर्यंत तिथे थांबला. त्याला पाहिल्यावर बवाजने त्याला प्रेमाने बोलावले. आणि जवळ बसायला सांगितले, तो माणूस आला आणि बवाजच्या जवळ बसला.

बवाजने मग काही साक्षीदांरानाही गोळा केले. गावातील दहा ज्येष्ठ मंडळींना बोलावले. त्यांनाही बसवून घेतले.

मग बवाज त्या नातेवाईकाला म्हणाला, “हे पाहा, नामी मवाबच्या डोंगराळ प्रदेशातून आली आहे. अलीमलेखच्या मालकीची जमीन तिने विकायला काढली आहे. हे पंच आणि ज्येष्ठ मंडळी यांच्या साक्षीने तुला हे मी सांगायचे ठरवले आहे. ही जमीन तुला परत विकत घ्यायची असल्यास तू घेऊ शकतोस. पण नसेल तर तसे मला सांग ही जमीन परत विकत घेण्याचा तुझ्यानंतर माझाच हक्क आहे. तेव्हा तू ती विकत घेणार नसलास तर मी घेईन.”

पूढे बवाज म्हणाला, “नामीची जमीन घेतलीस तर मवाबहून आलेली विधवा रूथसुद्धा तुझी पत्नी होईल. तिला मुल झाले की जमीन त्याच्या ताब्यात जाईल. म्हणजे जमीनीचा ताबा तिच्या मृत पतीच्याच कुटुंबात राहील.”

यावर तो आप्त म्हणाला, “मी काही ती जमीन घेत नाही. मीच खरे तर ती घ्यायला हवी, पण मला ते शक्य नाही कारण त्यामुळे कदाचित् मी माझ्या स्वतःच्या जमिनीला मुकेन. [a] तेव्हा तू ती खुशाल घेऊ शकतोस.” (पूर्वी इस्राएलमध्ये गहांण टाकलेल्या जमिनीची ती सोडवून घेण्याचे व्यवहार करताना खरेदीचा पुरावा म्हणून तो माणूस पायातला जोडा काढून दूसऱ्याला देत असे.) त्यानुसार तो नातलग म्हणाला, “जमीन तूच विकत घे” आणि आपला जोडा काढून त्याने बवाजला दिला.

बवाज मग तेथील सर्व श्रेष्ठवडीलधाऱ्या साक्षीदारांना म्हणाला, “आज तुमच्या साक्षीने मी अलीमलेख, खिल्योन, महलोन यांच्या मालकीचे सर्व काही नामीकडून विकत घेत आहे. 10 रूथलाही बायको म्हणून मी विकत घेतो. म्हणजे या मृत व्यक्तींची मिळकत त्यांच्याच घराण्यात राहिल. त्यांचे नाव त्यांच्या कुळातून, वतनातून पुसले जाणार नाही. तुम्ही या सगळ्याला साक्षी आहात.”

11 अशाप्रकारे वेशीपाशी जमलेले सर्व लोक आणि वडीलधारी माणसे म्हणाले, परमेश्वर कृपेने तुझ्याकडे येणारी स्त्री, इस्राएल घराण्याची स्थापना करणाऱ्या राहेल व लेआ यांच्यासारखी होवो. एफ्राथा येथे तू कर्ता पुरूष हो. बेथलेहेममध्ये प्रख्यात हो. 12 तामारने यहूदापासून पेरेसला जन्म दिला त्याचे कूळ थोर झाले तशीच तुलाही परमेश्वराच्या कृपेने रूथपासून भरपूर संतती होवो. त्याच्यासारखेच तुझे घराणे मोठे होवो.

13 त्यानंतर बवाजने रूथशी लग्न केले. तिला परमेश्वराच्या दयेने दिवस राहून मुलगा झाला. 14 गावातील बायका नामीला म्हणाल्या, परमेश्वर धन्य आहे त्याने तुला हा मुलगा. [b] दिला तो इस्राएलमध्ये किर्तिवंत होईल. 15 तुमचे तो पुनरूज्जीवन करेल वृध्दापकाळी तो तुमची काळजी घेईल तुझ्या सुनेमुळे हे झाले तिने तुला हा मुलगा दिला तिचे तुझ्यावर प्रेम आहे. सात मुलांपेक्षाही तिची थोरवी आधिक आहे.

16 नामीने बाळाला घेतले, आपल्या कुशीत घेतले. त्याचे संगोपन केले. 17 शेजाऱ्यांनी त्याचे नाव ठेवले. बायका म्हणाल्या, “नामीलाच हा मुलगा झाला आहे.” मग शेजारणींनी त्याचे नाव ओबेद ठेवले. ओबेद इशायचा पिता झाला. इशाय राजा दावीदचा पिता झाला.

रूथ आणि बवाजची वंशावळ

18 पेरेसची वंशावळ खालील प्रमाणे:

हस्तोनचा पिता पेरेस.

19 हेस्तोन रामचा पिता.

राम अम्मीनादाबचा पिता.

20 अम्मीनादाब नहशोनचा पिता.

नहशोन सल्मोनचा पिता.

21 सल्मोन बवाजचा पिता.

बवाज ओबेदचा पिता.

22 ओबेद इशायचा पिता.

इशाय दावीदचा पिता.

Footnotes:

  1. रूथ 4:6 जमिनीला मुकेन याचा अर्थ असा रूथशी लन्ग केल्यामुळे त्याची पहिली बायको आणी मुले यांचा त्याच्या जमिनीतील हिस्सा कमी होईल.
  2. रूथ 4:14 मुलगा रक्षण करणारा किंवा सोडवणूक करणारा या अर्थाने इथे हा शब्द वापरला आहे. आता हा मुलगा नामीच्या घरादाराची काळजी घेईल आणि अलीमलेखचे नाव पुढे चालवील असा त्या बायकांच्या म्हणण्याचा अर्थ.
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes