A A A A A
Bible Book List

योहान 2 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

काना येथील लग्न

दोन दिवसांनी गलीलातील काना गावी एक लग्न होते. येशूची आई तेथे होती. येशू व त्याचे शिष्य यांनाही लग्नाला बोलाविले होते. लग्नात पुरेसा द्राक्षारस नव्हता. सगळा द्राक्षारस संपला. तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, “त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही.”

येशूने उतर दिले, “आई, तू मला यात का गुंतवितेस? माझी वेळ अजून आलेली नाही.”

येशूची आई नोकरांना म्हणाली, “येशू तुम्हांला सांगेल तसे करा.”

त्या ठिकाणी दगडाचे सहा मोठे रांजण होते, यहूदी लोक विशेष विधीप्रसंगी धुण्यासाठी [a] पाणि ठेवण्यासाठी हे रांजण वापरीत असत. प्रत्येक रांजणात वीस ते तीस बादल्या पाणी मावत असे.

येशू नोकरांना म्हणाला, “हे रांजण पाण्याने भरा.” मग नोकरांनी ते रांजण काठोकाठ भरले.

मग येशू नोकरांना म्हणाला, “आता यातील काही पाणी काढा आणि ते भोजनप्रमुखाकडे न्या.”

मग नोकर ते पाणी घेऊन भोजनप्रमुखाकडे गेले. मग लग्नसमारंभातील भोजनप्रमुखाने ते चाखून पाहिले, तर पाण्याचा द्राक्षारस झालेला होता. तो द्राक्षारस कोठून आला हे त्या माणसाला माहीत नव्हते. परंतु ज्या नोकरांनी ते पाणी नेले होते त्यांना तो द्राक्षारस कोठून आला होता हे माहीत होते. लग्नसमारंभाच्या भोजनप्रमुखाने वराला बोलाविले. 10 तो वराला म्हणाला, “लोक नेहमी उत्तम द्राक्षारस पहिल्यांदा वाढतात. नंतर पाहुणे भरपूर प्याले म्हणजे मग लोक हलक्या प्रतीचा वाढतात. परंतु तू तर उत्तम द्राक्षारस अजून राखून ठेवला आहेस.”

11 स्वर्गीय सामर्थ्याचे चिन्ह म्हणून येशूने केलेला हा पहिला चमत्कार होता. गालीलातील काना येथे येशूने हा चमत्कार केला. आणि येशूने आपली महानता दाखवून दिली. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.

12 नंतर येशू कफर्णहूम गावी गेला. येशूची आई, भाऊ व त्याचे शिष्य त्याच्यासोबत गेले. ते सर्व काही दिवस कफर्णहूमास राहिले.

येशू मंदिरात जातो

13 यहूदी लोकांचा वल्हांडण सण अगदी जवळ आला होता, म्हणून येशू यरुशलेमला गेला. 14 येशू यरुशलेम येथील मंदिरात गेला. येशूला मंदिरात गुरे, मेंढ्या आणि कबुतरे विकणारी माणसे दिसली. काही माणसे मेज मांडून बसल्याचे त्याने पाहिले. ती माणसे लोकांना पैसे बदलून देण्याचा व्यापार करीत होती. 15 येशूने दोऱ्यांचे तुकडे जोडून एक चाबूक तयार केला. मग येशूने त्या सर्वाना तसेच मेंढ्यांना व गुरांना मंदिरातून हाकलून दिले. लोकांच्या पैशाचा व्यापार करणाऱ्यांचे मेज उलथेपालथे केले आणि त्यांचे पैसे विस्कटून टाकले. 16 येशू कबुतरे विकणाऱ्यांना म्हणाला, “या सर्व गोष्टी येथून घेऊन जा. माझ्या पित्याचे घर विकणाऱ्याची व विकत घेणाऱ्याची बाजारपेठ बनवू नका!”

17 हे घडले तेव्हा येशूच्या शिष्यांना पवित्र शास्त्रात जे लिहिले होते त्याची आठवण झाली:

“तुझ्या मंदिराच्या आवेशाने मला ग्रासून टाकले जाईल”

18 यहूदी लोक येशूला म्हणाले, “एखादा चमत्कार करुन आम्हांला चिन्ह दाखवा. आणि या गोष्टी करण्याचा तुम्हांला अधिकार आहे हे सिद्द करा.”

19 येशूने उत्तर दिले, “हे मंदिर नष्ट करा म्हणजे मी ते तीन दिवसांत पुन्हा उभारीन.”

20 यहूदी लोक म्हणाले, “लोकांना हे मंदिर बांधण्यासाठी शेहेचाळीस वर्षे लागली! आणि तुम्ही ते तीन दिवसांत बांधू शकता यावर तुमचा खरोखरच विश्वास आहे काय?”

21 (परंतु येशू मंदिराविषयी म्हणजे स्वतःच्या शरीराविषयी बोलला. 22 नंतर येशू मेलेल्यांतून पुन्हा उठविला गेला, तेव्हा त्याच्या शिष्यांना तो हे बोलल्याचे आठवले. आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्याविषयी लिहिलेल्या पवित्र शास्त्रावर आणि जे शब्द येशू बोलला त्यावर विश्वास ठेवला.)

23 वल्हांडण सणासाठी येशू यरुशलेमात होता. पुष्कळ लोकांनी येशूवर विश्वास ठेवला कारण तो करीत असलेले चमत्कार त्यांनी पाहिले. 24 परंतु येशूने त्यांच्यावर भरवसा ठेवला नाही. कारण येशूला त्यांचे विचार माहीत होते. 25 लोकांविषयी कोणी येशूला सांगावे याची त्याला काहीच गरज नव्हती. लोकांच्या मनात काय आहे हे येशू जाणून होता.

Footnotes:

  1. योहान 2:6 विधीप्रसंगी धुण्यासाठी यहूदी लोकांचे धुण्यासंबंधीचे विशेष नियम होते. म्हणजे जेवणापूवी, उपासनेपूवी व इतर विशेष प्रसंगी.
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes