A A A A A
Bible Book List

योहान 19 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

19 मग पिलाताने येशूला नेऊन फटके मारण्याची आज्ञा दिली. आणि शिपायांनी काट्यांचा मुगुट गुंफून तो त्याच्या डोक्यात घातला, व त्याला जांभळे वस्त्र घातले. ते त्याच्याजवळ वारंवार येऊन त्याला म्हणाले, “हे यहूद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असो!” आणि त्यांनी त्याच्या तोंडावर मारले.

पुन्हा एकदा पिलात बाहेर आला आणि यहूद्यांना म्हणाला, “पाहा! मी त्याला बाहेर तुमच्याकडे आणत आहे, तुम्हांला हे समजावे म्हणून की, मला त्याच्यावर दोषारोप ठेवायला कोणतेच कारण सापडत नाही.” जेव्हा येशू काट्यांचा मुगुट व जांभळी वस्त्रे घालून बाहेर आला, तेव्हा पिलात त्यांना म्हणाला, “हा पहा तो मनुष्य!”

मुख्य याजक व त्यांचे रक्षक त्याला पाहताक्षणीच मोठ्याने ओरडले, “त्याला वधस्तंभावर खिळा! वधस्तंभावर खिळा!”

पण पिलाताने उत्तर दिले, “तुम्ही त्याला घ्या व वधस्तंभावर खिळा. माझ्या दृष्टीने त्याच्यावर आरोप ठेवण्यास कोणतेही कारण मला दिसत नाही.”

यहूद्यांनी जोर देऊन म्हटले, “आम्हांला नियमशास्त्र आहे, आणि त्या नियमशास्त्राप्रमाणे त्याने मेलेच पाहिजे. कारण त्याने स्वतःदेवाचा पुत्र असल्याचा दावा केला.”

जेव्हा पिलाताने हे ऐकले, तेव्हा तो अधिकच घाबरला. आणि तो आत राजवाड्यात परत गेला. येशूला त्याने विचारले, “तू कोठून आला आहेस?” पण येशूने त्याला उत्तर दिले नाही. 10 पिलात म्हणाला, “तू माझ्याशी बोलण्यास नकार देतोस काय? तुला वधस्तंभावर खिळण्याची किंवा मुक्त करण्याची ताकद मला आहे, हे तुला समजत नाही का?”

11 येशूने उत्तर दिले, “जर वरून अधिकार देण्यात आला नसता, तर तुला माझ्यावर अधिकार नसता. म्हणून ज्याने मला तुझ्या स्वाधीन केले तो महान पापाचा दोषी आहे.”

12 तेव्हापासून पिलाताने येशूला सोडण्याचा प्रयत्न केला, पण यहूदी मोठमोठयाने ओरडत राहिले, “जर तुम्ही या माणसाला जाऊ दिले, तर तुम्ही कैसराचे मित्र नाही. जो कोणी स्वतः राजा असल्याचा दावा करतो, तो कैसराला विरोध करतो.”

13 जेव्हा पिलाताने हे ऐकले, तेव्हा त्याने येशूला बाहेर आणले आणि “फरसबंदी नावाची जागा,” (जिला इब्री भोषेत गब्बाथा) म्हणतात तेथे तो न्यायासनावर बसला. 14 तो तर वल्हांडणाची तयारी करण्याचा दिवस असून दुपारची वेळ झाली होती.पिलात त्या यहूद्यांना म्हणाला, “पहा हा तुमचा राजा.”

15 यहूदी ओरडले, “त्याला घेऊन जा! त्याला घेऊन जा! आणि वधस्तंभावर खिळून मारा!”

पिलाताने त्यांना विचारले, “मी तुमच्या राजाला वधस्तंभी द्यावे काय?”

मुख्य याजकांनी उत्तर दिले, “आम्हांला कैसराशिवाय दुसरा कोणी राजा नाही.”

16 मग त्याने त्याला वधस्तंभी खिळण्यासाठी त्यांच्या हाती दिले.

येशूला वधस्तंभावर खिळून मारतात

मग शिपायांनी येशूचा ताबा घेतला. 17 येशूने स्वतःचा वधस्तंभ वाहिला. तो बाहेर कवटीची जागा म्हटलेल्या ठिकाणी गेला. (इब्री भाषेत त्याला गुलगुथा म्हणतात.) 18 गुलगुथा येथे त्यांनी येशूला वधस्तंभावर खिळ्यांनी ठोकले. त्यांनी आणखी दोन मनुष्यांनासुद्वा वधस्तंभावर खिळले. त्या दोघांना त्यांनी येशूच्या दोन्ही बाजूंना खिळले व मध्ये येशूला खिळले.

19 आणि पिलाताने एक वाक्य लिहिले आणि ते वधस्तंभावर लावले. त्यावर असे लिहिले होते की, “ येशू नासरेथकर-यहूद्यांचा राजा.” 20 ती पाटी यहूदी भाषेत लिहिली होती. पुष्कळ यहूदी लोकांनी ती पाटी वाचली, कारण येशूला जेथे वधस्तंभावर देण्यात आले होते ते ठिकाण शहराच्या जवळ होते. तसेच ते लॅटीन, ग्रीक, आरामी भाषेतही होते.

21 यहुद्यांच्या मुख्य याजकांनी पिलाताला विरोध केला. ते म्हणाले, “‘यहूद्यांचा राजा’ असे लिहू नका तर हा मनुष्य यहूदी लोकांचा राजा आहे, ‘असा दावा करतो, असे लिहा.’”

22 पिलाताने म्हटले, “मी जे लिहिले ते लिहिले.”

23 जेव्हा शिपायांनी येशूला वधस्तंभावर खिळले, तेव्हा त्यांनी त्याची वस्त्रे घेतली. आणि चौघात ती वाटून घेतली. फक्त अंतर्वस्त्रे ठेवली. हा पोशाख वरपासून खालपर्यंत पूर्ण विणलेला होता. त्याला शिवलेले नव्हते. 24 म्हणून ते एकमेकांस म्हणाले, “हा आपण फाडू नये, तर यासाठी चिठ्ठ्या टाकून कोणाला मिळतो ते ठरवू या.” हे यासाठी घडले की, पवित्र शास्त्रात जे लिहिले होते ते पूर्ण व्हावे.

“त्यांनी माझी वस्त्रे आपआपसांत वाटून घेतली
    आणि माझ्या वस्त्रासाठी चिठ्ठ्या टाकल्या.”

म्हणून शिपायांनी असे केले.

25 येशूच्या वधस्तंभाशोजारी त्याची आई, त्याच्या आईची बहीण, क्लोपाची आई मरीया आणि मरीया मग्दालिया उभ्या होत्या. 26 जेव्हा येशूने त्याच्या आईला तेथे पाहिले. आणि ज्या शिष्यावर त्याची प्रीति होती तो जवळच उभा होता, तेव्हा तो त्याच्या आईला म्हणाला, “आई, हा तुझा मुलगा आहे,” 27 आणि त्या शिष्याला येशू म्हणाला, “ही तुझी आई आहे.” म्हणून त्या दिवसापासून या शिष्याने तिला आपल्या घरी नेले.

येशू प्राण सोडतो

28 नंतर, हे ओळखून की आता सर्व पूर्ण झाले आहे, आणि पवित्र शास्त्रातील वचनांची परिपूर्ती व्हावी म्हणून, येशू म्हणाला, “मला तहान लागली आहे.” 29 तेथे एक आंब भरून ठेवलेले भांडे होते, म्हणून त्यांनी बोळा आंबेत बुडवून भरून एजोबाच्या काठीवर ठेवून त्याच्या तोंडला लावला. 30 येशू आंब घेतल्यावर म्हणाला, “पूर्ण झाले आहे.” मग त्याने आपले डोके लववून आपला आत्मा सोडून दिला.

31 तो तयारीचा दिवस होता व दुसऱ्या दिवशी विशेष शब्बाथाचा दिवस होता. शब्बाथ दिवशी शरीरे वधस्तंभावर राहू नयेत अशी यहूदी लोकांची इच्छा होती. त्यांनी पिलाताला पाय तोडण्याची आणि शरीरे वधस्तंभावरून खाली घेण्याविषयी विचारले, 32 म्हणून शिपायांनी येऊन येशूबरोबर वधस्तंभी खिळलेल्या पहिल्याचे व नंतर दुसऱ्याचे पाय मोडून टाकले. 33 पण जेव्हा ते येशूकडे आले. तेव्हा त्यांना आढळून आले की, तो अगोदरच मेला आहे. तेव्हा त्यांनी त्याचे पाय मोडले नाहीत.

34 तरी शिपायांपैकी एकाने त्याच्या कुशीत भाला भोसकला, तेव्हा लगेच रक्त आणि पाणी बाहेर निघाले. 35 ज्या मनुष्याने हे पाहिले, त्याने साक्ष दिली आहे आणि त्याची साक्ष खरी आहे. त्याला माहीत आहे की, तो खरे बोलतो व तो साक्ष देतो यासाठी की, तुम्ही विश्वास धरावा. 36 या गोष्टी अशासाठी घडल्या की, पवित्र शास्त्राची परिपूर्ती व्हावी: “त्याचे एकही हाड मोडणार नाही.” [a] 37 आणि दुसऱ्या शास्रभागात म्हटले आहे: “ज्याला त्यांनी भोसकले त्याला ते पाहतील.” [b]

येशूला कबरेत ठेवतात

38 नंतर अरिमथाई येथील योसेफाने पिलातला येशूचे शरीर मागितले. योसेफ हा येशूचा शिष्य होता, पण गुप्त रीतीने, कारण त्याला यहूद्यांची भीति वाटत होती. पिलाताच्या परवानगीने तो आला व शरीर घेऊन गेला.

39 त्याच्याबरोबर निकदेम होता. याच मनुष्याने रात्रीच्या वेळी येशूची भेट घेतली होती. निकदेम शंभर पौंड [c] गंधरस व अगरू [d] घेऊन आला. 40 मग त्यांनी येशूचे शरीर घेतले आणि यहूदी लोकांच्या प्रेत पुरण्याच्या रीतीप्रमाणे सुगंधित द्रव्यासहित तागांनी ते गुंडाळले. 41 जेथे त्याला वधस्तंभी मारले होते तेथे एक बाग होती. आणि त्या बागेत एक नवीन थडगे होते, व त्या थडग्यात आतापर्यंत कोणालाच ठेवलेले नव्हते. 42 तो यहूद्यांच्या सणाच्या पूर्वतयारीचा दिवस असल्याने व ते थडगे जवळ असल्याने त्यांनी येशूला तेथेच ठेवले.

Footnotes:

  1. योहान 19:36 पाहा स्तोत्र. 34:20; निर्गम. 12:46; गणना 9:12
  2. योहान 19:37 पाहा जखऱ्या 12:10
  3. योहान 19:39 100 रोमी पौंड आजच्या 75 पौडाइतके.
  4. योहान 19:39 गंधरस व अगरु सुंदर सुवास असलेले मसाल्याचे पदार्थ. अत्तर म्हणून उपयोग, तसेव शरीराला लावण्यास.
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes