A A A A A
Bible Book List

यिर्मया 5 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

यहुदाच्या लोकांचे पाप

परमेश्वर म्हणतो, “यरुशलेमच्या रस्त्यावरुन चाला. सभोवती पाहा आणि या गोष्टींचा विचार करा. नगरातील चव्हाटे शोधा. जो सत्याचा शोध घेतो, जो सच्चेपणाने वागतो असा एखादा सज्जन माणूस सापडू शकतो का ते पाहा. जर तुम्हाला एक तरी सज्जन व सत्यशील माणूस सापडला तरी मी यरुशलेमला क्षमा करीन. लोक शपथ घेतात आणि म्हणतात, ‘परमेश्वर असेपर्यंत.’ पण ते काही त्यांच्या मनात नसते.”

हे परमेश्वरा, मला माहीत आहे की तुझ्या लोकांनी तुझ्याशी
    एकनिष्ठपणे वागायला हवे आहे.
तू यहूदातील लोकांना चोपलेस
    पण त्यांना काही वेदना झाल्या नाहीत.
तू त्यांचा नाश केलास,
    पण त्यांनी धडा शिकण्यास नकार दिला.
ते फार दुराग्रही झालेत.
    त्यांनी केलेल्या वाईट कृत्यांबद्दल त्यांना खेद वाटला नाही.

पण मी (यिर्मया) मनाशी म्हणालो,
“गरीब लोकच एवढे मूर्ख असले पाहिजेत.
    परमेश्वराच्या चालीरिती ते शिकलेले नाहीत.
    त्यांना, त्यांच्या देवाची शिकवण माहीत नाही.
म्हणून मी यहुदाच्या नेत्यांकडे जाऊन त्यांच्याशी बोलेन.
    नेत्यांना परमेश्वराच्या चालीरिती नक्कीच माहीत असतात.
त्यांना त्यांच्या देवाचे नियम माहीत असतात.
    ह्याची मला खात्री आहे!”
पण परमेश्वराच्या सेवेतून मुक्त होण्यासाठी
    सर्व नेते एकत्र जमले होते.
ते देवाच्या विरुद्ध् गेले म्हणून जंगलातील सिंह त्यांच्यावर हल्ला करील.
    जंगलातील लांडगा त्यांना ठार मारील.
चित्ता त्यांच्या शहराजवळ लपला आहे.
    शहरातून बाहेर येणाऱ्या प्रत्येकाचे तो तुकडे तुकडे करील.
यहूदातील लोकांनी पुन्हा पापे केल्याने हे घडून येईल.
    ते, अनेक वेळा, देवापासून दूर भटकत गेले आहेत.

देव म्हणाला, “यहूदा, मी तुला क्षमा करावी म्हणून तू मला एक तरी सबळ कारण सांग.
    तुझ्या मुलांनी माझा त्याग केला.
    त्यांनी मूर्तींपुढे शपथा वाहिल्या.
    पण त्या मूर्ती म्हणजे खरे देव नव्हेत.
तुझ्या मुलांना पाहिजे ते सर्व मी दिले.
    पण तरी त्यांनी माझा विश्वासघात केला.
    त्यांनी आपला बराच वेळ वारांगनेबरोबर घालविला.
ते लोक, भरपूर खाद्य खाणाऱ्या व समागमाला तयार असणाऱ्या घोड्यांप्रमाणे आहेत.
    शेजाऱ्याच्या बायकोला वासनेने हाका मारणाऱ्या घोड्यांप्रमाणे ते आहेत.
ह्या कर्मांबद्दल मी यहूदातील लोकांना शिक्षा करावी का?”
हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
“हो! अशा रीतीने जीवन जगणाऱ्या राष्ट्राला मी शिक्षा करीनच, हे तू जाणतेस.
    त्यांच्या लायकीप्रमाणे मी त्यांना शिक्षा करीन.

10 “यहूदाच्या द्राक्षवेलींच्या रांगातून जा.
    वेली तोडून टाका (पण त्यांचा संपूर्ण नाश करु नका)
    त्यांच्या फांद्या तोडा.
    का? ह्या फांद्या परमेश्वराच्या मालकीच्या नाहीत.
11 यहूदा व इस्राएल येथील घराणी, प्रत्येक बाबतीत,
    माझा विश्वासघात करीत आली आहेत.”
हा परमेश्वराचा संदेश आहे.

12 “हे लोक परमेश्वराबद्दल खोटे बोलले.
ते म्हणाले आहेत, ‘परमेश्वर आम्हाला काही करणार नाही.
    आमचे काही वाईट होणार नाही.
    आमच्यावर हल्ला झालेला आम्ही कधी पाहणार नाही.
    आम्ही कधी उपाशी राहणार नाही.’
13 खोटे संदेष्टे पोकळ वाऱ्या प्रमाणे आहेत.
    देवाचे शब्द त्यांच्याजवळ नाहीत [a] त्यांचे वाईट होईल.”

14 सर्वशक्तिमान परमेश्वराने पुढील गोष्टी सांगितल्या.
“मी त्यांना शिक्षा करणार नाही असे ते लोक म्हणाले म्हणून,
यिर्मया, मी जे शब्द तुला देतो, ते आगीप्रमाणे असतील,
    ते लोक लाकडाप्रमाणे असतील,
ती आग त्यांना पूर्णपणे जाळून टाकील.”
15 इस्राएलच्या वारसांनो हा परमेश्वराचा संदेश आहे.
“दूरवरच्या राष्ट्राला मी, तुमच्यावर हल्ला करण्यासाठी लवकरच आणीन.
ते शक्तिशाली राष्ट्र आहे.
    ते प्राचीन राष्ट्र आहे.
त्या राष्ट्रांतील लोक तुम्हाला माहीत नसणारी भाषा बोलतात.
    ते काय बोलतात ते तुम्ही समजू शकणार नाही.
16 त्यांचे भाते उघड्या थडग्यांप्रमाणे आहेत.
    त्यांची सर्व माणसे शक्तिशाली सैनिक आहेत.
17 तुम्ही गोळा केलेले सर्व धान्य ते खातील.
    ते तुमचे सर्व अन्न खाऊन टाकतील.
ते तुमच्या मुलामुलींना खाऊन टाकतील (त्यांचा नाश करतील) ते तुमची गुरे, शेळ्या, मेंढ्या खातील.
    ते तुमची द्राक्षे आणि अंजिरे फस्त करतील.
त्यांच्या तलवारीच्या जोरावर ते तुमच्या मजबूत शहरांचा नाश करतील.
    तुम्ही ज्या शहरांवर विसंबता ती भक्कम शहरे ते नष्ट करतील.”

18 “पण जेव्हा ते भयानक दिवस येतील.
हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे,
    तेव्हा, यहूदा, मी तुझा संपूर्ण नाश करणार नाही.
19 यहूदाचे लोक तुला विचारतील,
    ‘यिर्मया, आमच्या परमेश्वर देवाने आमचे असे वाईट का केले?’
त्यांना पुढील उत्तर दे,
‘यहूदाच्या लोकांनो, तुम्ही परमेश्वराला सोडले
    आणि तुमच्या देशात तुम्ही परक्या मूर्तींची सेवा केली.
तुम्ही असे वागलात म्हणून आता
    तुम्ही परक्या देशात परक्यांचीच सेवा कराल.’”

20 परमेश्वर म्हणाला, “याकोबाच्या वंशजांना
    आणि यहूदातील राष्ट्रांना हा संदेश द्या.
21 ऐका! तुम्हा मूर्खांना अक्कल नाही.
    तुम्हाला डोळे असून दिसत नाही
    कान असून ऐकू येत नाही.
22 खरोखर तुम्हाला माझी भिती वाटते.”
हा परमेश्वराचा संदेश आहे.
“माझ्यापुढे तुम्ही भीतीने थरथर कापावे.
    समुद्राला सीमा असावी म्हणून समुद्रकिनारे निर्माण करणारा मी एकमेव आहे.
    पाणी अखंड जागच्या जागी राहावे म्हणून मी असे केले.
    लाटा कधी किनाऱ्यावर आक्रमण करतात.
    पण त्या किनाऱ्याचा नाश करीत नाहीत.
    लाटा गर्जना करीत कधी कधी आत येतात, पण त्या किनाऱ्याच्या बाहेर जाऊ शकत नाहीत.
23 पण यहूदाचे लोक दुराग्रही आहेत.
    ते नेहमीच माझ्याविरुद्ध् जाण्यासाठी मार्ग आखत असतात.
    ते माझ्यापासून दूर गेले आणि त्यांनी माझा त्याग केला.
24 यहूदातील लोक आपल्या मनाशी असे कधीही म्हणत नाहीत
    ‘आपण आपल्या परमेश्वर देवाला घाबरु या आणि त्याचा मान राखू या.
    योग्य वेळेला तो आपल्याला आगोटीचा व वळवाचा पाऊस देतो.
    योग्य वेळी आपल्याला कापणी करता येईल, ह्याची तो खात्री करुन घेतो.’
25 यहूदातील लोकांनो, तुम्ही पाप केलेत म्हणूनच पावसाळा व सुगीचा हंगाम आला नाही.
    तुमच्या पापांनी परमेश्वराकडून मिळणाऱ्या ह्या चांगल्या गोष्टींचा आनंद तुमच्यापासून हिरावून घेतला आहे.
26 माझ्या माणसांत काही दुष्ट आहेत.
    ते फासेपारध्यांप्रमाणे आहेत.
हे लोक जाळे पसरवितात,
    पण पक्ष्यांना पकडण्या ऐवजी ते माणसांना पकडतात.
27 पक्ष्यांनी पिंजरे भरावेत तशी ह्या
    दुष्टांची घरे कपटांनी भरलेली असतात.
त्यांच्या कपटांनी त्यांना श्रीमंत व शक्तिशाली बनविले.
28     त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांमुळे ते पुष्ट व लठ्ठ झाले आहेत.
त्यांच्या दुष्कृत्यांना अंत नाही.
    ते अनाथांच्या वतीने बोलणार नाहीत.
    ते त्यांना मदत करणार नाहीत.
    ते गरीब लोकांना योग्य न्याय मिळवून देणार नाहीत.
29 त्यांनी केलेल्या ह्या कर्मांबद्दल मी त्यांना शिक्षा करावी का?”
हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
“अशा राष्ट्राला मी शिक्षा करणार हे तुम्हाला माहीत आहे.
    त्यांना योग्य ती शिक्षा मी करीन.”

30 परमेश्वर म्हणतो, “यहूदात भयानक
    व धक्कादायक गोष्ट घडली आहे.
31 संदेष्टे खोटे सांगतात,
जे काम करण्यासाठी याजकांची निवड केली आहे, ते काम ते करणार नाहीत.
    आणि माझ्या लोकांना हे आवडते!
पण तुमची शिक्षा जवळ
    आल्यावर तुम्ही काय कराल?”

Footnotes:

  1. यिर्मया 5:13 देवाचे … त्यांच्याजवळ नाही देवाने सांगितलेले त्यांच्या मनात उतरले नाही वा त्यांच्यात उतरले नाही.
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes