A A A A A
Bible Book List

यिर्मया 48Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

मवाबसाठी संदेश

48 हा संदेश मवाब देशासाठी आहे सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलच्या लोकांचा देव असे म्हणतो:

“नबो पर्वताला वाईट काळ येईल.
    त्याचा नाश होईल
किर्याथाईमचा गर्व उत्तरेल
    ते काबीज केले जाईल
मजबूत ठिकाणे वाकतील
    त्यांचे शतश: तुकडे होतील.
पुन्हा कधीही मवाबची स्तुती ऐकू येणार नाही.
    हेशबोनमधील लोक मवाबच्या पाडावाचा बेत आखतील
ते म्हणतील, ‘या, आपण त्या देशाचा शेवट करु या.’
मदमेना, तू सुद्धा शांत होशील,
    तलवार तुझा पाठलाग करील.
होरोनाईमचा आक्रोश ऐका.
    तो गोंधळाचा व प्रंचड नाशाचा आवाज आहे.
मवाबचा नाश होईल.
    तिची लहान मुले मदतीसाठी आक्रोश करतील.
मवाबचे लोक लूहीथच्या रस्त्याने
    वर जाताना मोठ्याने रडत आहेत.
खाली, होरोनाईमच्या रस्त्यांवर
    यातनांचे व दु:खाचे विव्हळणे ऐकू येते.
पळा! जीव वाचविण्यासाठी पळा!
    वाळवंटातून उडणाऱ्या झुडुपाप्रमाणे पळा!

“तुम्ही घडविलेल्या गोष्टी व तुमची संपत्ती यावर तुम्ही भिस्त ठेवता,
    म्हणून तुम्ही पकडले जाल.
कमोश दैवत कैद केले जाईल आणि
    त्याच्याबरोबर त्याचे पुरोहित व अधिकारी यांनाही नेले जाईल.
प्रत्येक गावावर विध्वंसक येईल.
    त्यातून एकही गाव सुटणार नाही.
दरीचा नाश होईल.
    पठाराचाही नाश केला जाईल
परमेश्वराने हे घडणार म्हणून सांगितले आहे,
    तेव्हा तसे घडणारच.
मवाबच्या शेतांवर मीठ पसरा.
    देशाचे ओसाड वाळवंट होईल.
मवाबची शहरे निर्जन होतील.
    तेथे कोणीही राहणार नाही.
10 जो कोणी ‘त्या’ लोकांना मारण्यासाठी
    आपल्या तलवारीचा उपयोग करीत नसेल, त्याचे वाईट होईल.

11 “मवाबला त्रास माहीत नाही
    मवाब मुरायला ठेवलेल्या मद्याप्राणे आहे.
त्याला कधी एका रांजणातून दुसऱ्या रांजणात ओतलेले नाही.
    त्याला कधी कैद झालेली नाही.
म्हणून त्याची चव कायम आहे
    आणि त्याच्या वासात फरक नाही.”
12 देव असे म्हणतो,
“तुझ्या रांजणातून तुला ओतून टाकण्यासाठी
    मी लवकरच माणसे पाठवीन.
ते रांजण रिकामे करुन त्याचे तुकडे करतील.”

13 मग दैवत कमोश याची मवाबच्या लोकांना लाज वाटेल इस्राएलच्या लोकांनी बेथेल [a] येथील दैवतांवर भिस्त ठेवली आणि त्याने त्यांना काहीच मदत केली नाही. म्हणून ते खजील झाले मवाबचेही तसेच होईल.

14 “‘आम्ही चांगले सैनिक व शूरवीर आहोत’
    असे तुम्ही म्हणू शकत नाही.
15 शत्रू मवाबवर हल्ला करील.
    तो शहरात शिरुन त्यांचा नाश करील.
कत्तलीत तिचे उत्तम तरुण मारले जातील.”
हा राजाचा संदेश आहे,
    आणि राजाचे नाव आहे सर्वशक्तिमान परमेश्वर.
16 “मवाबचा शेवट जवळ आला आहे
    लवकरच तिचा नाश होईल.
17 त्या देशाभोवती राहणाऱ्यांनी त्यासाठी शोक करावा.
    तुम्हाला मवाबची किर्ती माहीत आहे.
    म्हणून त्याच्यासाठी शोक करा.
म्हणा, ‘राजाची सत्ता संपली
    मवाबचे सामर्थ्य व वैभव गेले’

18 “दोबोनच्या रहिवाशांनो,
    आपापल्या मानाच्या जागा खाली करा.
जमिनीवर धुळीत बसा.
    का? कारण मवाबचा विनाश करणारा येत आहे,
आणि तो तुमची मजबूत शहरे नष्ट करील.

19 “अरोएरच्या रहिवाशांनो,
    रस्त्याच्या कडेला उभे राहून पाहा!
पाहा! माणसे पळून जात आहेत
    पाहा! स्त्रियाही पळून जात आहेत
    त्यांना काय झाले ते विचारा

20 “मवाबचा नाश होईल त्याची फजिती होईल.
    मवाब आक्रोश करील.
मवाबचा नाश झाला असे आर्णोन नदीकाठच्या
    प्रदेशात जाहीर करा.
21 उंच पठारावरील लोकांना शिक्षा केली जाईल.
होलोन, याहस व मेफाथ ह्या शहरांचा
    न्यायनिवाडा झाला आहे.
22 दीबोन, नबे, बेथ-दिबलाथाईम
    ह्याही शहरांचा निवाडा झाला आहे.
23 किर्याथाईम, बेथ-गामूल
    व बेथ मौन यांचा निकाल लागला आहे.
24 करीयोथ, बसरा
    व मवाबमधील दूरची
व जवळची शहरे यांचा
    न्यायनिवाडा झाला आहे.
25 मवाबची शक्ती तोडण्यात आली आहे.
    मवाबचे हात मोडले आहेत.”
परमेश्वरानेच ह्या गोष्टी सांगितल्या.

26 “मवाब परमेश्वरापेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजला म्हणून,
तो, मद्यप्याप्रमाणे झोकांड्या खाईपर्यंत त्याला शिक्षा करा.
    तो स्वतःच्याच वांतीत पडून लोळेल.
लोक त्याची टर उडवतील.

27 “मवाब, तू इस्राएलची चेष्टा केलीस
    इस्राएल चोरांमध्ये पकडला गेला का?
इस्राएलबद्दल बोलताना, प्रत्येक वेळी,
    तू मान हलवून, स्वतः इस्राएलपेक्षा चांगला असल्याचा अभिनय केलास.
28 मवाबवासीयांनो, तुमची गावे सोडा,
    जाऊन कडेकपारीत राहा
गुहेच्या तोंडाशी घरटे
    करणाऱ्या पारव्यांप्रमाणे व्हा.”

29 “आम्ही मवाबच्या गर्वाविषयी ऐकले आहे.
    तो फारच गर्विष्ठ होता.
तो स्वतःला विशेष समजे.
    तो नेहमी बढाया मारीत असे.
    तो फारच दुराभिमानी होता.”

30 परमेश्वर म्हणतो, “मवाबला अकारण राग येतो आणि तो स्वतःबद्दल बढाया मारतो हे मला ठाऊक आहे.
    पण त्याच्या फुशारक्या खोट्या आहेत.
    तो बोलल्याप्रमाणे करु शकत नाही.
31 म्हणून मला मवाबसाठी रडू येते.
    मला त्या देशातील प्रत्येकाबद्दल वाईट वाटते.
    कीर हरेसमधील लोकांबद्दल मला वाईट वाटते.
32 याजेरसाठी मी तेथील लोकांबरोबर शोक करतो.
    सिबा, पूर्वी तुझ्या द्राक्षवेली पार समुद्रापर्यंत पसरल्या होत्या
    त्या पार याजेरपर्यंत पोहोचल्या होत्या;
पण विनाशकाने तुझी फळे व द्राक्षे नेली आहेत.
33 मवाबच्या विस्तीर्ण द्राक्षमळ्यातून आनंद व सुख निघून गेले.
द्राक्षकुंडातील द्राक्षरसाचा प्रवाह मी अडविला आहे.
द्राक्षरस काढण्यासाठी द्राक्षे तुडविताना लोक गात वा नाचत नाहीत.
तेथे हर्षकल्लोळ नाहीत.

34 “हेशबोन एलाले येथील लोक रडत आहेत. त्यांचे रडणे पार याहसपर्यंत, सोअरपासून होरानाईम व एग्लाथशलिशीयापर्यंत ऐकू येते. एवढेच नव्हे तर, निर्मीमचे पाणी सुद्धा आटले आहे. 35 मी मवाबला उच्चासनी त्याच्या दैवताला अर्पण करु देणार नाही.” परमेश्वराने असे सांगितले.

36 “मला मवाबचे फार वाईट वाटते. बासरीतून शोकसंगीताचे सूर बाहेर पडावेत, त्याप्रमाणे माझे मन रडते. मला कीर हरेसच्या लोकांबद्दल दु:ख वाटते. त्यांचा पैसा, संपत्ती सर्व काही हिरावून घेतले गेले. 37 प्रत्येकाने मुंडन व दाढी केली आहे. प्रत्येकाचा हात कापला आहे व त्यातून रक्त वाहत आहे. [b] प्रत्येकजण शोकप्रवर्तक वस्त्रे कमरे भोवती गुंडाळत आहे. 38 मवाबमध्ये प्रत्येक घराच्या धाब्यावर आणि प्रत्येक सार्वजनिक स्थानी, लोक मृतांसाठी शोक करीत आहेत. मी रिकामा रांजण फोडावा त्याप्रमाणे मवाबला फोडले, म्हणून सर्वत्र दु:ख झाले आहे.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.

39 “मवाबचे तुकडे तुकडे केले गेले. लोक रडत आहेत. मवाब शरण आला. आता तो खजील झाला आहे. लोक त्याची खिल्ली उडवितात खरे, पण घडलेल्या गोष्टीमुळे ते भयभीतही होतात.”

40 परमेश्वर म्हणतो, “पाहा! शत्रू गरुडाप्रमाणे खाली झेपावत आहे.
    तो त्याचे पंख मवाबवर पसरवीत आहे.
41 मवाबची शहरे काबीज केली जातील.
    लपण्याच्या भक्कम जागांचा पाडाव होईल.
त्या वेळी, मवाबचे सैनिक,
    प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे भयभीत होतील.
42 मवाब या राष्ट्राचा नाश होईल.
    का? कारण त्याने स्वतःला परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ मानले.”

43 परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो:
    “मवाबवासीयांनो, भीती, गर्ता आणि सापळे तुमची वाट पाहात आहेत.
44 लोक घाबरुन पळतील
    ते गर्तेत पडतील एखादा त्यातून वर आलाच,
तर तो सापळ्यात सापडेल मी मवाबवर शिक्षेचे वर्ष आणीन.”
परमेश्वराने असे सांगितले.

45 “लोक शक्तिशाली शत्रूपासून पळाले आहेत
    ते सुरक्षेतेसाठी हेशबोनला पळाले पण तेथे सुरक्षा नव्हती.
हेशबोनमध्ये आग लागली
    सीहोनच्या गावात आग लागली
    आणि ती मवाबच्या नेत्यांचा नाश करीत आहे.
    ती त्या गर्विष्ठ लोकांचा नाश करीत आहे.
46 मवाब, तुझे वाईट होणार.
    कमोशच्या लोकांचा नाश होत आहे.
तुझी मुलेमुली बंदिवान म्हणून वा कैदी [c] म्हणून नेली जात आहेत.

47 “मवाबचे लोक कैदी म्हणून नेले जातील पण पुढील दिवसांत मी त्यांना परत आणीन.” हा परमेश्वराचा संदेश होता.

येथे मवाबचा न्यायनिवाडा संपतो

Footnotes:

  1. यिर्मया 48:13 बेथेल ह्याचा अर्थ यराबाम राजाने बेथेल येथे बाधलेले मंदिर होय पाहा 1 राजा 12:28-33 तेथे अजूनही, चुकीच्या मार्गाने पूजा करीत होते, का कनानी लोकांचे खोटे देव ‘एल’ व ‘बआल’ ह्याची पूजा करीत होते हे स्पष्ट होत नाही.
  2. यिर्मया 48:37 प्रत्येकाने … वाहते आहे मृतांबद्दलचा शोक प्रदर्शित करण्यासाठी लोक असे करीत.
  3. यिर्मया 48:46 कमोश … कैदी मवाब राष्ट्राचा देव. हा अम्मोनी लोकांचा देव होता, तरी सुध्दा कमोशाला राष्ट्रीय देव मानत.
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes